जिथे नाही कधी रमलो (तरही)

Submitted by मिल्या on 23 January, 2012 - 06:19

नविन तरहीत माझाही सहभाग..

धन्यवाद कैलास...
------

चरण पकडून श्वासांचे मरण मी टाळतो आहे
जिथे नाही कधी रमलो तिथे रेंगाळतो आहे

कधीकाळी इथे पोहायला शिकवायचो ज्यांना
अता नुसतीच त्यांची लाज मी सांभाळतो आहे

मिळावे खायला भरपेट म्हणुनी लढविली युक्ती
व्यथांच्या भाकर्‍या करुनी भुकेला जाळतो आहे

कलंदर पायवाटांनी मला ना मार्ग दाखविला
हिशेबी राजरस्ते अन स्वत:हुन टाळतो आहे

अरे ह्या कोणत्या देशात नेले आज कवितेने?
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे

धरेला घट्ट धरल्याने नभाला जाउनी भिडलो
विजेने लुब्ध व्हावे ह्याचसाठी वाळतो आहे

असा मी आरश्यामध्ये स्वत:ला पाहतो आता
कुणी वाचक जणू पुस्तक उभ्याने चाळतो आहे

तुझीही वेळ येइल की... जरा तू धीर धर दु:खा !
जुने अपमान अद्यापी उरी कवटाळतो आहे

--- काही र्‍हस्व दिर्घाच्या सुटी घेतल्याबद्दल क्षमस्व

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असा मी आरश्यामध्ये स्वत:ला पाहतो आता
कुणी वाचक जणू पुस्तक उभ्याने चाळतो आहे

तुझीही वेळ येइल की... जरा तू धीर धर दु:खा !
जुने अपमान अद्यापी उरी कवटाळतो आहे>>> आवडले

(मतल्यातील ओळींबाबत जरा गोंधळ आहे मनात, कनेक्शन नीट लक्षात आले नाही) Happy

कृगैन

-'बेफिकीर'!

मतला संदिग्ध वाटला..

मिळावे खायला भरपेट म्हणुनी लढविली युक्ती
व्यथांच्या भाकर्‍या करुनी भुकेला जाळतो आहे

अरे ह्या कोणत्या देशात नेले आज कवितेने?
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे

असा मी आरश्यामध्ये स्वत:ला पाहतो आता
कुणी वाचक जणू पुस्तक उभ्याने चाळतो आहे

व्वाह!!!

विजेने लुब्ध व्हावे म्हणुन आता वाळतो आहे

गडबड आहे मात्रांची!

मिळावे खायला भरपेट म्हणुनी लढविली युक्ती
व्यथांच्या भाकर्‍या करुनी भुकेला जाळतो आहे

कलंदर पायवाटांनी मला ना मार्ग दाखविला
हिशेबी राजरस्ते अन स्वत:हुन टाळतो आहे

धरेला घट्ट धरल्याने नभाला जाउनी भिडलो
विजेने लुब्ध व्हावे म्हणुन आता वाळतो आहे...
>>>> हे आवडले. Happy

भूषण, नचिकेप, केपी धन्यवाद..

मतला म्हणावा तसा अजूनही जमला नाही... मिसरा बदलला पण तरीही संदिग्धता जाईल असे नाही... अजूनही विचार सुरू आहेच..

नचिकेत : 'म्हणुन' बदलले आहे Happy

कलंदर पायवाटांनी मला ना मार्ग दाखविला
हिशेबी राजरस्ते अन स्वत:हुन टाळतो आहे

अरे ह्या कोणत्या देशात नेले आज कवितेने?
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे

धरेला घट्ट धरल्याने नभाला जाउनी भिडलो
विजेने लुब्ध व्हावे ह्याचसाठी वाळतो आहे>>>

झक्कास!!

मतल्याबद्दल बेफि व नचिकेतशी सहमत!

अरे ह्या कोणत्या देशात नेले आज कवितेने?
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे

असा मी आरश्यामध्ये स्वत:ला पाहतो आता
कुणी वाचक जणू पुस्तक उभ्याने चाळतो आहे............

