लपंडाव

Submitted by pradyumnasantu on 10 June, 2012 - 22:15

तो चांद पहा आकाशी अहा सुकुमार कुणी घरी घुसला
रातीस आली मदहोशी ज्वर जणू प्रितीचा मुसमुसला
चांदणी खडी अंगणी चमक नथ्थनी दागिना हसला
रातीच्या बसत छातीशी बात प्रितीची करुन तो फसला
वाटले, मनी दाटले प्रेम रातीला बरा सापडला
घेतले बाहुपाशात अडकला त्यात चंद्र अवघडला
जो लपंडाव खेळत निशा लोळत पलंगावर पडली
थोडासा झाला वेळ संपला खेळ उषा अवतरली
पाहून प्रणय जोडीचा उषा-सूर्याचा, निशा बावरली
चंद्रास मिठीत घेण्यास पुन्हा धरण्यास निघुन ती गेली
करुनिया 'शुभ्र' चेहरा हलवी मोहरा रात्र जी तिथुनी
रात्रीची धाकटी भगिनी ती ’संध्या’ तरुणी म्हणाली हसुनी
"सूर्याची फजिती करते जगा हासवते पहा तू ताई"
तितक्यात दाखवित तोरा तिला सामोरा दिनकर येई
मनी उठले प्रेम तरंग जसे ते रंग तयाला दिसले
चंचल तो खुळा सूर्य बावळा पाहून सर्वजण हसले
हृदयाला समजावित सूर्य मोहीत तिज पाठी गेला
पाहून निशेला आत होत लज्जित परतुनी आला
चुपचाप लाज-गंधित उषा शोधित सूर्य घरी गेला
प्रणयाचा अपुरा खेळ कराया पुरा चंद्र परतला

गुलमोहर: 
शब्दखुणा: