चिमणी
किलबिलाट सारा आज शून्य होता,
दुडदुडत्या पैंजनाचा आवाज संथ होता
कोपऱ्यातून हुंदक्याच्या आवाज आला कानी,
व्याकुळ झाला तो, पाहता रडती चिमणी
उंबऱ्यात दिसता बाबा, आता उधाण आले
भरले तुडुंब डोळे, गाली काजळ ओघळले
त्याने पसरता हात, चिमणी धावत आली
पैंजनांचे मौन तोडीत ती, बाबाला बिलगली
डोळे पुसता पुसता, त्याला हुंदक्यात बोलली
मलाही हवा शालू, चिमणी हट्टाला पेटली
मिळाला नवा शालू, नटली नवरी लाडकी
गालावर खळ पेरीत चिमणी आनंदून हसली