चिठ्ठी भाग 3

Submitted by चिन्नु on 26 December, 2019 - 09:42

चिठ्ठी भाग 2 -
https://www.maayboli.com/node/72818

आतून अनुला आईबाबांचं बोलणे ऐकायला येत होते.
"कुठे उधळलेत चिरंजीव? आज तरी शाळेत जाणार का?"
"राहू द्या हो. चिंगी नाहीये ना इथे. म्हणून भिरभिरलाय जरा."
'कशी गोड माझी सुमाक्का!'
अनुने मनातल्या मनात आईला पप्पी देऊन टाकली. आता शाळेत जावं लागणार नाही या विचाराने त्याला एकदम तरतरी आली. उठून उभं राहत त्याने एक पाऊल मागे घेतलं आणि 2-3 ढांगांमध्ये उडी मारून मागची भिंत पार केली. पण हाय! समोरून चिंगीचे वडील येत होते. ते अनुला जामच आवडायचे नाहीत. जरा पोट सुटले होते पण एखाद्या पैलवानासारखे दिसत. ते कुणाशी बोलत नसत. अनुशी तर नाहीच. तरी तो त्यांना टरकून असे. ते केसांना मेंदी लावत म्हणून त्यांना अनु मेंदीचं झाड म्हणे.
त्याउलट चिंगीची आई. सर्वांशी अघळपघळ बोलत. अनुचे फार लाड करत. चहा खारी देत, टीव्ही लावून देत. एकदा टीव्हीवर एका कार्टून फिल्म मध्ये त्यांच्या सारख्या दिसणार्या एका पात्राचं नाव होतं पानकीबेगम!
तसा अनु सुरुवातीला त्यांच्या कडे जायला बिचकायचा. एक दिवस चिंगीच्या आईने त्याला रस्त्यात गाठून विचारलं "काय रे बाळा? तू का येत नाहीस आमच्या कडे? "
"तुमच्या घरी तो माणूस राहतो ना, तुम्ही त्याचे हातपाय बांधून त्याला पलंगाखाली टाका. मग मी येईन तुमच्या घरी!"
असं उत्तर दिले असले तरी चिंगीकडून तिचे बाबा घरात नसल्याची खातरजमा करून अनु तासनतास खेळत असे.
आता त्यांना एकदम समोर पाहून अनु जरा गडबडलाच. पण लगेच एका भिंतीआड लपून पाहू लागला. चिंगीचे वडील शेजारी डागडुजी चाललेल्या घरात शिरले. त्याआधी तिथं असलेलं जुनं घर त्यांच्या मालकीचं होतं. ते विकून टाकले त्यांनी. एक कुटुंब तिथे रहायला आले होते. ते काही रिपेअर करवत असताना प्राॅब्लेम आल्यामुळे चिंगीच्या वडीलांना बोलावले होते.
चिंगीचे वडील गेटमधून आत शिरले. तशी एक माणूस पळत आला. त्याच्याशी बोलत बोलत ते आत शिरले. तो माणूस बहुधा नोकर असावा असं अनुला वाटलं. आत जावं की नाही या विचाराने घुटमळत असतानाच एक कार आली. घरातून कुणी सुटाबुटातला माणूस आधी व त्यांच्या मागे चिंगीचे वडील व नोकरमाणूस बाहेर आले. कार मधून ड्रायव्हर उतरून पुढे झाला. मोठ्या अदबीने त्याने एक लिफाफा त्यांना देत म्हणाला, "साहब, आपके लिए चिठ्ठी भेजी है हमारे साहबने ". त्या सुटबूट काकांनी ते घेऊन वाचलं आणि काहीतरी जुजबी बोलून त्या कारवाल्याला रवाना केले. मग नंतर चिंगीचे वडील त्यांना हो जायेगा असं म्हणून निघून गेले. सुटबूट काका घरात जायला वळले. आता अनुला फावले. तो दबकत दबकत आत शिरला आणि त्यांच्या मागे जाऊ लागला. समोर काही रोपं लावण्यात आली होती. आता त्या घराचा दर्शनी भाग छान दिसत होता. तेवढ्यात त्याला मागून आवाज आला.
"कौन?"
तशी अनु झर्रकन मागे वळला. समोर सुटबूट काका पाहताच घाबरून पळू लागला.
"अरेरे! डरो नही बेटा. रूको जरा. कौन हो तुम? What's your name? "
अनुने आपला शर्ट मुठीत गच्च आवळून धरला. तो बोलत नाहीसे पाहून ते घराकडे वळले आणि त्यांनी जोरात हाक मारली, "परीबेटा! जरा बाहर आओ"
त्यांचं लक्ष नाहीसं बघून अनु बाहेर पळत सुटला.
चिठ्ठी भाग 4 - https://www.maayboli.com/node/72860

Group content visibility: 
Public - accessible to all site users