मराठी कविता

भेटीगाठी

Submitted by प्रतिक सोमवंशी on 27 June, 2019 - 09:30

रात ठिबकते साथ देऊनी उनाड तळ्याकाठी
त्याच किनारी ठरल्या होत्या आपल्या भेटीगाठी
गंध माळूनी नक्षत्रांचा फुलली राने आहेत
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत

लख्ख पडल्या चंद्रप्रकाशात ही रात धूसर भासते
लागोलाग उठल्या वलयांमध्ये तुझी सावली दिसते
मला भेटाया तळ्यात उतरले सारे तारे आहेत
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत

धुंद वाहत्या वाऱ्यावरती औदुंबर सळसळते
पायाखालच्या पाचोळ्यातुन कुठे व्याळ वळवळते
श्वास रोखुनी अंधारातून सावज धावते आहे
माझी म्हणाया रितेपणात या माझी पाने आहेत

पाऊस तू अन कविता

Submitted by प्रतिक सोमवंशी on 26 June, 2019 - 10:36

एक एक थेंब अवकाशातून कोसळताना
एकदा अंगणी उभी राहा
हात पसरवून ते पाणी अंगावर झेल
आठवेल आता तुला
एक एक ओळ - माझ्या कवितेची
ज्या मी सुरवातीला तुझ्यासाठी लिहिल्यात
नाही म्हटल्या तरी आठवणीत राहिल्यात

वूमन्स डे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 25 June, 2019 - 03:00

व्हेंटिलेटरवर ती
इसीजी चा टूनग, टूनग आवाज
उरात भीती, घश्यात अडकलेले श्वास
वातावरणात पसरलेला औषधी वास
“वाचेल का हो ?” -मी
.
व्हेंटिलेटरवर - ती
फाटलेले ओठ , रक्ताळलेल शरीर
असंख्य जखमा घेऊन, खचलेला धीर
तशी ती चुरगळुन बिरगळुन टाकलेली
रस्तावर कचऱ्याच्या ढिगाच्या काठी
पण खरच कुणी नाही आज तिच्या पाठी
.
व्हेंटिलेटरवर ती
“डॉक्टर प्लिज वाचवा ना तिला” -मी
कस घडल? कुणी केल? तू कोणते कपडे घातले होतेस?
किती पिलेली होतीस? वगैरे वगैरे
एक इंटरव्ह्यू पाहिजे मला फक्त
थोडा वेळ बोलली तरी चालेल

तिच्या समोरील पाने

Submitted by प्रतिक सोमवंशी on 23 June, 2019 - 11:35

काल मी तिच्यासमोर ठेवून दिली
मी लिहिलेली काही पाने
मागच्या काही महिन्यात लिहिलेली
तिच्या ओठांवर लिहिलेल्या चारोळ्या
तिच्या पाठीवर लिहिलेल्या कविता
अन तिच्यावर लिहिलेल्या गजला
तिच्या केसांत गुंफलेली त्रिवेणीही होतीच
त्या फक्त ओळी नव्हत्या , प्रत्येक ओळ ती स्वतः होती
कशीही का असेना पण माझी होती
कित्येक मैफिली गाजवल्या होत्या मी
त्या ओळींवर, तिच्या जीवावर
तिने पान उचलले, ती वाचू लागली
माझी नजर तिचे भाव टिपू लागली
तिने हळूच एक भुवई वरती केली
एक उसासा टाकला,
पान खाली ठेवून दिल

काळ अनंत आहे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 22 June, 2019 - 08:01

बघ कुठेतरी काहीतरी राहून गेलय...
एक एक क्षण हातातून निसटून जातोय...
तुझाही प्रवास असाच सगळ्यांसारखा...
अनंताकडून अनंताकडे...
काय कमावलस? काय गमावलस?
याच्या हिशोबात पडू नकोस...
तुझ गणित अजूनही कच्चच आहे...
बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार,
इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रीग्नोमेट्री,
क्वांटम फिजिक्स, सेलेस्टीअल मेकॅनिक्स,
कॉस्मोलॉजि, अस्ट्रोलॉजि,
न्यूटनचे, डार्विनचे, पायथागोरसचे कोणतेही सिद्धांत लावलेस तरी...
शेवटी ‛शून्य’च उरणार...
वरच्या शंकूतील वाळू खालच्या शंकूत
अशीच हळू हळू निसटत जाणार...
.

