कविता

मुसक्या बांधलेली कविता

Submitted by रसप on 6 June, 2012 - 04:20

मुसक्या बांधलेली कविता
काल स्वप्नात आली
तिची घुसमट पाहून माझीही
खूप घालमेल झाली

मी म्हटलं, 'सोडवतो तुला'
ती म्हणाली, 'राहू दे..
मला सोडवावंसं अजून कुणाला वाटतं
मलाच जरा पाहू दे'

तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर
दु:खाचा लवलेश नव्हता
दुर्लक्षित झाल्याच्या भावनेने
डोळ्यांत क्लेश नव्हता

माझी घालमेल वाढली तसे
खाडकन डोळे उघडले
अजून उजाडायला अवकाश होता..
अंधार पाहून समजले

डोक्यात आणि मनात
नुसतं काहूर माजलं होतं
तिच्या हसऱ्या चेहऱ्याने
मला बेचैन केलं होतं

नकळतच हातात
कागद आणि पेन घेतलं
शब्दांच्या शेपट्यांना
भावनेला जुंपलं...

एकेक शेर लिहित होतो,
एकेक कविता म्हणून

गुलमोहर: 

पागोळी

Submitted by अज्ञात on 6 June, 2012 - 00:39

घन; वेस ओलांडून
आला सोनियाचा सण
धुळवड आकाशात
ऊर घागर भरून
झरे रेशमाचं पोत
सारे दारूण झाकून
रोमरोम शहारून
गाई अंकुरात धून

थेंब थेंब फुटे वाळा
वारा शकून पिऊन
झिंग ओलेत्या मेघाची
सय सय उधाणून
सरे चातकाचे ऋण
मोर माना उंचावून
भिजलेल्या अंगणात
मन पागोळी होऊन

.........................अज्ञात

गुलमोहर: 

फटाक !!

Submitted by pradyumnasantu on 5 June, 2012 - 18:49

काय करता रे तुम्ही?
स सर कविता
कविता?
कसली रे कविता तुझी?
सर, माझी ऐच्छिक
माझी काल्पनिक
माझी अकाव्यमय...
अस्सं
चला हात पुढं करा..
फटाक !!

तू रे?
सर मला आहे प्रसिद्धीची हौस....
माझा आहे छोटासा कंपू सर
चल हात पुढं कर..
फटाक !!

अरे तू, भलताच नम्र दिसतोयस
आणि तुझी कविता.. मी पाहिलीय कुठंतरी आज सकाळीच
होय सर, मी रिक्षा फिरवत होतो
..आणि मी सर.. त्याच्या रिक्षामागे धावत होतो
कागद पेन्सिल घेऊन कविता करत
वेळ कसाबसा घालवत....
असुदे असुदे नको पुढं करु हात
या पट्टीनं केलाय माझा घात
तुटली बिचारी अर्ध्यात
दोन मात्रा आणि अर्ध्याच वृत्तात
*
हं, तर अशाच कविता केल्यात तुम्ही

गुलमोहर: 

रत्नांच्या बघ राशी झाल्या,

Submitted by प्राजु on 5 June, 2012 - 14:09

रत्नांच्या बघ राशी झाल्या,
माझ्या काचखड्यांच्या
काटे भरल्या वाटा होती ,
मखमल पायघड्यांच्या

ओले हिरवे झाले माझे,
मौसम निष्पर्णाचे
निळे जांभळे फ़ूल श्रावणी,
देही गोकर्णाचे

तुझ्यासोबती वाटा सार्‍या,
यमनामधले गाणे
घमघमणार्‍या सुरावटींशी,
नाते लोभसवाणे

रोमरोमी भिजते मीही,
हळवा श्रावण दे
ओघळते मी प्राजक्तासम,
भिजलं अंगण दे

उधाणू दे ना सागरलाटा,
तुझ्या किनार्‍यावरी
तुझी पौर्णिमा होऊन आले,
तुझ्याच मी अंबरी

-प्राजु

गुलमोहर: 

जाऊ नकोस नं!

Submitted by निंबुडा on 5 June, 2012 - 06:28

तू येतोस ते जाण्यासाठीच हे माहीत असूनही
दर वेळी तितक्याच आतुरतेने
तुझी वाट पहायची!

आलास की आपल्या अस्तित्वाचा दरवळ
उमटवत राहतोस
मनभर....आसमंतभर..........

तुझा तो उधाणलेला मोहर
मग भिनतो माझ्याही नसानसांत
आणि मी झेलत राहते त्याचा बहर
मनसोक्त....

आणि जाताना तू ठेवून जातोस खुणा
अमीट तृप्तीच्या
अपूर्व समाधानाच्या..
.
.
.
आताही तू जाण्याची वेळ जवळ येत चालली
म्हणून जीव कासावीस...
तुला मात्र परतीचे लागलेले वेध
आणि माझं मन उदास!
.
.
.
नेहेमीच तर असं होतं
तरीही दर वेळी तुझ्या येण्याची
तितक्याच आतुरतेने वाट पाहण्याचं कारण काय माहितीये?
.

गुलमोहर: 

विरह

Submitted by UlhasBhide on 5 June, 2012 - 02:48

विरह

धुमसून जाळणारा हा दाह कोंडलेला
स्मृतिचिन्ह मानुनी हा हृद्रोग पोसलेला

बेचैन; गैरमुरद्दफ गझला सदैव छळती
विरहात काफिया हा रदिफेत गुंतलेला

प्रत्यक्ष ना तरीही कवितेत भेटशी तू
रात्रीस चांदण्याचा उ:शाप लाभलेला

अंतर क्रमे निरंतर ही वाट योजनांचे
तो मार्ग त्याच वळणी तेथेच थांबलेला

अस्तित्व राखण्याला नुसताच श्वास घेतो
हृद्स्पंदनी कधीचा ’उल्हास’ संपलेला

.... उल्हास भिडे (५-६-२०१२)

गुलमोहर: 

खंड कपारी

Submitted by अज्ञात on 5 June, 2012 - 01:14

अभिषेकाचे ओढे नाले
वाहुन गेले माघारी
शिरी बोडके उरले कातळ
हिरवळ सुकली संसारी

तळी साचले मुके सरोवर
किमया प्रतिबिंबित सारी
अगणित लेणी खंड कपारी
दिसल्या मजला गाभारी

काठ किनारे भिजलेले
आकाश पृष्ठ्भर निजलेले
रंगात निळ्या लहरींवरती
पवनाचे स्पर्श पहुडलेले

जड एक कोपरा माझाही
काळजात काहुर दडलेले
काजळरात्री अंधार नभी
चांदणे भ्रमात विखुरलेले

.........................अज्ञात

गुलमोहर: 

छपरावर उष्मा थयथय नाचत होता

Submitted by pradyumnasantu on 4 June, 2012 - 22:15

छपरावर उष्मा थयथय नाचत होता

ढग एक तरंगत आकाशी वांझोटा

मातीत बियांच्या शेकोट्या झालेल्या

कुत्र्याच्या छातीत फुलला होता भाता

*

पोत्यात तळाशी तांदूळ होते थोडे

पण भात रांधण्या पाणी? झिजले जोडे

एक घोट जळाचा मिळेल का हो सांगा

पुसताच सर्वजण फिरवित त्यांची तोंडे

*

ऐकले अचानक शब्द सुखद सोनेरी

"पर्जन्य करितसे वसुंधरेला ओली"

ते ऐकुन जिव्हा चाटत तिकडे गेलो

तो ती तर होती कविता कुणी केलेली

*

भरलेले तेथे कवि संमेलन जंगी

पावसाविषयीच्या कविता अनेक रंगी

कोरडा एकटा होतो मी पाषाण

गुलमोहर: 

तू देशील का रे दोन मणी ते मजला

Submitted by pradyumnasantu on 4 June, 2012 - 22:02

रे नकोत मजला हिरे आणखी मोती
सोन्याची देखिल नच मजला खिजगणती
मी मणी घेऊनी जाईन फिरण्या पृथ्वी
गरीबीचा कंठी हार माझिया सजला
तू देशील का रे दोन मणी ते मजला
......
ही बालकवींची अवनी मी भटकीन
अन श्रावणातल्या सरी पिेऊन टाकीन
घेईन शोषुनी चंद्राची शीतलता
नयनांचे शर मी नभामधे घुसवीन
आनंदे गाइन सौंदर्याच्या गजला
तू देशील का रे दोन मणी ते मजला
......
या अमूल्य् ऐशा कोंदणातले मणी
करतिल मला ते कायमसाठी ऋणी
भगवंता पुरवी एक हट्ट हा माझा
तुज पाहू शकावे अशी आस मन्मनी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता