स्वामीजी

सुवर्णमध्य (पंचचामर)

Submitted by स्वामीजी on 19 August, 2014 - 13:24

बघून स्वप्न ते जगावया मिळो अशी तृषा
असून भागते कुठे, कृतीस ना तशी दिशा ?
प्रयास होत ना म्हणून अर्धस्वप्न भंगते
मलूल खिन्न रात्र ती मनामनात खंतते ॥

भरारतात पंख जे नभास साद घालण्या
तिथे न कुंपणे समर्थ हो तयास रोखण्या ।
उगाच का मनात बोल राहती उदासुनी
कशी न येत उत्तरे मुखामधून ठासुनी ?

असेल स्वावलम्ब भिस्त आपुल्या बळावरी
तया कशास सान्त्वना हवी दुज्या स्मितापरी ?
कसे बनायचे अधीन, सोबती कुणी हवे ?
पुढे चला नि आपसूक साथ धावती थवे !

असेल सौख्यलालसा तशी मिळेल यातना
म्हणून मूढ भावहीन थांबणे उपाय ना ।
मधेच भव्य उच्च लक्ष्य का कसे मिळायचे ?
पलायनास का सुवर्णमध्य नाव द्यायचे ?

विनवणी.... (कटावाची लावणी )

Submitted by स्वामीजी on 15 August, 2014 - 23:10

विनविते तुम्हा राजसा, निवान्तच बसा, विसावा घ्यावा
शिणलात म्हणुन शिणगार करत अलवार, रातिचं ऱ्हावा ।
नि:शंक झोकला देह, कवेची ठेव, समर्पण करता
करवितो कसा हा खेळ, असुनिया वेळ जायचे म्हणता ?

प्रेमात कसा अनमान, फुकाची शान, काळजी घ्यावी
थकविता किती हा देह, चेपते पाय, जराशी प्यावी ।
उतरवा मनाचा भार, उगा बेजार एकटे बनता
बहरेल दिलाची साथ, मनाची गाठ मोकळी करता ॥

कसलीच नसे मज हाव, तुम्हावर जीव म्हणुन कळवळते
पाहता कपाळी अठी, भिरभिरी दिठी, मनाशी जळते ।
जो वाघ म्हणुन पाहिला, साजणा मला आज ना दिसला
दिलदार रांगडा वीर, मनाचा धीर आज का रुसला ?

दिवसात कितीही येत, बिदागी देत ऐकती गाणी

सांजवेळ ..... (सुमन्दारमाला)

Submitted by स्वामीजी on 5 August, 2014 - 05:45

दिवा लावताना जरी सांजवेळी उजेडास आमन्त्रणे धाडली
मनाने करावे भयाचे इशारे, स्वत:चीच नाचे तिथे सावली ।
भले हात जोडून देवासमोरी मुखे प्रार्थना ती दिव्याची असे
मनी फक्त काहूर दाटून येते, कुशंका इडेची पिडेची वसे ॥१॥

निशा दाटुनी येत चोहीकडूनी, नभी चांदण्यांचा सडा घातला
अजूनी नसे चन्द्र आला समोरी, तमाचा पसारा मनी दाटला ।
किडे किर्किरोनी टिपेच्या स्वराने हवेतील अस्वस्थता वाढते
तुटूनी कशी अंगणातील झाडावरूनी सुकी काटकी वाजते ॥२॥

घरातील कोणी अजूनी न आले म्हणूनी प्रतीक्षा सुरू होतसे
उशीराच येणे जरी नित्यचे हे, मना चिंतण्याला पुरेसे असे ।

ऐक जरा ना.. (वृत्त चम्पकमाला)

Submitted by स्वामीजी on 4 August, 2014 - 02:17

सांजसकाळी कातरवेळी
गूज मनाचे ऐक जरा ना..

झांजर वारा कातळमाळी
भोकर बोरे काजळजाळी,
चाखुन घेता माधुर ओठी
बोलत जाऊ लाघव गोठी..

पाउलवाटा आड मळ्याची
धून सजावी गोड गळ्याची,
मावळतीला सूर्य बुडावा
लाजत हाती हात धरावा..


