"तो"
तो चंद्र आहे वेडा , मी चांदणी नभाची,
त्याला प्रकाशाचे वेड , मला भीती वलयाची !
तो फिरतो नभात , तार कापतो ढगांची,
माझी क्षीणशी भ्रमन्ती , साथ त्याच्या सावलीची!
तो आकाशीचा राजा , सभा त्याची प्रकाशाची,
त्याच्या सभेमध्ये आहे, मला जागा किरणाची!
त्याला क्षितीजाचे वेड , मला तार प्रांगणाची,
त्याची बेधुंद भरारी, माझी चाल कासवाची!
तो आहेच थोडा वेडा , धग सोसतो उराशी,
त्याच्या प्रेमाची ती उब, माझ्या मनाच्या तळाशी!