गेल्या तीन-चार वर्षांपासून मी ढसाळांची कविता वाचत आहे. ढसाळांच्या कवितेशी माझा संबंध तसा खूप उशिरानेच आला. सवर्णांच्या सांस्कृतिक जडणघडणीत दलित कविता किंवा एकूणच दलित वाङ्मय/कला यांच्याशी संबंध बेतानेच येत असावा. तसा आला तरी त्याचा सखोल विचार होणे आणि त्याबद्दल आवड, एक प्रकारची आपुलकी निर्माण होणे हे ही बहुधा विरळच असावे. आजही मराठी साहित्य/कला/संस्कृती आणि त्यासंबंधीच्या संकल्पना, ज्यांना सुर्वे “सारस्वत” म्हणतात त्यांनी डॉमिनेट केलेली आहे आणि ह्या बायसला अनुसरूनच कोणत्याही कलाप्रकाराचे संस्कार आपल्यावर होत असतात. आपली, विशेषतः सवर्णांची, सांस्कृतिक जडणघडण होत असते [ग्राम्शी (Gramsci) ह्याला cultural hegemony म्हणतो].
शाळेच्या कवितांमध्ये, कोणत्याही एका इयत्तेत, नावाला एक-दोन किंवा जास्तीत जास्त तीन “विद्रोही/दलित” कविता असत. त्यामुळे असा काहीतरी साहित्य प्रकार/विचारप्रवाह/चळवळ आहे याची कल्पना तर होती. परंतु त्याचे महत्व काय, आणि वैशिष्ट्ये कशी आणि किती ह्यादृष्टीने विचार हमखास झाला नव्हता. किंबहुना त्या कविता ज्यांच्याशी निगडित आहेत त्या समाजाशीच संबंध तुटक होता आणि म्हणून तिकडे कधी विशेष लक्ष गेले नाही, दिले नाही. शाळेनंतर, म्हणजेच गेल्या २२ वर्षांपासून, कविता खूप वाचली गेली आणि सगळ्यात आवडता कलाप्रकार झाली. तरीही दलित कविता/ दलित अभिव्यक्ती/ दलित साहित्य चळवळ यांपासून तर मी लांब-लांबच गेलो. मागच्या काहीच वर्षांमध्ये एक नवीन सामाजिक आणि राजकीय जाणीव योगायोगानेच निर्माण झाली आणि त्यामुळे दलित वाङमयाकडे नव्या दृष्टीने पाहणे होऊ शकले. त्याच प्रवासात ढसाळ भेटले, त्यांची कविता भेटली आणि तिने मला अक्षरशः हादरवून सोडले, सर्व प्रकारे अस्वस्थ केले. ती कविता वाचताना सततच असे वाटले कि एवढा समर्थ कवी जो सहजच, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय किंवा दिलीप चित्रे म्हणतात तशी नोबेल पातळी म्हणू त्या गुणवत्तेची, कविता लिहून गेला आणि तरीही एक कवी म्हणून साहित्याच्या मुख्य प्रवाहातून — सर्वसाधारणपणे, सवर्णांच्या दृष्टीने — एवढा दुर्लक्षित कसा राहिला?
ढसाळांच्या कवितेबद्दल लिहावे असे वाटत राहिले. म्हणजे त्यांची कविताच तेवढा विचार करायला प्रवृत्त करते आणि साहजिकच ते विचार जोपर्यंत व्यक्त होत नाहीत तोपर्यन्त तरी त्रास देत राहतात. पण तिच्याबद्दल लिहिणे तेवढेच कठीण. एकतर ती समजायला सोपी नाही. जिथे ती तेंडुलकरांना पूर्णपणे समजली नाही (ढसाळ त्यांच्या समोर समजावयाला असताना [गोलपिठा प्रस्तावना]) तिथे ती सर्वांसमोरच एक आव्हान आहे. खर तर ती दोन टोकांची आहे [ह्या बाबतीत अधिक विश्लेषणासाठी पहा वसंत पाटणकर - नामदेव ढसाळ यांची कविता: जीवनातील समग्रतेचा शोध]. त्यांच्या काही कविता अगदीच सुबोध आहेत (विशेष करून ज्या प्रखर विद्रोही आणि आवाहनात्मक आहेत — उदा. गोलपिठातील रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो, बेंबीच्या देठ ओला होणाऱ्या वयात, माणसाने इत्यादी) आणि इतर कविता निदान थोड्या प्रमाणात तरी दुर्बोध आहेत किंवा अगदी पूर्णपणे दुर्बोध आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत त्या जाणून बुजून दुर्बोध व्हाव्या म्हणून लिहिल्या आहेत असे वाटत नाहीत [“यानंतर काहीच दुर्बोध लिहायचे नाही ”, आंबेडकर १९७८, तुही यत्ता कंची? ]. ढसाळांची कविता ही अभिव्यक्तीवादाच्या (expressionism) विशाल अवकाशात स्वच्छंदीपणे संचार करणारी कविता आहे. तिच्यातील अभिव्यक्ती ही, अस्तित्त्ववाद (existentialism), अतिवास्तववाद (surrelalism), आधुनिकोत्तरवाद (postmodernism), आंबेडकरवाद, मार्क्सवाद आणि मुख्य म्हणजे या सर्वांच्या पायाशी असलेल्या दलित आणि सर्वहारा समाजाच्या जीवनाचा एक मूलभूत, परिपूर्ण, आणि एकमेव अनुभव, या सर्वांच्या समग्रतेतून — त्यांच्या परस्परपूरक आणि परस्परविरोधी संबंधांतून — सहजपणे आविष्कृत झालेली अशी एक अनोखी अभिव्यक्ती आहे. अभिवाक्तीवादाच्या अनुषंगाने तिने विशिष्ट आणि निर्णायक पावले उचललेली आहेत [ढसाळांनी गोलपिठाच्या पूर्वी सुमारे ३००० वृत्त/छंदबंध कविता लिहिल्या होत्या, त्यांच्या स्वत:च्या म्हणण्यानुसार साधारण सहावीत असल्यापासून त्यांना संबंध वृत्ते इत्यादी तोंडपाठ होती] आणि त्या वाटेवर तिला सामोरी आलेली आव्हाने सहजपणे निभावलेली आहेत [गजानन मुक्तिबोधांचे एक प्रसिद्ध विधान असे आहे “अब अभिव्यक्ति के सारे ख़तरे उठाने ही होंगे”, अँधेरे में, चाँद का मुँह टेढ़ा है]. हे करत असताना आपली एक खास शैली आणि ओळखच नव्हे तर एक संपूर्ण विश्व [चित्रे त्यांना poet of the underworld म्हणतात] आपल्यासाठी ठेवून गेलेली आहे. ढसाळांच्या कविता ही अशी जागतिक कलाविश्वातील अभिव्यक्तीवादाच्या क्षेत्रातील एक महत्वाची घटना आहे. म्हणूनच तिचा सखोल विचार आणि अभ्यास होणे गरजेचे आहे आणि ती तिच्या समग्र स्वरूपात परिपूर्ण पणे जगासमोर मांडणे देखील गरजेचे आहे.
ढसाळांची कविता इथे मांडताना ती मला पूर्णपणे समजली आहे असा मी बाऊ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ती जरी समजली नसली तरी तिच्यातील प्रखर भावना, वेदना, तळमळ, आवाहन, आणि या सर्वांचा मिळून विशिष्ट असा एक अद्वितीय कलाविष्कार माझ्यापर्यंत काही अर्थाने तरी पोहोचला आहे [हा मुद्दा तेंडुलकर गोलपिठाच्या प्रस्तावनेत विस्ताराने मांडतात]. तो जसा पोहोचला आहे त्या स्वरूपात मांडण्याचा विचार आहे. परंतु हे सर्व करत असताना मी कोणत्याही दृष्टीने त्या बाबतीत एक्स्पर्ट नाही हे पुन्हा पुन्हा सांगेन. मी ढसाळांच्या कवितेबद्दल असे लिहितो आहे याचे मूळ कारणच त्या कवितेमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि म्हणून तिच्याबद्दलचा झालेला विचार, त्यातून जाणवलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी ह्या आहेत. ढसाळांच्या काही कवितांबद्दलच्या माझ्या टिपण्ण्या ह्यापुढील लेखांत मांडण्याचा विचार आहे. सुरवातीला गोलपिठा आणि गांडू बगीचा मधील काही कवितांवर, एक एक करून, लिहिणार आहे.
तेंडुलकर म्हणतात तसे, ढसाळांची कविता पूर्णपणे समजत जरी नसली तरीही ती वाचल्यानंतर आपल्याला, काही अंशाने तरी, एका मूलभूत पातळीवर जाऊन सामाजिक व्यवस्थेचा विचार करण्यास प्रवृत्त करते, एक प्रकारचे विश्वरूप दर्शन घडवते. हे करत असतानाच मराठीच काय तर जागतिक काव्य अभिव्यक्ती आणि परंपरा अनेकविध अर्थाने समृद्ध करते. म्हणूनच मायबोलीच्या वाचकांसाठी ढसाळांच्या कवितेवरील प्रस्तुत चर्चा अर्थपूर्ण ठरेल अशी आशा आहे. त्याचबरोबर ढसाळांच्या कवितेवरील आणि त्यासंबंधाने इतर कवितांवरील मायबोलीच्या वाचकांचे विचार, माहिती आणि चर्चा जी/जर ह्या आणि ह्यानंतरच्या लेखांखाली नमूद होईल, ती त्यांची कविता समजून घेण्यासाठी उपयोगी होईल अशीही आशा आहे.
ढसाळांच्या कवितेसंबंधांत काही
ढसाळांच्या कवितेसंबंधांत काही यू-ट्युब व्हिडीओस:
ढसाळांच्या काही मुलाखती https://youtu.be/_dif2paIB4I?si=A4P-UDLsSofR461f, https://youtu.be/4vYLJVM3Pow?si=pbHvAR4UBSKKYjgj
मलिका अमर शेख ढसाळांविषयी बोलताना https://youtu.be/lZCTlJwz1KY?si=c9fVTvayKxBBRnxb
नुकत्याच झालेल्या “तुही यत्ता कंची?” ह्या कार्यक्रमाचा काही भाग https://youtu.be/oyamtOiz4_w?si=pk5Q1E-31Ea3b1xt
“मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे” https://youtu.be/XOr9sHM2j6s?si=Z3xpskfHH6vHlJAW
“बेंबीचा देठ ओल्या होणाऱ्या वयात” https://youtu.be/-iYhYMC3zV0?si=R4K897HxdfWGQBYu
“रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो” https://youtu.be/WrO5MFpjCtg?si=TRHus5bb3ctWPhHo
नम्रपणे काही मुद्दे मांडतो.
My reply deleted by myself
धन्यवाद, लिंक्स पाहाते. माझी
धन्यवाद, लिंक्स पाहाते. माझी या कवितेशी अगदीच ओळख नाही.
>>> या मतांच्या समर्थनार्थ (विचारले गेले तर व त्यावेळी वेळ असला तर) लिहू नक्की शकेन
मी विचारते आहे, मला समजून घ्यायला आवडेल. वेळ असेल तेव्हा अवश्य लिहा.
>>> मी विचारते आहे, मला समजून
>>> मी विचारते आहे, मला समजून घ्यायला आवडेल. वेळ असेल तेव्हा अवश्य लिहा.
ओह! हे मी माझा प्रतिसाद delete करून वाचल्याक्षणी वाचले.
विशिष्ट मुद्दा विचारलात तर यथामती काही म्हणू शकेन.
अन्यथा, तुमच्या विचारांपुढे माझा अभ्यास नाही
भयंकर विषण्ण आणि हतबल करणारी
भयंकर विषण्ण आणि हतबल करणारी कविता आहे असे इम्प्रेशन आठवते. वाचवत नाही. उगाच कशाला सुखाचा जीव दु:खात घालायचा? करतो का आपण काही काम वेश्यांसाठी, त्यांच्या लहानग्या बाळांसाठी काही - नाही. नुसतं वाचून काय मिळणार? एक सवंग आनंद वेगळे जग पाहील्याचा आणि पुढे जाउन आपण व आपले प्रियजन कसे सुरक्षित आहोत ते सुख ऊराशी कवटळण्याचा.
मी टिपणं काढायच्या आत पोस्ट
मी टिपणं काढायच्या आत पोस्ट उडवलीत तुम्ही!
संत कवी होते/मीर कवी होते, ढसाळ कवी नव्हते, खरं ते लिहिणारी व्यक्ती होते - म्हणजे काय ते समजून घ्यायला मला आवडेल.
म्हणजे ढसाळांच्याही पलीकडे जाऊन एखादी व्यक्ती कवी आहे की नाही, एखादं लेखन काव्य आहे की नाही - याचे तुमच्या मते निकष काय, तुमच्याही पलीकडे जाऊन असे काही अॅब्सोल्यूट निकष असू शकतात का, असले तर ते कुठले - असे प्रश्न मला पडले/पुन्हा ऐरणीवर आले, म्हणून विचारलं.
>>> करतो का आपण काही काम
>>> करतो का आपण काही काम वेश्यांसाठी, त्यांच्या लहानग्या बाळांसाठी काही - नाही. नुसतं वाचून काय मिळणार?
>>> ढसाळांच्याही पलीकडे जाऊन
>>> ढसाळांच्याही पलीकडे जाऊन एखादी व्यक्ती कवी आहे की नाही, एखादं लेखन काव्य आहे की नाही - याचे तुमच्या मते निकष काय, तुमच्याही पलीकडे जाऊन असे काही अॅब्सोल्यूट निकष असू शकतात का, असले तर ते कुठले - असे प्रश्न मला पडले/पुन्हा ऐरणीवर आले, म्हणून विचारलं.
नक्की यथामती लिहितो
मते तयार आहेतच (त्याशिवाय वरचे लिहिलेच नसते :फिदी:) पण हास्यजत्रा बघत आहे
(भारतातील) उद्या बोलू
प्रतिसाद आणि मतांसाठी अनेक
प्रतिसाद आणि मतांसाठी अनेक आभार.
@सामो >>> करतो का आपण काही काम वेश्यांसाठी, त्यांच्या लहानग्या बाळांसाठी काही - नाही. नुसतं वाचून काय मिळणार? एक सवंग आनंद वेगळे जग पाहील्याचा आणि पुढे जाउन आपण व आपले प्रियजन कसे सुरक्षित आहोत ते सुख ऊराशी कवटळण्याचा.
वैयक्तिक “आपण” काय वाचावे आणि काय नाही हा ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे. त्या बाबतीत मी कसेच काही बोलू शकतो. ह्याउपर व्यक्तिगत ओळखीच्या संदर्भाशिवाय काही मत देणे माझ्या दृष्टीने योग्य होणार नाही. परंतु एक लोकशाही समाज म्हणून “आपण” वेश्यांच्या, दलित्यांच्या आणि एकूण lumpen proletariat च्या प्रश्नांबाबत काही करू शकतो का किंवा काहीच का करू शकत नाही? हा एक मूलभूत प्रश्न आहे आणि तो समजून घेण्यासाठी, त्याबाबत एक समाज म्हणून काहीतरी करू लागण्यासाठी ढसाळांच्या कित्येक कविता नक्कीच लागू आहेत असे मला वाटते.
ढसाळ किंवा दलित कवितेबाबत मायबोलीवर मला relatively खूपच कमी चर्चा आढळून आली, म्हणूनच तिचा होईल तेवढा पाठपुरावा करून लिहावे असे ठरवले.
@स्वाती_आंबोळे >>> तुमच्याही पलीकडे जाऊन असे काही अॅब्सोल्यूट निकष असू शकतात का, असले तर ते कुठले - असे प्रश्न मला पडले/पुन्हा ऐरणीवर आले, म्हणून विचारलं.
माझ्या मते कविता काय आहे आणि कोण कवी आहे ह्याचे निकष काळानुसार बदलत असतात. आजच्या absolute relativism च्या काळात जो व्यक्ती स्वतः:ला कवी म्हणतो तो कवी आणि ज्याला तो स्वतःची कविता म्हणतो ती कविता. अर्थात ह्या बाबतीत सर्वांची संमती असावीच ह्याची गरज नाही. “आवडली तर घ्या(यची) नाहीतर सोडून द्या(यची)”.
कवितेची गुणवत्ता किती ह्याबाबतीत त्या कवितेचा प्रभाव किती ह्याला धरून काही absolute निकष असू शकतात आणि काळानुसार ते बदलत असतात असे मला वाटते. अकरावी - बारावीत असताना मी बालकवी वाचून काढला होता (जो आजही बऱ्यापैकी पाठ आहे). त्या वरील बरीच समीक्षा ही वाचली होती. तेव्हा T. S. Eliot च्या “Tradition and Individual Talent” ह्या लेखाची ओळख झाली ज्याबाबत मर्ढेकरांनी “परंपरा आणि नवता” अशी टीका लिहिली. करंदीकरांनीही आपली वेगळी लिहिली आहे. मर्ढेकरांची टीका तेव्हा वाचली होती. ढोबळमानाने सांगायचे तर मुद्दा असा आहे की प्रतिमा, फॉर्म किंवा अभिव्यक्ती इत्यादी बाबतीत नावीन्य हा काव्याच्या नवीनतेचा आणि म्हणून गुणवत्तेचा एक महत्वाचा निकष आहे आणि अशा प्रकारच्या नाविन्याची निर्मिती ही मूलभूतपणे परंपरेच्या साच्यातच होत असते, परंपरेला समृद्ध करत असते. तेंडुलकर म्हणतात “त्याच्या (ढसाळांच्या) कवितेने अनेकदा तुकारामाच्या अस्सल अभंगांची आठवण मला दिली” असे. गंगाधर गाडगीळांचे “साहित्याचे मानदंड” हे ही तेव्हा वाचले होते आणि त्यातील काही गोष्टी, विशेषतः बालकवी आणि मर्ढेकरांच्या कवितेसंदर्भात, back of the mind राहिल्या आहेत.
दुसऱ्या एका बाजूने विचार करायचा तर “कलेसाठी कला” किंवा “जीवनासाठी कला” असा एक “आदिम” वाद आहे. मागच्या काही वर्षांत “जीवनासाठी कला” ह्या बाजूनेच माझा स्वतःचा निर्णय ठाम आहे. “पार्टी” ह्या गोविंद निहलानींच्या सिनेमात (आणि कदाचित एळकुंचवारांच्या मूळ नाटकात) ह्या बाबतीत काही उल्लेखनीय चर्चा आहे. त्याची लिंक https://www.youtube.com/watch?v=xnYFvnEfRSs. पूर्ण सिनेमाची एक लिंक: https://youtu.be/xTr8qV5ioNM?si=GymKADH_FNEsakyG भारतात ह्या काही वर्षांपूर्वी उपलब्ध नव्हत्या, आता आहेत की नाही हे माहित नाही.
>>>>> रक्तात पेटलेल्या अगणित
>>>>> रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
शोधून वाचली काल. अस्वस्थ करते.
>>>>अँधेरे में, चाँद का मुँह टेढ़ा है
कळली नाही
>>>>ढसाळ किंवा दलित कवितेबाबत मायबोलीवर मला relatively खूपच कमी चर्चा आढळून आली, म्हणूनच तिचा होईल तेवढा पाठपुरावा करून लिहावे असे ठरवले.
