मराठी गझल

*** कटाक्षांची कृपा

Submitted by अरविंद चौधरी on 6 July, 2012 - 00:23

*
कटाक्षांची कृपा झाली मनावर
पहारा कैक डोळ्यांचा घरावर

पुरे पाऊस प्रेमाच्या ढगांचा
सुखाचा पूर मग होतो अनावर

कधीचे दुःख एकाकीच माझे
कुणी दव सांडले पानाफुलावर !

कधी नाहीच केला प्रश्न कोणी !
तरीही चित्त माझे उत्तरावर

जरी डोळ्यात माझ्या झोप नाही,
तरी का झिंग झोपेची जगावर

उशाला ठेवली स्वप्ने गुलाबी
खुळी जाऊन बसली ती छतावर

----- अरविंद

गुलमोहर: 

जे व्हायचे ते घडून गेले.

Submitted by सुधाकर.. on 5 July, 2012 - 10:34

जे व्हायचे ते घडून गेले
इथे पावसाळे रडून गेले.

कोण वाचतो शब्दास आता
ज्ञान ग्रंथात सडून गेले.

घातले दाणें जरी मुठीने
उपाशीच पक्षी उडून गेले.

माझी मी दिली कुर्‍हाड ज्यांना
माझ्याशीच ते लढून गेले.

रक्तावर पोसले तरु जरी
पानगळीत हे झडून गेले.

गर्दीत पाहीले सोयरे जे
नजरे समोरच दडून गेले.

किती सावरावं प्रत्यकाला?
आसवात गाव बुडून गेले.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नाहीस वेचले तू, वेचेल अन्य कोणी!

Submitted by सतीश देवपूरकर on 5 July, 2012 - 08:12

गझल
नाहीस वेचले तू, वेचेल अन्य कोणी!
मी एक फूल आहे, माळेल अन्य कोणी!!

दे राजरोस फाटा, वा टाक कोप-याला;
मथळ्यासमान मजला छापेल अन्य कोणी!

दगडावरील काळ्या, मी एक रेघ आहे!
माझीच री पुढेही.....ओढेल अन्य कोणी!!

तरळू नकोस देवू डोळ्यांत भाव माझे;
नसल्यावरी इथे मी, वाचेल अन्य कोणी!

हे फक्त एक पुस्तक नाही....असे स्वत: मी!
विसरू नकोस कोठे, चाळेल अन्य कोणी!!

वेळीच हृदय माझे ताब्यात घे तुझ्या तू;
समजायच्याच आधी, लाटेल अन्य कोणी!

तू खूप आवडीने लिहिलेस नाव माझे;
ते नाव ऎनवेळी वगळेल अन्य कोणी!

-------प्रा.सतीश देवपूरकर

गुलमोहर: 

माणसे की खेकडे!

Submitted by प्राजु on 5 July, 2012 - 01:28

माणसातच आज ना माणूस कोठे सापडे
चालती तिरक्याच चाली .. माणसे की खेकडे!

सूड दंगे, खून-खटले, जाहले हे रोजचे
का बरे लोकांस आहे शांततेचे वावडे?

आंधळी ही न्याय देवी, दोष ना काही तिचा
दुर्जना हाती खवा अन सज्जनाला जोखडे

जागृती करतात हत्या रोखण्या गर्भातली
पण खरे की श्वान शेपुट वाकडे ते वाकडे

पेटुनी आता उठावे वाटते कित्येकदा
पण पुन्हा ओढून घेते सभ्यतेची झापडे

पावसा तूही असा का राज्यकर्त्यांसारखा?
आस लावूनी जिवाला ठेवसी तू कोरडे

देश प्रगतीच्या पथावर सांगना जावा कसा
ठेवली तारण मती जर धर्म-जातींच्याकडे!

माणसा माणूस हो! हे कळकळीचे सांगणे
अन्यथा या भूवरी उरतील केवळ माकडे

गुलमोहर: 

गगनात वीज लकलकते, अन् तुझी आठवण येते!

Submitted by सतीश देवपूरकर on 4 July, 2012 - 11:41

गझल
गगनात वीज लकलकते, अन् तुझी आठवण येते!
सर वळवाची कोसळते, अन् तुझी आठवण येते!!

मृद्गंध नव्हे धरणीचा, हा गंध तुझ्या पदराचा!
झुळकीने मन कळवळते, अन् तुझी आठवण येते!!

लवलवणारी ही फांदी, की, रुळणारी ही वेणी?
एखादे फूल निखळते, अन् तुझी आठवण येते!

बिलगली वेल भिजलेली, की, तूच उभी ओलेती?
गात्रात शिरशिरी भरते, अन् तुझी आठवण येते!!

सर अवचित जावी पडुनी, तारुण्य तसे ओसरते!
हुरहूर तेवढी उरते, अन् तुझी आठवण येते!!

गुलमोहर: 

देवून थोडी कल्पना ( तरही )

Submitted by निशिकांत on 4 July, 2012 - 01:56

प्राक्तना मी विनवतो तू ऐक ना!
येत जा देवून थोडी कल्पना

मेघ वांझोटे कसे आले नभी!
कोरड्या अन् गडगडाटी वल्गना

कगदी नावा करोनी ठेवल्या
वाट बघती ये बरस रे तू घना

भंगण्या तप मेनका यावी कधी
याच हेतूने सुरू आराधना

दप्तराचा अन् अपेक्षांचा किती
भार पाठीवर! मुलांची वेदना

षंढ सारे सोसती अन्याय का?
लुप्त कोठे जाहली संवेदना?

जर जिहादी ठार झाला तर म्हणे
त्यास मिळती कोवळ्या नवयौवना

शेत कसण्या लाजतो शिक्षीत का?
हीच आहे शिक्षणाची वंचना

शब्द का "निशिकांत" ओघळती असे?
शायरीतुन व्यक्त होती यातना

गुलमोहर: 

मी येण्या आधी येथे......!

Submitted by सुधाकर.. on 3 July, 2012 - 12:59

मी येण्या आधी येथे, मला कधी ना कळले होते
प्रत्यकाचे हात इथे पापधुळीने मळले होते.

शाळेत शिकलो एक अन् जगी पाहीले दुजेच काही
अज्ञानाचेच दळण येथे सज्ञानाने दळले होते.

नशा, वासना, लाचारी पैशाचे हे मंगळ येथे
चंगळ पाहुन मन माझे, कधी जराशी चळले होते.

सभ्यतेवर थुंकूण जेंव्हा जुगार्‍याचा डाव मांडला,
मागुन आल्या शब्दांनीच मनास तेंव्हा छळले होते.

विसरुण या जगास आता स्वप्नात रमणे ठरले पण,
मनात माझ्या स्वप्नांचे गावच अवघे जळले होते.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

किती मानहानी गिळली, काय तुला सांगू?

Submitted by सतीश देवपूरकर on 3 July, 2012 - 12:19

गझल
किती मानहानी गिळली, काय तुला सांगू?
घरे काळजाला पडली! काय तुला सांगू?

रोष किती रस्त्यांचा मी ओढवून घेवू?
वाट घराचीही रुसली, काय तुला सांगू?

एकवेळ समजू शकतो साक्ष दुश्मनांची;
दोस्तमंडळीही फिरली, काय तुला सांगू?

दोनचार झाडांसाठी तुला रडू आले;
पुरी बाग माझी जळली, काय तुला सांगू?

कसे कोणजाणे गेले कुणाला न ऎकू;
तटातटा नाती तुटली, काय तुला सांगू?

फेडता न आली देणी मला जिंदगीची;
राखही चितेची विकली, काय तुला सांगू?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

कधी कधी

Submitted by सागर कोकणे on 3 July, 2012 - 09:33

उधळून मुक्त दाने द्यावी कधी कधी
हिंडून गाव भिक्षा घ्यावी कधी कधी

बहरात या ऋतूच्या, कोमेजलो असा
वाटे समोर तू ही यावी कधी कधी

वृत्तात ना लिहावी, स्वच्छंद जन्मता
गझलेसमान ती ही व्हावी कधी कधी

जे सोडती न आशा, ध्येयास पाहता
अंती तयास लाभे, चावी कधी कधी

ते वाहती फुलांचे, निर्माल्य सागरा
त्यानेहि भावसरिता, प्यावी कधी कधी

-काव्य सागर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जणू वेदना जात्यावरती दळते आहे

Submitted by प्राजु on 3 July, 2012 - 00:17

कसे म्हणावे नशीब हे फ़ळफ़ळते आहे
उथळ सुखांच्यासवे जरा खळखळते आहे!

नव्हते ठरले कधी आपुले भेटायाचे
कशास मी त्या पाराशी घुटमळते आहे?

थुंकुन देता आयुष्याला नशिबावरती
हळू हळू ते आता थोडे कळते आहे

मन्मानीला लगाम त्यांच्या घालू जाता
नात्यांमधली गोडी का साकळते आहे??

पुरुषासाठी जन्म पणाला नारी लावे
येत तटाशी लाट सुधा आदळते आहे!

आज-उद्याला अथवा परवा येशिल तू रे
पावसा बघ वेधशाळा गोंधळते आहे!

आयुष्याची भुकटी भुकटी होउन गेली
जणू वेदना जात्यावरती दळते आहे

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल