मराठी गझल

माझ्यासंगे देव बोलला नाही.

Submitted by सुधाकर.. on 19 June, 2012 - 09:37

माझ्यासंगे देव बोलला नाही,
नियतीने तराजू तोलला नाही.

धरावी कोणती वाट आता,
फकीर एकही बोलला नाही.

आत्मपिडा ही घेऊन चाललो.
तुला हुंदका पेलला नाही.

आयुषा दे,हवे तेवढे घाव आता,
मी अजुन आत्मा सोलला नाही.

फुंकून पुंगी गेले,कित्येक गारूडी,
मनाचा भुजंग या डोलला नाही.

सांभाळ नशिबा, तू स्वतःला,
जख्मांचा हिशेब मी ही सोडला नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जीव कोणी लावल्याचे ज्ञात नाही!

Submitted by सतीश देवपूरकर on 19 June, 2012 - 07:42

गझल
जीव कोणी लावल्याचे ज्ञात नाही!
त्यास, कोणीही दिलेला हात नाही!!

कोकिळेची धून फोनातून वाजे;
कोकिळा कुठलीच आता गात नाही!

का कुणी उल्लेखही माझा करावा?
मी कुठेही येत नाही, जात नाही!

बाब कुठलीही असू द्या, हे पहावे.....
आपले मन आपल्याला खात नाही

राहिलो आजन्म अंधारामधे मी!
एक मी कंदील, ज्याला वात नाही!

खेळ हे सारे तुझ्या, निव्वळ मनाचे!
वाटते तुजला तसे अजिबात नाही!!

गुलमोहर: 

मला बघ जायला पाय्जे...............

Submitted by वैवकु on 19 June, 2012 - 04:03

तुला म्हाईत न्हाई बोलला तो कोन होता गं
मला तो ओळखीचा पन् तुला अन्नोन होता गं

मला बघ जायला पाय्जे कसाय्तो पाह्यला पाय्जे
बरं न्हाई म्हने त्याला इठ्याचा फोन होता गं

कसा हायेस तू म्हंता अधी तो हासला होता
"सुखी ..!" म्हन्ण्यात त्या त्याच्या दुखाचा टोन होता गं

तुजा-माजा जसा संकल्प हाये एक होन्याचा
तसा माजा-इठ्याचा तो अधीपासोन होता गं

घरी आली इचाराया मला आषाढवारी ती
"कुठं होतास तू होवून वर्षे दोन होता?".......... गं!!

मला बघ जायला पाय्जे;
कसाय्तो पाह्यला पाय्जे ;
बरं न्हाई म्हने त्याला ..................
...................इठ्याचा फोन होता गं !!

गुलमोहर: 

अशी वागते मी तशी वागते

Submitted by प्राजु on 19 June, 2012 - 00:40

अशी वागते मी तशी वागते
जराशी जगावेगळी वागते..

नसे काहि नातेच माझे तुझे
तरी होउनी मी तुझी वागते

कशानेच ओथंबले ना कधी
तशी मी म्हणे कोरडी वागते

जरी चार भिंतीत कंगालता
समाजात मी भरजरी वागते

मनाशीच संवाद चाले कधी
तिथे त्या क्षणी मी खरी वागते

तशी चेहर्‍याने सुखी भासते
कधी वाटले नाटकी वागते??

जगावेगळे 'प्राजु' काही नसे
तसेही खरे का कुणी वागते!!!

-प्राजु

गुलमोहर: 

असंभव

Submitted by सुधाकर.. on 17 June, 2012 - 11:55

असंभव जगण्याला, चुचकारते आहे मरण.
पारध्याच्या वेधाने, चित्कारते आहे हरण.

अरे कुठे गेले ते पांडव सारे,लढवैय्ये?
पैशावरती बळाचे येथे,होते आहे हरण.

येऊ नको रे हरिश्चंद्रा,वध होईल तुझा.
सत्तेला ही सत्व येथे जाते आहे शरण.

रक्ताळलेले गिधाड,भयभीत होऊन कलकलले,
दयावान बुध्दाचेही,रचले, जाते आहे सरण.

आसवांवर तुझ्या अता विश्वास तरी कसा ठेऊ?
इथे सैतान ही अंभंगाचे गाते आहे चरण.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चालतो मी

Submitted by निशिकांत on 17 June, 2012 - 11:49

खेकड्याची चाल आता चालतो मी
जो पुढे जाईल त्याला ओढतो मी

सागराच्या तांडवाला टाळतो मी
शोधण्या मोती तळाला राहतो मी

धर्मशास्त्रातील तत्वे वाचलेली
वागताना बासनी गुंडाळतो मी

शोधली पळवाट मांसाहार खाण्या
जानवे खुंटीस तेंव्हा टांगतो मी

कोण मेले कोण जळते काय त्याचे !
भाकर्‍यांना त्या चितेवर भाजतो मी

पाहिले अन् भोगले अन्याय इतके !
फक्त डोळेझाक करणे जाणतो मी

पारध्यांना हूल देवुन वाचलेल्या
सावजांच्या धडधडीला ऐकतो मी

जीत सत्त्याचीच होते शेवटी पण
मालिकांतुन दुष्ट खोटा गाजतो मी

दर्शनी "निशिकांत" कुस्ती खेळसी का?
वास्तवाला भीत दर्पण फोडतो मी

गुलमोहर: 

त्या भेटीगाठींमध्ये केवढी माधुरी होती!

Submitted by सतीश देवपूरकर on 17 June, 2012 - 05:48

गझल

त्या भेटीगाठींमध्ये केवढी माधुरी होती!
श्वासांत सूर सनईचे, ओठांत बासरी होती!!

आभास जागृतीमध्ये, यायचीस स्वप्नांमध्ये!
ती नशा निराळी होती, दिनरात तरतरी होती!!

माळावर ऎन दुपारी, मी निवांत निजलो होतो;
हटकेल कसा मज कोणी? ती तुझी ओसरी होती!

पाहिले कैक लोकांना फिरताना पोटासाठी;
ते भटकत होते कोठे, अन् कुठे भाकरी होती!

हे असले कसले जगणे? ही काय जिंदगी झाली?
आयुष्य असे ते जगले, ती जणू नोकरी होती!

मी गरगर फिरतच बसलो भिरभि-याप्रमाणे नुसता...
बाहेर नोकरी होती, अन् घरी छोकरी होती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,

गुलमोहर: 

येत जा देऊन थोडी कल्पना (तरही)

Submitted by इस्रो on 17 June, 2012 - 05:20

भंग तू केलीस माझी साधना
येत जा देऊन थोडी कल्पना

सहज सुचते छान त्याला शायरी
पाहतो जेव्हा कुणी नव यौवना

तीर नजरेचे नको ना चालवू
हाय होती काळजाला वेदना

हात हाती दे जरासा लाडके
आज थोडे आणखी तू थांबना

दु:ख आहे सोसलेले एवढे
मी करु कैसा सुखाचा सामना ?

एकदा तू सांग 'नाहिद' हे मला
मी तुझी, माझाच तू ही सांगना !

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०, ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]

गुलमोहर: 

कधी कधी

Submitted by रसप on 17 June, 2012 - 03:23

वाट चालली, तसा चालतो कधी कधी
हवा वाहिली, तसा लहरतो कधी कधी

मला जवळचा मित्र मानती किती तरी
तरी एकट्याने मी रडतो कधी कधी

धडपडलो अन सावरलो मी अनेकदा
हार मानली तरी जिंकतो कधी कधी

तू सागर मी तुझा किनारा निवांतसा
तुझा असुनही तुझाच नसतो कधी कधी

मला सुखी करण्याकरिता झटतेस खरी
तरी तुला मी दु:खी करतो कधी कधी

नकळत होते तुझ्यामुळे संपूर्ण गझल
अथवा मी काफियात चुकतो कधी कधी

....रसप....
१७ जून २०१२

गुलमोहर: 

येत जा देऊन थोडी.. तरही

Submitted by प्राजु on 17 June, 2012 - 00:09

पावसा थोडा शहाणा वागना
येत जा देऊन थोडी कल्पना

कोण श्वासातून आले अंतरी
जागल्या सार्‍या कशा संवेदना!

वादळाने बांध जेव्हा फ़ोडला
वाहिल्या मी गाडलेल्या वेदना

आज पाचोळ्यापरी मी वाहिले
वावटळ होईन ही संभावना

आठवे सारे कुण्या काळातले
विस्मृतीची आज भासे वंचना

स्पंदने होतात यांत्रिकतेत अन
मी जिण्याची खूप करते वल्गना!

दांभिकांची रांग या दगडापुढे
सोबतीला वासना अन याचना

फ़ालतू अडकू नको प्रश्नात तू
हे जरा 'प्राजू' मनाला सांग ना

-प्राजु

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल