म्हातारीचा वाडा....!!

Submitted by धुंद रवी on 9 June, 2012 - 07:30

r_r3.jpg

गर्द अंधा-या वाड्यामध्ये...
पिशाच्चांचा राडा
असा गावाच्या वेशीबाहेर....
म्हातारीचा वाडा

म्हातारीच्या वाड्यात म्हणे...
सत्तावन्न खोल्या
सावल्यांनी भरलेल्या अन
रक्तानं त्या ओल्या

गेला कोणी वाड्यामध्ये
तर येणे परत नाही
आणखिन एक सावली वाढे
तरी खोली भरत नाही

वाड्यामधल्या हरेक खोलीत
येतो म्हातारीचा वास
कधी ऐकु येते किंकाळी
कधी पुटपुटण्याचा भास

आमोशाच्या रात्री इथं
कुणी बाळ रडत असतं
वाड्यामागचं झाड वडाचं
दात विचकुन हसतं

कुबट कुजगट म्हातारीची
जळलेली कातडी
बाहेर लोंबता.. फुटका डोळा
अन मान जरा वाकडी

हळद कुंकु... मिरच्या लिंबु
पसरलं असतं घरभर
चिमुरड्यांच्या रक्तासाठी
चटावलेलं तळघर

तळघरात ह्या खेचुन नेतो
सरपटणारा पंजा
कोवळ्या जीवावर ताव मारतो
अतृप्त अघोरी मुंजा

सळसळणा-या जिभाच काढी
खळखळणारा ओढा
असा गावाच्या वेशीबाहेर..
म्हातारीचा वाडा

एक पोर चिमुकली.. रस्ता चुकली
खेळत गेली वाड्याकडे
हे बघणा-या गावक-याच्या
जीवाचा थरकाप उडे

पोर ती वेडी.. ओढली गेली
हडळीच्या अमलाखाली
ओलांडुन उंबरा वाड्याचा
भारावुन ती आत निघाली

घाबरुन... तरी धीर धरुन
आत गावकरी शिरला अंती
लागत गेले दरवाजे अन
खसखसली ती तटबंदी

बाधीत ती... संमोहीत ती
जीव निरागस भूल पडे
गावक-याला दिसला पंजा
सरपटताना तिच्याकडे

कुजबुजले कुणी खोल्यांमधुनी
होणार वाटते घात हिचा
तो धावला जीवाच्या आकांताने
धरुन ओढला हात तिचा

पण क्षणात त्याचा जीव गोठला....
श्वासाचा चोळामोळा
त्या चिमुकलीला नव्हता पंजा
लोंबत होता.... फुटका डोळा

चेकाळत मग आला पंजा
सावल्या लागल्या फेर धरु
होऊन चिमुकली, म्हातारीने
पचवले शेकडो वाटसरु

पुन्हा विचकले दात वडाने,
हसला रक्तपिपासु ओढा
असा गावाच्या वेशीबाहेर
.....म्हातारीचा वाडा

धुंद रवी.

Ring.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भयकविता....!!
-कवी रवी धारप-;)

आवडली.

( एक निरागस प्रश्न : हे मायबोलीचं वर्णन आहे का ? )

धुंद रवी,

खूप छान आहे कविता. भरदुपारी वाचली तरी आवडली. पण स्साली रात्री वाचायला हवी होती. पुढील वेळेस कृपया तशी शिफारस सूचित करणे. Proud

आ.न.,
-गा.पै.

बाप्रे! तुफान आहे ही.. कस सुचतं राव तुम्हाला! खरच दंडवत!!!!!

नशीब माझं संध्याकाळी वाचली ही कविता ! Uhoh

Sad
कसं होणार माझं आता Sad
उगाच वाचली आता

एक तर कविता, त्यात धुंद रवीची कविता म्हणुन विनोदी समजुन रात्री वाचली असती तर Sad
बाप्रे Sad

वर्णानात्मक कविता आहे. वेगळेपणा विशेष वाटला.
कविता, आवश्यक तो प्रभाव/वातावरण निर्माण करते आहे.
(चित्रांची गरज नव्हती असं वैयक्तिक मत.... कृगैन)
--------------------------------------------------------------------------

भाप्र. कवितेतला रस कोणता ? बीभत्स की भयानक ?
की दोघांचं मिश्रण ?

कविता एकदा कवीने लिहील्यावर रसिक त्यामधे काय पाहील हे सांगता येत नाही. एका वेगळ्या अँगल मधून पाहीलं तर या सर्व नकारात्मक प्रतिमा आहे असं वाटतं. एक ब्लॅक कविता कवीने रेखाटलीये. या प्रतिमा निराशा, भय इ. नकारात्मक भावनांचं वर्णन करत आहेत असं वाटतं. या भावना जेव्हां मनाचा ताबा घेतात तेव्हां ते म्हातारीचा वाडा बनतं.

मोह, माया, फसगत या कारणातून येणारी ही निराशा, मनाच्या जखमा यांना इतर वर्णनं लागू पडतात. अर्थात, कवीला हेच म्हणायचं असेल असंही नाही.

मस्त आहे कविता.............एकदम झाक...... Happy

चित्रांची गरज नव्हती असं वैयक्तिक मत.... >> ++
कविता मुळात सही आहे, ह्या प्रकारची भीती आवडणार्‍यांकरता पुरेशी...
चित्राची गरज नाहीये.. रसभंग होतोय, असं मलाही वाटलं..

कविता-cum-कथा मस्तच! पण मध्येच मुंजा कुठून आला? यमक जुळवण्यासाठी दुसरी प्रतिमा वापरायला हवी होती.