काव्यलेखन

कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा?

Submitted by वनिता तेंडुलकर ... on 7 February, 2013 - 21:32

कोण दिशेने वाहत येई अवखळ वारा?
आज मनाच्या दारी झरती अमृतधारा

अवघड वाटा अंधाराच्या तुडवत आले
चैतन्याचा उधळत मागे प्रकाश सारा

गलबत माझे माझ्यासोबत फितूर झाले
तरण्यासाठी एकच दिसला तुझा किनारा

किंचित ओले भिजले डोळे आज कशाने ?
वितळत जाई हृदयामधला किल्मिष पारा

आयुष्याला अर्थ नव्याने, तुझीच माया !
वेचत जाते आज सुखाच्या असंख्य गारा

नीतूला हे समजुन आले फार उशीरा
मागावे ते मिळते तुटता नभांत तारा

वनिता....

सुतक......नविन

Submitted by योगितापाटील on 7 February, 2013 - 21:25

सुतक......

कुठून तरी वाहत आलं ते बीज नकळतच.....
कुंपणाला ओलांडून
थेट अंगणातच माझ्या
मी शहारले.....
मातीतून उगवणारा तो नव्या नवलाईची कोंब बघून
हळूहळू.....
बाळस धरण सुरु झालं त्याचं
मीच तर घालत होते खत पाणी
आधी अजाणतेपणान......
आणि नंतर....
जाणीवपूर्वक...
वार्यावर थरथरणारी त्याची पान...
हिरवीकच्च पालवी...
उतू जाणारा बहर...
पावसातली मुग्धता...
फुलांचा सडा...
अडथळे पार करून माझ्या पर्यंत पोहोचणारा दरवळ...
सगळ सगळ हव होत मला...
आयुष्याच्या पर्णविहीन शिशिरला
देऊ पाहत होते
त्याच्या वसंताची चाहूल....
दिवसेंदिवस वाढत गेल्या त्याच्या फांद्या

स्मृती

Submitted by pulasti on 7 February, 2013 - 15:49

किल्मिष, गोंधळ, शंका सगळी...निवळू दे
सुन्या नभावर शुभ्र निळाई पसरू दे

चित्रामध्ये निसर्गास रंगवताना
ऋतू आपल्या मनातलाही मिसळू दे

कुणी आखले? का मीही पळतो यावर?
रुळावरूनी गाडी थोडी घसरू दे

कधी वाटते, घट्ट स्मृतींना पकडावे
कधी वाटते...सगळे काही विसरू दे

तडफड होते त्याची अन आम्ही म्हणतो -
"गझलेमध्ये जरा सफाई येऊ दे"

शब्दखुणा: 

स्फुट शेर (प्रासंगिक)

Submitted by सतीश देवपूरकर on 7 February, 2013 - 10:17

स्फुट शेर (प्रासंगिक)
खूळ घ्यायचेच खूळ लागले मला!
चौकटीत राहणे पसंत ना मला!!
..............................................................
तोब-यामुळेच तोंड चरबटे किती!
खळखळून एक छान टाक चूळ तू!!
...........................................
उंच हा बकूळ, ठेंगणाच मोगरा!
कोणतेच फूल माझिया न जोगते !!
..........................................................
तडकशील तूच अन् कळेल हे तुला.....
काच मी दिसावया तरी अभेद्य मी!
............................................................
दगड एक मार अन् दिसेल मी कशी....
हे तुला कळेल की, किती गढूळ मी!

शेवटची ओळ

Submitted by उमेश वैद्य on 7 February, 2013 - 09:58

शेवटची ओळ

श्वास माझा संपताना सूर आले ओळखीचे
कोण आहे गात येथे गीत जे माझ्या मनीचे
मावळूनी चालल्या दाही दिशाही लुप्त झाल्या
कोठवर जपणे स्वतःला अंतरी ऊर्मी निमाल्या
व्यर्थ आशा दाखवावी व्यर्थ मजला गुंतवावे
हे असे का चालवीसी पोर चाळे संपवावे
जगत भासाचे कवडसे आणि आशेचे झरोके
काय कामाचे मला हे पाट खोटे मृगजळाचे
सांग कोठे लुप्त झाल्या ज्या सरींनी चिंब झालो
काव्य रसना प्रसवलेली तीच मी आकंठ प्यालो
वाटते माझ्याचसाठी गोष्ट काही तू करावी
ऐक मित्रा याचवेळी ओळ कवनाची स्फुरावी...

शब्दखुणा: 

साद मी घालेन तेव्हा वाचवाया धाव नक्की

Submitted by प्राजु on 7 February, 2013 - 08:59

साद मी घालेन तेव्हा वाचवाया धाव नक्की
जाग विश्वासास त्या अन ईश्वरा मज पाव नक्की

त्रास होतो आठवांचा मग कशाला आठवावे?
तू मना आता स्वत:ला चांगले खडसाव नक्की

का तिथे कल्लोळ झाला, मी कहाणी सांगताना
ना कळे की घेतले कुठले असे मी नाव नक्की??

काल नाही, आज नाही, पण उद्याला ईश्वरा तू
सिद्द करण्याला स्वत:ला दे मलाही वाव नक्की

खेळ तू खेळी तुझी, मीही इथे केली तयारी
प्राक्तना, करणार आहे मी तुझा पाडाव नक्की!

संकटांना घाबरूनी घेतली माघार मी जर
आडवूनी तू मना बिनधास्त कर मज्जाव नक्की

जात आहे... भेटण्याची वेळ कळवाया तिला

Submitted by वैवकु on 7 February, 2013 - 07:19

जात आहे भेटण्याची वेळ कळवाया तिला
व्वा सबब !! ...भेटायच्या आधीच भेटाया तिला...

एकदा हातातला गजरा करूनी हुंगतो
एकदा मी बनवतो कानातला फाया तिला

भरजरी दिलखेच आणिक लाघवी आहे म्हणुन
मी तिच्यासम काफिया केलाय 'शेराया' तिला

कोणत्याही भावनेचा ड्रेस पेहरला तरी
ओढणी असते हवी हसरीच ओढाया तिला

जाणिवा फुलपाखरागत हालक्याफुलक्या तिच्या
मीपणा माझा कसा जमणार पेलाया तिला

विठ्ठलाचा शेर ऐकवताक्षणी बेभानुदे
वेड माझे लागुदे ..अपुलेच वाटाया तिला

__________________________________________

उधार सारे फिटेल नक्की..

Submitted by रसप on 7 February, 2013 - 05:43

उधार सारे फिटेल नक्की
तुझे तुलाही मिळेल नक्की

नसेल प्राजक्त अंगणी पण
जुनी जखम दरवळेल नक्की

म्हणे निसर्गच हसून छद्मी -
'फुलास काटा छळेल नक्की!!'

भकास झाली जमीन आता
नभास पान्हा फुटेल नक्की

अजूनही वाटते मला की
दुरूनही ती बघेल नक्की

जिथे जिथे तू, तिथे तिथे मी
कधी तरी जाणवेल नक्की

'जितू', मंदिरी कशास जाऊ ?
मिळेल तितके पुरेल नक्की !

सांजवेड

Submitted by मुग्धमानसी on 7 February, 2013 - 02:24

सांज ढळून गेली सखे गं सर्व परतले
इथे मी एकटी उरले...

खळाळणारे यमुनेचे जळ शांत शांत झाले
दूरवर त्या वृंदावनीचे दिवे मंद झाले
सावलीच्या मागावर मन हे वेडे धाऊन दमले
इथे मी एकटी उरले...

बघ तिथे त्या पानामागे हळूच हलले काही
इथे-तिथे सर्वत्र जरी तो... तरिही कुठेच नाही
त्याला शोधत फिरताना मी स्वतःस हरवून बसले
इथे मी एकटी उरले...

कुठे वाजले पाऊल मजला वाटे आला तोच
त्या तिथे त्या नभात तिथवर माझी कुठली पोच?
तरिही इथे या यमुनेकाठी पाऊल माझे थिजले
इथे मी एकटी उरले...

कशी मी एकटी उरले? तो माझ्या आत बाहेर
हे त्याचे पसरले अंश पुसोनी माझी चाकोर

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन