ढसाळांची कविता ३: सारीपाट आणि दोन रस्ते

Submitted by चेराज on 12 June, 2025 - 08:33

ह्या दोन कविता आता इथे देऊन ठेवत आहे त्यांबद्दल पुढच्या खेपेस थोड्या विस्ताराने लिहीन.

सारीपाट: गांडू बगीचा (१९८६), शब्द पब्लिकेशन सहावी आवृत्ती २०२२, पृ. क्र. ९.

इंद्रिये मालवली जातात
प्रतिबिंबाला नक्षत्रे फुटतात
येरझरांची शतपावली
एकरूपतेचा श्रांत पक्षी
चिरनिद्रेचे घर स्थलकालाचा आरंभ
भूत भविष्य वर्तमानाची जमीन
निद्रेतून जागृतीत : जागृतीतून निद्रेत
जीवनानंदाची तरलता
कैवल्यानंदाचा सारीपाट
या अरण्यातून मला बाहेर पडू दे
निराकार रतीचे सुख
मी : तू चे खुले प्राकृत
वेदनाशून्य निरतिशयाचा पाणलोट
म्हणावे तर काय म्हणावे
या महारोगाला?
प्रतिक्षिप्त क्रियांचे बाशिंग
त्यात झोपमोड झालेले अकरा रुद्र
यानंतरही आरसा किती स्वच्छ ठेवणार?
माणसाने मोजू नये आपल्याच
आत्म्याची उंची

दोन रस्ते: मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५), लोकवाङ्मयगृह, चौथी आवृत्ती २०११, पृ. ५९

दोन रस्ते आयुष्याचे
आयुष्य दोन रस्त्यांचे
ज्याचे कधीच होऊ शकत नाही
विलीनीकरण
कुणीही जादूटोणा करावा,
यक्षिणीची कांडी फिरवावी
हे दोन रस्ते असतात परस्परविरोधी
त्यांना नियम असतो वर्गयुद्धाचा लागू
एक रस्ता भूकमरी आणि लाचारीचा, तडजोडीचा
स्वतःला विकण्याचा
दुसरा रस्ता विद्रोहाचा, सरळसोट सत्तेवर जाण्याचा
जग बदलण्याचा आणि स्वतःलाही बदलण्याचा

सारीपाटचा मी इंग्रजी भाषांतर करण्याचा प्रयन्त केला होता तो असा:

A game of dice

Senses are softened down
Constellations grow from the reflection
To and fros make a hundred steps
The bird of harmony rests
Cave for a long-lasting sleep, beginning of space and time
A rock for past, present and future
Waking up from sleep: Sleeping again after awake
Flowing with the pleasures of life
A blissful game of dice
Let me find a way out of this forest
Shapeless happiness of an intercourse
Naked reality of me : you
A splash of painless extremity
Afterall what should I call this cancer of a disease?
A crown of antagonist reactions
Hanging down from which are eleven Rudras woken up from sleep
And after all these, how clean can one keep the mirror?
One should not measure the height of their own soul.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा बनवलेला धागा संपादित करण्याचा पर्याय काही कारणास्तव आता दिसत नाही आहे, म्हणून इथे वरील कवितांवरची चर्चा मांडत आहे.

मागच्या दोन लेखांत मुख्यत्वे गोलपिठातील काही कविता पहिल्या. गोलपिठा; १९७२; ते गांडू बगीचा; १९८६; असा ढसाळांच्या कवितेचा एक प्रवास आहे. या दरम्यान मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१९७५), प्रियदर्शिनी (१९७६), तुही यत्ता कंची ? (१९८१), आणि खेळ (१९८३) हे त्यांचे कवितासंग्रह आले. ह्या प्रवासात ढसाळांची कविता बदलत गेली आहे, आणि ह्या बदलांकडे पाहण्याच्या ढसाळांच्या स्वतःच्या दृष्टीकोनाचा द्वंद्वात्मक भौतिकवाद (dialectical materialism) हा मूलाधार आहे. द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि ontology वर सवडीने एक लेखमालिका करण्याचा बेत आहे. आतापुरते पटकन सांगायचे तर प्रत्येक पदार्थात, म्हणजे अगदीच प्रत्येक, आणि पदार्थापासून बनत जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीत, म्हणजे व्यक्ती आणि विचारांतही, (किमान) दोन परस्परविरोधी गुणविशेष किंवा तत्वे अंतर्भूत असतात ज्यांच्या एकमेकांमधील संघर्ष किंवा तडजोड-वाटाघाटींतून त्या पदार्थ, गोष्टी किंवा विचारांच्या अंतरंग आणि बहिरंगात सतत बदल होत असतात, आणि असा सततचा बदल हेच आपल्या अनुभवांचे अंतिम सत्य आहे (see e.g. Engels: ‘Dialectics of Nature’; in effect Heraclitus: “one cannot step twice in the same river”). तर ‘मूर्ख म्हाताऱ्याने … ‘ (लोकवाङ्मयगृह, चौथी आवृत्ती २०११), च्या प्रस्तावनेतून, ढसाळांच्याच शब्दात: “गोलपिठा नंतरचा हा माझा दुसरा कवितासंग्रह. त्यावेळी मी एक होतो, आता मी बदललेलो आहे. ती कविता एक होती, आता कविताही बदललेली आहे. प्रत्येक कलावंताला स्वतःचे एक वर्गचरित्र असते. मीही याला अपवाद असू शकत नाही. ज्याला व्यवस्थेने तीन हजार वर्षे ज्ञानास, उत्पन्नास, संपत्तीस, मानप्रतिष्ठेस वंचित केले अश्या सर्वहारा दलित वर्गाचा मी एक कवी. विसाव्या शतकातल्या निम्न बदलामुळे मीही कवितेपर्यंत येऊन पोचलो. पोचणारच होतो. जसं गुलामगिरीकडून सरंजामीकडे, सरंजामीकडून भांडवलशाहीकडे, भांडवलशाहीकडून शास्त्रीय समाजवादाकडे आणि पुढे असेच सुखी समृद्ध राजसंस्थाविहीन रस्त्याकडे. जन्म-विकास-बदल या सूत्रातून संभवणाऱ्या सातत्याच्या वाटचालीकडे, सर्वंकष मुक्तीकडे, सर्जनाकडे.” याला अनुसरून ‘सारीपाट’ आणि ‘दोन रस्ते’ ह्या कवितांचा आढावा घेत आहे.

‘गोलपिठा’तील कवितांत विद्रोहाच्या स्वराला प्राधान्य आहे, ‘मूर्ख म्हाताऱ्याने … ’त विद्रोहाबरोबरच विचार-विश्लेषणालाही. ‘प्रियदर्शनी‘ ही इंदिरा गांधीवरील कविता मी अजून वाचलेली नाही. ‘खेळ‘ मध्ये मोजक्याच पण प्रचंड दीर्घ कविता आहेत. “मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे” ही कविता मी माझी बायको, जी एक चित्रकार आहे, तिला पहिल्यांदा दाखवली तेव्हा ती म्हणाली की “त्यांचा कॅनव्हास खूप मोठा आहे”, आणि मी मनात म्हटले की “वा! असाही विचार करता येतो”. ‘खेळ‘ मधील कविता सामाजिकच आहेत, पण त्यांची अभिव्यक्ती ही प्रामुख्याने शृंगारिक आहे. ‘गांडू बगीचातील‘ कविता ह्या तुलनेत जास्त गुंतागुंतीच्या आहेत आणि त्यांची अभिव्यक्ती ही शृंगारिक, अमूर्त, सांकेतिक अशी बरीच वैविध्यपुर्ण आहे. गुणविशेषांच्या बाबतींत मला ‘तुही यत्ता कंची?’ मधील कविता ‘गोलपिठा’ आणि ‘गांडू बगीचा’ यांच्या कुठेतरी मध्ये वाटतात.

‘सारीपाट’ ह्या कवितेला स्कंद पुराणातील शिव-पार्वतीच्या कथेचा संदर्भ आहे. ढसाळांनी वर्णिलेल्या ‘सारीपाटा’वर शृंगाराचे रूपक आहे आणि लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हे व्यक्त करणाऱ्या काही प्रतिमा — जीवनानंदाची तरलता, निराकार रतीचे सुख, वेदनाशून्य निरतिशयाचा पाणलोट — अश्या खाश्या अमूर्त आहेत. श्रुंगाराच्या रूपकाच्या आणि विशेषतः शिव-पार्वतीच्या संदर्भाच्या दृष्टीने ह्या कवितेला ‘खेळ’चे एक continuation म्हणू शकतो. उदा. खेळ (प्रास, पृ. ८) मधील

ही तुझ्या माझ्या समागमातील आदिम शिवशक्ती
हे पुरातून स्तनातून उसळणारे भवतृष्ण कारंजे
हे अवघे आकाश तुझ्या-माझ्या मतलबातले
ज्याला आदि नाही
ज्याला अंत नाही
मी साद घालतोय तुला युगानुयुगे
तू थोडीशी हंबरशील ना?...

‘सारीपाटा’त वरवर श्रुंगाराची, एकरूपतेची, जीवनानंद-कैवल्यानंदाची, रतीच्या सुखाची बात जरी असली तरी कवितेचा मूळ भाव हा आत्मपरीक्षणात्मक आहे. स्कंद पुराणातील त्या कथेत पार्वतीकडून खेळात पराभूत झालेला आणि म्हणून स्वाभिमान दुखावून रागावलेला शंकर आहे. ढसाळांच्या कवितेला आणि ह्या आत्म-परीक्षणाला त्यांच्या विशिष्ट (रती) अनुभवाचा संदर्भ असावा, नसावा. परंतु त्याहीपेक्षा जास्त मला असे वाटते की कविता बदललेल्या किंबहुना सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीतून पत्करलेली तडजोड, त्यातून आलेली अपराधाची भावना आणि म्हणूनच त्यांतून बाहेर पडण्याची तळमळ अशा नैतिक आणि अध्यात्मिक संघर्षाचे एक अस्फुट दर्शन देणारी अशी आहे.

अपराधीपणाच्या जाणिवेतून होणारे आत्मपरीक्षण आणि त्यांतून घडून येणारा अध्यात्मिक संघर्ष हा दोस्तोयेव्हस्की- काफ्काप्रणीत अस्तित्ववादाचा (existentialism) गाभा आहे. अस्तित्ववाद हा ढसाळांच्या भावनिक आणि वैचारिक प्रक्रियेचा तसेच त्यांच्या काव्यातील अभिव्यक्तीचा एक स्थायीभाव आहे. या बाबतीत त्यांच्या ‘मलाही दारिद्रयाचं स्वतंत्र शेत आहे’ (गोलपिठा), ‘सैतानांबद्दल’ (तुही यत्ता कंची?) अशा आणखी काही कविता लक्षात घेता येतील. अस्तित्ववादाच्या दृष्टीनेच पण आत्मपरीक्षणापेक्षाही वैफल्याची भावना ज्यात प्रधान आहे अशा ‘बाप वडारी आणि मी’, ‘तात्विक भूमिकेवर’, ‘माचिसाच्या चौथ्या मितीतून’ (तीनही गोलपिठा) अशाही कविता आहेत. यांतील ‘मलाही दारिद्रयाचं स्वतंत्र शेत आहे’ आणि ‘माचिसाच्या चौथ्या मितीतून’ यांच्याबद्दल पुढच्याच लेखात थोड्या विस्ताराने लिहीन आणि इतर कवितांबद्दल नंतर कधीतरी.

अपराधीपणातून झालेले आत्मपरीक्षण हे अशा प्रकारे (अध्यात्मिक दृष्ट्या) स्वतःला बदलण्यासाठी महत्त्वाचे ठरते, एखाद्या आगगाडीच्या इंजिन सारखे किंवा तिच्यातल्या इंधनासारखे. ‘गांडू बगीचा’तील ‘शर्टाविषयी तर्क’ (पृ. ५५) या कवितेत कदाचित म्हणूनही ढसाळ म्हणतात


माणसानं असू नये धुतल्या तांदळासारखं स्वच्छ
त्याच्या शर्टावर असावेत काही डाग
त्यानं पदराच्या गाठीला बांधावं थोडंसं पाप

अशा अध्यात्मिक, नैतिक किंवा तात्विकही संघर्षाची प्रक्रिया जशी अंतर्मनातून चालू असते, तशीच समजातूनही विविध पातळ्यांवर चालू असते; अगदी शोषक आणि शोषित यांच्या वर्गयुद्धापर्यंत; एकाच द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या नियमाने. जी मी वर या नियमाची व्याख्या केली, त्याच नियमाची एक खूप प्रभावी व्याख्या करणारी अशी वर दिलेली ‘दोन रस्ते’ ही कविता.

रानभुली, तुम्ही वाचत आहात त्याबद्दलच धन्यवाद! एकतर माझा पर्स्पेक्टीव खूपच स्पेसिफिक झाला आहे. त्यात रिसर्च फील्डचा असल्याने अगदी मोजून मापून लिहायची सवय झाली आहे. आणि याउपर साहित्याबद्दल असे काही नव्यानेच लिहायला घेतले असल्याने काहीतरी भलतेच लिहिले गेले असल्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्या गोष्टी क्लिष्ट वाटत आहेत ते सांगितले तर मी त्या उलगडा करून अधिक स्पष्ट लिहिण्याचा प्रयत्न करीन.

एक कविता नि त्यावर भाष्य (ते करताना वाचणारे ईयत्ता आठवी 'अ' आहे - म्हणजे थोडीफार अक्कल आलेली पण बाहेरचे जग नि ढसाळांबद्दल फारसे माहित असलेली नाही असे धरून) लिहिलेत तर बरं होईल.

मी तरी वाचायला भारी उत्सुक आहे. मुकताच ढसाळाबद्दल एक जुन्या दिवाळी अंकात लेख वाचला त्यात ढसाळ एक राजकिय कार्यकर्ते ह्या बाजूने बरेच लिहिले होते. एका आदर्शवादापासून सुरू होऊन टिपीकल राजकारणी व्यक्तीकडे झालेला प्रवास हा मुख्य विषय. त्याचबरोबर एक कवि म्हणून बंद होत गेलेला प्रवास ह्याबद्दल एक छोटा पॅरा होता. तुम्ही कवितांबद्दल लिहिला कि त्या नरेटिव्ह मधे फिट होते का ते बघेन.