स्वतःशीच बोलायचे राहून गेले ...

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 June, 2019 - 09:52

खूप कमवली धन दौलत
खूप कमवली नाती
खूप जपली माणस आपली
खूप जपल्या आठवणी
खूप मिळाले मित्र नवे
खूप जण साथ सोडून गेले
खूप जगलो सुखात आयुष्य
खूप दुःखही सहन केले
खूप हसलो सुखात
खूप दुःखात रडूनही झाले
पण
पण
या सर्वांशी करार करताना
स्वतःशीच बोलायचे राहून गेले ...
©प्रतिक सोमवंशी

कागदावरच्या शाहीचे डाग आता सुकले आहेत

Submitted by प्रतिक सोमवंशी on 19 June, 2019 - 13:31

कागदावरच्या शाहीचे डाग आता सुकले आहेत
माझ्या गजलेचे काही शेर मुद्दाम चुकले आहेत

आम्हा भुकेचे व्याकरण भूक लागल्यावर कळत नाही
भुकेल्या पोटापुढे पोरं अक्षरांना मुकले आहेत

बागेमध्ये बसलेली कित्येक पाखरं प्रेम करतात
त्यांच्या अमर नावांमुळे कित्येक खोडं दुखले आहेत

मी काय म्हणतो, तुम्हाला कश्याला तो गुलाब हवा?
त्याच गुलाबाच्या नादात किती काटे रुतले आहेत?

स्वप्न सारी दाखवून ते मत घेऊन गेले होते
सांगा तर निवडून आल्यावर ते कुठे खपले आहेत?
©प्रतिक सोमवंशी

दिलातील जळजळ

Submitted by प्रतिक सोमवंशी on 14 June, 2019 - 08:25

घेऊन चला जिथे नभांची हळहळ आहे
ओकायची तिथे दिलातील जळजळ आहे

बरसायचे आहे मुक्त माझ्या जाणिवांना
माझ्या उरात दाटली त्यांची वळवळ आहे

खूप दाटले आहे हे धुके उन्हाळ्यात
वाटते सावलीत माजली खळबळ आहे

दाही दिशात पळती हे रुधिराचे घोडे
नसानसांत भरली त्यांची चळवळ आहे

नसेल उदयाच्या वेशीला तिमिराचे तोरण
लावलेल्या तिथे दिवट्या ही बळबळ आहे

अथांग सागराला का विचारतात प्रश्न
उत्तरात लपलेली त्याची कळकळ आहे
©प्रतिक सोमवंशी

पाऊस बनून जावं

Submitted by प्रतिक सोमवंशी on 14 June, 2019 - 08:20

पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
आपण कितीही कोरडे असलो
तरी पाण्यासारख वहाव

वाहून न्याव्यात कधी कागदाच्या बोटी
बरसण्यासाठी मिळतात नाणीही खोटी
कधी असच छोट्या सुखासाठी झगडावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं

अंगणी चिखल होतो कधी कधी
पण त्यामुळेच बहरतात पेरलेली दाणी
कधी येतो पूर, कधी वाहून जातात गायी
पण समतोलासाठी कधी अस पण करावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं

तू फक्त भेट तिला एकदा किनारा बनून

Submitted by प्रतिक सोमवंशी on 13 June, 2019 - 05:22

तू फक्त भेट तिला किनारा बनून
फिरू दे ना थोड तिला
तुझ्या प्रेमाच्या किनाऱ्यावर,
भिजू दे ना तिला थोड,
त्या तुझ्या बऱ्या वाईट लाटांतुन उडणाऱ्या तुषारांमध्ये,
कळू देत तिला काय देण लागते ती या समुद्राच
भेट तिला एकदा किनारा बनून...
रेखाटू देत तिला ही
तिच्या मनात लपून ठेवलेल्या जखमा
तुझ्या मनाच्या रेतीवर,
पण हो लाटांनी त्या पुसायचा प्रयत्न मात्र नको करुस
मग बघ बांधेल तीही,
तिच्या स्वप्नांचा महल.
तू मात्र शंख शिंपल्यांची आरास करून तिला थोडीफार मदत मात्र कर.

Pages

Subscribe to RSS - मराठी कविता