.......................

पु.ले.शु Happy

चरण पकडून श्वासांचे मरण मी टाळतो आहे
जिथे नाही कधी रमलो तिथे रेंगाळतो आहे

कुणाचे तरीपाय धरुन मी आजचे मरण उद्यावर ढकलत आहे(टाळत आहे)... परँतु असे करणे हा माझा स्वभाव नाही.

हा अर्थ मला लागला.

चाळतो,कवटाळतो फार आवडले.

धन्यवाद श्याम आणि कैलास...

कैलास - बरोबर मला असेच आणि थोडे अजून काही म्हणायचे आहे आणि ते नीट पोचत नाहीये हे मान्य आहे ...

अरे ह्या कोणत्या देशात नेले आज कवितेने?
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे

असा मी आरश्यामध्ये स्वत:ला पाहतो आता
कुणी वाचक जणू पुस्तक उभ्याने चाळतो आहे

तुझीही वेळ येइल की... जरा तू धीर धर दु:खा !
जुने अपमान अद्यापी उरी कवटाळतो आहे

---हे तिन्ही खूप आवडले.

मिळावे खायला भरपेट म्हणुनी लढविली युक्ती
व्यथांच्या भाकर्‍या करुनी भुकेला जाळतो आहे

धरेला घट्ट धरल्याने नभाला जाउनी भिडलो
विजेने लुब्ध व्हावे ह्याचसाठी वाळतो आहे

या दोन्ही शेरात काय म्हणायचे आहे ते कळाले नाही भौ.

मिल्याजी,
एक मतला सुचवीत आहे. विचार व्हावा:
असे उसन्याच श्वासांनी मरण मी टाळतो आहे
जिथे नाही कधी रमलो तिथे रेंगाळतो आहे

-- जयन्ता५२

चरण पकडून श्वासांचे मरण मी टाळतो आहे
जिथे नाही कधी रमलो तिथे रेंगाळतो आहे

श्वासांचे चरण पकडण्याची आणि त्यायोगे जिवंत राहण्याची नॉव्हेल कल्पना कवीला उला मिसर्‍यात सुचली याचे अभिनंदन. दुसरी ओळ ठरलेलीच असल्याने आणि ही तरही गझल असल्याने मतला साफ आहे या पलीकडे या मतल्याकडे पाहण्याचे टाळलेले योग्य.

कधीकाळी इथे पोहायला शिकवायचो ज्यांना
अता नुसतीच त्यांची लाज मी सांभाळतो आहे

पहिल्या ओळीतील 'इथे' या शब्दाची भरीव गरज जाणवली नाही. किंवा पहिल्या ओळीत इथे ऐवजी तिथे आणि दुसर्‍या ओळीत अता ऐवजी इथे असे केल्यास एक वेगळा अर्थ स्थापन व्हावा. नुसतीच लाज सांभाळणे या शब्दप्रयोगात गहन गडबड जाणवली. लाजेव्यतिरिक्तही काही सांभाळायचे होते काय असा एक विचार चाटून जातो. लाज सांभाळणे म्हणजे लाज वाचवणे असे म्हणायचे असले तरी या शब्दरचनेत लाज सांभाळणे म्हणजे काठावरील चिरगुटे चोरीला जात नाहीत हे पाहणे असा अर्थ ध्वनीत होतो. कल्पना करा की कवी स्विमिंग टॅन्कवर काही जलतरणपटूंचे कपडे सांभाळत बसला आहे व ह्यांना आपणच पोहायला शिकवले होते हे आठवून खिन्न होत आहे. यातील पोहण्याचे रूपक हे आश्वासक आहे मात्र ते ज्या अभिव्यक्तीसह समोर आले आहे ते वाचून सुरुवातीला एखादा अपरिपक्व गझल रसिक चोरून हासण्याची शक्यता आहे.

मिळावे खायला भरपेट म्हणुनी लढविली युक्ती
व्यथांच्या भाकर्‍या करुनी भुकेला जाळतो आहे

आधी हाताला चटके, मग मिळते भाकर. या ओवीतील शास्त्रीय क्रमाला कवीने सीमेपलीकडे भिरकावलेले दिसते. येथे कवी प्रथम भाकरी करत आहे आणि मग भूक जाळत आहे. दिवस किती बदलले हे यातून सहज समजावे. लढविली ऐवजी काढली केल्यास 'गालगा' हा परफेक्ट वृत्तीय अक्षरक्रम सांभाळूनही आशयात फार फरक पडणार नाही. सुरेश भटांनी अनेकदा व्हिज्युअलाईजच करता येणार नाहीत अशा कल्पनांना गझलेत स्थान दिलेले आढळते. म्हणजे विजांचा झिम्मा, इमानी आसवे वगैरे. तशाच या व्यथांच्या भाकर्‍या.भाकरी व इडली या शब्दांची अनेकवचने मराठीत भाकरी व इडलीच (अनुक्रमे - अर्थातच) होतात. मात्र भाकर्‍या हा शब्द घेऊन या शेराला एक ग्रामीण बाज चढवण्यात कवी यशस्वी झालेला दिसतो.

कलंदर पायवाटांनी मला ना मार्ग दाखविला
हिशेबी राजरस्ते अन स्वत:हुन टाळतो आहे

हा शेर आमच्या आकलनशक्तीपलीकडील आहे.

अरे ह्या कोणत्या देशात नेले आज कवितेने?
जिथे निवडुंगही अष्टौप्रहर गंधाळतो आहे

अरे या शब्दामुळे 'अरे तिच्यायला, हे कुठे आलो राव मी' असा एक घाबरलेला उद्गार मनात येतो. पण निवडुंग गंधाळणार्‍या ठिकाणी पोचल्याचा कवीला तर आनंदच होणार. अरे ऐवजी मला का चालू नये (मला हा शब्द गझलेत दोनतीनदा आल्याने टाळण्याचे कारण नसतेच म्हणा) हे लक्षात आले नाही. निवडुंग अष्टौप्रहर गंधाळणे हे नुसतीच लाज सांभाळण्यासारखे आहे. निवडुंगाने दिवसातून दोनच तास गंधाळणे अभिप्रेत आहे का असे वाटते. निवडुंगाचा कवितेतील वापर सहसा बोचरेपणासाठी अथवा फोफावलेपणासाठी केला जातो. येथे गंधाळण्यासाठी केला आहे हे नावीन्य आहेच . त्याच वेळी 'गंधाळायला' निवडुंगच का आठवला हे मात्र लक्षात येत नाही. काही वेळा काही शब्द आपले स्वतःचे सौंदर्य घेऊन येतात. जसे 'रात्रंदिवस' या शब्दाऐवजी 'अष्टौप्रहर' हा समवृत्तीय शब्द अधिक सुंदर आहेच. हे श्रेय कवीचेच. बाकी शेराहा अशय अगदी पन्नास पन्नास टक्के नसला तरी निदान तीस सत्तर या प्रमाणात तरी दोन ओळींत विभागला जावा. पण येथे वीस ऐंशी झालेले दिसते.

धरेला घट्ट धरल्याने नभाला जाउनी भिडलो
विजेने लुब्ध व्हावे ह्याचसाठी वाळतो आहे

पहिली ओळ सुंदर. दुसरीवर आम्ही काही बोलणार नाही.

असा मी आरश्यामध्ये स्वत:ला पाहतो आता
कुणी वाचक जणू पुस्तक उभ्याने चाळतो आहे

पुस्तक उभ्याने! व्वा व्वा! कवीच्या अनेक सुंदर गझलांमधील कवीची वास्तविक चुणूक या शेरात दिसतेच दिसते.

तुझीही वेळ येइल की... जरा तू धीर धर दु:खा !
जुने अपमान अद्यापी उरी कवटाळतो आहे

चांगला शेर

कळावे

गंभीर समीक्षक