चंपकमाला

ऐक जरा ना.. (वृत्त चम्पकमाला)

Submitted by स्वामीजी on 4 August, 2014 - 02:17

सांजसकाळी कातरवेळी
गूज मनाचे ऐक जरा ना..

झांजर वारा कातळमाळी
भोकर बोरे काजळजाळी,
चाखुन घेता माधुर ओठी
बोलत जाऊ लाघव गोठी..

पाउलवाटा आड मळ्याची
धून सजावी गोड गळ्याची,
मावळतीला सूर्य बुडावा
लाजत हाती हात धरावा..


भेट घडाया मुक्त मनाची
चाहुल ना हो दूर कुणाची,
तू बरसावे बावर गाणे
स्वप्न मनीचे गोजिरवाणे..

आवरताना सावरलेले
पाझर डोळे बावरलेले,
प्रीत उरीची व्याकुळ व्हावी

भाव मनी हे, भेट घडावी..

(वृत्त चम्पकमाला - गालल गागा गालल गागा)

- स्वामीजी
(काही ठिकाणी या वृत्ताचे नाव "रुक्मवती" असे सुद्धा दिलेले आहे)

संपादन...

Subscribe to RSS - चंपकमाला