कुठे मनास गुंतवू....? ㅤㅤㅤㅤㅤㅤㅤㅤ(पञ्चचामर)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:42

"कुठे मनास गुंतवू?" विचित्र प्रश्न काय हा ?
चहू दिशातुनी कुणी मनास बोलवी पहा ।
असेल पर्वणी इथे क्षणोक्षणी लहानशी
अशा सुखा जपूनिया शिदोर ठेव छानशी ॥१॥

निसर्ग रंग माखतो सदैव जीवनास रे
तयास पांघरून घे, कधी नको म्हणू पुरे ।
लहान रोपट्यावरी नव्हाळ एक पान ते
दंवात चिंबते पहा जिथे उद्या पहाटते ॥२॥

लहानग्या मुलास जोजवी कुशीत माउली
तिच्या मुखावरी पहाल तृप्तता उजाडली ।
जरी कितीक वंचना विवंचना जगात या
कृतार्थता जिण्यातली सुखात झाकते तया ॥३॥

जबाबदार जाणिवा पुनश्च मार्ग रोखती
धरून धैर्य पावले पुढील मार्ग शोधती ।
थकूनिया घरी चहा पिता मनी निवान्त तो
बघूनिया कुटुंब आपले सुखी सुखावतो ॥४॥

कधी चुकून जोडलाय हात देवदर्शना
असेल नेम घेतलाय नित्य ईशपूजना ।
क्षणाभरामुळे जरा मनातुनी विसावतो
विरूनिया वृथा व्यथा हळूच तो सुखावतो ॥५॥

कला अनेक लाभल्या खुलून व्यक्त व्हावया
मनामधील भावना जगापुढे दिसावया ।
तयात आत्ममग्नता, प्रचंड लाभ होतसे
विशुद्ध एकटेपणा जगून तृप्तता असे ॥६॥

अनेक या अशा क्षणातल्या सुखासवे जशी
मनास गुंतण्यास कारणे इथे बरीचशी ।
तरी कसा सवाल व्यर्थ भेडसावतो पहा
"कुठे मनास गुंतवू?" विचित्र प्रश्न काय हा ? ७॥

उगा कशास भव्य दिव्य वा उदात्त शोधशी ?
जिण्यास रोजच्या कसे उगाच क्षुद्र मानशी ?
समोरच्या जगात जे दिसे तसेच चांगले
म्हणून त्यात गुंतुनी जगून व्हा सुखी भले ॥८॥

- स्वामीजी ८-३-१४ㅤ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aprateem

पंचचामर वृत्त हे वीररसप्रधान, पुरुषार्थी असं मानलं जातं असं ऐकलं आहे, त्याचा पुरेपूर परिपोष शब्दाशब्दातून झाला आहे, आणि तोही साध्या रोजच्या जगण्याच्या संदर्भात .
'शिदोरी'चं 'शिदोर 'हे लघुरूप खूप आवडलं Happy

अहा, स्वामिजी, ... सुरेख. सुखाची ही साधी सोप्पी कल्पना... कल्पना नव्हेच... साक्षात रूपच.
किती सुरेख.

सर्वांगसुंदर रचना, आशयघन आणि गोडही...

अवांतर - कधी चुकून जोडलाय हात देवादर्शना - इथे "देवदर्शना" असे हवे आहे का ? आगाऊपणाबद्दल क्षमस्व.

वा ! छान.
"उगा कशास भव्य दिव्य वा उदात्त शोधशी ?
जिण्यास रोजच्या कसे उगाच क्षुद्र मानशी ?
समोरच्या जगात जे दिसे तसेच चांगले
म्हणून त्यात गुंतुनी जगून व्हा सुखी भले ॥८॥" >>> हे सर्वात विशेष.

सुरेख रचना. आवडली.

"नको मनास गुंतवू!" कलीच बोलवीत हा ।
चहूकडून सारखे सदाच लोभवीत हा ॥
असेल वाटली जरी, न पर्वणी मुळीच बा ।
कशास लागते शिदोर, दोर बांधते उगा ॥