हात दिला हातात तुझ्या मी!
गझल
हात दिला हातात तुझ्या मी!
तू माझ्या हृदयात तुझ्या मी!!
दूर तुझ्यापासून कुठे मी?
एकेका श्वासात तुझ्या मी!
उंबरठ्यासारखेच अगदी;
तगमगलो दारात तुझ्या मी!
चुकलेल्या गलबताप्रमाणे;
भिरभिरलो डोळ्यात तुझ्या मी!
शब्द तुझे, पण, मिठास माझी!
विरघळलो ओठात तुझ्या मी!!
कोठे गेले थडगे माझे?
वणवणलो शहरात तुझ्या मी!
चुकामूक दोघांची झाली;
तू माझ्या नादात तुझ्या मी!
दिवस असो वा रात्र असू दे;
वावरतो स्वप्नात तुझ्या मी!
कोसळलो, पण, सुदैव माझे;
गडगडलो पदरात तुझ्या मी!
उद्यानातच ऎट फुलांची;
विराजलो गज-यात तुझ्या मी!
------प्रा.सतीश देवपूरकर