कुठे आता..

Submitted by mi manasi on 4 June, 2023 - 02:30

शोधतो आहे जुने झुरणे कुठे आता!!
ते तुझे माझे खुळे जगणे कुठे आता!!

चांदणे येते उशाशी चंद्र मधु झरतो
रेशमी स्पर्शासवे जळणे कुठे आता!!

कोवळी पाती तृणाची सर्द एकांती
नाचरे चाळे तुझे पळणे कुठे आता!!

बोलती लाटा मुक्याने ऐकतो सारे
बोलक्या डोळ्यात ते दिसणे कुठे आता!!

बरसता धारा गरजते ना तसे अंबर
हात हाती, चिंब ते भिजणे कुठे आता!!

ते तुझे नखरे किती रुसणे किती हसणे
ती मिठी तो स्पर्श ते छळणे कुठे आता!!

कोंडला वारा नभाने चोरले चंद्रा
धुंद त्या रात्री तसे फुलणे कुठे आता!!

वृत्तः राधा

मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users