काव्यलेखन

मनपाखरू

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 08:01

शब्द शब्द टिपत गेलो
फ़ूले घेतली हुंगून.
अनावृत्त चालता चालता
आभाळ आलं वाकून.

कसं कधी अवचित
मुकं झालं झाड.
खोल खोल जाताना
मुळा लागली वाढ.

वळणवेड्या झर्‍यातून
गीत आले वाहून.
मातीसवे नातं गोवून
उन्हे घेतली न्हाऊन.

आयुष्याच्या वादळात
फ़ाटली सारी शिडं.
सैरभैर फ़िरतं आता
मन-पाखरू हे वेडं

शब्दखुणा: 

तुझ्या अंगणात

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 07:29

बहर वसंताचा येण्या आधी,
फ़ूले माळण्याची हौस तू लावून घे.
फ़ुलेल मोगरा एक दिवस तुझ्याही अंगणात.

वार्‍याचे वादळ होण्या आधी,
स्वत:ला सावरणं तू शिकून घे
आसरा देणारी झाडच होतील कधी असाह्य प्रवासात.

मुठीतले दाणें तुझ्या संपण्या आधी,
गाणे एक आळवून ठेव
वाट चुकलेली पाखरं येतील तुझ्याही दारात.

रात्र मोहरण्या आधी,
ओढाळ मन तू जपून ठेव.
शिंपेल आभाळ चांदणं कधी तुझ्याही घरात.

आभाळ भरून येण्या आधी,
कविता एक आठवून ठेव..
स्वरांचा फ़ुटेल झरा कधी तुझ्याही अंतरात.

शब्दखुणा: 

भातुकली

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 06:53

आज आठवे मजला
बकुळीच्या त्या सावलीला
मातीची घेऊन भांडी
तू संसार इवला मांडी.

वेणी बाहुलीची घालताना,
कितीक लागे तुजला चिंता.
कुंतल्यातला तरी सुटेना
तो लाल रेशमी गुंता.

बाहुलीशी जिव जडे
रमुन खेळशी तू वेडे
मध्येच काही मी बडबडे
करावेस तू भात-वडे
तरी साधले तुला गडे
बाहुलीचे गीत बोबडे.

निजू घातलेस बाहुलीला
बोट लावूनी ओठाला मग
अबोलाची ती शपथ मला.

निर्मळ होती बाळपणी
भातुकलीची प्रीत आगळी
तरी आज का काळीजवेळी
तुझी नि माझी वाट वेगळी?

शब्दखुणा: 

पिकलेली आळवं

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 06:26

सुट्टी दिवशी, अंगणातच मी उभा असे.
डोंगरावरून पलीकडच्या अनवाणी ती येत असे.
ती येत पाटी आवळ्याची डोक्यावर सावरत
खड्यांच्या नागमोडी वाटेवर, अशक्त पाय थरथरत.
मी नसलो की उंबर्‍यातच मुक होऊन बसायची.
असलो तर सुरकुत्यांच्या जाळ्यातून कधीतरी हसायची.
फ़ाटका धडपा पाटीवरून बाजूला मग करायची.
अन मुठभर आवळे हातात माझ्या ठेवायची.
मी विचारत: ’झाडावर ही चढतेस तू?’
ती खेकसत: ’मेल्या,उगाच का मग खातोस तू!’
आवळ्यांसाठी ती हिंडत असे रानभर,
करवंदीच्या काट्यांचे ओरखडे घेत अंगभर.
गाठी मारून सांधलेलं फ़ाटकं होतं लुगडं
वणवण हिंडून फ़ुटलेलं पाय होतं उघडं.
पाहून वाटे खुप,आपणही तिला द्यावं काही,

शब्दखुणा: 

चंद्र

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 05:53

ओंठांत गंजल्या माझ्या
मी मंत्र बांधले होते.
दोघात नदीच्या काठी
आधी कोण बोलले होते?

ते गीत सांज उन्हांचे
या देहात मुरले होते.
दोघांच्या अबोलपणी ते
सांग कुणी गायले होते?

पाण्यात उतरता शेजा
मी स्वप्न सांधले होते.
सोडून हात तू जाता,
का परतून पाहीले होते?

तू चंद्र व्हावेस माझा म्हणूनी,
मी सुर्य लोटले होते.
’वेड्या!’ गौर केतकी माझे,
मी हात पोळले होते.

शब्दखुणा: 

कधीतरी उगाच..!

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 05:33

कधीतरी उगाच भटकत फ़िरावं,
अन मध्येच वळून वाट उगाच दूर पळावी.
उगाच ऊन तापावं खिरावं,
अन वेडी पावलं उगाच चूर जळावी.

कधीतरी उगाच रान हिडावं,
अन तळ्याकाठी उगाच उभं रहावं.
उगाच पाण्यात खडा टाकावा,
अन बुडबूडा ही उगाच यावा.

कधीतरी उगाच हसावं फ़ूलांशी,
अन खोटंच रूसावं कळ्यांशी.
उगाच बोलावं झाडांशी,
अन स्तब्ध व्हावं उगाच पहाडांशी.

कधीतरी उगाच यावी सांज निसूर
अन रानभर पसरावी उगाच हुरहूर.
उगाच शोधावा नदी झर्‍यातून आपला सूर
अन मध्येच फ़ुटून आसवांचा खरेच यावा पूर

शब्दखुणा: 

चेले

Submitted by सुधाकर.. on 10 August, 2012 - 04:59

कुणी विरुप घेऊनी आले
कुणी आरोप लावून गेले.

एका पेक्षा एक भेटले
सारे एकाच गुरूचे चेले.

स्वत:साठी मी टाकलेले
कुंपण कोणी मोडून गेले.

झाड नाही कुणी लावले,
तरी बाग सारी मोडून गेले.

चालताना हे काय झाले
मागच्यानेच पाय ओढले.

फ़क्त एका असुयेपोटी अन,
तोंडघशी मज पाडून गेले.

शब्दखुणा: 

श्रावणाच्या चिंब धारा

Submitted by सांजसंध्या on 10 August, 2012 - 04:05

एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली आणि आता कामात असताना कविता स्फुरली. इथे द्यायचा मोह आवरता आला नाही. श्रेय त्या ओळीला (ओळखालच तुम्ही) Happy )

श्रावणाच्या चिंब धारा

अवचिता भेटीत या तू,
चांदण्यांचे गीत गावे
आणि गाताना हळूसे,
ऐकू माझे नांव यावे

मन्मनींच्या उंच लाटा
वादळाने वादळाव्या
सागरा रे चंद्रवेड्या
तू मला लिपटून घ्यावे

श्रावणाच्या चिंब धारा
आठवांशी दंग व्हावे
त्या खुणांनी, ओळखीच्या
अंग अंगी मोहरावे

धुंद वारा, बोचरासा
चेतवावा, देह सारा
झिलमिल्या या पावसाने
तव मिठीशी, चिंबवावे

बावरूनी सांज यावी
तू जरासे बावरावे

लबाड कान्हा .. खट्याळ कान्हा ...

Submitted by विदेश on 10 August, 2012 - 02:34

.
खोड्या करुनी
दंगा करुनी
गोपगड्यांना
खेळवतो -

लबाड कान्हा
खट्याळ कान्हा
यशोदामाईला
पळवतो -

क्षण शिक्षेचा
गोळा लोण्याचा
डोळ्यासमोर
वितळतो !

हसणे विसरता
रुसून बसता
आनंद माईचा
मावळतो -

मुख उघडोनी
विश्व दावूनी
यशोदामायेला
'माया'ळतो ,

यशोदामाता
जवळी घेता
पदरामध्ये
विरघळतो !
.

शब्दखुणा: 

रद्दीवाला -

Submitted by विदेश on 10 August, 2012 - 02:27

.
रद्दीवाला "या कविराज"- म्हणून माझे स्वागत करतो
त्याच्या पैशानेच मला तो कटिंग चहा पाजत असतो -
मला भेटल्यावरती तो आनंदी अन् खुषीत दिसतो
माझ्या कवितेच्या रद्दीवर त्याचा धंदा चालू असतो !
एके काळी 'रद्दीवाला' म्हणून ज्याला हिणवत होतो
सलाम करुनी मी आता त्याचे जंगी स्वागत करतो -
"आभारासह परती"चा कविता-कचरा माझा घेतो
रद्दीवाला धंदा करुनी , धंद्यामधुनी 'सोने' घेतो !
कवितांच्या रद्दीने माझ्या, रद्दीवाला झाला 'राव'
'अध्यक्ष'पदी खुर्चीवरती देणगीसाठी त्याचे नाव -
व्यासपिठावर बसून हल्ली तो कविसंमेलन गाजवतो

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन