मराठी गझल

मुक्या वेदना, अनाथ दु:खे, हीच शेवटी सोबत होती!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 May, 2012 - 11:48

गझल
मुक्या वेदना, अनाथ दु:खे, हीच शेवटी सोबत होती!
मीही जपल्या जखमा सा-या, ती तर माझी दौलत होती!

त्या जखमांची, त्या दु:खांची, ओठांवरती गाणी झाली;
ज्या जखमांना, ज्या दु:खांना, तुझ्या कृपेची संगत होती!

नव्हता पैसाअडका काही, नव्हते मानमरातब काही;
पण, कष्टाची भाकर होती! जगण्यामध्ये रंगत होती!

जे झटले, जे झिजले, त्यांचे नाव न साधे कुणी घेतले!
श्रेयासाठी भुकेजलेल्या लोकांची ती पंगत होती!!

थोडे थोडे म्हणता म्हणता, समुद्र प्यालो मी अश्रूंचा!

गुलमोहर: 

मी इथे झाकोळता चार पाहिली स्वप्ने

Submitted by कमलेश पाटील on 24 May, 2012 - 11:14

मी इथे झाकोळता चार पाहिली स्वप्ने,
कोरड्या डोळ्यात लाचार पाहिली स्वप्ने

सोंगट्यानी खेळ कोड्यात टाकला तेव्हा,
जिंकण्या होऊन बेभान जाळली स्वप्ने.

आरशाने घात केला,तरुण मज केले,
चार सुरकूत्या लपवण्यास माळली स्वप्ने.

पाश माझ्या भोवती तव पडावया जाता,
पिंजरा आकाश करतात वेंधळी स्वप्ने.

आज अंधारात वाटे जगावया थोडे,
वाट तेजाळीत जातात कोवळी स्वप्ने.

कोरड्या ग्रिष्मात याव्या सरी तुझ्या माझ्या
लाख वेळा आसावतात मोकळी स्वप्ने

गुलमोहर: 

जीवना, वैरी न तू, नाही सखाही

Submitted by रसप on 24 May, 2012 - 08:10

ना कधी होता तुझा पुळका मलाही
जीवना, वैरी न तू, नाही सखाही

नेहमी माझे मुखवटे बदलतो मी
आठवे ना चेहरा मज कालचाही

कैक मी केले गुन्हे, ना सिद्ध झाले
वाटते, माझीच मी द्यावी गवाही

का, कसा बरबाद झालो, काय सांगू?
आजही प्रेमात माझ्या खोट नाही

मंदिरासम मानले मी घर प्रियेचे
आज कळले देव गाभाऱ्यात नाही..

सांगती इतिहास सोन्याच्या युगाचा
चाड नाही वर्तमानाची जराही !

पेटला वणवा तरी ना पेटलो मी
अन कटाक्षाने तिच्या का होय लाही ?

....रसप....

गुलमोहर: 

अरे, फुलांचा सुगंधही मी दुरून घेतो!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 May, 2012 - 04:35

गझल
अरे, फुलांचा सुगंधही मी दुरून घेतो!
अलीकडे मी, ऋतू ऋतू पारखून घेतो!!

कशास मी आर्जवे करावी तुझी वसंता?
हरेक मी श्वास केवढा मोहरून घेतो!

असे नव्हे की, इजा व्यथांनीच फक्त केल्या;
सुखासही आजकाल मी पाखडून घेतो!

मला करावेच लागते वज्र काळजाचे;
हरेक माणूस आयुधे पाजळून घेतो!

नवीन नाही मला असे बेचिराख होणे;
अलीकडे रोज मी मला सावडून घेतो!

उगाच सोन्यासमान येते न ओळ ओठी;
मनात एकेक शब्द मी पालखून घेतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर

गुलमोहर: 

पुन्हा गवसलो होतो

Submitted by निशिकांत on 23 May, 2012 - 01:59

खरे सांगतो माझ्यापासुन मीच हरवलो होतो
डोळ्यामध्ये तुझ्या पाहता पुन्हा गवसलो होतो

आस तुझी सोडून दिली मी सर्व संपले होते
वळून तू बघता जातांना मी मोहरलो होतो

आज अचानक कबरीवरती दिवा लावला तू अन्
प्रेम कळाले मरणानंतर तरी बहरलो होतो

एक कवडसा जगण्यासाठी मला पुरेसा होता
तो मावळता अंधारी मी मुकाट निजलो होतो

असंख्य कोल्हे, नभी गिधाडे, आप्त भोवती असता
जगणार्‍याने कसे जगावे? मी गांगरलो होतो

देव म्हणे "कैदेत राहिलो धूर्त पुजार्‍यांच्या,
सोडुन गेलो मंदिर जेथे मी गुदमरलो होतो"

किती फाटका प्रपंच माझा! लोक सुदामा म्हणती
कधी न झाली कृष्णकृपा, पण मी सावरलो होतो

गुलमोहर: 

रंक आता राव झाले

Submitted by वैभव फाटक on 22 May, 2012 - 11:55

जीत होता नाव झाले
रंक आता राव झाले

कोंबड्याची बांग नाही
आज जागे गाव झाले

जिंकताना हारलो मी
व्यर्थ सारे डाव झाले

आठवांना चाळताना
झोंबणारे घाव झाले

वेध घेण्या काळजाचा
लाजण्याचे आव झाले

चार नोटा वाटता मी
भुंकणारे म्याव झाले

वैभव फाटक ( २६-०२-२०१२)

गुलमोहर: 

केव्हा नकार, केव्हा केव्हा रुकार होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 May, 2012 - 04:47

गझल
केव्हा नकार, केव्हा केव्हा रुकार होते!
माझ्या प्रतारणेचे नाना प्रकार होते!!

हा चेहराच माझा आहे मुळात हसरा;
माझी अशीच हसता हसता शिकार होते!

खांद्यावरून त्यांनी नेले मला स्मशानी;
यारांसमान माझे सारे विकार होते!

श्रीमंत त्या सुखांना तू द्यायचे न मातू;
केलेस लाड त्यांचे, पण ते भिकार होते!

पायांमधील काटे काढेन मी कधीही;
हृदयात मात्र माझ्या रुतले नकार होते!

लाटा पुन्हा पुन्हा का आलंगती तटाला?
एका मिठीत त्याच्या लाखो रुकार होते!

गुलमोहर: 

अशी जगावी गझल!

Submitted by रसप on 22 May, 2012 - 03:28

मनामधूनी निर्झर वाहे, अशी लिहावी गझल
हृदयी अंकुर उमलुन यावे, तशी फुलावी गझल

आर्त भावना झिरपत यावी, लयीत अल्लद सहज
चौकटीतले चित्र रुचावे, तशी दिसावी गझल

भाळावरच्या सौभाग्यासम हरेक अक्षर सजव
पायी पैंजण छनछनवावे, तशी हसावी गझल!

मनात जपलेली आवडती जुनी सुगंधी जखम
डोळ्यातिल सुकलेले पाणी, तशी रुजावी गझल

एका एका शब्दानेही अंबर सारे उजळ
क्षितिजकडांनी झळकुन जावे अशी जमावी गझल

वैशाखाच्या जाळामध्ये वसंत मनिचा फुलव
प्राजक्ताने मुग्ध करावे अशी जगावी गझल

गुलमोहर: 

कमजोर माणसाने बाही न सरसवावी

Submitted by खडूसराव on 21 May, 2012 - 03:04

कमजोर माणसाने बाही न सरसवावी
लोकामधे स्वत:ची इज्जत स्वत: जपावी

बाराखडीसही जर ना वाचले कधीही
गझलेवरी कुणाच्या अक्कल न पाजळावी

हर एक भावनेला ना मांडणे जरूरी
जर छंद बोचती तर कविताच का लिहावी ?

टीका पचेल त्याने लोकांसमोर यावे
केवळ स्तुतीकरीता कविता घरी म्हणावी

कविता लिहायची ह्या मुक्तांगणात ज्याला,
त्याला "गुलाम झालो" ही बोच का रहावी '

'मी श्रेष्ठ' दाखवाया करती विरोध कोणी,
ती 'श्रेष्ठता' अशांनी गझलेत दाखवावी

"का माजलास इतका ?" म्हणती तुलाच 'केशव'
प्रतिभाच माजण्याची त्यांच्याकडे नसावी !

- के.गो.

गुलमोहर: 

उधारीचे हसू आणून झाली साजरी दु:खे

Submitted by रसप on 21 May, 2012 - 02:54

सुखाच्या मल्मली वेषात आली बोचरी दु:खे
उधारीचे हसू आणून झाली साजरी दु:खे

सराईताप्रमाणे मी सुखांना चोरले होते
सुखे सारीच ती खोटी निघाली ही खरी दु:खे

मनाचे मी किती कप्पे करावे अन् किती वेळा?
इथे जागा नसे पाहून झाली बावरी दु:खे

तुझ्या माझ्या शिळ्या ताज्या क्षणांचे सोहळे झाले
मनापासून सजवावी अशी ती लाजरी दु:खे

जरी अंधारल्या वाटा मनाला लाभल्या होत्या
विसाव्याच्या क्षणी बनली घराची ओसरी दु:खे

मला प्रेमाविना काही तुझ्याकडचे नको होते
तुझे समजून नजराणे जपावी मी तरी दु:खे

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल