काय हे प्राणांत माझ्या सारखे झंकारते?

Submitted by सतीश देवपूरकर on 5 June, 2012 - 03:42

गझल
काय हे प्राणांत माझ्या सारखे झंकारते?
तू दिलेल्या वेदनेची एकतारी वाजते!

साथ येते, हात देते, ही कुणाची सावली?
कोण जाणे कोण माझ्या सोबतीला चालते!

ऊन्ह माध्यान्हातले मी, तू पहाटेची प्रभा!
आग जी हृदयात माझ्या, तीच तूही साहते!!

मी शिगेला पोचलेल्या मारव्याची आर्तता!
पूर्तता तू! सांगता तू! भैरवी तू वाटते!!

रोज उल्कापात होतो, कल्पनाही ना नभा;
ऊर धरणीचे परंतू रोज थोडे फाटते!

हाय सोन्याचा मुलामा काय किमया दाखवी?
खुद्द सोन्याची परिक्षा पितळ घेवू पाहते!

कोणता नुसता मुलामा? चोख सोने कोणते?
हे कळायाला नजरही चोख व्हावी लागते!

ईश्वराला वाहलेले फूल आहे एक मी;
सांग, निर्माल्यातले का फूल कोणी माळते?

दूर कोनाड्यात एका मेणबत्तीसारखे;
जन्म सारा जाळुनी का शब्द कोणी पाळते?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

.......खयाल छान आहेत नेहमीसारखे पण जस्जसा शेर सम्पत जातो तस्तशी अभिव्यक्तीची पकड ढीलीढाली वाट्ते... सुटत चालाल्यासरखी वाट्ते .
शेर प्रमाणाबाहेर बोथट होवून जातो मग काळजात घुसत नाही........

काही शेरातील खयालच सपक आहेत जरा मिर्च्-मसाला हवा होता असे जाणवले .....

मतला छान .

शेर क्र,२ थेट सहज सोपा .

शेर क्र,३ काफीयाकडे सरकतो तसा केवळ आग साहणे इतकाच सम्बन्ध जुळ्वल्याने शेरातला खयाल बेचव वाटतो जरा अजून खमन्ग असू शकला असता तर मजा आली असती

शेर ४ ठीकठाक

शेर ५ कल्पना नाही नभा... असे केल्यास सुलभता येइल. 'न' चा अनुप्रास लयीला अजून उठावदार करेल

शेर ६ वा दोन्ही ओळींचा संबंध स्पष्ट नाही होत आधी सोने मग पितळ याचा उल्लेख वेगवेगळ्या ओळीत असल्याने असे भासत असावे

शेर ७ वा हा मस्त आहे एकमेव परफेक्ट वाटावा असा आहे .. हासिले गझलही म्हणता येइल

शेर ८ वा पुन्हा काफियाकडे सरकत जाताना शेर वेगळीच कलाटणी /वळण घेण्याच्या नादात पाय घसरून पडला आहे ईश्वर -निर्माल्यातले फूल संबंध जुळ्तो पण 'केसात माळणे' चा वापर करून तुम्हाला नेमके काय सांगायचेय कुठल्या गोष्टीवर वक्तव्य करायचेय कळाले नाही

मक्ता भन्नाट आहे. एखाद्याने कुणाला वचन दिलेच तर मेणबत्तीसारखे जळण्याचे (उर्दूतली शमा ही प्रतिमा घेवून तिला मराठीत मेणबत्ती करणे कनाला पचायला जरा जड आहे शिवाय सौंदर्यबोधाचा फडतूसपणा दाखवणारेही ) वचन का देईल आणि असले वचन का पाळत बसेल समजले नाही .
त्या शेरात शेवटी योजलेले फक्त प्रश्नचिन्हच शेरापेक्षा अधिक अर्थपूर्ण आहे शेर त्यापुढे निरर्थकच आहे .

असो
पु ले शु
सर्व मते वैयक्तिक आहेत ....न पटल्यास फार महत्त्व देवू नये ही विनन्ती ...

अप्रतिम...........
हाय सोन्याचा मुलामा काय किमया दाखवी?
खुद्द सोन्याची परिक्षा पितळ घेवू पाहते!

कोणता नुसता मुलामा? चोख सोने कोणते?
हे कळायाला नजरही चोख व्हावी लागते!

ईश्वराला वाहलेले फूल आहे एक मी;
सांग, निर्माल्यातले का फूल कोणी माळते?

हे विशेष आवडले.......... Happy