काव्यलेखन

गोडवा..

Submitted by के अंजली on 6 August, 2012 - 09:12

बरसला हा पाऊस

माझा भिजला गं ओस

तिथे गोडवा रुजला

तुझ्या डोळ्यात टिपूस

मी साखर घोळली

तुझ्या गुर्‍हाळाचा कस

असा भिजलो तुझ्यात

जणू देह ही तुळस...!

पाउस पंचक

Submitted by aart on 6 August, 2012 - 07:59

पाउस पंचक

पहिला पाउस,

पाउसपैंजण सजवजुनी थुईथुई
धबधबते हे हीरवे रान,
कुशीत घेता झुळुक नवथर
खुशीत गाते इवले पान.....

दुसरा पाउस,

कातरवेळी कातरकाया
अन आवेगाचे आर्त कडे,
चंद्रउरीच्या कळ्या उमलल्या
पण माळ अनाहत आत कुढे....

तिसरा पाउस,

सुबक ठेंगणी नाजुक चंचल
लव्हाळ रुवजी रानोमाळ,
झरझरते झुळझुळते अल्लड
त्यात निळेसावळे आभाळ.....

चौथा पाउस,

थबथबणार्‍या थेंबांची झालर
नखरेल नाचवे पिंपळपान,
निरखुन बघता सूर्याने मग
इंद्रधनुषी होते रान...

पाचवा पाउस,

काळाकभिन्न कातळकडा
अन धबधब्यांची कोसळती रांग,
धुक्यात हरवली वाट सख्या रे
तुजप्रत येउ कशी मी सांग....

भातुकलीचा डाव आपला

Submitted by रसप on 6 August, 2012 - 01:06

एकांताच्या दोन क्षणांचा
परस्परांशी मेळ घालतो
काळवंडल्या मनात माझ्या
रस्ता शोधत धडपड करतो

तुझ्याविना मी जगण्याचीही
कधी कल्पना केली नव्हती
तू नसताना क्षणाक्षणाला
विषण्णतेची येते भरती

लपवुन दु:खे हसायलाही
तूच शिकवले मनास होते
गहिवरतो मी हसता हसता
स्मरते कारण मला नको ते

भातुकलीचा डाव आपला
तसाच अर्धा पडून आहे
खिडक्या दारे भिंतींनाही
तुझीच आशा अजून आहे

खोट्या इच्छा आकांक्षांच्या
नभात कोणी किती उडावे
विझलेल्या डोळ्यांनी माझ्या
सांग दूरचे कसे पहावे ?

मी तर पावसात खेळणार खेळणार

Submitted by पुरंदरे शशांक on 5 August, 2012 - 23:45

मी नाही घरात बसणार आई ऽऽऽ.....
मी तर पावसात खेळणार खेळणार

होड्या मस्त सोडणार सोडणार
डोलताना छान त्या बघणार बघणार

टपोरे थेंब झेलणार झेलणार
गा-या गा-या भिंगो-या खेळणार

लाल लाल पाण्यात नाचणार नाचणार
उडूं दे चिखल मातीच असणार

सर्दी ताप नाही घाबरणार
आल्याचा चहा पिणार पिणार

पावसाची छान लागलीये झड
बोलावते मला चल लवकर

तू पण ना आई भितेस कशाला
पावसात ये तू काही नाही होणार
मी नाही घरात बसणार आई ऽऽऽ.....
मी तर पावसात खेळणार खेळणार....

सागरतिरी .......

Submitted by किंकर on 5 August, 2012 - 19:56

चालताना सागर किनारी ,वाळूत उमटती पाऊलखुणा
लाट त्यावरून जाता, पुसट होतसे ठसा पुन्हा

पारदर्शी लाट अलगद,पसरी पडदा धूसर नितळ
घाव त्याचा कातर करी, गतस्मृतींचा कभिन्न कातळ

चुकवता त्या अलवार लाटा , घेती नव्याने वळण पाऊले
परिस्थितीने सहज बनविले, अज्ञाताच्या हातचे बाहुले

बदलता मार्ग नव्याने, दूर राहिला सागर किनारा
कडे कपारीतील झुळूक, वाहून आणते गंधित वारा

त्या वाऱ्याने त्याचे, पुन्हा केले असे भिरभिरे
आसवातल्या धुलीकणांनी, नजर त्याची लागू चुरचुरे

शब्दखुणा: 

राजा होणे राजाचीही नकल होती

Submitted by सुधाकर.. on 5 August, 2012 - 14:36

खरी कहाणी विदुषकाची विकल होती
राजा होणे राजाचीही नकल होती

फ़ितूर झाले माझेच प्यादे आज इथे,
तशी न कोणत्या फ़िरंग्यांची मजल होती.

खरे सांगतो पराभूत मी तिथे झालो.
जिथे माझ्य़ा छाव्यांची नजर अचल होती.

पाय ठेवला विश्वासाने मी जिथेही
तिथे मानवी किड्यांची ही दलदल होती.

लढत रहाण सतत रणांगणात जिवनाच्या
हिच माझ्या आयुष्याची खरी गझल होती.

शब्दखुणा: 

असू दे फाटका संसार माझा!

Submitted by सतीश देवपूरकर on 5 August, 2012 - 13:29

गझल
असू दे फाटका संसार माझा!
तुला कळणार ना व्यवहार माझा!!

जगाची आसवे पुसता समजले.....
मलाही वाटतो आधार माझा!

असे हे काय प्रतिसादात माझ्या?
कवींना सोसला ना भार माझा!

किती मजला दळावे या जगाने?
भुगा झाला पहा हो पार माझा!

कसा यावा कुणा अंदाज माझा?
पवित्रा भासतो हळुवार माझा!

सुगीचे सोबती पाहून झाले!
कधी भेटायचा मज यार माझा?

कुणी आग्रह करावा जेवताना;
असा ना राहिला आहार माझा!

स्वत:चा मीच शत्रू काय झालो;
पहावा लागला संहार माझा!

गझल म्हणजेच श्वासोच्छ्वास माझा!
कसा नाकारता अधिकार माझा?

किती आयुष्य अस्ताव्यस्त माझे!
घरी या! अन् पहा! बाजार माझा!!

चंद्रस्वप्न एकले

Submitted by भारती.. on 5 August, 2012 - 04:43

चंद्रस्वप्न एकले

जरी इथून जायचे पुनश्च आणखी कुठे
मनात घोळवेन मी सकंप गीत येथले

जनातला मनातला किती अपार गलबला
निजेत जागवेन मी चंद्रस्वप्न एकले

मी हिशेब मांडला समग्र कागदावरी
आसवात वाहत्या आकडे विसावले

वाट डोंगरातली नी लाट सागरातली
साद दे दूरून जरी शहर गात्री बिंबले

सधन मेघमालिका उदार आज वर्षू दे
दिठीत गोंदवेन मी सतंद्र वृक्ष हर्षले ..

http://www.youtube.com/watch?v=DNUB9leN9TA&feature=plcp

भारती बिर्जे डिग्गीकर

मैत्री

Submitted by चाऊ on 5 August, 2012 - 01:50

सांगू का मैत्री म्हणजे काय खूळ असतं
खर्‍या मैत्रीच काय मुळ असतं

मैत्रीत करतो जो जीव नकोसा
तरीही सारखा वाटतो जो हवासा

त्याच्या संगं उगाच तासनतास बसावं
भिजवावा खांदा रडून, नाहीतर उगाच हसावं

मैत्री म्हणजे नुसताच गोतावळा नाही
जपणं मैत्रीला हे साधं काम नाही

कधी मैत्री म्हणजे नको तिथलं दुखणं
तरीही खपत नाही मित्राला काही खुपणं

आपलेही काटे- कंगोरे सोसतातच ना मित्र
मैत्रीत सदा काही नसतं, गोड गुलाबी चित्र

रुसवे फ़ुगवे भांडण-कडाके, तरीही रहाते मैत्री धड
मैत्री म्हणजे अभेद्द कडा, मैत्री म्हणजे आधार वड

मैत्री आहे खाण सुवर्णाची, मैत्रीची आण आहे जन्माची

शब्दखुणा: 

"तू"

Submitted by -शाम on 4 August, 2012 - 10:14

तू आलीस आणि माझं घर, अंगण तुझं झालं
अगदी माझ्यासकट..

दिवस फुलत गेले
रात्री जागत सरल्या
प्रेमात, रागात, गप्पांत,
किंवा नुसतच तुला बघत...

तुला दिलेलं काहीच
कधी मोजलं नाही
प्रेमाचा हिशेब ठेवायचा नसतो म्हणून...
तू ही निर्व्याज दरवळत राहिलीस
मिठीत येऊन...

पण सुगंध कोणाला बांधता आलाय कधी
शेवटी बघत राहिलो तुझ्या वाटेवरची धूळ
वार्‍याची झुळूक होऊन
तू दूर जाताना...

आता आठवण आली की,
सजल डोळ्यांनी थरथरता हात
फिरतो अंगणातून
जिथे तुझ्या नाजूक बोटांतून
कधी रांगोळी सजत होती
.

.
.
आणि लोक म्हणतात,
बापाला कुठं काळीज असतं....आईसारखं!

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन