लेवून प्रीत माझी
लेवून प्रीत माझी मिरवू नको सखे तू
आत्ताच या जगाला कळवू नको सखे तू
दारापुढे तुझ्या मी का थांबलो कळे ना
ते ताट आरतीचे सजवू नको सखे तू
लाटा अनोळखी या ठेवू नको भरवसा
वाळूत नाव माझे गिरवू नको सखे तू
कानावरी तुझ्याही येतील चार गोष्टी
इतक्यात फार पुढचे ठरवू नको सखे तू
येईल वेळ तीही एकांत भेटण्याची
लाजून चेहरा मग लपवू नको सखे तू
----------------------------------------- जयन्ता५२