श्री. अवधूत परळकर - तेंडुलकर : जवळून जाणवलेले

Submitted by चिनूक्स on 15 November, 2009 - 17:44

श्री. विजय तेंडुलकर नक्की कसे होते, हा एक अतिशय अवघड प्रश्न. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुपेडी होतं की खरे तेंडुलकर कसे होते, हे समजून घेणं खूप कठीण आहे. नाटककार म्हणून जागतिक ओळख असलेल्या तेंडुलकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका ही माध्यमं लीलया हाताळली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दृक्-श्राव्य विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

ज्येष्ठ पत्रकार व लेखक श्री. अवधूत परळकर यांनी तेंडुलकरांची निर्मिती असलेल्या 'दिंडी' या दूरदर्शनवरील मालिकेचं सादरीकरण केलं होतं. तेंडुलकरांचा दीर्घ सहवास लाभलेल्या श्री. परळकरांचा एक अप्रतिम सुंदर लेख तेंडुलकर गेल्यानंतर 'ललित'मध्ये प्रसिद्ध झाला होता. अनेक वृत्तपत्रं, नियतकालिकं व दिवाळीअंकांतून सातत्यानं अतिशय कसदार लेखन करणार्‍या श्री. अवधूत परळकर यांचा 'तेंडुलकर : जवळून जाणवलेले' हा लेख इथे पुनर्मुद्रित केला आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------

तेंडुलकरांकडे रोजची ऊठबस होती किंवा मी त्यांच्या अगदी फार सान्निध्यात होतो अशातला भाग नाही. पण सर्व बाबतींत लहान असूनही मित्र म्हणून त्यांनी माझ्या खांद्यावर जो हात ठेवला होता त्यानं मी भारावून गेलो होतो. वय, बुद्धी, वाचन-व्यासंग, कर्तृत्व या सर्व बाबतींत आम्हां दोघांत बरंच अंतर असतानाही त्यांचं वागणं बरोबरीच्या दोस्तासारखं. तेंडुलकरांसारखा साहित्यिक आपल्या साहित्यजगतात कोठेतरी अस्तित्वात आहे, लिहितो आहे, बोलतो आहे ही भावना किती दिलासा देणारी होती हे तेंडुलकरांच्या जाण्यानंतर अधिक प्रखरपणे कळते आहे.

तेंडुलकर ज्या पद्धतीनं विचार करायचे, बोलायचे, वागायचे ते आम्हां दोस्तांना सगळंच्या सगळं मान्य होतं असंही नाही. आवडते लेखक आणि आवडता माणूस असूनही त्यांना किंवा त्यांच्या विचारांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍यांपैकी मी नव्हतो आणि आमच्या मित्रपरिवारापैकीही कोणी नव्हतं. हेवा वाटावा असा तल्लखपणा तेंडुलकरांच्या बोलण्यात, विचारांत आणि एकूण व्यक्तिमत्त्वात होता. त्यांच्या विचारांतील ताजेपण, वैचारिक दृष्टिकोनातील मांडणीतील वेगळेपण भुरळ घालणारं होतं. मोठ्या माणसांच्या निधनानंतर आपली त्यांच्याशी कशी आणि किती जवळीक होती याचं प्रदर्शन मांडणारे लेख सुरू होतात. जवळून दिसलेले तेंडुलकर हा लेख लिहिताना आपलंही लिखाण या प्रकारच्या लेखांत जमा होईल की काय, ही भीती आहेच. तेंडुलकरांच्या संदर्भात अशी जवळीक दाखवणं ही खरं तर समाजाचा रोष ओढवून घेणारी गोष्ट आहे. विजय तेंडुलकर नावाच्या तल्लख साहित्यिकाकडे मराठी समाज त्यांच्या हयातीत रागानंच पाहत होता. परंपरेला छेद देऊन समाजात नवं काही मांडू पाहणार्‍या, समाजाच्या आवडीनिवडीची क्षिती न बाळगता आपल्या मनाला भावेल ते वाणी आणि लेखणीतून प्रकट करणार्‍या व्यक्तींची मराठी समाजातल्या एका मोठ्या गटानं नेहमीच उपेक्षा केली आहे. तेंडुलकरांच्या वाट्याला त्यांच्या हयातीत नुसती उपेक्षा नाही तर भरपूर निंदानालस्ती आली.

कर्तारसिंग थत्त्यांनी एकदा 'लोकसत्ता'च्या कार्यालयात जाऊन तेंडुलकरांना छडीनं मारलं होतं तेव्हा फार मोठा समाज आनंदित झाला होता. नरेंद्र मोदी हे ज्यांचं दैवत आहे, अशांना तेंडुलकर हे व्हीलन वाटणार हे उघड आहे. तेंडुलकरांना उद्देशून असलेली दूषणं, निर्भर्त्सना, टवाळकी समाजात वावरताना त्यांच्या परिवारातल्या आमच्या मित्रांच्याही वाट्याला यायची. वाईट वाटायचं. तेंडुलकरांबद्दल वाईटसाईट बोललं जातंय आणि ते आपल्याला ऐकावं लागतं म्हणून नाही तर या मंडळींच्या अज्ञानमूलक विचारसरणीबद्दल, वैचारिक आळसाबद्दल वाईट वाटायचं. यांपैकी बरीचशी शेरेबाजी तेंडुलकरांचं साहित्य न वाचता केलेली असायची. विशिष्ट प्रकारच्या वैचारिक पर्यावरणात वाढलेल्या आणि एकांगी वाचन असलेल्या या गटाला तेंडुलकरांचं बोलणं, वागणं, लिहिणं समजणं मुश्किल होतं.

माणूस जसा दिसतो तसा असतो, हे जर खरं मानलं तर तेंडुलकर आम्हां मित्रपरिवारात सर्वांत तरुण होते. त्यांचं दिसणं, त्यांचा झोकदार पोशाख, त्यांचा बोलण्यातला उत्साह, आत्मविश्वास हा तरुण वयाला शोभणारा वाटायचा. बाह्यांगी ते दिसायचे त्याच्यापेक्षा ते मनानं तरुण होते. त्यांचं निधन हे आमच्यातल्या एकाच्या अकाली मृत्यूप्रमाणे वाटलं. प्रयाग हॉस्पिटलात होते तेव्हाच फक्त ते त्यांच्या वयाचे दिसू लागले होते. त्याही अवस्थेत मांडीवर लॅपटॉप घेऊन त्यावर काहीतरी टाईप करताना मी एकदा त्यांना पाहिलं तेव्हा तर मला ते पूर्वीप्रमाणेच तरुण भासले.

सकाळीसकाळी उठून तेंडुलकरांना सरप्राइज करायला त्यांच्या घरी धडकावं तर खोलीत सर्व उरकून तेंडुलकर असेच झकपक पोशाखात कम्प्युटराजवळ बसलेले दिसायचे. निळू दामले एक दिवस पहाटे त्यांना झोपेतून उठवायच्या इराद्यानं गेला तर त्यांचा सेवक बहादूर दारातच दामल्यांना म्हणाला, "थोडं आधी यायला पाहिजे होतं, बाबा बाहेर हिंडायला गेलेत." विलेपार्ल्याच्या मुक्कामात तेंडुलकरांची पार्ल्यात प्रभातफेरी असायची. पार्ल्यातल्या नगरसेवकांचं कर्तृत्व रोजच पार्ल्यातल्या गल्लीबोळात त्यांच्या नजरेला पडायचं. ठरावीक वेळी समोरून येताना दिसणार्‍या पार्लेकरांइतकाच ठरावीक ठिकाणी आढळणार्‍या कचर्‍याच्या ढिगांशी माझा परिचय आहे, असं ते म्हणायचे. 'रामप्रहर'मध्ये या काळातल्या त्यांच्या पदयात्रेत जन्माला आलेलं चिंतन उतरलं आहे.

वर्षातून एकदा दिवाळीच्या दिवशी पहाटफेरी दादरच्या फाइव्ह गार्डनमध्ये असायची. बाजीराव कुलकर्णी, निळू दामले, सुधा कुलकर्णी असा सगळा मित्रपरिवार सोबत असायचा. निळू मला पहाटे पिकअप करायचा तर बाजीराव तेंडुलकरांना घेऊन यायचे. चालता चालता तेंडुलकरांची राजकारण, समाजकारणाविषयीची खोचक भाष्यं एकणं हे दर दिवाळीचं खास आकर्षण असायचं. संघाचं बालीश राजकारण, वाजपेयी सरकारची शासन चालवताना उडणारी भंबेरी, समाजवाद्यांचे घोळ यांसारखे तत्कालीन राजकीय वातावरणातले विषय असायचे. त्यांच्या कॉमेंटमधला तिरकसपणा चटकन ध्यानात येत नसे. एखाद्या विषयावर तेंडुलकरांची प्रतिक्रिया नोंदवताना, भाषण लिहून काढताना नवशिक्या पत्रकारांची तर विकेट जायची. युतीचं सरकार राज्यात येण्याआधी निवडणुकीच्या दरम्यान केव्हातरी भाजपच्या उमेदवारांच्या संदर्भात बोलताना तेंडुलकर बोलले होते, "या मंडळींना एकदा निवडून द्याच. मजा येईल." निवडून आल्यावर त्यांची काय गोची होते ते पाहू, ही या विधानामागची खोच पत्रकारांच्या लक्षात आली नाही. दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रात छापून आलं - 'भाजपच्या उमेदवारांना निवडून द्यायचं तेंडुलकरांचं आवाहन'.

शिवसेनेचं, हिंदुत्त्ववाद्यांचं राजकारण, दुटप्पीपण हे तेंडुलकरांनी विनोदाचे विषय बनवले होते. मार्क्सवाद्यांची, समाजवाद्यांचीही यातून सुटका नसायची. 'कन्यादान' नाटकात समाजवाद्यांवर त्यांनी झोडलेले ताशेरे फार तीक्ष्ण होते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी मुंबई-पुण्यात पत्रकबाजी बरीच चालायची. विविध समाजविघातक घटनांचा जाहीर धिक्कार करण्यासाठी एका निषेधपत्रकावर विचारवंत, साहित्यिकांच्या घरी जाऊन स्वाक्षर्‍या घेतल्या जात. तेंडुलकरांच्या घरी गेलो असता एकदा डाव्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेच्या खंडणी की अशाच कोठल्यातरी दहशतीच्या प्रकरणावर स्वाक्षरी घ्यायला आले होते. सही करायला नकार देऊन तेंडुलकर शांतपणे त्यांना म्हणाले, "असं काही आहे का हो, की देशात शिवसेनाच फक्त अशा गोष्टी करते? हे प्रकार तर देशभर सगळ्या पक्षांतली माणसं करताहेत. बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाची माणसं दुर्गापूजेसाठी खंडणी गोळा करतात. अगदी अशाच पद्धतीने. त्यांच्या विरुद्ध का नाही पत्रक काढायचं? पत्रकात त्याचा आधी उल्लेख करा, मग करतो सही." नंतर माझ्याकडे वळून ते मला म्हणाले, "कोणी कोणाला शांततेचे धडे द्यावेत अशी स्थिती आज उरलेली नाही. मी काही सेनेचा सपोर्टर नाही. पण एकट्या शिवसेनेलाच झोडायचे, हा काय प्रकार आहे? हे वेडे समजतात काय? लोक काय डोळे बंद करून बसलेत?"

खोलीत कोणी पत्रकार नव्हते. नाहीतर 'तेंडुलकरांकडून शिवसेनेच्या दहशतशाहीचं समर्थन' असा मथळा दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रांत झळकला असता.

दैनंदिन घटनांकडे तेंडुलकरांचं बारकाईनं लक्ष असायचंच. त्यांवरची तेंडुलकरांची मतं इतर कुणाहीपेक्षा वेगळी असायची. चळवळीतल्या लोकांच्या गैर गोष्टींविषयीदेखील ते अधनंमधनं बोलायचे. भलत्या दिशेनं भरकटलेल्या कार्यकर्त्याबद्दल काय होता आणि आज कुठे गेला, या स्वरुपाचं बोलणं व्हायचं. पण एकूणात सामाजिक चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांविषयी त्यांना आपुलकी होती. त्यांचं स्खलनही ते समजून घ्यायचे. तेंडुलकरांच्या घराची दारं शबनम झोळीवाल्या कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र उघडी असायची. अरे, रात्री बारा वाजता फोन केलास तरी झोपेतून उठून तो मी घेईन, असं एका सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात ठेवून बोलताना तेंडुलकरांना मी पाहिलंय. या चळवळीतल्या लोकांना टेक्नॉलॉजी वगैरे काही कळत नाही, असं कोणीतरी म्हणाल्यावर उसळून आवाज चढवून त्याला विरोध करताना तेंडुलकरांना मी पाहिलं आहे. "मेधाला कळत नाही, हजारेंना कळत नाही. मग कोणाला कळतं? कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून धरणाची उंची वाढवणार्‍या मुख्यमंत्र्यांना कळतं? की खोटी आकडेवारी देणार्‍या ऑफिसर्सना? मेधा हट्टी आहे हे मी मान्य करतो. पण ती सीआयएची एजंट आहे, तिला फॉरिन फंडिंग मिळतं, हे काय प्रकारचं बोलणं आहे? या लोकांकडचे मुद्दे संपले की असे वैयक्तिक हल्ले करण्याचा हलकटपणा सुरू होतो." तेंडुलकरांना मनस्वी संतापताना मी अशाप्रसंगीच पाहिलं. एरवी विरोधकांना समजावणीच्या सूरात शांतपणे इश्यू समजावून सांगणार्‍या तेंडुलकरांचं बेअरिंग मेधावर, विवेकवर कोणी हल्ला केला की सुटायचं.

दंगल करणार्‍या जमावापेक्षा त्यांना चिथावणी देणार्‍या नेत्यांवर ते कमालीचे संतापायचे. अरे, ही सगळी माणसं अट्टल खुनी आहेत, असं त्यांना बोलताना मी ऐकलंय. नरेंद्र मोदींना गोळी घालेन, या त्यांच्या उद्गाराचं मला किंवा त्यांच्या परिवारातल्या कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी सामान्य जीवांचा बळी घेणार्‍या या देशातल्या काही फॅसिस्टांना देहांताशिवाय दुसरी सौम्य शिक्षा नाही, असं ते मला उद्वेगानं म्हणाले होते.

अण्णा हजार्‍यांच्या अगदी सुरुवातीच्या सभेला तेंडुलकरांनी हजेरी लावली होती. त्यांचं भाषण ऐकून ते अण्णांवर निहायत खूष झालेले दिसले. 'सुरुवातीला सगळेच असे वाटतात. आपण फार भाबडेपणानं त्याकडे पाहता कामा नये..' असं काहीतरी माझं चालू असता मला अडवत ते म्हणाले, "मला नाही असं वाटत. हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. अगदी साधा माणूस आहे. राजा नागडा आहे, असं ओरडून सांगणार्‍या मुलाच्या जातीतला मला तो वाटतो. त्याच्या आवाजातच तो किती जेन्युइन आहे हे समजतं. आता आपल्याकडे त्याचं पुढे काय होणार हे मात्र ठाऊक नाही."

राजकीय, सामाजिक भाष्यं करणारे आणि सिनेमे पाहणारे, सिनेमावर भरभरून बोलणारे तेंडुलकर ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्त्वं नव्हती. सिनेमाकडे ते सामाजिक चळवळीचं एक्स्टेन्शन म्हणून पाहायचे. त्यामुळे गप्पा मारताना सामाजिक, राजकीय विषयांवरली चर्चा सहजपणे सिनेमाच्या प्रांतात शिरायची. 'झोर्बा द ग्रीक'मधला झोर्बाचं काम करणारा अँथनी क्वीन त्यांच्या मनात रुतून बसला होता. इस्तवान झाबोच्या 'टेकिंग साइड्स’ या चित्रपटावरही ते भरभरून बोलायचे. वडिलांनी लहानपणी चिक्कार इंग्रजी सिनेमे दाखवल्यानं तेंडुलकरांच्या काळातले सिनेमे मी लहानपणी पाहिले होते. त्यामुळे त्यांच्या आवडीच्या सिनेमातल्या चर्चेत मीही भाग घेऊ शकायचो. मी सिनेमाकडे चित्ररेखाटनकलेच्या अंगानं बघायचो. त्यांचं म्हणणं कॉम्पोझिशन, फोटोग्राफी वगैरे कमी महत्त्वाचं नाही; पण या सगळ्यांतून बाहेर काय येतं, सिनेमा आपल्याला काय देतो, हे महत्त्वाचं. मतभेद असूनही सिनेमा हा आमच्या मैत्रीतला समान धागा होता, असं आता मला वाटतं. हॉलिवुडच्या सुवर्णकाळातल्या कलाकृतींबरोबरच चित्रपट महोत्सवांनी समोर आणलेला आंतरराष्ट्रीय सिनेमा हाही चर्चेचा विषय असायचा. तेंडुलकर हे महोत्सवातले चित्रपट पाहायला धडपडणारे एकमेव 'ज्येष्ठ मराठी साहित्यिक' असावेत. 'सिनेमे पाहणारा मराठी साहित्यिक म्हणून तुमचं गिनेस बुकात नाव आहे', असं मी गमतीनं म्हणालो होतो. त्यावर त्यांची कॉमेंट होती - 'नीट वाचलंस का ते बुक? कमी पैशात पटकथा लिहिणारा पटकथाकार म्हणूनही माझं नाव त्यात आहे'.

'कप' या भूतानच्या सिनेमाविषयी बोलताना तेंडुलकर गहिवरूनच जायचे. हा चित्रपट मुंबईच्या महोत्सवात पहिल्यांदा दाखवला गेला तेव्हा त्याविषयी कोणाला फारसं ठाऊक नव्हतं. चार थिएटरांत एकावेळी सिनेमे चालू असायचे. इराणच्या एकाहून एक सरस फिल्म एका थिएटरात चालू असताना 'कप' नावाचा भूतान देशातून आलेला सिनेमा पाहायला कोण जाणार? प्रभातमधलं आमचं टोळकं इराणी चित्रपट पाहत बसलं. तेंडुलकर एकटे 'कप' पाहत बसले. शो संपल्यावर तेंडुलकरांची भेट झाली. कुठे होतास? किती छान फिल्म चुकवलीस, असं सांगून ते 'कप' हा सिनेमा पाहणं हा किती धमाल अनुभव होता, हे भारावलेल्या स्वरात सांगत बसले. 'कप'चा शो दोन दिवसांनंतर पुन्हा होता. तेंडुलकर एवढं म्हणताहेत तर तो चित्रपट पाहावाच, असा विचार करून मी दुसर्‍या दिवशी 'कप' पाहायला रांगेत उभा राहिलो. थिएटराच्या दरवाजाजवळ विजय तेंडुलकर नावाचे थोर नाटककार शाळकरी मुलाच्या उत्साहानं रांगेत दुसरा-तिसराच नंबर लावून उभे होते.

दूरदर्शनवरील 'दिंडी' मालिकेमुळे मला तेंडुलकर अधिक जवळून पाहायला मिळाले. तू मला ओळखतोस की नाही माहीत नाही, पण मी तुला ओळखतो, असं ते पहिल्या भेटीत म्हणाले होते. तेंडुलकरांकडून मी ऐकलेला हा पहिला विनोद.

विनोदाची तेंडुलकरांना किती अद्भुत जाण आहे, हे नंतर त्यांच्या प्रत्येक भेटीत जाणवत गेलं. दूरदर्शन केंद्रावर 'प्रोड्यूसर एमिरेट्स' म्हणून त्यांची तेव्हा नेमणूक झाली होती. दरमहा त्यांचा तनखा त्यांना मिळायचा. त्या बदल्यात कार्यक्रमनिर्मितीचं बंधन मात्र त्यांच्यावर नव्हतं. त्यांचा स्वभाव ठाऊक झाल्यानं मी त्यावर खवचट जोक केला - 'आम्हांला कार्यक्रम करण्याबद्दल पैसे मिळतात. तुम्हांला न करण्याबद्दल मिळत असतील'. प्रतिक्रिया म्हणून त्यांनी एकदा डोळे वटारून माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं, "तू मला ओळखतोस की नाही असं सुरुवातीला म्हणालो होतो. तू तर मला चांगलं ओळखतोस."

'दिंडी' हा खास करून ग्रामीण समाजाचा वेध घेणारा कार्यक्रम होता. तो घेताना कोणत्याही फॉर्ममध्ये अडकायचं नाही, असं तेंडुलकरांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणे गावागावातल्या भटकंतीत भेटलेली माणसं, त्यांची जगण्याची शैली, स्थानिक समस्या सोडवायला धडपडणारे ग्रामीण कार्यकर्ते असं सगळं मुलाखती, निवेदन आणि प्रत्यक्ष जीवनदर्शन यां स्वरुपांत या मालिकेत यायचं. महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा हा तेंडुलकरी शैलीतला परिचय होता. मी त्या कामी भरीव योगदान देईन, या आशेनं त्यांनी मला दूरदर्शनचा माणूस म्हणून निवडलं होतं. कार्यक्रमासाठी लागणारी उपकरणांची, माणसांची तयारी, त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतुदीची, समन्वयाची कामं यांत माझा वेळ जायचा. त्यामुळे त्यांची अपेक्षा काही मी पूर्ण करू शकलो नाही. तेंडुलकरांच्या आधुनिकतेवर चरफडणारा सनातन्यांचा एक वर्ग दूरदर्शनवर होता. तेंडुलकरांना दिल्या जाणार्‍या सुविधांवर त्या सार्‍यांचा रोष होता.

पावसामुळे एकदा आम्हाला शूटिंग रद्द करावं लागलं. सुहासिनी मुळगावकरांना हे समजलं तेव्हा त्या बोट नाचवत माझ्या पुढे आल्या आणि त्यांच्या सुरेल आवाजात चालीवर म्हणल्या, 'बरं झालं म्हातारीचं काम झालं'. तेंडुलकरांना मी ही गंमत सागताच ते सुरवातीला हसले आणि नंतर गंभीर होऊन म्हणाले, "माझे ज्यादा लाड होतात असं सुहासिनीला किंवा इतर कोणाला वाटत असेल तर मी हा कार्यक्रम थांबवतो. स्टाफवरच्या निर्मात्यांना सुविधा मिळाव्यात हे खरं आहे. त्यांनी त्यासाठी ओरडा करावा. आंदोलन करावं; मी त्यांच्या मागं उभा राहीन".

'दिंडी' कार्यक्रम करताना अनंत अडचणी यायच्या. कॅमेरामन आणि रेकॉर्डिस्ट असे आळीपाळीनं वेळेवर यायचे नाहीत. दोघे आले तर ट्रान्सपोर्ट सुविधा नसायची. ज्यांची मुलाखत घ्यायची ते प्रतीक्षा करत राहायचे. निळू दामले आणि मी अस्वस्थ व्हायचो. तेंडुलकरांच्या चेहर्‍यावरली शांतता भंग पावत नसे. 'त्रागा करून काही उपयोग नाही. यावर उपाय काय यावर विचार करूया. कॅमेरामन, रेकॉर्डिस्ट यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते समजून घेऊया. सुविधा मिळत नाही याची तक्रार करणं तुला अवघड वाटत असेल तर मी डायरेक्टरना भेटतो', असं मला ते म्हणायचे. शूटिंगच्यावेळी कॅमेर्‍यात बिघाड झाला; शूटिंगला विलंब झाला, की निळू लगेच कॉलम लिहायला घेई तर तेंडुलकर शांतपणे कोपर्‍यात बसून कागदावर स्केचिस काढत बसत. चित्रकला हाही तेंडुलकरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. अत्यंत गुणसंपन्न असूनही उपेक्षित राहिलेल्या श्रीधर अंभोरे या चित्रकारावर तेंडुलकरांनी दिंडीचा एक छान एपिसोड केला होता. घरातली स्वत:ची लहानशी रूम त्यांनी उत्तमोत्तम कलाकृतींचं संग्रहालय बनवून टाकली होती. हुसेनच्या बरोबरीनं तिथे नवशिक्या कलाकाराची चित्रकृती किंवा शिल्पं मांडलेली दिसायची. तेंडुलकरांपाशी असलेली दृश्यसमज 'घाशीराम कोतवाल'मुळे लोकांपुढे आली. मला स्वत:ला 'दिंडी' कार्यक्रमात त्याचा प्रत्यय येत होता.

तेंडुलकर असतील थोर नाटककार. व्हिज्युअल टेक्निक वगैरे त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त महिती आहे अशा घमेंडीत मी तेव्हा होतो. एकदा एडिटिंग टेबलावर तेंडुलकर दृश्य-मांडणीसंदर्भात बोलू लागले तेव्हा आपली दृश्यसमज किती प्राथमिक आहे हे मला कळून चुकलं. मुलाखत देणार्‍याचा चेहरा सतत पडद्यावर दिसल्यानं प्रेक्षक कंटाळून जाईल, टीव्ही हे दृश्यमाध्यम असल्यानं मुलाखत देणारा जे बोलतो त्या संदर्भातली दृश्यं अधेमधे टाकायची अशी तिथली तंत्रपरंपरा. तेंडुलकरांचा त्याला विरोध होता. त्यांच्या सौम्य समजावणीच्या सुरात ते मला म्हणाले, "पडद्यावर जो चेहरा आपण दाखवतो त्यात पुरेसं नाट्य आहे. लोकांना तो चेहरा वाचू द्या, त्या माणसाच्या चेहर्‍यावर शब्दागणिक जे भाव उमटताहेत ते पाहू द्या. मध्ये दृश्य टाकून त्यांना डिस्टर्ब करू नका. पडद्यावर दुसरं दृश्य उमटलं की लोकांचं शब्दावरलं लक्ष विचलित होतं. ते त्या दृश्यातल्या बारीकसारीक हालचाली निरखू लागतात".

तेंडुलकरांनी नंतर दृश्यसंकलनामागील त्यांची थिअरी सांगणारं लेक्चर मला दिलं. पुन्हा ही माझी भूमिका आहे, तुम्हांला वेगळं वाटत असेल तर तसं करा, असं सांगून ते मोकळे झाले. मराठीतल्या कुठल्या साहित्यिकानं दृश्यमाध्यमाचा इतका काटेकोर विचार केला असेल? मराठी सिनेमाची आपले पटकथाकार प्रत्यक्षात संवादकार होते. खटकेबाज संवाद हेच आपल्या सिनेमाचं वैशिष्ट्य. दृश्य वगैरे गोष्टी कॅमेरामननं बघून घ्यायच्या अशी एकूण पद्धत.

टीआरपीचं भूत जन्माला आलं नव्हतं तरी काही अपवाद वगळता दूरदर्शनवरल्या कार्यक्रमामागं लोकानुनय ही प्रमुख प्रेरणा असायची. 'दिंडी' कार्यक्रमाची जातकुळी या संकल्पनेला छेद देणारी होती. लोकशिक्षण या मूलभूत उद्देशनं देशात टीव्हीचं नेटवर्क अस्तित्वात आलं. 'दिंडी' हा दूरदर्शन यंत्रणेला टीव्हीच्या मूळ उद्देशाचं भान आणून देणारा कार्यक्रम होता. शेतीविषयक कार्यक्रमांच्या पलीकडे ग्रामीण भाग आहे. त्याच्या स्वतंत्र समस्या आहेत. तमाशापलीकडे लोककला आहेत, कलावंत आहेत हे मला यातून लोकांसमोर आणायचं आहे, असं तेंडुलकर म्हणायचे. "पण हे बघणारा प्रेक्षक आहे का?" असा मी एकदा प्रश्न केला. तेव्हा त्यावर त्यांचं उत्तर आलं, "प्रेक्षकांना असे कार्यक्रम बघायची सवय लावावी लागेल. लगेचच हे होणार नाही. वेळ लागेल."

लोकांच्या शहाणपणावर माझा जबरदस्त विश्वास आहे, असं तेंडुलकर वारंवार ठासून म्हणायचे. तू मला फ्रॅंकली सांग, निळू आणि मी हे जे करतोय ते अकॅडेमिक आणि बोजड तर होत नाही ना, असं दिंडी संदर्भात तेंडुलकर अधूनमधून मला एकटं गाठून विचारायचे.

"सगळ्या कार्यक्रमांना मिळून एकच उत्तर देता येणार नाही." मी म्हणायचो, "काही कार्यक्रम फार गुंतागुंतीचे होतात, फक्त त्या त्या क्षेत्रातल्या अभ्यासकांना रुचतील असे होतात. माझ्या मतापेक्षा तुम्ही ज्या प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम करता त्यांना आपण हा प्रश्न विचारला पहिजे." मी प्रत्येकवेळी निरनिराळ्या शब्दांत त्यांना हे सांगायचो. कार्यक्रमाचा फीडबॅक घेतला पाहिजे. फीडबॅकची माझी सूचना तेंडुलकरांना तत्वत: मान्य होती. पण विषय तेवढ्यावरच संपायचा. एकदा जिना उतरताना ते मला म्हणाले, "लोकांचं जाऊदे. इथल्या प्रोड्यूसर मंडळींचं कार्यक्रमाबद्दल काय मत आहे?" मला त्यांना स्पष्ट सांगावं लागलं, "इथला प्रोड्यूसर नावाचा माणूस सहसा दुसर्‍या प्रोड्यूसरचे कार्यक्रम पाहायच्या भानगडीत पडत नाही."
"हां, म्हणजे जसा मराठी लेखक दुसर्‍या लेखकाचं साहित्य वाचायच्या भानगडीत पडत नाही..."
तेंडुलकर मनापासून हसत म्हणाले. "भानगड हा शब्द मात्र तू चांगला वापरलास."
"सॉरी, मला दुसरा शब्द सुचला नाही म्हणून तो वापरला." मी सारवासारव करायचा प्रयत्न केला.
"नाही. तू अतिशय योग्य शब्द वापरलास. कार्यक्रम बघणं, साहित्य वाचणं या भानगडीच आहेत लेका. समाजसेवा, सामाजिक बांधिलकी या आणखी काही भानगडी."

'दिंडी'चा एक एपिसोड तेंडुलकरांनी त्यांचे आर्किटेक्ट मित्र फिरोझ रानडे यांना करायला दिला होता. चांदवडच्या वाड्याचा स्थापत्यशास्त्राच्या अंगानं परिचय करून देणारा एक लघुपट रानड्यांनी बनवला. रानड्यांच्या अनुपस्थितीत तेंडुलकरांनी एडिटिंग टेबलावर हा लघुपट पाहिला आणि ते नेहमीच्या शैलीत मान तिरकी करून म्हणाले, चांगला केलाय रे. आणि मग त्यातल्या कोणत्या जागा विशेष आवडल्या हे सांगत बसले. सुरचित पटकथा आणि अभ्यासू दृष्टिकोन लाभलेला हा माहितीपट चांदवडच्या वाड्याबरोबरच स्थापत्यशास्त्राकडे पाहण्याच्या रानड्यांच्या काटेकोर दृष्टिकोनाचा कसा परिचय करून देतो हे तेंडुलकर मला समजवून सांगत बसले. "असं काम इथं तुमच्या दूरदर्शनवर का होत नाही?" तेंडुलकरांनी एडिटिंग रूमच्या बाहेर पडत पडता विचारलं. माझ्याऐवजी आमच्या एडिटरनं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. "साहेब, या पद्धतीचा लघुपट इथल्या लोकांनी स्वत: बनवायला घेणं सोडा, पण त्यांनी पाहिला तरी मला ग्रेट वाटेल," एडिटर म्हणाला.

नंतर कधीतरी 'दिंडी'संदर्भात बोलणं निघालं तेव्हा या उत्तराची आठवण करून देऊन तेंडुलकर म्हणाले, "आपण ज्यांना साधी माणसं म्हणतो ना, त्यांच्यापाशी असं आपल्याला चकीत करून सोडणारं शहाणपण असतं." का कोण जाणे, व्यक्तीची त्याच्यासमोर स्तुती करणं तेंडुलकर टाळत. त्याच्या पश्चात चांगलं बोलायला त्यांना आवडे. अगदी अत्रे शैलीतच ते त्या व्यक्तीची तिसर्‍याजवळ स्तुती करत. जयंत पवार, मुकंद सावंत, मनस्विनी, इरावती कर्णिक, विवेक पंडित, मुकुंद टांकसाळे, सुनील शानबाग, अतुल पेठे, रामू रामनाथन, निळू दामले ही त्यांची लाडकी मंडळी. माझ्यासमोर या व्यक्तींची वारेमाप प्रशंसा चालायची. माझ्याबद्दल माझ्यासमोर ते कधी चांगलं बोलल्याचं मला आठवत नाही. याचा अर्थ पश्चात आपल्याबद्दलही ते असे प्रशंसापर बोलत असतील अशी सोयीस्कर समजूत मी करून घेतली. माझ्या पुस्तकाचे उतारे ते जाहीर कार्यक्रमात वाचून दाखवत. या प्रकारानं अवघडल्यासारखं होई. एक दिवस मी त्यांना गंमतीनं म्हटलं, "माझं साहित्य तुम्ही वाचून दाखवता खरं. पण त्याचं मानधन माझ्याकडे अजून आलं नाही." आठवड्याभरानं तेंडुलकरांनी दोन हजाराचा चेक माझ्या पत्त्यावर पाठवून मला आणखी अवघडवून टाकलं.

'दिंडी' कार्यक्रमात अधिकार्‍यांशी वाद व्हायचा प्रसंग एकदाच आला. दिंडीसाठी दोन भागांत कुसुमाग्रजांची मुलाखत चित्रित केली होती. शिरवाडकरांना मानधन किती द्यायचं असं मी त्यांना विचारलं.
"किमान एक हजार तरी द्यावं असं मला वाटतं. त्याहून जास्त देता येत असेल तर उत्तम." तेंडुलकर मोघम म्हणाले. दोन दिवसांनी मी तेंडुलकरांना फोन केला, "डेप्युटी डायरेक्टरनी मी लिहिलेला हजाराचा आकडा खोडून पाचशे केला आहे. जास्त देता येणार नाहीत म्हणताहेत."
"मग असं कर", शांतपणे तेंडुलकर म्हणाले, "त्यांना म्हणावं, शिरवाडकरांना हजार मिळणार नसतील तर टीव्हीवर हा एपिसोड दाखवला जाणार नाही. का दाखवला नाही याची कारणं तेंडुलकर नंतर पत्रकार परिषदेत जाहीर करतील असंही ठामपणे सांग." अधिकार्‍यांच्या कानावर हे घालताच त्यांनी आधीचा आकडा खोडून स्वत:च त्याच्यावर एक हजाराचा आकडा लिहिला.

रविवारी गपांचा अड्डा बाजीराव कुलकर्णीकडे असायचा. शाखेची बैठक आहे रविवारी, असा निळू दामलेचा निरोप यायचा. आठच्या सुमाराला तेंडुलकर तिथं हजर ताहायचे. बाजीरावांच्या घरी तेंडुलकर स्वत:च्या घरापेक्षाही अधिक मोकळे, प्रसन्न आणि कम्फरटेबल वाटायचे. गल्लीतल्या घडामोडीपासून बुशच्या जागतिक राजकारणावर तिथं दिलखुलास मतंमतांतरं चालायची, थोरामोठ्या व्यक्तिमत्त्वांवर निर्भेळ विनोद, थट्टामस्करी चालायची. प्रचलित सांस्कृतिक विषयांवर स्वैर भाष्ये केली जायची. मार्क्वीझ, मुराकामीच्या कादंबर्‍या बाजीराव तेंडुलकरांच्या हातावर ठेवत. त्यांचं स्वत:चं वाचन अद्भुत होतं. पुस्तकांच्या अफाट संग्रहानं कुलकर्णी दाम्पत्याच्या घराच्या भिंती भरलेल्या.

तुमच्या या लायब्ररीवर मला डल्ला मारायचाय आणि काही पुस्तकं पळवून न्यायची आहेत, असं मी एकदा बाजींना म्हणालो. "कधीही यायचं आणि हवी ती पुस्तकं घेऊन जायची. विचारायची वगैरे काही गरज नाही. वाचून झाली की आहे त्या जागी आणून ठेवायची." बाजी म्हणाले.

"कळलं," तेंडुलकर मला म्हणाले. "डल्ला मारण्याचं थ्रील बाजी काही तुला लाभू देणार नाहीत. पुस्तकं लाटण्याचं समाधान तुला काही मिळणार नाही." नॉस्टॅल्जियात सहसा न रमणारे तेंडुलकर बाजींच्या घरी नॉस्टॅल्जिक होत. दै. मराठा रविवार पुरवणीच्या, 'वसुधा' मासिकाच्या काळात जात. सुरेश भट, रॉय किणीकर यांचे धमाल किस्से सांगत. तेंडुलकरांपाशी असलेलं उपहास आणि विनोदनिर्मितीचं कौशल्य या बैठकांत मला अधिक ठळकपणे जाणवायचं. 'नाटककार तेंडुलकर' हे तेंडुलकरांचं अगदी जुजबी वर्णन आहे, हे मला बाजींच्या घरातले तेंडुलकर पाहिल्यावर समजलं. बाजींच्या घरची रविवार सकाळची बैठक म्हणजे सर्वांना सर्वार्थानं समृद्ध करणारं एक विद्यापीठ होतं. विजय तेंडुलकर या विद्यापीठाचे अघोषित कुलगुरू होते. निळू आणि मी त्या विद्यापीठातली व्रात्य पोरं होतो. बोलताना कुलगुरूचाही मान आम्ही ठेवत नसू. अनिर्बंध अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे विद्यापीठाचं ब्रीदवाक्य होतं. आणि भाषणस्वातंत्र्य एन्जॉय करण्यासाठीच आम्ही तिथे जमत होतो. संघाच्या शाखेत असतं त्याच्या अगदी उलट वातावरण. अ‍ॅन्टी शाखा म्हणायलाही हरकत नाही.

तेंडुलकरांची राहती खोली हीसुद्धा आम्हां पोरासोरांच्या दृष्टीनं एक शाळा होती. मी तिथं गप्पा मारत असता एकदा तिथं अमृता सुभाष आली. आमच्या गप्पा चालू आहेत पाहून ती संकोचून म्हणाली, "तुम्हांला मी डिस्टर्ब तर नाही ना केलं?"
"केलंस डिस्टर्ब तर त्यात काय झालं?" तेंडुलकर म्हणाले, "कर डिस्टर्ब कर. अगं, आपण एकमेकांना सतत डिस्टर्ब करत राहिलं पाहिजे. तरच काहीतरी बरं निष्पन्न होईल." खरंच आहे. नाटक-सिनेमांतून तेंडुलकरांनी आपल्याला काही कमी डिस्टर्ब केलं नाही. तेंडुलकरांची खोली तरुण नाट्यकर्मींच्या मानसिक विसाव्याचं ठिकाण होतं. बेनेगल, निहलानींना तेंडुलकरांना भेटायला अपॉइंटमेंट घ्यावी लागायची. प्रायोगिक नाटकातली मंडळी अपॉइंटमेंटशिवाय त्यांना भेटू शकत होती. तेंडुलकरांपाशी ती त्यांचं मन मोकळं करायची. तेंडुलकर उत्तम वक्ते होते तसे उत्तम श्रोतेही होते. विजया मेहतांनी या वयातही तरुण रंगलर्मींचं एक छान वर्कशॉप घेतलं, असं मी कौतुकानं त्यांना सांगायला गेलो तर ते मोकळेपणानं हसले. म्हणाले, "विजयाला वेडबिड लागलंय काय? त्या पोरांना आता काय शिकवते ती? या पोरांना व्यासपीठावर बसवावं आणि आपण त्यांच्या पायाशी बसून विद्यार्थी बनून ऐकावं अशी स्थिती आहे. विजयानं अलीकडच्या पोरांची - संदेश, इरावती, मनस्विनीची नाटकं पाहिली नसणार. मी ती पाहिली आणि वाटलं, फुकट आपण नाटककार म्हणून मिरवतो. ही पोरं जे काय लिहितात ते किती अद्भुत आहे. इतकं मोकळंढाकळं मला लिहिता आलं असतं तर..? या पोरांना आम्ही काय शिकवणार?"

तेंडुलकर म्हणतात तितकी आजची ही पोरं हुशार असतील नसतील. पण तेंडुलकर नावाच्या माणसाला कलाक्षेत्रातल्या नवतेचा किती विलक्षण सोस होता हे अधोरेखित होतं. नव्या मंडळींच्या अर्ध्याकच्च्या प्रयत्नांना डोक्यावर घेऊन नाचणारा हा माणूस, आजच्या पिढीला जुन्या संस्कृतीला कवटाळून बसणार्‍या ज्येष्ठ नाटककारांपेक्षा आपला वाटला तर आश्चर्य नाही. मी मधल्या पिढीचा माणूस, पण तेंडुलकरांमुळे या नव्या होतकरू कलावंत, साहित्यिकांशी माझा जवळून परिचय झाला. एकट्या तेंडुलकरांमुळेच नव्हे, तर विविध स्तरांतल्या तेंडुलकरांच्या मित्रमंडळींमुळेही माझा विचारांचा आणि अनुभवाचा परिसर विस्तारला.

सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करता आला पाहिजे असं तेंडुलकर नेहमी म्हणत. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत ही धडपड जाणवते. घटनेच्या पलीकडे जाऊन पाहण्याची दृष्टी त्यांना लाभली होती. त्यांच्या निधनापूर्वी प्रयाग हॉस्पिटलात मी आणि सुबोध जावडेकर त्यांना भेटायला गेलो तेव्हा 'नवं काय पाहिलंत ते सांगा', असं त्यांनी मान उंचावून आम्हांला विचारलं. जावडेकरांनी त्यांना 'कबड्डी कबड्डी' नाटकातला सगळा सांस्कृतिक संघर्ष सांगितला. व्यावसायिक रंगभूमीवरही असे नवे प्रयत्न होताहेत या जाणिवेनं ते काहीसे सुखावल्यासारखे वाटले. नव्याचा ध्यास कायम आहे याचा अर्थ त्यांची तब्येत आता झपाट्यानं सुधारते आहे, तेंडुलकर अजून आपल्यात आहेत, असं मला तेव्हा वाटलं.

नव्याचा ध्यास पिढ्यान् पिढ्या जतन करणं हाच तेंडुलकरांना आपल्यात ठेवण्याचा मार्ग आहे, असं आज मला वाटतं.

--------------------------------------------------------------------------------------------------

पूर्वप्रसिद्धी - ललित (ऑगस्ट २००८)

विशेष आभार - श्रीमती शुभांगी पांगे

टंकलेखन साहाय्य - अंशुमान सोवनी

--------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीस ला होते परळकर? ऐकून छान वाटलं! लेख तर तुझे भन्नाट असतातच. ज्या लोकांना भेटायचं राहून गेलं त्यांना भेटवायला तू आहेस ही किती छान सोय केली आहेस सर्वांची!

सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करता आला पाहिजे..... हे त्यांचे म्हणण अगदी पटले.
धन्यवाद चिनूक्स आणि इतर मंडळी. आवडला लेख. संपूर्ण तेंडुलकर सीरीजच मस्त आहे.