सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्त होत आहे

Submitted by जयदीप. on 2 August, 2014 - 14:52

आता हवेप्रमाणे गेलेत दूर वारे
आपापलीच हलती आशाळभूत पाने

ते ऎकतात काही गाणी जुनी नव्याने
गाते समोर कोणी, कोणी मनात गाते

ठरल्यानुसार सगळे काही घडून जाते
ओंजळ भरून सुद्धा पाणी निघून जाते

भरती पुसून गेली सारेच ठाव माझे
वाळूमधे कशाला लिहिलेस नाव माझे

सूर्योदयाप्रमाणे सूर्यास्त होत आहे
लिहिलेस तू तसे हे आयुष्य जात आहे

.....जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे शेर छान आहेत

आपापलीच हलती आशाळभूत पाने << छान इंप्रेसिव्ह मिसरा वाटला

ठरल्यानुसार सगळे काही घडून जाते<<सगळेकाही असा एकसंध शब्द हवा वेगवेगळे केल्याने त्या दोन शब्दात संभ्रम निर्माण होवू पाहत आहे . आनंदकंदात यतिभंग खटकतो. बदल आवश्यक .

ठाव नाव मध्ये एक वेगळी जमीनही आढळते असे काही झाले की मला व्यक्तिशः आवडते
शेवटचा शेरही जमीनीत वैविध्य आणणारा वाटला

संपूर्ण गझल आवडली

प्रत्येक ओळ आवडली आणि गझल वाटली नाही.

स्वरकाफियासोबत रदीफ घेतली तर गझलेचे सौंदर्य 'अबाधित' राहू शकते. उर्दूप्रमाणे मराठीत (देवनागरीत) स्वरचिन्हे लिहिताना वेगळी लिहिली जात नाहीत. त्यामुळे मराठीत हा विचार आलेला आहे.

हिला गझल म्हणायचं की नाही Happy

लिहिली तेव्हा जाणवत होतं की काहीतरी कमी आहे (अमिबासारखी वाटत होती ..) :p

पण मला जे म्हणायचं होतं ते मांडता येत होतं... म्हणून लिहिली

या पुढे अशी स्वरकाफिया (रदीफ नसलेली) गझल लिहिणार नाही. Happy

स्वरकाफियासोबत रदीफ घेतली तर गझलेचे सौंदर्य 'अबाधित' राहू शकते<<<<< १००% सहमत

पण आपल्या ह्या रचनेत तसे झाले नाही म्हणून ही गझल नाही असेही नक्कीच म्हणता येणार नाही जोशी.
बेफीजी म्हणत आहेत की तसे केल्याने गझलेचे सौंदर्य अबाधित राहील . आता आहे ते जरा कमी सुंदर आहे असा अर्थ त्यातून निघतो आणि ही रचना गझल नाही असे तर कुठेच कोणी म्हटलेले नाहीयेय . कोणी असे म्हणेल असेही वाटत नाही .
रदीफ नसलेली स्वरकाफियाची गझल हा प्रकार मराठीत जास्त हाताळला गेला नसावा ह्यात आकृतीबंधाचा बांधीवपणा रसिकाला सहजतेने लक्षात येत नाही .पण काळ जसजसा जाईल तशी अशी गझल जास्त समरसून अनुभवायला रसिक शिकतील असे वाटते . ह्या गझलेच्या प्रकाराला (अश्या आकृतीबंधाला ) मराठीत नक्कीच स्कोप आहे असे माझे मत आहे .
पण हेही खरे की गझलेचे सौंदर्य अबाधित राहणे हा बेफीजींचा मुद्दा तितकाच अकाट्य आहे (खोडून काढताच येणार नाही असा ) आणि जोशी आपण असा एखादा निर्णय घ्याल तर तेही स्वागतार्हच ठरावे असेही मला वाटते .

>>>आता आहे ते जरा कमी सुंदर आहे असा अर्थ त्यातून निघतो आणि ही रचना गझल नाही असे तर कुठेच कोणी म्हटलेले नाहीयेय . कोणी असे म्हणेल असेही वाटत नाही .<<<

ह्याला गझल म्हंटले जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे

जयदीप ह्यांनी आश्वासक गझल रचना दिलेल्या आहेत. वैवकु तर तरबेज गझलकार आहेतच.

आपण सगळ्यांनी मिळून हा काव्यप्रकार त्याच्या भटांनी सांगितलेल्या वैशिष्ट्यांसकट आणि उर्दूत अनुभवलेल्या गुणांसकट अभेद्य ठेवावा अशी बहुधा अपरिपक्व अपेक्षा आहे. बाकी जे ज्यांना करायचे ते ते करतीलच.

(फुक्कट मिळालेला) युनिफॉर्म घातलेल्याला शिस्त लावता येते.

ह्याला गझल म्हंटले जाऊ नये अशी प्रामाणिक इच्छा आहे <<

आपल्या इच्छेचा मी आदर करतो . आपल्या अश्या इच्छेमागची गझलतंत्रातील कारणे पटतातही पण मला वाटते कालप्रवाहाचा रेटा गझलेचा प्रवाह कुठे घेवून जावू इच्छितो आहे हे काळानुरूप उलगडत जाईल . आपण वाट पाहिली पाहिजे
अलामत ही गझलतंत्राचे आत्मतत्व असल्यासारखी असते असे मला वाटते मी गझलतंत्रात काळानुरूप होत गेलेले बदल जे अभ्यासले ते गझलेत अलामतीनंतरची जागा हळूहळू रिकामी करण्याच्या दिशेने एक एक करत होत गेले आहेत व ते स्वीकारले गेले आहेत असे माझे एकंदर मत होत गेलेले आहे .
गझलेला रदीफच नसणे ही मला तंत्रातील सर्वात मोठी सूट वाटते . पण ती मान्य केली गेली .मग काफियांच्या स्वरूपात काही बदल केले गेले तेही स्वीकारण्यात आले.

गझलेत असे मतप्रवाह कसे इंट्रोड्यूस होत जातात ह्याची प्रक्रिया नेमकी कुठे व कधी सुरू होते व हे मतप्रवाह सर्वमान्यतेच्या टप्प्यापर्यंत कसे व कधीपर्यंत पोचतात . नियम-उपनियमांच्या ह्या मार्गक्रमणाबद्दल मला नेहमी कुतुहल वाटत आले आहे . .

की असं असेल ... एखादी गोष्ट जमेल तितकी सोपी करण्याकडे जनरली माणसाचा कल असतो त्यातला प्रकार असावा का ?

मला वाटते की नियम ज्याचेत्याने आपले योग्य वाटतील /झेपतील तितके आणि त्याप्रमाणे हताळले तर काय होईल ?

>>>मला वाटते की नियम ज्याचेत्याने आपले योग्य वाटतील त्याप्रमाणे हताळले तर काय होईल ?<<<

निर्मीतीला गझल म्हंटले जायला हवे ह्याचा आग्रह सोडण्याचा मोठेपणाही दाखवायला हरकत नसावी मग! Happy

माझा शेवटचा प्रश्न बालिश होता सहज मनात आला म्हणून बोलून दाखवला फक्त .

मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गम्मत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे <<<<<<हा शेर मला नेहमी आठवतो .

मर्यादांच्या सीमा ठरतात कश्या . त्या वाढवायच्या कशासाठी(हा गझलसाधनेचा एक भाग आहे का?) ..विस्फोटाला बेसिक नियंत्रणे तेवढी लावली तर पुरेसे नाही का ?(बेसिक नियम= खयाल .बहर, काफिया(अलामत ) , रदीफ ह्या चार पायांवर मजबूतीने आशय उभा असेल तर पुरेसे नाही काय . ... मग बाकीचे उपनियम ज्याच्या त्याच्या सुलभतेनुसार त्याने वापरले तर चालणारच नाही का ?

अश्याप्रकारचे सौती काफिये उर्दूत चालतात असे ऐकले आहे . मर्यांदांच्या सीमा हळूहळू शिथील करताना जमाना दिसतो आहे . आम्ही काय केले पाहिजे ?

मर्यादांच्या सीमा वाढवण्यात खरी गम्मत असते
बुडबुड्यातही विस्फोटाची शान लपवलेली आहे <<<<<<हा शेर मला नेहमी आठवतो .<<<

तो शेर तुम्ही ह्या विषयाला अ‍ॅप्लाय करत आहात त्याबद्दल मी (म्हणजे तो शेर रचणारा) नक्कीच काही म्हणू शकत नाही. मला अभिप्रेत अर्थ वेगळा होता.

अश्याप्रकारचे सौती काफिये उर्दूत चालतात असे ऐकले आहे .<<<

फिराक गोरखपुरीच्या अश्या काही गझला वाचल्याचे मलासुद्धा आठवत आहे. पण अपवादांनी नियम ठरतात त्याचनुसार उर्दू गझलेतही पावणे शंभर टक्के गझला गझलतंत्र पाळून झालेल्याच दिसतात. पण तो भाग निराळा! उर्दूमध्ये असे एकच शायर वारंवार, किंवा अनेक शायर वारंवार करताना दिसत नाहीत.

मला आठवते की टीव्हीवर मी १९९० च्या सुमारास एक उर्दू मुशायरा सहज पाहिलेला होता. त्यावेळी एक नवा शायर गझल पेश करत असताना त्याने 'रास्ता' ह्या शब्दाऐवजी 'रस्ता' हा शब्द (वृत्तासाठी) त्याच्या शेरात घेतला आणि तो उच्चारून झाल्याझाल्या मुशायर्‍यातील सर्वात बुजुर्ग शायराकडे बघत व त्या बुजुर्गाला आदराने पुकारत माफी मागीतली व म्हणाला की 'माफ कीजिये, रास्ता को रस्ता बनादिया मैने'! ही जाणीव असणे वेगळे आणि बंड पुकारणे वेगळे! (येथे मला खचितच असे म्हणायचे नाही की सदर गझलकाराने कोणालाही उद्देशून ह्या गझलेबाबत असे काही भाष्य करावे वगैरे, पण निदान ही जाणीव असायला हवी की आपण गझलतंत्र निभावलेले नाही आहे व ती जाणीव असल्याचे कोठेतरी व्यक्त झालेले असायला हवे)./

मर्यांदांच्या सीमा हळूहळू शिथील करताना जमाना दिसतो आहे . <<<

माझ्यामते शिथील करणारे अनभिज्ञपणे तसे करत आहेत, एखादी खास, अभ्यासातून आलेली पॉलिसी म्हणून नव्हे. ते दुर्लक्ष करण्याजोगेच आहे.

आम्ही काय केले पाहिजे ?<<<

तुम्ही, आम्ही असे काहीही नाही आहे. तुम्ही व मी व येथील बहुतेक सारेच गझलकार एकाच पातळीवर आहेत, दोन चार वर्षे कोणीतरी आधी गझल करू लागला म्हणून महान असतो असे नव्हेच. तुमचा हा प्रश्न सुरेश भट साहेबांना विचारण्याच्या पात्रतेचा आहे. तूर्त औरंगाबादच्या बशर नवाझ साहेबांना किंवा भोपाळच्या बशीर बद्र साहेबांना विचारू शकता. Happy

आपल्या बोलण्यातून व्यक्त होत असलेला आग्रही स्वर मी ओळखतो मी , हा स्वर पक्का घोळवूनच मी गझल केली पाहिजे ह्या वैयक्तिक मताचा आहे .
मी ह्या अश्या प्रकारांकडे एखादावेळचा प्रयोग म्हणूनच पाहतो . नेहमीनेहमी अश्या गझल कोणी करेल तर मीच त्याला प्रश्न करीन . .

माझ्यामते शिथील करणारे अनभिज्ञपणे तसे करत आहेत, एखादी खास, अभ्यासातून आलेली पॉलिसी म्हणून नव्हे. ते दुर्लक्ष करण्याजोगेच आहे. <<< अनभिज्ञपणे की अभ्यासातून ह्याबाबत आपले मत समजले हे मला महत्त्वाचे वाटते मी या नक्कीच स्वतंत्रपणे विचार करीन.

अनेकदा मला तुम्ही गझलेच्या नियमांबाबत खूप परंपरावादी वाटता (एखाद्वेळेस सनातनी हा शब्द फिट बसेल बहुतेक )...वाटता . पण पटताही . (वै म कृ गै न )

धन्यवाद बेफीजी .

>>>अनेकदा मला तुम्ही गझलेच्या नियमांबाबत खूप परंपरावादी वाटता (एखाद्वेळेस सनातनी हा शब्द फिट बसेल बहुतेक )...वाटता . पण पटताही . (वै म कृ गै न )<<<

गझलतंत्रात बदल करण्याची गरज का भासावी? गझलतंत्र कृत्रीम आहे, खिळे ठोकल्यासारखे आहे, असे म्हणणार्‍यांना माझा नेहमीचा प्रश्न असा असतो की त्या कृत्रीमतेत नैसर्गीकता आणणे हे आव्हान पेलणे मओरंजक नाही का? एखाद्या परिक्षेसारखे नाही का? उर्दूमधील यच्चयावत कवी आजही ते का पाळतात? भटसाहेबांनी ते का पाळले? त्या सगळ्यांनी कृत्रीम गझला रचल्या असेही म्हणता येईल, पण मग त्या कृत्रीम गझला एन्जॉयही कल्पनेपेक्षा जास्त केल्या गेल्या नाहीत का? आणि ज्यांना कृत्रीमतेपासून सुटका करून घेण्याची निकड भासत आहे, त्यांना गझलतंत्रावर भाष्य करत बसायला का वेळ मिळत आहे? तुमचे तुम्ही हवे तसे लिहा आणि म्हणा की मला हे सुचले. 'ह्याला गझलच म्हणा' हा आग्रह कशासाठी?

कृत्रीमता << नियमांमागील असे बदल स्वीकारलेजाणे ह्या मागे कृत्रीमता हा फॅक्टर असावा हा विचार मला शिवला नव्हता . पण आता समजला . बरोबर आहे तुमचे
पण जे गझलेच्या आणि तिच्या कायद्यांच्या बाबतीत ओरड करतात त्यांच्याबाबतीत "नाचता येइना.." हा मला प्रमुख मुद्दा वाटत आला आहे . खरेच हे गझलतंत्र कवीचा कस पाहणारे असते !!

पुनश्च धन्यवाद बेफीजी

What great inputs! Thank you sir (s)!

Happy
या पुढे मी अश्या गझला लिहिणार नाही. सदर रचनेला गझल म्हणावे हा ही माझा आग्रह नाही.
माणूस चुका करूनच शिकतो. हा धडा (सदर गझलेच्या बाबत) मी लक्षात ठेवीन. ..

पुन्हा एकदा मनापासून आभार Happy

http://www.maayboli.com/node/49791

वरील चर्चेतून असे दिसत आहे की
या गझलेलाही गझल म्हणता येणार नाही ..स्वर काफिया आहेत (रदीफ नाही)

कृ मार्गदर्शन करावे

जयदीप,

तेथे मी हे सगळे लिहिले नाही, कारण ही चर्चा निघाली की खूप मनस्ताप होतो. Happy

माझ्यामते तंत्रशुद्ध गझल तीसुद्धा नाही.

स्वरकाफीया गझल नकोच या पुढे<<<

छे छे! अभिव्यक्तीला दाबू नका, रदीफ वापरा, स्वरकाफियाच्या कित्येक गझला अतिशय खूबसूरत आहेत. Happy

दीवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है
हमभी पागल होजायेंगे ऐसा लगता है

दुनियाभरकी यादे हमसे मिलने आती है
शाम ढले इस सूने घरमें मेला लगता है

कितने दिनोंके प्यासे होंगे यारो सोचो तो
शबनमका कतरा भी जिनको दरिया लगता है

किसको 'कैसर' पत्थर मारू, कौन पराया है
शीशमहलमे इक इक चेहरा अपना लगता है

- कैसर आझमी

"आपापलीच हलती आशाळभूत पाने" >>> व्वा !
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"माझा नेहमीचा प्रश्न असा असतो की त्या कृत्रीमतेत नैसर्गीकता आणणे हे आव्हान पेलणे मओरंजक नाही का? एखाद्या परिक्षेसारखे नाही का?" >>> बेफीजी, ह्या प्रश्नातून छान विचार मांडलात.
मी तर म्हणेन की वृत्ताच्या नियमात राहून, आशयाची बूज आणि काव्याचा बाज राखून अभिव्यक्त होणे हे एक आव्हान असले तरी ते पेलण्यातला आनंद आगळाच असतो. जो पेलायचा प्रयत्न करतो त्यालाच तो समजतो/लाभतो.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी वरील चर्चेतून छान मुद्दे मांडले गेले, जे माझ्यासारख्या नवशिक्यांसाठी फार उपयुक्त ठरू शकतात.

जयदीप ,
कदाचित गझल म्हणता येईल वा नाही येणार हिला पण जे आहे ते 'काव्य' म्हणून अतिशय सुंदर आहे, प्रभावी आहे .
तुमचे खयाल नेहमीच एका विशिष्ट उंचीचे असतात ..
पुढे रदीफासहीत स्वरकाफिया वापरलात तर 'गझल' म्हणूनही प्रभावी होईलच. असो शुभेच्छा !

चर्चेमुळे बरेच काही वाचायला मिळाले ..
Thanx वैवकु, बेफिजी . Happy