ब्रह्मदेवाला वाटलं एकदा
करावं काहीतरी अफाट!
पृथ्वी बनवण्याचा घेतला मक्ता
नवनिर्मितीचा गिरवत कित्ता,
पृथ्वीभोवती दिला एक पहारेकरी
त्याच्या हाती समतोलाची दोरी,
चंद्र आपला घालत राहिला गस्त
काही वर्षात तिचे हाल बघून झाला त्रस्त!
एके दिवशी म्हणाला ब्रह्माला,
हा असा नग देवा, तुला कसा सुचला?
बाकी सगळी सृष्टी चालते नियमाने,
नियम मोडायच काम हा करी नेमाने!
श्वास काही गन्धलेले
शब्द काही थांबलेले
कालच्या रात्रीत एका
चन्द्र सोळा माळलेले
माळल्या मिठीत एका
दो जीवांची स्पंदने
क्षणैक अधरी अमृताच्या
घागरीतील मंथने
मंथुनी काढू सखे गं
सुख दुःखे सारी आता
भारल्या गात्रांतूनी
निरवू ये साऱ्या व्यथा
व्यथेलाही लाभू देऊ
एक चंदेरी किनारा
येई तेथे निर्मूया मग
एक चंद्रमौळी निवारा
त्या निवाऱ्यातून पाहू
चन्द्र सोळा माळलेले
कालच्या रात्रीत एका
जोड तारे जन्मलेले
©निखिल मोडक
सोबती मी ह्या कृष्ण रात्रीचा,
किनाऱ्यावर आज विसावलेला ।।
जिवन अधांतरी लटकलेले अन् ,
रोमरोम कृष्णमय झालेला ।।१।।
व्याकुळलेली जणू मी अशी ,
जसा पंख तुटलेला कावळा ।।
अस्पृश्य वाटे मज प्रकाश ,
सखा हा अंधारलेला किनारा ।।२।।
गंधाळलेला मौल्यहीन अश्रू ,
माशांनी चटकन का झेलला ।।
घेऊन दूर सोबती लाटांना ,
काळोखात तो ही काळवंडला ।।३।।
अंधारलेल्या ह्या आभाळाला ,
डाग कसा पांढरा लागला ।।
चमकलेले हे चांदणे अन् ,
चंद्र कोणी असावा कोरला ।।४।।
-रुद्रा-
कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ’हा चंद्र’ नावाची. त्यात ते म्हणतात,
"त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते"
’हा चंद्र’ म्हणजे आपल्याला नेहमी आकाशात दिसतो, तो. लहानपणी गाडीतून जाताना आपल्यासोबत पळणारा, पण गाडी थांबली तर पुढे पळून न जाता आपल्यासाठी थांबून राहणारा. मोठेपणी ’चंद्र आहे साक्षीला’, ’ एकसो सोला चॉंद की रातें’ वगैरे ओळींची आठवण करून देणारा.
’तो चंद्र’ म्हणजे पृथ्वीचा उपग्रह. पृथ्वीभोवती सत्तावीस दिवसांत एक, अशा प्रदक्षिणा घालत राहणारा, सूर्याच्या सोबतीने समुद्रात भरती-ओहोटी घडवणारा, कधी सूर्यालाच ग्रहण लावणारा.
एक चंद्र कोरीचा
चन्द्र एक कोरासा
कलंक न त्यावर काही
इतकासा वा जरासा
तो जन्मा आला तेव्हा
कोणी न पाहिला त्याला
तो घेऊन आला होता
जाज्वल्य दग्ध वारसा
जळत राहिला तोही
जोवर होते शक्य
विझत जातानाही
दृढ राखले सख्य
घेतला मागून त्याने
तेजाचा एकच अंश
वाचले त्यामुळे तेज
होण्यापासून निर्वंश
रात्रीच्या गर्भात तोच
पेरतो आशा एक
शीतल मायेखाली
घेतो उन्हाची लेक
किती युगे तो असा
तपात रंजतो आहे
स्थितप्रज्ञ शांततेच्या
डोहात नाहत राहे
अमावस्येच्या चंद्रा विना चांदणी कधी सजत नाही
दिवस कसाही सरतो रे
पण तुझ्या आठवणीत ही रात्र काही निजत नाही
रक्ताळलेला भाकरीचा चंद्र
आता फक्त दोन दिवस
ओढत ताढत नेऊ पाय
लेकरू माझं घरी येईल
दारात वाट पाहते माय
चिरा पडल्या, फोड फुटले
उभंही राहू देईनात पाय
उरले नाही अंगात त्राण
विसावा जरा मिळेल काय
शांत शीतल गोल चंद्र
जणू चुलीवरची भाकर
क्षणात आली निद्रादेवी
खडबडीत खडीच्या गादीवर
जीव वाचवण्याच्या तुम्ही
नापास झालात परीक्षेत
मृत्यू गाठणारच असतो
तुम्ही जरी असाल परीक्षित
स्वप्न सुखाचे पाहता पाहता
कराल काळ आला धडधडत
स्वप्नांबरोबर थकली शरीरेही
घेऊन गेला ओरबाडत चिरडत
लहानपणी गणपतीच्या आणि सशाच्या गोष्टीतला चंद्र अगदी आवडायचा. उन्हाळ्याच्या रात्री बाहेर झोपताना या चंद्रानंच तर झोपवलं आहे चांदण्यात गुरफटून. नंतर त्याच्यावरचे खड्डे, गुरुत्वाकर्षण, परिक्रमा शिकलो. पण इतक्या तांत्रिक गोष्टींमध्ये घुसूनसुद्धा चंद्र पाहिला की त्या गोष्टी कधीच आठवत नाहीत. कदाचित चंद्र हा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर ‘केवळ आवडणे’ या एकाच गोष्टीसाठी निर्माण झाला असावा.
चंद्र जागला गं नभी चंद्र जागला।
कोजागिरी रात्र आज चंद्र जागला ।।धृ.।।
शरदमास पूनवरात्र खेळ रंगला।
आज यौवनात रात्र खेळ रंगला।
नसांनसांत नि मनांत मोद जागला।।१।।
उद्याने आज सखे सजली ही किती।
तरुलतांसी बहर सखे आज हा किती।
आसमंती दरवळला गंध आगळा।।२।।
पूर्ण चंद्र माथ्यावरी लुप्त सावल्या।
लक्ष लक्ष तारका नभात दाटल्या।
कोजागिरी उत्सवात पियुष प्राशल्या।।३।।
रचना :- डॉ. विकास सोहोनी.

---
२० मार्च २०१९. समांतर विश्वातला (Parallel universe) एक अंतराळवीर (Astronaut), त्यांच्या विश्वातल्या चंद्रावर संशोधन करण्यासाठी गेलेला आहे. त्यांच्या चंद्रावर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर प्राथमिक स्वरूपाची Wormhole मधून प्रवास शक्य करू शकणारी यंत्रणा बसवलेली आहे.