मराठी गझल

वाटा

Submitted by वैवकु on 23 June, 2012 - 11:22

वाटेत येत गेल्या माझ्या हजार वाटा
काही प्रवाहवाटा काही किनारवाटा

निघती कुठून काहिच ठेवीत माग नाहित
अन् पोचतात तेथुन होती पसार वाटा

मी चालतोच आहे जन्मान्तरे कधीची
मी तोंडपाठ केल्या होत्या चुकार वाटा

ती वीट नेत नाही त्याला कधी कुठेही
तो जात नाहि सोडुन माझ्या विचारवाटा

सगळेच शेर माझे न्या विठ्ठलाळलेले
कोणास दोन वाटा कोणास चार वाटा

गुलमोहर: 

नभी मेघ हिंडायचे बंद झाले!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 June, 2012 - 08:30

गझल
नभी मेघ हिंडायचे बंद झाले!
वनी मोर नाचायचे बंद झाले!!

अरे माणसा काय केलेस तू हे?
ऋतू यायचे जायचे बंद झाले!

कुणी घातला बांध गाण्यास त्यांच्या?
झरे वाहते गायचे बंद झाले!

तुझे बोल बोलायला लागलो मी;
तसे लोक बोलायचे बंद झाले!

मनोरंजनाला अहोरात्र टीव्ही!
पहा लोक वाचायचे बंद झाले!!

न श्रोत्यांस, ना बासरीला कळाले....
कधी श्वास चालायचे बंद झाले!

कशी माणसे शुष्क पाषाण झाली?
तुझे नाव गोंदायचे बंद झाले!

किती रोज निर्यात व्हावी फळांची?
तरूंना फळे यायचे बंद झाले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,

गुलमोहर: 

शब्दांच्या खांद्यांवरती पालखी तुझ्या स्वप्नांची!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 June, 2012 - 07:45

गझल
शब्दांच्या खांद्यांवरती पालखी तुझ्या स्वप्नांची!
हृदयाला भिडेल दिंडी, मी लिहिलेल्या गझलांची!!

शब्दांना उधाण आले वारीच्या वारक-यांचे;
गझलेच्या रंगामध्ये रंगली झुंड रसिकांची!

हृदयाचा मृदंग केला, ओठांना बोल मिळाले!
नाचाया तालावरती लागली रांग शब्दांची!

शब्दांनी शिकून घ्यावी नि:शब्दाची परिभाषा
शब्दांच्या पलीकडेही पोचते उडी शब्दांची!

शब्दांच्या कुपीत भरल्या मी संवेदनाच माझ्या;
घमघमेल प्राणांमध्ये एकेक ओळ गझलांची!

त्यामुळेच बहुधा येते कवितेस मधाची गोडी;
असतात कवीच्या हृदयी पोळीच जणू शब्दांची!

घोळतील माझ्या ओळी रसिकांच्या हृदयामध्ये;

गुलमोहर: 

एरव्ही शिवराळ सगळ्यांचीच वाणी!

Submitted by सतीश देवपूरकर on 21 June, 2012 - 07:32

गझल
एरव्ही शिवराळ सगळ्यांचीच वाणी!
फक्त झेंडावंदनाला देशगाणी!!

हाच का तो देश, जो आझाद झाला?
राहिली कोठे हुतात्म्यांची निशाणी?

चेहरे बदलून ते निवडून आले!
लोकशाहीची दशा बघ दीनवाणी!!

तो वडा अन् पाव सुद्धा स्वस्त कोठे?
कोठुनी आणू तुला सिलबंद पाणी?

कैक कोटी बेहिशोबी जप्त केले!
काय पैशांच्या कुठे असतात खाणी?

जन्मलो, जगलो, तसा चुपचाप मेलो......
काय मी सांगू तुला माझी कहाणी?

संकुले, अन् मॉल, मल्टीप्लेक्स झाली!
काल परवा चाळ होती या ठिकाणी!!

आज ऎटम सॉंगचा आहे जमाना!
मी कशाला आळवू माझी विराणी?

-------प्रा.सतीश देवपूरकर

गुलमोहर: 

एक मी अन एक तू

Submitted by वैभव फाटक on 21 June, 2012 - 02:41

दोस्त दोघे एक मी अन एक तू
मी किती करतो गुन्हे पण, 'नेक' तू

लष्कराची भाजताना भाकरी
विस्तवावर हात थोडे शेक तू

पाहुया मासा अता जातो कुठे ?
फक्त पाहुन वेळ, जाळे फेक तू

का तुझी प्रत्येक मैफिल बेसुरी ?
सूर आळव अंतरी दिलफेक तू

पर्वतांवर जायचे आता तुला
पार केल्या टेकड्या कित्येक तू

( वैभव फाटक - १८ जून २०१२ )

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/06/blog-post_18.html

गुलमोहर: 

पावलांपाशी 'जितू'ला जोजवा हो विठ्ठला !

