तुझी नि माझी स्वप्ने सारी उधळलीस ना ?

Submitted by रसप on 5 June, 2012 - 01:01

तुझी नि माझी स्वप्ने सारी उधळलीस ना ?
जुन्यांस फेकुन नवी सजावट करवलीस ना ?

कश्या अचानक वाटा झाल्या धूसर धूसर ?
डोळ्यांमधले बनून पाणी तरळलीस ना ?

तू नसताना नको वाटले जगणे तरिही
पुन्हा आज मी मजेत आहे, समजलीस ना ?

हल्ली तू काजळ भरणेही सोडले, म्हणे !
तुझ्याच प्रतिमेच्या नजरेतुन उतरलीस ना ?

फुलांसारख्या कितीक कविता तुला दिल्या मी
माझ्या दु:खाच्या गंधाने बहरलीस ना ?

नकोच होती संगत 'जीतू' तुझी कुणाला
तुझी सावली पसार झाली, बघितलीस ना ?

....रसप....
४ जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post.html

गुलमोहर: 

मोहक लयीची गझल आहे. खयाल ओके.

पुन्हा आज मी मजेत आहे, समजलीस ना ?>>> यात 'तसा' आज मी मजेत आहे - असे एक सुचले. कृ गै न

वाह सुंदर........

हल्ली तू काजळ भरणेही सोडले, म्हणे !
तुझ्याच प्रतिबिंबाच्या नजरेतुन उतरलीस ना ?

फुलांसारख्या कितीक कविता तुला दिल्या मी
माझ्या दु:खाच्या गंधाने बहरलीस ना ?

हे खूपच छान, आवडले....... Happy

हल्ली तू काजळ भरणेही सोडले, म्हणे !
तुझ्याच प्रतिबिंबाच्या नजरेतुन उतरलीस ना ?

ह्या शेरात

हल्ली तू काजळ भरणेही सोडले, म्हणे !
तुझ्याच प्रतिमेच्या नजरेतुन उतरलीस ना ?

असा बदल करतो आहे. (एक गुरू जास्त होता!)

मस्त गझल
नवे खयाल नाविन्यपूर्ण काफियांच्या आधारे मस्त तोलून धरलेत ..छानच

लय तर मस्तच निवड्लीत मुळात लयीतच गझलपणा ठासून भरला आहे ....सुन्दर