नवरात्र : माळ नववी

Submitted by snehalavachat on 17 October, 2018 - 09:44

नवरात्र : आदिशक्तीचा जागर

माळ नववी

“आरती ओवाळिते जय अंबे माते
विनम्र भावे सारे तुजला नमिते
करवीरक्ष्रेत्री तुजे वास्तव्य असते
तुझ्या दर्शनी शांति लाभत असे”

आजच्या महानवमीला नवदिवसाचे पारणे संपते. होमहवनात षडरिपुंचा त्यागच जणू नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. मातेची साग्रसंगीत षोड्शोपाचारे पूजा होणे हीच आजच्या माळेची सदिच्छा असते. कारण आजची माळ ही आपल्या लाडक्या लेकीसाठी असते. तिच्या आवडीनिवडीसाठी प्रत्येक आई कायमच आपल्या मनाला मुरड घालून आपली लेक आनंदी कशी राहील हेच बघत असते.

आपल्यावर हक्काने रागावणारी, रूसणारी अश्या ह्या माझ्या लाडक्या लेकी श्रीया आणि श्वेता म्हणजे लक्ष्मी व सरस्वतीचा वास माझ्या आयुष्यात आहे. कधी त्या माझ्या आई असतात, तर कधी प्राणप्रिय सखी असतात. जगात मला समजून घेणारे त्यांच्याशिवाय कोणीच नाही.

माझ्या आयुष्याच्या त्या जणू अमूल्य ठेवाच आहेत. माझा श्वास व माझे जीवन म्हणजे या माझ्या दोन लेकी आहेत. देवी अंबाबाईची आयुष्यभराची कृपाद्रुष्टीच जणू तिने माझ्या पदरात भरभरून टाकली आहे. हा हळुवारपणा , नाजुकपणा व ऊर्जेचा शक्तीस्रोत माझ्या आयुष्यात सदैव असाच वाहता राहू देत हीच प्रार्थना.

“आई अंबे जगदंबे मागणे हे तुला
नित्य राहो कृपाद्रुष्टी साकडे हे तुला ||
अशी मायची पाखर ही तुझी पुण्याई
चिरंजीवी होई बाळ असा वर देई ||”

Group content visibility: 
Public - accessible to all site users