इडा पीडा सारी

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 29 May, 2019 - 10:38

इडा पीडा सारी टळो
दत्त प्रेम उरी झरो
मध्यमेचे महासुख
चेतनेत माझ्या उरो ॥

उलथून स्वर्ग सारा
गंगा धरे अवतरो
प्राशितांना पुण्य परा
मला मीही नच स्मरो ॥

डिंडिंमता अनुहत
हृदयात असा भरो
कणकण पारा होत
वारा आर पार सरो ॥

पेटलेल्या वन्हीला त्या
घोट सागराचा पुरो
स्वप्न सत्य मांडणारे
वस्त्र अंतरीचे विरो ॥

दत्त स्वप्न विक्रांतचे
दत्ता मध्ये पूर्ण मुरो
भासमान अस्तित्व नि
नाम रूप सारे हरो ॥

© डॉ..विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेखच!
नेहमीप्रमाणे शेवटचे कडवे भारी.

डिंडिंमता अनुहत
हृदयात असा भरो
कणकण पारा होत
वारा आर पार सरो ॥>>> हे नाही समजले. अनाहत असे म्हणायचे आहे का?

होय ,अनाहता चा उल्लेख अनुहुतू असा बर्‍याच ठिकाणी आहे अनुहुताचा हल्लर गाये ... असे संत एकनाथ म्हणतात

दत्त स्वप्न विक्रांतचे
दत्ता मध्ये पूर्ण मुरो
भासमान अस्तित्व नि
नाम रूप सारे हरो ॥>>>> फारंच सुंदर अपेक्षा आहेत आपल्या....