धर्मशाळेची दशा झाली घराची!
गझल
धर्मशाळेची दशा झाली घराची!
काळजी नाही कुणालाही कुणाची!!
नेम येण्याचा न जाण्याचा कुणाच्या;
सोय जो तो पाहतो केवळ स्वत:ची!
पाहताना वाट गेला जन्म सारा;
जिंदगी जगलो घराच्या उंब-याची!
छप्पराची चाळणी होवू दिली मी;
राखली मर्जी परंतू पावसाची!
मेघ शाकारायला येतात कौले;
त्या घराला काळजी नसते छताची!
झोपडीला माझिया दारे दिशांची;
घेतली जागा नभाने छप्पराची!
मान्य जीर्णोद्धार ना आला कराया;
रंगरंगोटी करू पडक्या घराची!
ती पहा तोंडावरी आली दिवाळी;
माळ गुंफू या नव्याने तोरणाची!
लागल्या लगडीच स्वप्नांच्या विकाया;
फार होती हौस घरटे बांधण्याची!