Submitted by रसप on 21 June, 2012 - 00:57

आज काही आपलेही ऐकवा हो विठ्ठला
दु:ख विश्वाचे मलाही दर्शवा हो विठ्ठला

मी कवाडे खोलली माझ्या मनाची, आत या !
अन प्रियेची रिक्त गादी चालवा हो विठ्ठला

रोज माझे एव्हढेसे दु:ख मी गोंजारतो
अंश थोडा 'माउली'चा दाखवा हो विठ्ठला !

पंख फुटले ह्या मनाला भरकटे येथे-तिथे
अंबराच्या पिंजऱ्यातुन सोडवा हो विठ्ठला

आर्ततेने मागतो प्रत्येक जण काही तरी
मी कधी लाचार झालो ? आठवा हो विठ्ठला

वाटते की झोपलो नाही किती वर्षांत मी
पावलांपाशी 'जितू'ला जोजवा हो विठ्ठला !

....रसप....
२० जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_21.html

प्रेरणा -

गुलमोहर: 

आत्म्याची बातमी

Submitted by वैवकु on 20 June, 2012 - 09:39

बातमी आत्मा मला माझा शिळी देवून मेला
काल त्याने विठ्ठलाशी सावळा संभोग केला

बामणी डोक्यात माझ्या शायरीची म्हैस व्याली
मी विटेवर एक हेला पाहिला होता उभेला

नागडा जोडा तुझ्या त्या भक्तभोगी वासनेचा
लागतो रे फार देवा मार गुंडाळून शेला

निंबघोळी कारल्यागत ही गझल् कडुझार माझी
गोडवा लावा हिचा सौंदर्य-बोधी साखरेला

श्रीहरीचे नाव मी घेतो नि भरतो पोटखळगा
(नामरूपी भारनियमन....... पाप-पुण्यां*च्या भुकेला Wink !!!)

__________________________________________________________

पुण्यां*च्या = पुण् + यांच्या असेच वाचले जाते पुण्यां*च्या असेच लिहिले जाते.

गुलमोहर: 

फुले तुझी, पण, सुवास माझा!

Submitted by सतीश देवपूरकर on 20 June, 2012 - 07:58

गझल
फुले तुझी, पण, सुवास माझा!
तुझ्यात होईल भास माझा!!

कसा तुझा मी निरोप घेवू?
कसा करू मी प्रवास माझा?

तहानलेली नदी म्हणाली.....
“मलाच ठाऊक ध्यास माझा!”

लिही ललाटी तुला हवे ते;
मला करू दे प्रयास माझा!

तुझीच या काळजात वस्ती!
तपास एकेक श्वास माझा!!

गुन्हा कुणाचा? कुणास फाशी?
अचूक होता कयास माझा!

लपेटली बासने मलाही;
उपाय केला झकास माझा!

भिकार झाली न भूक माझी;
न सोडला मी उपास माझा!

गुलमोहर: 

*** अक्षर नाही

Submitted by अरविंद चौधरी on 20 June, 2012 - 07:09

*

जेथे हेवा मत्सर नाही
अपशब्दांचा वापर नाही

हुकते संधी,मिळते संधी
वेळ तीच ती,नंतर नाही

घरास माझ्या छत गगनाचे
आकाशाला छप्पर नाही

असो मना मी जरी कफल्लक
तुजविण माझी स्थावर नाही

धुडगूस चालतो दुःखांचा
फक्त सुखांचा वावर नाही

कोण कुणाचा आहे येथे ?
या प्रश्नाला उत्तर नाही

'मी' अन् माझी भेटच नाही
दोघांत जरी अंतर नाही

काही नाही इथे टिकाऊ
परब्रह्मासम अक्षर नाही

---- अरविंद

गुलमोहर: 

तुला कधी मिशा फुटणार?

Submitted by अभय आर्वीकर on 19 June, 2012 - 11:27

तुला कधी मिशा फुटणार?

पाखरेही एकी करतात जरासे पंख फुटल्यावर
पण तुला कधी मिशा फुटणार? सांग माणूस म्हटल्यावर

पंचम स्वरात बोलणे तुझे, गैरवाजवी नसेलही
पण; मुजोरीची किंमत काय? पुरेसे नाक कटल्यावर

काही औषध उरले नाही, मित्रा तुझ्या स्वभावाला
मिळणार केव्हा शांती तुला! माझे डोळे मिटल्यावर?

राखेशिवाय दुसरे आता अन्य काय उरले येथे?
अवश्य धावून तू आलास खरा; पण आग विझल्यावर

तुझ्याशी वाद घालणे असा माझा उद्देश नसतोच

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल