गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 August, 2014 - 15:11

मानला ताईत.... बसला फास ज्याचा
पुत्र तो थरकाप उडवे काळजाचा

येथली स्थित्यंतरे त्याच्याचसाठी
आजही आहे तिच्यास्तव तोच साचा

कैफियत मांडू कशी माझी इथे मी
बोलताना वाटते जाईल वाचा

यायचा नाही तुला अंदाज माझा
लिंपलेला चेहरा, ह्रदयास खाचा

आरसा त्याच्या मनाचा तडकलेला
स्पर्शण्या धावू नको रुततील काचा

जेवढा काढायचा तो यत्न करतो
तेवढा चिखलात फसतो पाय त्याचा

लांबचा पल्ला तुला गाठायचा तर..
सोस कळ पायातली...झिजणार टाचा

पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा

-सुप्रिया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येथली स्थित्यंतरे त्याच्याचसाठी
आजही आहे तिच्यास्तव तोच साचा

कैफियत माझी कशी मांडू इथे मी
बोलताना वाटते जाईल वाचा

पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा<<<<

सुंदर शेर

छान

पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा >>> क्या बात है ..

पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा>>>> अप्रतीम!

कैफियत माझी कशी मांडू इथे मी
बोलताना वाटते जाईल वाचा

पारदर्शी कोवळ्या पानांप्रमाणे
गाठता यावा तुझ्याही तळ मनाचा

व्वा…

'हात त्या घालू नको रुततील काचा' ==> या मिसऱ्यामध्ये थोडी अजून सफाई हवी आहे माझ्या मते. (त्या -त्याला/त्यात )

एकंदर गझल मस्तच.

<<<<'हात त्या घालू नको रुततील काचा' ==> या मिसऱ्यामध्ये थोडी अजून सफाई हवी आहे माझ्या मते. (त्या -त्याला/त्यात )>>>>.

हो, मीही विचार करतेय 'त्या' वर Happy

धन्यवाद मंडळी !

-सुप्रिया.

चांगली झालीये कि? ... मला तर आवडली...!!

अवांतर -मायबोलीच्या गझलकारांचं एक वेगळंस्टँडर्ड असल्याची जाणिव काही मुशायरा"नशीन" गझलकारांनी मला करून दिलीये... Happy

शाम Happy Happy Happy