सुकलेले लाकूड
लाकडाची बासरी
बासरीचे ओले सूर
कृष्णाच्या ओठांवरी
दगड तो खडबडीत
त्यावरती होते शिल्प
सुस्वरूप करतात
शिल्पकाराचे हात
उन्हाळ्याच्या उन्हात
भेगेभरल्या भूमीत
पावसाचे थेंबथेंब
ताजे कोंब रूजवीत
जरी कुरुप मनात
लपलाहे कोणी चोर
प्रार्थनेतला ईश्वर
संत बनवी सत्वर
पण बासरी तुटते
कधी शिल्पही फुटते
अवतरतो दुष्काळ
संतपण लया जाते
याला एकच उपाय
संग निर्मळच ठेव
फुटक्या शिल्पाच्याही मुखी
येई बासरीचा देव
( संगणक आणी फेसबुकचे व्यसन जडलेल्या लोकांना बघून सुचलेली कविता. )
मान पाठ दुखते, कमी
होतच नाही ओढ
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड
कशीबशी त्रोटक एक
चारोळी लिहायची
पूर्ण होण्या अधीच तिला
पोस्टही करायची
लाईकला प्रतिसादाची
हवी असते जोड
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड
विचारता आज असा का
उदास सखे चेहरा
पत्नी म्हणे जाणून घेण्या
गुगलवर सर्च करा
टोमण्यांचाच मिळतोय
हल्ली फराळ गोड
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड
हँग होता संगणक
सारेच झाले ठप्प
स्क्रीनवरची द्रौपदी
झाली होती गप्प
कौरवांना म्हणत नव्हती
पदर माझा सोड
इंटरनेट अन् फेसबुकची
लागली इतकी खोड
शार्दूलविक्रीडित
(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.
त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते.)
कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित
वृत्त : शार्दूलविक्रीडित
कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ.
का लिहितो मी कविता?
कारण 'ती' लिहित नाही..
तीच जिला आजकाल गुलाबी रंग खूप आवडतो
किती ठोके चुकले त्याचा हिशेब नेहमी चुकतो
ती हसत राहते मनातल्या मनात
कुणालाच न सांगता
मी तेच मोती वेचतो आणि
गुंफतो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच ज्याला कुठे दुखतंय तेच कळत नाही,
पण दु:ख उगाळायला आवडतं
त्याची व्यथा डोळ्यातून झरत राहते
काहीच न बोलता..
मी तेच शब्द टिपतो आणि
गातो माझी कविता !
का लिहितो मी कविता?
कारण 'तो' लिहित नाही..
तोच जो फक्त किनाऱ्याच्या दगडांवर आपटत राहातो
पुन्हा पुन्हा मागे जाऊन, पुन्हा पुन्हा उसळत राहातो
तो खवळतो, आतल्या आत खदखदतो..
अंतर राखून
सख्या मला जवळ घे
पण श्वासापुरती फट ठेवून
माझ्यावरती रागाव सुद्धा
मनधरणी ची जागा राखून
पाठ फिरवून रुसून बैस
पण वळवण्याची संधी ठेवून
वळवल्यावर हसून बघ
पुन्हा रुसण्याचा मोका राखून
चन्द्र झाला आता वेडा , रात्र आता सावरेना,
तुझ्या स्पर्शाची ती उब , माझ्या उरात मावेना !
थाम्बली वेडी झुळुक , पानही आता हलेना ,
तुझ्या वाटेवरुन माझी , काही नजर हटेना!
हसरा तुझा चेहरा , डोळ्यासमोरुन जाइना ,
कधी होते मी स्वतःची , माझी मला आठवेना!
चंद्र झाला आता वेडा , रात्र आता सावरेना,
तुझ्या स्पर्शाची ती उब , माझ्या उरात मावेना !
थांबली वेडी झुळुक , पानही आता हलेना ,
तुझ्या वाटेवरुन माझी , काही नजर हटेना!
हसरा तुझा चेहरा , डोळ्यासमोरुन जाइना ,
कधी होते मी स्वतःची , माझी मला आठवेना!
एक पिंजरा देहाचा त्याला संस्कारांचा टाळा
इंद्रियांच्या गजांवर बाह्यस्वातंत्र्याचा वाळा
क्रूर बाहेरचा वारा करे आसवांशी चाळा
आत उन्हाळा हिवाळा आतमध्ये पावसाळा
माझ्या कल्पनांना जेव्हा तेथे पाठवले होते
त्यांना स्वतःच्या आईचे दूध आठवले होते
कोणी लाथाडले त्यांना कोणी हाकलून दिले
बद्धतेच्या सावलीला स्वातंत्र्याचे ऊन दिले
आल्या माघारी कल्पना जणू वीज कोसळावी
जणू सून टाकलेली तिच्या माहेरी पोचावी
त्यांचे दवापाणी केले आणि त्यांना विचारले
कोण जिंकले बाहेर कोण लढाई हारले
माझ्या गळ्यात घालुनी दोन्ही हात त्या म्हणाल्या
सारे गुपीत जाणले सार्या अफवा निघाल्या
घे हे चार थेंब पाण्याचे
ठेव पापणीवर
गांजलेल्यांना सहानुभूती दाखवताना
उपयोगी पडतील बरं
*
अंगभर फासायला
ही घे भस्माची पुडी
महाराज बनायचं ढोंग करून
भक्तिणीची ओढ साडी
*
हे पकड डझनभर ड्रेस
आणि हे वेगवेगळे ऎड्रेस
अनेकींशी लग्नं कर
हुंडा घेउन साफ कर
*
मी कोण विचारतोस
तुला सल्ला देणारा
गळ्यातला नाग पाहिलास
जटांवर डोलणारा?
*
पाय नको धरूस
मी नाही खरा भगवान
नाग आहे रबराचा
देवपण माझेही थोतांड
*
फसवू सा-या जगाला
मग अत्र्यांचे नाटक आहेच
आठवणींचे विणले जाळे
मोहक तंतू निळे जांभळे
उन्हात नाजूक असे लाकाके
हरेक वेढा विश्व निराळे
स्पर्श सुखावह मऊ मखमली
लखलखणार्या त्या रेघांचा
वेध मना मग उगाच लागे
लकाकणार्या त्या वेढ्यांचा.
थरारली ती हिरकणी जाळी
डोळाभेट जेव्हा जहाली
भूतकाळाचा काळा कोळी
कणाकणाने पुढ्यात येई
विस्तारले कर मी माझे दोन्ही
विस्मयित मग झाला तोही
वेडावाकडा असे जरीही
आलिंगन मी दिले त्यासही.
द्रुष्टीआड जरी काल लपवला
तरी तोही माझा, तोही माझा.