त्यापेक्षा ना.... मला एक घर दे.

Submitted by मुग्धमानसी on 8 December, 2017 - 05:42

त्यापेक्षा ना.... मला एक घर दे.
बाकी काही नको.

खिडक्या नकोत!
आतल्या आत कोंदटलेलं माझं जग मला तिथून कुठेही भिरकावून द्यायचं नाही.
त्याला उबदार जोजवायचंय. घट्टमुट्ट निजवायचंय.
तुझ्या कुशीत.

दारंही नकोत!
माझ्या दुखर्या पांगूळलेल्या श्वासांना बाहेरच्या ’सुदृढ’ हवेत नेऊन मला दुखवायचं नाही.
त्यांना अलवार पसरायचंय. अलगद उष्ण पेरायचंय.
तुझ्या छातीत.

छप्पर तर नकोच!
माझं अवकाशभर भिरभिरणारं अनाकार एकटेपण त्याला आपटून धडका देऊन रक्तबंबाळ होईल.
त्या एकटेपणाचे मळभदार ढग उंच उंच नेऊन मला गच्च बरसायचंय...
तुझ्या ओंजळीत.

भिंती तर अजिबात नको!
माझ्या समजूतींची, आठवणींची, अपेक्षा-मोहांची लक्तरं मला कुठेही ठोकून टांगून सजवायची नाहीत.
त्या लक्तरांच्या नि:शब्द अडगळीला कण कण वितळवून मला त्यांना वाहतं बघायचंय...
तुझ्या डोळ्यांत.

ओटाही नको मला! चूल नको!
देहभर प्रेमाच्या आचेवर चर्रर्र चटक्यानं काळीजभर चुरचुरणारी माझी भूक मला भागवायचीच नाही.
त्या भूकेच्या थंडगार आगडोहात असहाय्य उत्कट लालसेनं स्वत:ला झोकून देणारा तू हवायस!
माझ्या घरात!

तुला काहीतरी द्यायचंच आहे ना मला?
मग मला माझं एक घर दे.
तुझ्या तळहातावर.
बाकी काही नको!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख!

जबरदस्त दर्जेदार! एकाच वेळी निराशा आणि एक वेगळी प्रसन्नता सुद्धा.. असं गोंधळात टाकून सोडणारं लिखाण आवडतं बुवा आपल्याला