भेट घडाया मुक्त मनाची
चाहुल ना हो दूर कुणाची,
तू बरसावे बावर गाणे
स्वप्न मनीचे गोजिरवाणे..

आवरताना सावरलेले
पाझर डोळे बावरलेले,
प्रीत उरीची व्याकुळ व्हावी

भाव मनी हे, भेट घडावी..

(वृत्त चम्पकमाला - गालल गागा गालल गागा)

- स्वामीजी
(काही ठिकाणी या वृत्ताचे नाव "रुक्मवती" असे सुद्धा दिलेले आहे)

संपादन...

कुठे मनास गुंतवू....? ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ(पञ्चचामर)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:42

"कुठे मनास गुंतवू?" विचित्र प्रश्न काय हा ?
चहू दिशातुनी कुणी मनास बोलवी पहा ।
असेल पर्वणी इथे क्षणोक्षणी लहानशी
अशा सुखा जपूनिया शिदोर ठेव छानशी ॥१॥

निसर्ग रंग माखतो सदैव जीवनास रे
तयास पांघरून घे, कधी नको म्हणू पुरे ।
लहान रोपट्यावरी नव्हाळ एक पान ते
दंवात चिंबते पहा जिथे उद्या पहाटते ॥२॥

लहानग्या मुलास जोजवी कुशीत माउली
तिच्या मुखावरी पहाल तृप्तता उजाडली ।
जरी कितीक वंचना विवंचना जगात या
कृतार्थता जिण्यातली सुखात झाकते तया ॥३॥

जबाबदार जाणिवा पुनश्च मार्ग रोखती
धरून धैर्य पावले पुढील मार्ग शोधती ।
थकूनिया घरी चहा पिता मनी निवान्त तो

निसर्गनाते ㅤㅤㅤㅤㅤㅤ(पादाकुलक)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:31

नव्हाळ हिरव्या पानावरती
दंवबिन्दूंचे हिरकणगोंदण,
अस्फुट उमलत कळ्या सुगन्धी
पहाटवाऱ्याकडून आंदण..

कविमन बघते रोज अनावर
प्रमुदित होउन निसर्गवाटा,
मन्थन होउन उसळत येती
शब्दसागरा भरती लाटा..

सहजी प्रगटे निसर्गनाते
यात नसे हो प्रयत्न कसला,
आवर्जुनिया बांधिलकीच्या
आवेशाचा विचार कुठला..

अंधाराचा विरून पडदा
उजेड कानी कुजबुज करतो,
विसावलेल्या गात्रांमधला
उरला आळस दूर ढकलतो..

गोड शिरशिरी अंगावरती
हवेत भूपाळी पाझरते,
उरलासुरला आळस झटकत
नव्या दिसाचे स्वागत करते..

भले रोजचा असतो अनुभव
नवीन म्हणुनी काही नसते,
चिरंतनाच्या नवेपणाचे
नित्य नवेसे रूप झळकते..

स्वामीजींची कृपा....

Submitted by निरंजन on 4 April, 2012 - 10:19

सतत अपमान सहन करण आणि तो सुद्धा खाली मान घालुन यासारख दूसर दुःख नाही. ज्या माणसाला कर्ज काढाव लागत तो त्या कर्जापेक्षा उपकाराच्या ओझ्याखाली सतत दबलेला असतो. मग तो माणूस त्याची बायको व मुलं सर्व या माणसाचे गुलाम होतात. मुलांचे तर हाल खुप वाईट असतात. त्यांना बिचार्‍याना हेच समजत नसत की आपला सतत अपमान व राग का होतोय ? पण तो होत असतो. त्यांच्या बालमनावर त्यामुळे नेमका कॊणता परिणाम होईल हे सांगता येत नाही. काही मुलं गुन्हेगार होतात तर काही गोगलगाय होऊन आला दिवस ढकलत असतात. त्यांना स्वतःच मनच उरलेल नसत. सतत कोणाचे तरी पाय धरायचे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - स्वामीजी