साद मी घालेन तेव्हा वाचवाया धाव नक्की

Submitted by प्राजु on 7 February, 2013 - 08:59

साद मी घालेन तेव्हा वाचवाया धाव नक्की
जाग विश्वासास त्या अन ईश्वरा मज पाव नक्की

त्रास होतो आठवांचा मग कशाला आठवावे?
तू मना आता स्वत:ला चांगले खडसाव नक्की

का तिथे कल्लोळ झाला, मी कहाणी सांगताना
ना कळे की घेतले कुठले असे मी नाव नक्की??

काल नाही, आज नाही, पण उद्याला ईश्वरा तू
सिद्द करण्याला स्वत:ला दे मलाही वाव नक्की

खेळ तू खेळी तुझी, मीही इथे केली तयारी
प्राक्तना, करणार आहे मी तुझा पाडाव नक्की!

संकटांना घाबरूनी घेतली माघार मी जर
आडवूनी तू मना बिनधास्त कर मज्जाव नक्की

स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..

-प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच.. सगळे शेर मस्त आहेत.
मात्र काही जुने खयाल नव्याने वाचून विशेष वाटत नाही हेही नक्की

स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..

अतिशय चांगला शेर!

भाव - उत्तम शेर आहे!
मला मतलाही फार आवडला. 'नक्की' असं परत परत म्हणताना मला एक संशयाची 'हिंट' जाणवली... आणि त्यामुळे मजा आली!

खेळ तू खेळी तुझी, मीही इथे केली तयारी
प्राक्तना, करणार आहे मी तुझा पाडाव नक्की!

स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..
>>>>>सुरेख!!!!

भन्नाट !
पाडाव आणि भाव तर खूपच आवडले.

नाव असलेला शेर खयाल चांगला असूनही तितकासा भावला नाही.

यात्रीजी Lol

तिथे मी एक शेर बदलून वाचला होता तो सांगीतला असतातर तुम्हाला अजून मोठ्याने हसता आले असते

का तिथे कल्लोळ झाला?...... मी उखाणा घेत होते......
ना कळे की घेतले कुठले असे मी नाव नक्की?? Wink

स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की..

विचार आवडला.
दुसरी ओळ फारच छान.
पहिली अजून चांगली करता येईल.

स्त्रीच्या हतबलपणावरचा माझा एक शेर आठवला
(ह्या शेरातही विचार मांडणीपेक्षा पुढचा आहे):

हा स्वतःवरचा तुझा विश्वास ढळणारा
सांगतो का मान्य तुजला बंधने माझी

समीर

त्रास होतो आठवांचा ....
काल नाही, आज नाही, .....
हे शेर अधिक आवडले.

"स्वामिनी की कामवाली, की रती, वस्तू दिखाऊ?
एकदाचा काय आहे सांग माझा भाव नक्की.." >>> यातला आशय खूप मस्त आहे
पण कामवाली आणि भाव हे शब्द इतर शब्द आणि आशय यांच्या बाजाशी
तितकेसे सुसंगत वाटले नाहीत. वैम. कृगैन.

शेवटचा शेर छान..!

त्रास होतो आठवांचा मग कशाला आठवावे?
मला वाटते एखाद्या शेराची ही दुसरी ओळ म्हणून वापरली असती तर अधिक चांगली वाटली असती. (या गझलेत नव्हे.)
असो.

अजून एक सुचला शेर..

वंदिले नाही तुला मी जिंदगीच्या शेवटीही
पण तरीही पैलतीरी लाव माझी नाव नक्की !

वावा खुरसाले जमतय की वावा
आता ताव ठाव डाव गाव हाव राव असे काफिये योजून प्रयत्न करून पहा जमेल तुम्हाला
शुभेच्छा