त्या भेटीगाठींमध्ये केवढी माधुरी होती!

Submitted by सतीश देवपूरकर on 17 June, 2012 - 05:48

गझल

त्या भेटीगाठींमध्ये केवढी माधुरी होती!
श्वासांत सूर सनईचे, ओठांत बासरी होती!!

आभास जागृतीमध्ये, यायचीस स्वप्नांमध्ये!
ती नशा निराळी होती, दिनरात तरतरी होती!!

माळावर ऎन दुपारी, मी निवांत निजलो होतो;
हटकेल कसा मज कोणी? ती तुझी ओसरी होती!

पाहिले कैक लोकांना फिरताना पोटासाठी;
ते भटकत होते कोठे, अन् कुठे भाकरी होती!

हे असले कसले जगणे? ही काय जिंदगी झाली?
आयुष्य असे ते जगले, ती जणू नोकरी होती!

मी गरगर फिरतच बसलो भिरभि-याप्रमाणे नुसता...
बाहेर नोकरी होती, अन् घरी छोकरी होती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

मतल्यात माधुरी शब्द खटकला. माधुर्य सहसा वापरले जाते.

शेवटच्या शेरात भिरभिर्‍या ऐवजी ''भोवर्‍या'' चालले असते व अजून चांगले वाटले असते.

आभास जागृतीमध्ये, यायचीस स्वप्नांमध्ये!
ती नशा निराळी होती, दिनरात तरतरी होती!!

माळावर ऎन दुपारी, मी निवांत निजलो होतो;
हटकेल कसा मज कोणी? ती तुझी ओसरी होती!

पाहिले कैक लोकांना फिरताना पोटासाठी;
ते भटकत होते कोठे, अन् कुठे भाकरी होती!....................हे तिन्ही शेर आवडले.

डॉक्टर साहेब, आपल्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आपण उपस्थित केलेल्या दोन मुद्यांवर थोडे स्पष्टीकरण करतो...........

माधुर्य, माधुरी, गोडवा या सर्व शब्दांचा अर्थ एकच, तो म्हणजे मधुरपणा.
पण, “भेटीगाठींमध्ये” असे आपण म्हणतो, तेव्हा तिथे होणारी संभाषणे ही अंतर्भूत असतात, व विशेषत: वाणीतला/वाचेतला गोडवा वा गोड आवाज हे जेव्हा म्हणायचे असते, तेव्हा “माधुरी” हाच शब्द वापरतात. “माधुर्य” शब्द मंजुळपणा, मनोरंजकता, स्वभाव किंवा वागणूकीतली मृदुता, सौम्यपणा, सात्विकपणा इत्यादींसाठी वापरतात.

मी “भिरभि-याप्रमाणे” का म्हटले त्याचा खुलासा करतो.............
शेर असा आहे.........
“मी गरगर फिरतच बसलो भिरभि-याप्रमाणे नुसता...
बाहेर नोकरी होती, अन् घरी छोकरी होती!

इथे घरी आणि दारी दोन्ही ठिकाणी माझी अवस्था एखाद्या लहान मुलांच्या कागदी भिरभि-याप्रमाणे झाली आहे. भिरभिरे हे वारा आला की, गरगर फिरते. वा-यामधे लहरीपणा असतो. नोकरीवर वरिष्ठांचा लहरीपणा व घरी लाडक्या कन्येचा लहरीपणा या दोहोंमुळे माझ्यावर त्या खेळण्यातल्या भिरभि-याप्रमाणे गगरगर फिरण्याची वेळ आली आहे अशी लाडिक कुरबुर आम्ही इथे करीत आहोत, कारण मूळत: आमचे boss काय किंवा आमची कन्या काय, दोहोंवर प्रेम आहे. आणि प्रेमात माणूस सर्व काही आनंदाने स्वीकारतो! आम्ही देखिल दोहोंचा लहरीपणा सांभाळत गरगर फिरत असतो, घरी आणि दारीही! मला स्वत:ला भोव-याच्या गरगर फिरण्यात वर अपेक्षित असलेला सर्व अर्थ दिसत नाही. म्हणून “भिरभि-याप्रमाणे” शब्द
“भोव-याप्रमाणे” शब्दापेक्षा जास्त उचित वाटतो.
शिवाय भिरभि-यात भिरभिरणे अशीही शेड आहे. असो.
पुन:श्च प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कृपया आपली मते कळवावीत. म्हणजे माझ्या विचारात काही त्रुटी असतील तर त्यांचे मला निराकारण करता येईल.
...........प्रा.सतीश देवपूरकर
असाच लोभ असू द्या.
टीप: आपण माझी तरही गझल वाचली का? कशी वाटली? आपली मते माझ्या दृष्टीने बहुमोल असतील. वाचायला आवडतील.

आपणास प्रतीत असलेल्या 'छोकरी'वर जरा अणखी भावूक रचना वाचायची सवय झाली आहे.

इथे हा शेर 'त्या' छोकरीचा वाटतच नाही आहे.......... जरा हझलिश वाटतोय........... आपण केलेल्या विश्लेषणात्मक स्पष्टीकरणामुळेतर अजूनच !

बेफिकीरजी! आपले म्हणणे अंशत: खरे आहे. माझ्या सुरवातीच्या, उमेदवारीच्या काळातील ही गझल होती. गझलेकरता धडपडत असतानाची ही गझल होती. पण, मला, का कुणास ठाऊक, एकही शब्द वा शेर बदलावा वाटला नाही!
आपणास कुठे काही खटकले काय? असल्यास नि:संकोचपणे कळवा. मी आवश्यक ते बदल जरूर करेन!

टीप: एक विचारू का? आपल्याच जुन्या गझलेत नवे शेर आपण टाकता का, जेव्हा मूड लागतो तेव्हा? किंवा जुन्या शेरांत, कालांतराने बदल करावेसे वाटतात का? असे बदल आपण करता का? एक कुतुहल म्हणून विचारले. माझे विचाराल, तर मी कधी कधी असे करतो, फारच मूड आला की.

बरेच नुसते मतले, वर्षानुवर्षे, नुसते पडूनही राहतात, कारण त्या उंचीचे पुढील शेर लिहिताना कधी कधी भीती वाटते. कित्येक गझलांचे २, ३ वा ४च शेर लिहून सोडून दिलेले असतात. कधी कधी मधलाच शेर सुचतो, व मग मतल्यासाठी प्रतिक्षा करत असतो. कधी कधी अनेक सुंदर सुंदर मतले एकाच वेळी मनात हैदोस घालत असतात. एका वेळी अनेक गझला हळूहळू दिवसेंदिवस पुढे सरकत असतात.
आपला काय अनुभव आहे?...........

कधी कधी एखादा सुंदर व अलौकिक मिसरा ओठांवर येतो. व मग त्या ताकदीचा दुसरा मिसरा लिहायला कैक दिवस लागतात.असेही होते.

एक फार पूर्वीचे साधारणपणे १९८८ सालचे, एका मिस-याचे उदाहरण देतो........

एक मिसरा अचानक मला सुचला..........

“आता कुठे जरासे आकाश शांत झाले!”

झाले, या मिस-याने मला इतके काही पछाडले म्हणून सांगू.

मग ब-याच दिवसांनी, तितक्याच ताकदीचा, तोलामोलाचा मिसरा परमेश्वराने आमच्या झोळीत टाकला व तो शेर पूर्ण झाला व मला मुक्ती मिळाल्यासारखे वाटले.
तयार झालेला शेर असा...........
“आता कुठे जरासे आकाश शांत झाले!
मी बेचिराख झालो, अन् ते निवांत झाले!!”

१९८८ नंतर आजतागायत हा मतला घेवून गझल पूर्ण करण्याची माझी हिम्मत झाली नाही.

कधी कधी, कोणता मिसरा उला ठेवायचा व कोणता मिसरा सानी ठेवायचा यावर देखिल मन अडखळते, हटून बसते. कधी कधी एखदाच चपखल शब्द न स्मरल्यामुळे तयार होत आलेला शेर तसाच अधांतरी मनात बरेच दिवस लटकत राहतो. माझे बहुतेक शेर हे जाता, येता मोटार चालवतानाच होतात, कारण तेव्हा बायकोचा, मुलांचा कुठलाही तगादा मागे नसतो. आपला काय अनुभव आहे?...........
भूषणराव आज मूड लागला म्हणून माझे मन आपणासमोर मोकळे केले!
बाकी बरेच काव्यविषयक बोलायचे आहे ते समक्ष भेटीत (जेव्हा केव्हा होईल तेव्हा)
बोलूच!
....................प्रा.सतीश देवपूरकर.

प्रोफेसर साहेब,

Happy

खरे सांगू का? या विषयावर चर्चा करायची माझीही इच्छा असते. इन फॅक्ट माझेही अनेक शेर ड्राईव्ह करतानाच होतात. पण मायबोलीच्या प्रतिसादांमध्ये त्यावर चर्चा करणे हा काहीजणांना 'शो बिझिनेस' वाटू शकेल. एकदा नुसतेच 'गझल कशी सुचते' या विषयावर गप्पा मारायला जे यायला तयार असतील त्या सर्वांनी मिळून भेटू.

मला खात्री आहे की मी, आपण, डॉक्टर, वैवकु, सुप्रिया आणि प्राजू नक्की येतील. आनंदयात्रीही यावेत आणि कणखर आले तर मजाच.

असो.

-'बेफिकीर'!

माळावर ऎन दुपारी, मी निवांत निजलो होतो;
हटकेल कसा मज कोणी? ती तुझी ओसरी होती!

पाहिले कैक लोकांना फिरताना पोटासाठी;
ते भटकत होते कोठे, अन् कुठे भाकरी होती!.

Class .....