चिन्नु

लकेर

Posted
5 months ago
शेवटचा प्रतिसाद
5 months ago

कुठून लकेर येते, माझे जीवन गाणे होते!

लाटेचे पैंजण किणकिणती, झुळकेशी खिदळत मोहक गाती,
अल्हाद सूरांना दटावत एक, पान तिथे संन्यासी होते-
माझे जीवन गाणे होते!

मध्येच दिसते, लपून बसते, लाजून आढेवेढे घेते,
मनमोराला उगा खूळावत, अवखळ धून सवार होते-
माझे जीवन गाणे होते!

मी पहिली मी पहिली म्हणते, अल्लड श्रुती नादावत जाते,
भावसख्याचे गूज लेऊनी, खळखळते! रुणझूणते!
माझे जीवन गाणे होते!

- चिन्नु

प्रकार: 

गोंगुरा दाल (अंबाडीची भाजी घालून डाळ)

Submitted by चिन्नु on 26 September, 2016 - 07:04
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंबाडीची पाने- दीड कप, तुरीची शिजवलेली डाळ - दीड कप, मूठभर शेंगदाणे, ४ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा चिरून, मीठ, कोथिंबीर
हळद, हिंग, जिरे-मोहरी, कडीपत्ता, २ हिरव्या मिरच्या कापून, २ सुक्या लाल मिरच्या, फोडणीसाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

तूरीची डाळ शिजवून घ्या. आंबाडीची पाने धुवून घ्या.
गॅस मध्यम आंचेवर ठेवून पातेल्यात फोडणीसाठी तेल घाला. गरम झाल्यावर हिंग, हळद, मिरच्या, शेंगदाणे, जिरे, मोहरी घाला. तडतडल्यावर त्यात आंबाडीची पानं घालून तेल सुटेतोवर परता. लसूण ठेचून घाला. कांदा व मीठ घाला. तुरीची डाळ घालून ५ मिनिटे उकळू द्या.
कोथिंबीर घालून गरमागरम वाढा की ओरपा!

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. अंबाडीची पानं जर आंबट नसतील तर चिंचेचा कोळ थोडासा घालू शकता.
२. शेंगदाणे वगळल्यास चालतील पण मग 'ती' चव येणार नाही.
३. मिरच्या आपापल्या आवडीनुसार घालणे. तिखटही चालेल.
४. पोळी किंवा भाताबरोबर छान लागतेच, सूप म्हणूनही संपते.
५. पाणी तुरीच्या डाळीबरोबरचे घाला. जास्त पाणचट नको.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट

गाणं..

Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago

हृदयाला घट्ट बिलगून आहे एक गाणं..

एका एका श्वासाने भरत जातो अंतरा,
थोडा चंद्र , थोडा सूर्य की चांदण्यांच्या मात्रा..

फुलपाखरी पंख घेऊन भुर्र फिरून येते,
मनातल्या चोराला मोकाट सोडून देते!

कुठंकुठं खण्ण वाजते अनुभूतीचे नाणं..
चढ्या लयीत गाऊन घेत्ये मिठीतलं गाणं!

खोल खोलश्या विहीरीतून आलेत सूरपक्षी
पाणी शिंपीत तुळशीपाशी तुझ्या रांगोळीची नक्षी..

एक सूर पारव्याचा, एक जीवनगाणं..
जुन्या गोधडीच्या मऊ पोतीचं आहे रेशीमगाणं...

प्रकार: 
शब्दखुणा: 

दोडक्याचे कबाब

Submitted by चिन्नु on 25 December, 2014 - 03:17
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ लहान दोडके शिरा काढून, १ मध्यम बटाटा, २ लहान हिरव्या मिरच्या, १ च्मचा आलं-लसूण पेस्ट, १ जुडी कोथिंबीर, २ छोटे चमचे रवा, मीठ, शॅलोफ्राय करायला तेल, आवडत असल्यास एक छोटा कांदा बारीक चिरून, ताजे मटारदाणे, बाईंडींगसाठी बेसन आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात पण लागेल तसे.
कबाबची प्लेट सजवायला कोथिंबीर, गाजराची फुले, काकडीचे आणि कांद्याचे काप.

क्रमवार पाककृती: 

दोडक्याच्या शिरा काढून तुकडे करा. बटाट्याची साल काढून तुकडे करा. हे तुकडे, थोडी मटार, अर्धी जुडी कोथिंबीर (काड्यावाला भाग), हिरव्या मिरच्या, आल-लसूण पेस्ट, थोडे मीठ घालून मिक्सरमधून वाटा.
*आशूडीने सुचवल्यानुसार-- मिक्सरमधून काढलेले मिश्रण थाळीत एका बाजूला ठेवले तर दोडक्याचे पाणी निघून येईल ते वेगळे करावे म्हणजे बाईंडिंगला पीठ कमी लागेल.
रवा घाला. ५ मिनिटे ठेवा तसेच. नंतर लागेल तसे बेसन, तांदळाचे पीठं, मीठ, जीरे, मटारदाणे, कोथिंबीर, कांदा मिक्स करा. कबाब थोड्या तेलात शॅलोफ्राय करा. एका प्लेटमध्ये सॅलड आणि केचपबरोबर किंवा कांदा काकडीने सजवून खायला द्या.

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात आलू टिक्कीच्या आकाराचे ८ कबाब झालेत.
अधिक टिपा: 

१. मिश्रणात पाणी मुळीच लागत नाही. दोडक्याचे पाणी पुरते.
२. एकदा मिक्स केल्यावर कबाब लगेच लावावेत, नाहीतर दोडक्याचे पाणी सुटत जाते, मग भजी तळावी लागतील Happy
३. थोडा गाजराचा कीस मिक्स करू शकतो, पण एक गोडीळ चव येते. तशी न येता मीठ आणि तिखट जास्त टाकावे लागेल.
४. आधी प्लेट सजवण्याचे सामान सज्ज ठेवावे. आयत्यावेळी कबाब ठेवून गरम सर्व्ह करावे. नाहीतर तळता तळताच कबाब खाऊन फस्त होतात Proud
५. पुलाव, हे कबाब, कोशिंबीर, गाजर हलवा किंवा गुलाबजामून म्हणजे मस्त आणि लाईट बेत.
६. प्रतिसादातून सुचवलेले - बाजरीचे पीठ खमंगपणासाठी वापरता येइल. थँक्स टू आशूडी. Happy

पाककृती प्रकार: 
माहितीचा स्रोत: 
मंजुलाज किचनच्या राईस कबाबवरून प्रेरित.

मेथीची पातळ भाजी

Submitted by अल्पना on 8 October, 2013 - 00:37
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मेथीची जुडी, एक- दीड मुठ भाजलेले शेंगदाणे किंवा अर्धी वाटी दाण्याचं कुट, ८-१० लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ, हळद, फोडणीपुरतं तेल.

क्रमवार पाककृती: 

मेथीची जुडी निवडून, धूवून, चिरून घ्यावी. शेंगदाणे, मिरच्या, लसूण, जीरे आणि मीठ पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हे सगळे पदार्थ जितके मिळून येतिल तितकं चांगलं.

कढईत तेल-जीरे, हळदीची फोडणी करून त्यात मेथी परतून घ्यावी. १-२ मिनीट झाकण ठेवून शिजवावी. नंतर यात शेंगदाण्याचं पातळ वाटण घालून १०-१२ मिनीट उकळू द्या. भाजी तयार.

ही भाजी चपाती /भाकरी चुरून खाण्याइतपत पातळ असते.

औरंगाबादच्या आजूबाजूच्या भागात करतात बहूतेक अशी भाजी. आमच्या घरी, शेजारी कधी खाल्ली नव्हती. पण जावेच्या आईकडे त्यांच्या स्वैपाकाच्या बाईने करुन खाऊ घातली. तेंव्हापासून ही माझी आवडती भाजी झाली आहे.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

पातळ असल्याने ही भाजी नेहेमीच्या मेथीसारखी चोरटी होत नाही. घरात एखादीच मेथीची जुडी असेल तर करायला सोयीची.
चिन्नु आणि इतरांनी दिलेल्या टिपा -
१.या भाजीत उकडलेला कांदाही घालतात. कांदा सालपटं काढून उकडायचा आणि चिरा देऊन ग्रेव्हीत सोडा. तेव्हढा वेळ नसेल तर कांदा सालासकट गॅसवर भाजायचा व गरम ग्रेव्हामध्ये चिरा देऊन घालायचा.
कांद्याची पातही मस्त लागते.
२. यातच थोडीशी शिजवलेली तुरीची डाळ पण मॅश करून घालता येते.
३. कच्ची हिरवी मिरची घेण्यापेक्षा भाजलेली हिरवी मिरची, मिरे पण वाटणात घालतात.
४. या पद्धतीने सगळ्या पालेभाज्या करता येतिल.
५. अशाच प्रकारच्या ग्रेव्हीमध्ये इतर भाज्या - घोसाळी, दोडकी, दुधी पण करतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
माहितीचा स्रोत: 
अंतिका मावशी
Subscribe to RSS - चिन्नु