कधी कधी मी
विश्वात त्याच माझ्या रमते कधी कधी मी
ज्याच्यामधे असूनी नसते कधी कधी मी
'जे जे मनात माझ्या, ते ते तुझ्या असावे!'
अंदाज बांधताना फसते कधी कधी मी
प्रीती निभावण्याची माझी त-हा निराळी...
नुसती प्रतारणाही जपते कधी कधी मी
तुलना नकोच माझी, व्याकूळ चातकाशी...
बघ कोरडी भिजुनही उरते कधी कधी मी
चटके सुसह्य होते ग्रीष्मातल्या झळांचे...
भर श्रावणातही का जळते कधी कधी मी?
पंखात जोम आहे आकाश भेदण्याचा...
छाटून पिंज-याशी अडते कधी कधी मी
गोष्टीत ऐकलेल्या गोष्टी विरुन गेल्या...
प्रत्यक्ष अनुभवांनी घडते कधी कधी मी