भुलाबाई

Submitted by @Shraddha on 22 October, 2018 - 15:07

महाराष्ट्रात वेगवेगळे सण वेगवेगळ्या प्रदेशात थोड्याफार फरकाने साजरे होतात. महाराष्ट्रात इतरत्र साजरा होणारा भोंडला, हादगा विदर्भात भुलाबाई च्या रूपात साजरा होतो.
भुलाबाई म्हणजे देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वती कडून सारीपाटात सर्वकाही हरल्यावर शंकर कैलास सोडून रूसुन निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती भिल्लीणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते.
शंकर पार्वतीच्या रूपाला भुलले म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजी राणा म्हणतात. तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मुर्ती स्थापन करतात.
पुजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पुर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पुरता मर्यादित झाला आहे.

भुलाबाईची पुजा करून मुली लोकगीते म्हणतात. विशिष्ट लयीत टाळ्या वाजवत ही गाणी म्हटली जातात.
"ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा" म्हणत गाणी सुरु होतात.
भुलाबाई च्या निमित्ताने स्त्रिया आपली सुख दुःख एकमेकींशी वाटतात."अस्सं सासर द्वाड बाई" म्हणतं सासरचे वर्णन करतात तर "अस्सं माहेर सुरेख बाई" म्हणत माहेरच्या आठवणीत रममाण होतात. सासरचे हेवेदावे सांगताना " कशी घेऊ दादा घरी नंदा जावा करतील माझा हेवा, हेवा परोपरी नंदा घरोघरी" म्हणत मनातले सल बोलुन दाखवतात.
सासुरवाशीणीच्या मनातली माहेरची ओढ "कारल्याचं बी पेर ग सुनबाई मग जा अपुल्या माहेरा" म्हणणार्‍या सासुला "कारल्याचं बी पेरलं हो सासूबाई आता तरी धाडा ना" या आर्जवातुन आपल्या पर्यंत पोहचते.

माहेरी आलेल्या भुलाबाई ला घ्यायला येणाऱ्या सासरच्या मंडंळींवर ती" चारी दरवाजे लावा ग बाई, झिपरं कुत्रं सोडा गं बाई" अशा आविर्भावात रूसुन बसते.
मग तिचा रुसवा" यादवराया राणी रुसुनी बैसली कैसी, माहेरवाशीणी सुन घरासी येईना कैसी" म्हणत एक एक जण तिला दागिना देऊ करत रूसवा काढायचा प्रयत्न करतो. या सर्वांना नकार देणारी भुलाबाई नवर्‍याने देऊ केलेलं अर्धं राज्य मात्र आपल्याला हवं म्हणते.
भुलाबाई चे डोहाळे" पहिल्या मासी सासु की पुसे सुनबाई सुनबाई डोहाळे कसे" म्हणत कुटुंबातील सर्व सदस्य तिचे डोहाळे पुरवतात.
माहेरवाशीण भुलाबाई बाळंत होते. तिचा बाळंतविडा " साखरेच्या गोण्या बाई लोटविल्या अंगणी भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस" म्हणत अकरा दिवस केला जातो. बाराव्या दिवशी " अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता" म्हणत बारसं केलं जातं. बारशाला दोन मुली हाताचे पंजे एकमेकात गुंफून पाळणा करतात. त्यात बाळाचं प्रतिक म्हणून हळकुंड ठेवतात. आरती झाली की मग खिरापतीचा कार्यक्रम होतो. खिरापत ओळखताना आम्ही 'श्री बालाजीची सासू कांदेखाई' म्हणून मोकळ्या होतो.
आणखी बरीच गाणी थोड्याफार फरकाने म्हटली जातात.
आता भुलाबाई उत्सवाचं प्रमाण कमी झालयं. पण तरीही या निमित्ताने स्त्रिया एकत्र येतात. गाण्यांमधे भुलाबाईच्या रूपात स्वतः ला बघतात.
जिवनातल्या ताणतणावांचा विसर पडून थोडावेळ तरी आनंद उपभोगता यावं, हाच खरा तर या उत्सवाचा उद्देश.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी मैत्रिणींच्या तोंडून ऐकली आहेत मी भुलाबाईची गाणी.
त्यापैकी हे मला फार हसवायचं : -

अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं कॅलेंडर
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा अलेक्झांडर Happy Happy

अगदी बरोबर.. याच नावाला सगळे फार हसतात.. आम्ही आपल्या आपल्या नावाचं यमक जोडायचो गाण्यात.
त्यात एक होतं, खिडकीत होता owl भुलोजीला लेक झाला नाव ठेवा राहुल Lol

रोचक माहिती.
"अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होतं कॅलेंडर
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा अलेक्झांडर "
आणि
"खिडकीत होता owl भुलोजीला लेक झाला नाव ठेवा राहुल"
हे पण भारीच. Happy

@ DShraddha

..... खिडकीत होता owl भुलोजीला लेक झाला नाव ठेवा राहुल... Happy

त्या सईबाईला विंचू चावल्यावर उपचारासाठी 'सासरचा कुरूप' आणि 'माहेरचा राजबिंडा' वैद्य येतो ते पण गाणे धमाल आहे.

तेंव्हा मी लहान होतो...मोठ्या बहिणीचा हात धरून जायचो! पण अजूनही आठवणी आहेत. कारण तेंव्हा 'खाऊ' ओळखणे व ती 'खिरापत ' हाताच्या इवल्याश्या पंज्यावर घेणे हे अप्रूप फार होते!
कृपया गाणी लिहा नं आठवतील तेव्हढी....तेव्हढाच एक ठेवा सांभाळून ठेवण्याचा एक इवलासा प्रयत्न!!

छान लेख.. अजून ते एक वेड्याचे पण असायचं गाणं. ☺️ फारपूर्वी डीडी वर रानजाई कार्यक्रम येई त्याच्या शीर्षक गीतामध्ये 'भुलाबाई' शब्द होता ☺️

मस्त लिहिलंय.

आमच्याकडे भोंडला फेमस, नवरात्रात फक्त. गाणी साधारण दोघांची सारखी पण आमच्याकडे पाटावर हत्ती काढून त्याची पूजा आणि फेर धरायचा भोवती.

अरे वा...
आमच्याकडे हि सारी गाणी म्ह्णताता..
अजुनही जवळपास ४ ५ दिवस चालते भूलाबाई आणि रोजचे २ ४ घर कॉलनीमधले..
सुरुवात पहिली गं पूजाबाई, देवा देवा सादेव(साथ दे च भ्रष्ट रुप).. साथीला खंडोबा..खेळी खेळी मंडोबा या गाण्याने होत,
मग जोडीला आपे दुध तापे त्यावर पिवळी साय हे गाणं सुद्धा असायचं..
तर शेवट "बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा... गाणे संपले खिरापत आणा.. आणा बाई आणा लवकर आणा"ने होते.

खिरापत ओळखतना सुद्धा मज्जा येते..

त्या सईबाईला विंचू चावल्यावर उपचारासाठी 'सासरचा कुरूप' आणि 'माहेरचा राजबिंडा' वैद्य येतो ते पण गाणे धमाल आहे.>>
मला सुरुवात आठवेना त्याची.. फारच मधून आठवतय..

कांडुन कुंडून राळा केला बाई राळा केला..
राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली..
पाच पैशाची घागर आणली बाई घागर आणली..
मधल्या बोटाला विंचु चावला बाई विंचु चावला..

आला गं सासरचा वैद्य आला..
डोक्यात टोपी फाटकी तुटकी,
अंगात सदरा फाटका फुट्का,
हातात काठी जळक लाकुड
तोंडात विडा शेणाचा.. कसा गं दिसतो येड्यावाणी बाई गबाळ्यावाणी..

आला गं माहेरचा वैद्य आला,
डोक्यात टोपी मखमली,
अंगात सदरा जरतारी,
हातात काठी पंचरंगी
तोंडात विडा पानाचा...कसा गं दिसतॉ राजावाणी बाई राजावाणी.. असं काहीस आहे..

टीना >> हो..
ही गाणी सुद्धा असतात. आमच्या कडे ही म्हणतात
<<आला गं सासरचा वैद्य आला.. मज्जा येते म्हणताना Wink

अरे आणखी एक गाण आहे ना,

श्रीकांत कमलकांत ऐसे कैसे झाले,
झाले ते झाले माझ्या नशीबी आले...

वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
चिमण्या चिमण्या म्हणुन त्याने उडवून टाकल्या... असे...

संपादन (4 hours left)
टीना >> हो..
ही गाणी सुद्धा असतात. आमच्या कडे ही म्हणतात>> अगं म्हणजे मी वैदर्भीय.. भोंडला, हातगा हि नावं इथे येऊन ऐकली.. तिकडे भुलाबाईच म्हणतात..

मला सुद्धा भुलाबाईच माहीत होती. अकरावी ला 'हादगा' नावाचा एक धडा होता. ते वाचताना वाटायचं आपली भुलाबाई आणि हादगा यात बरचं साम्य आहे.

ओ टीना, पहिली गं पूजाबाई, देवा देवा सादेव >>> यासाठी खुप खुप धन्यवाद. या ओळीच्या पुढचं आठवत नाहीये, पण भुलाबाईच्या गाण्याची सुरवात या गाण्याने होते एवढंच आठवत होत, खात्री वाटत नव्हती.

कांडुन कुंडून राळा केला बाई राळा केला > याच्या आधी काहीतरी "एके दिवशी काऊ आला बाई..... सईच्या अंगणात (कणीस) टाकून दिल बाई...." असं काहीतरी आहे. कुणाला पक्क आठवत असेल तर लिहा प्लिज

नदीच्या अलिकडे राळा पेरला बाई राळा पेरला
एके दिवशीं काऊ आला बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेलं बाई तोडून नेलं
सईच्या आंगणांत टाकून दिलं बाई टाकून दिल
सईनं उचलून घरांत नेलं बाई घरांत नेलं
कांडून कुटून राळा केला बाई राळा केला
राळा घेऊन विकायला गेली बाई विकायला गेली
पांच ( त्याच ) पैशाची घागर आणली बाई घागर आणली
घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला
आला माझ्या सासरचा वैद्य
डोक्याला टोपी फाटकी तुटकी
कपाळाला टिकला शेणाचा
तोंडांत विडा काळाही काळा
कपाळाला गंध शेणाचें
अंगांत सदरा चिंध्या बुंध्या
नेसायला धोतर फाटकें तुटकें
पायांत जोडा लचका बुचका
हातांत काठी जळकें लांकूड
कसा गा दिसतो भिकार्‍यावाणी बाई भिकार्‍यावाणी ॥
आला माझ्या माहेरचा वैद्य
डोक्याला टोपी जरतारी
कपाळाला टिकला केशरी
तोंडांत विडा लालही लाल ( कस्तुरीचा )
अंगात सदरा रेशमी ( मलमली )
नेसायला धोतर जरीकांठी ( रेशीमकांठी )
पायांत जोडा पुणेशाही
हातांत काठी पंचरंगी
कपाळाला गंध केशरी
कसा ग दिसतो राजावाणी बाई राजावाणी ॥

हुश्श !! मला माहित असलेलं असं व्हर्जन आहे ..
लेख मस्त! लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ..
आमच्याकडे कोकणात भोंडला च म्हणतात ..
लेख वाचून मला पण अकरावी ला 'हादगा' नावाचा एक धडा होता तोच आठवला Happy

Thanks अंजली.. Happy
आम्ही ते नदीच्या ' पलीकडे ' म्हणतो. आणि एक दोन शब्द इकडेतिकडे बाकी सेम
'तोंडात विडा शेणाचा'
आणि तिकडे 'पायात बुट पुणेरी'

वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
चिमण्या चिमण्या म्हणुन त्याने उडवून टाकल्या... असे...>>

आमचा वेडा करंज्या होड्या करून सोडायचा Lol

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या

Pages