मांडे हा शब्द मी पहिल्यांदा साधारण दुसरी-तिसरीत असताना मराठीच्या पुस्तकात वाचला. मनातल्या मनात मांडे खाल्ले, मनातले मांडे मनातच जिरले.. वगैरे वाचुन मांडे म्हणजे काहीतरी खायचा पदार्थ आहे हे लक्षात आले. पण हा पदार्थ दिसतो कसा, खातात कशाबरोबर इत्यादी प्रश्न मनात उपस्थित झाले. म्हणजे तसे मला तेव्हा जिलेबी, पुरणपोळी इत्यादी पदार्थही कसे दिसतात ते माहित नव्हते. पण ते शब्द कानावरुनही गेले नव्हते, त्यामुळे अर्थात दिसतात कसे हा प्रश्न उपस्थित झाला नव्हता.
श्री. विजय तेंडुलकर नक्की कसे होते, हा एक अतिशय अवघड प्रश्न. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुपेडी होतं की खरे तेंडुलकर कसे होते, हे समजून घेणं खूप कठीण आहे. नाटककार म्हणून जागतिक ओळख असलेल्या तेंडुलकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका ही माध्यमं लीलया हाताळली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दृक्-श्राव्य विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
कन्यादान या तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल श्रीमती सुहास जोशी यांच्याशी बोलायचं ठरवलं आणि योगायोगानं त्याच वेळी दोन आत्मचरित्रं वाचनात आली. श्रीमती सुधा वर्दे यांचं गोष्ट झर्याची आणि श्रीमती यशोधरा गायकवाड यांचं माझी मी ही ती दोन आत्मचरित्रं. म्हटलं तर वेगळी, पण बरीचशी सारखी. सुधाताई वर्दे महाराष्ट्राला परिचित आहेत त्या सेवादलाच्या एक नेत्या म्हणून. सेवादलाचं आणि सेवादलाशी जोडलेल्या कलापथकाचं कामच सुधाताईंनी आयुष्यभर केलं. सुधाताईंचं हे पुस्तक आहे ते त्यांच्या व श्री. सदानंद वर्दे यांच्या सहजीवनाबद्दल. पक्षानेच त्यांचा हा विवाह ठरवला.