सुस्वागत आहे.
लेख वाचावासा वाटला.
लेख वाचावासा वाटला.
अस्वस्थ करणारं काही वाचायला वेळ, आणि मनाची तयारी लागते.
नवीन Submitted by चेराज on 17 May, 2025 - 11:37>>> प्रतिसाद आवडला.
हे वाचायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करायला आवडेल.
असं काही समोर ठेवल्याबद्दल धन्यवाद!
कविता ही कविता वाटण्यासाठी ती
कविता ही कविता वाटण्यासाठी ती पद्य व काव्य यांचे मिश्रण असावी. संतांनी जे लिहिले ते अखिल मानवजातीसाठी लाभदायक विचारांचे 'पद्य व काव्य' असे मिश्रण होते. दैनंदिन जीवन कसे जगावे याची सूत्रे त्यात सापडतात. कवितेच्या ओळी या 'उक्ती' होण्याकडे कवीचा कल असो. कवितेचे एक कार्य असते व कवितेवर जबाबदारी असते, ते कार्य व ती जबाबदारी ही की माणसांची मने जुळावीत. अति भयंकर दिशेने समाज वैचारिक प्रवास करत असेल तर कविता ही एक 'विशिष्ट व्यक्तिमत्त्व' धारण करू लागते जे ढसाळ, विंदा, भट, मर्ढेकर यांच्या काव्यातून प्रतिबिंबित होते. शेकडो समीक्षक व अभ्यासक यांची कारकीर्द या नावांच्या काव्याचे महत्व विशद करण्यात बनली, जमली असली तरी दैनंदिन जीवनात सर्वसामान्य माणूस हा उक्ती म्हणून वेगळ्याच ओळी उदाहरणार्थ उच्चारतो. देणाऱ्याचे हात घ्यावे सारखे अपवाद सोडून! समीक्षक ही बांडगुळ जमात आहे. दिशाभूल करण्यात पटाईत असलेले हे समीक्षक स्वतः दोन ओळी अश्या लिहू शकत नाहीत ज्या सामान्याला आपल्याश्या वाटाव्यात. सामान्य माणूस हा कलाकृतीचा सर्वश्रेष्ठ रसिक असतो. अभ्यासक नसतात. ढसाळांची कविता समाजातील बीभत्सतेसोबतच अमानवीपणा व विषमता यावर आक्रमक भाष्य करते व त्यामुळे एका घटकासाठी आधारस्तंभ ठरते. (ती 'कविता' असते की नाही हे वेगळे, पण ते भाष्य अत्यंत वास्तववादी असते). संतांची कविता ही एकूण मानवजातीसाठी लाभदायक विचार देणारी असते. तुकाराम महाराजांनी केलेली भाष्ये ही प्रसंगी आक्रमक असतील पण ती एकूणच सर्वांसाठी चिंत्य व अनुकरणीय असतात.
आपली कविता, कवितेचे कार्य करते की नाही की एका समाजघटकाला उत्तेजित करते की टाळ्या मिळवू पाहते की 'ती कविता जगासमोर आणलीच नाही तरी स्वतःला तोषवते व ते कवीला पुरेसे वाटते' याकडे प्रांजळपणे बघणे कधीतरी आवश्यक ठरते.
यात धागालेखकाला उद्देशून एकही टीकात्मक विधान नाही.
काल स्वाती आंबोळे यांनी दिलेल्या प्रतिसादावर हा माझा प्रतिसाद आहे व हा धागाही आत्ताच परत वर आला हे बघून 'येथे लिहावेसे वाटत होते' हे लिहिल्याचे आठवले.
बेफिकीर प्रतिसाद आवडला.
बेफिकीर प्रतिसाद आवडला.
आपली कविता, कवितेचे कार्य करते की नाही की एका समाजघटकाला उत्तेजित करते की टाळ्या मिळवू पाहते की 'ती कविता जगासमोर आणलीच नाही तरी स्वतःला तोषवते व ते कवीला पुरेसे वाटते' याकडे प्रांजळपणे बघणे कधीतरी आवश्यक ठरते. >>>>
कवितेच्या ओळी या 'उक्ती' होण्याकडे कवीचा कल असो. कवितेचे एक कार्य असते व कवितेवर जबाबदारी असते, ते कार्य व ती जबाबदारी ही की माणसांची मने जुळावीत. अति भयंकर दिशेने समाज वैचारिक प्रवास करत असेल तर कविता ही एक 'विशिष्ट व्यक्तिमत्त्व' धारण करू लागते >>>>
संतांची कविता ही एकूण मानवजातीसाठी लाभदायक विचार देणारी असते. तुकाराम महाराजांनी केलेली भाष्ये ही प्रसंगी आक्रमक असतील पण ती एकूणच सर्वांसाठी चिंत्य व अनुकरणीय असतात.
आपली कविता, कवितेचे कार्य करते की नाही की एका समाजघटकाला उत्तेजित करते की टाळ्या मिळवू पाहते की 'ती कविता जगासमोर आणलीच नाही तरी स्वतःला तोषवते व ते कवीला पुरेसे वाटते' याकडे प्रांजळपणे बघणे कधीतरी आवश्यक ठरते. >>>>
धन्यवाद, छंदी (तुमच्या आय डी
धन्यवाद, छंदी (तुमच्या आय डी चे शीर्षक मला माझ्या फोनवर लिहिता येत नाहीये)
मीर बद्दल लिहायचे राहिले, ते
मीर बद्दल लिहायचे राहिले, ते आता लिहितो
डॉ अनंत ढवळे हे माझे जुने
डॉ अनंत ढवळे हे माझे जुने मित्र! काही वर्षे काहीच संवाद नाही. परदेशात असतात.
कवितेबाबाबत सकस दृष्टिकोन देऊ शकणारा माणूस!
त्यांचा एक मुद्दा!
'स्वतःला वजा करून सभोवतालावर भाष्य करणारे काव्य श्रेष्ठ ठरते'
मीर तसे लिहायचा.
ज्या परिस्थितीत आपण अस्तित्वातच नाही आहोत पण एक निरीक्षक आहोत अश्या परिस्थितीवर काव्यात्म भाष्य करणे
मीरचे सगळे काव्य / म्हणजे गझला, तश्या नसतील, विशेषतः मक्ते तर नसतीलच (मक्ता ही त्या काळची 'गरज' होती, आज तो छंद आहे). मात्र मीरचे अनेक शेर हे व्यक्तिनिरपेक्ष आहेत. कोणालाही लागू होणारे आहेत. आपलेसे वाटणारे आहेत. त्या विचारांवर मीर हावी झाला नाही.
हे कळायला मला डॉ ढवळे यांच्यासोबत अनेक मीटिंग्ज घ्याव्या लागल्या.
धन्यवाद, चेराज आणि बेफिकीर.
धन्यवाद, चेराज आणि बेफिकीर.
बेफिकीर, माझं मत चेराज यांनी व्यक्त केलेल्या मताशी मिळतंजुळतं आहे हे लिहिण्याची बहुधा आवश्यकता नाही. पण निराळं, विशेषत: विरोधी मत समजून घ्यायचा प्रयत्न असतो, म्हणून विनंती केली होती.
मला जे समजलं त्यानुसार तुम्ही कोणतं काव्य श्रेष्ठ समजावं याबद्दल लिहिलं आहात, मुळात कुठलं लेखन काव्य समजावं याबद्दल फारसं लिहिलेलं नाहीत. पण तो खरोखरीच मोठा विषय आहे.
शिवाय कलाकृतीच्या आस्वादात तिच्या वर्गवारीमुळे फारशी बाधा येत नाही, हेही खरंच आहे. तेव्हा अशी चर्चा काहीशी शवविच्छेदनासारखी होत जाण्याचा धोकाही असतो.
पुन्हा एकदा, चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार.