काथ्याकूट: नि...चा धनी (भाग सव्वा आठ)

Submitted by चैतन्य रासकर on 31 December, 2018 - 08:34

काथ्याकूट: भाग एक
नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
मोघम अमोघ (भाग तीन)
इराची तऱ्हा (भाग चार)
उरातला केर (भाग पाच)
नकळत चघळत (भाग सहा)
हौशी चौकशी (भाग सात)
च्याव म्याव (भाग साडे सात)
जरी तर्री (भाग पावणे आठ)
सारा पसारा (भाग आठ)

बोनस बिनस:
ईशाचा इशू

..............................

तर मंडळी... अशा या सकाळी, सुरुवात आहे नव्या कहाणीची, वेळ नाही आणीबाणीची, आमची नित्या गुणाची, म्हणून का ती पुण्याची? का मग ठाण्याची? नित्या सांगेल का कथा तिच्या धन्याची? दिसेल का दुसरी बाजू नाण्याची? सोय होईल का आमच्या खाण्या पिण्याची?
मी, नीरव आणि इरा, आम्ही मीनीरा. नित्याच्या घरी पोहचलो आहोत, समोर बघतो तर काय....

"नित्या आहे का?" नीरवने विचारले.
"आहे ना.. आपण?" त्या मुलाने विचारले
"आम्ही तिचे फ्रेंड्स"
"ओह या ना हो.." तो मुलगा घराचं दार उघडत म्हणाला.
"तुम्ही?" इराने विचारले.
"आय एम सात्विक.. हर हजबंड"

हाच तो हजबंड? तू तर बंड निघालास. तुला अखंड शोधत असताना, असा सबंध कुठे लपला होतास? आणि काय रे सात्विक? तुझं आडनाव 'आहार' का?

तर दारात.... नित्याचा नवरा उभा ठाकला, गालात हसला, काय होता हा मसला? आधी बॉयफ्रेंड नंतर नवरा कसा भेटला? खरा कोण यातला? नित्याला हा कुठे पटला? तिच्या मनात हा कसा काय रुतला? का हा तिच्यासाठी झटला? कोणी कोणासाठी जीव ओतला? हा वाटत नाही इथला? आहे हा कुठला? झोपेतून आत्ताच उठला? आता ऑफिसला जायला सुटला?
नित्याच्या नवऱ्याचा प्रश्न मिटला? का पेटला?

नित्याचे आधी बॉयफ्रेंड्स भेटले मग आता नवरा भेटला, भाज्या बदलत होत्या पण ग्रेव्ही तीच होती.

बरं या... या सात्विकला बघून, नित्याच्या डोक्यात टिक टिक वाजलं? अन माझ्या ठोक्यात धडधड वाजत होती, मला बीपी झालाय का काय?
सात्विक तसा टवटवीत पण वयाने लहान वाटला.
कसं ए.. प्रेम, लग्न अन वय कधी होईल काय सांगता येत नाही.

आणि काय रे सात्विक, पांढऱ्या रंगाच्या लुंगीवर चॉकलेटी लेदर जॅकेट? एवढ्या सकाळी एवढी फॅशन? कसं रे जमतं? सोनम कपूर वूड बी प्राउड. सात्विकचे केस ओले होते, अंघोळ केली? का फक्त केस धुतले? मला काय करायचं? लोकांचे नुसते केस बघून राहिलोय.
सात्विकच्या कडेवर एक लहान मुल होतं. लहान मुल बघून त्याचं वय किंवा एखाद्याचं वय बघून त्याला किती लहान मुलं असावीत हे मला सांगता येत नाही. त्या लहान मुलाच्या डोक्यावर मोजता येईल एवढे केस होते, त्याने अंगात जे घातलं होतं, त्याला आपण टीशर्ट म्हणूयात. या मुलाचे पाय पाळण्याच्या बाहेर सुद्धा दिसत होते, कारण याने पॅन्टच घातली नव्हती. हा मुलगा त्याच्या हातातली छोटी गाडी चावत होता, भूक लागलीय? का दात येत आहेत? का दोन्ही?

पण हे लहान मुल कोणाचं? नित्याचं? नित्याने आमचा मामा केला? हा पराक्रम नित्या अन सात्विकने कधी रचला? असा अवघड प्रश्न पडला. इराने कडेवरच्या मुलाशी खेळत सात्विकला विचारले "याचे नाव?"
सात्विकने नाव सांगताना घसा खाकरला अन थांबलाच!!
ह्या? झालं नावं सांगून? काय होतं? काय कळलंच नाही, म्हणून मी घसा खाकरत विचारले "ख्याय?"
सात्विकने परत घसा खाकरला!!
अरे तू असे आवाज का काढतोय? नावं कुठंय? खाकरण्यात नाव आहे का? इस खाकरणे को क्या नाम दू? घसा खाकरणं मन लावून कसं ऐकायचं? काय प्रोसेस असते?
आता नीरवने परत नाव विचारलं, तसं सात्विक नावाची फोड करत म्हणाला "घ्रि..ख़्यां..श.."

'घ्रिख़्यांश' स्वतःच नाव ऐकून क्षणभर थांबला, स्तब्ध झाला, कुठेतरी शून्यात बघू लागला, बालपण विसरला, त्याला अकाली वृद्धत्व आलं, मग घ्रिहीवरून आलं, रडायला लागला. नावातच एवढा दर्द ए.... त्याला करणार काय? एखाद्यानं खाकरलं की 'घ्रिख़्यांश' त्याच्याकडे बघणार, अशा नावाने लोकांचे घसे बसतील हो. या नावामुळे लोक तुम्हाला नाव ठेवतील.
मुलाचं असं नाव का? हे वडिलांना कसं विचारणार? पण आमच्या इराने विचारलं "घ्रिख़्यांश का?"
"जन्मपत्रिकेत नावासाठी घ्र अक्षर आलं होतं हो.." सात्विक म्हणाला.
एवढी ऍडव्हान्स जन्मपत्रिका? जोडाक्षर आलं? जन्मपत्रिका अपग्रेडेड होती की काय? व्हर्जन टू पॉईंट ओ? बरं झालं 'ळ' आलं नाही, आता तरी खाकरता येतंय, नाहीतर गुळण्या करायला लागल्या असत्या.

"घ्रिख़्यांशला घरी घ्रि म्हणतात का?" हे अर्थात इराने विचारलं.
"तसं काही निकनेम नाहीये ओ, पण आम्ही लाडाने जब्री म्हणतो" सात्विक म्हणाला.
जब्री? हे नाव अरबी का? ठीके, जब्री म्हणा.. मी त्याला मार्मिक म्हणणार, सात्विकांचा मार्मिक.
सात्विक नवरा, मार्मिक मुलगा, तामसी बायको.
"बाकी कसा आहेस?" नीरवने विचारले.
सात्विकच असेल ना.
"मस्त हो..." सात्विक म्हणाला "आत्ताच अंघोळ झाली" सात्विक त्याच्या लुंगीच्या नाडीला गाठ मारत म्हणाला. एक मिनिट...याच्या अंगी नाडीवाली लुंगी? मी सात्विकच्या लुंगीकडे बोट दाखवत विचारले "कुठे मिळतात?"
"घरातच शिवली ओ.."
"तुला शिवून बघायचंय?" इराने मला विचारले.
"हे बघून मी शिवेल" का हात लावल्यावर हे सुटेल? नको हात लावायला, कशाला उगीच रिस्क.
तेवढ्यात 'ख़्यांश' ने निषेध नोंदवत, सात्विकच्या हाताला दंश केला, यावर सात्विक परत खाकरला!! सात्विकने त्याला खाली सोडले, तसा जब्री घ्रि पळू लागला, सात्विकने कसेतरी घ्रिला पकडले, कडेवर घेतले. तसं नीरवने विचारले "नित्या कुठंय?"

"अ... ती झोपलीय हो..." असं म्हणत सात्विक 'मार्मिकला' ला कडेवर घेऊन आतल्या खोलीकडे गेला, ती खोली बंद होती. त्या खोलीच्या दाराची कडी वाजवत, सात्विक म्हणाला "नित्या.. उठ.. कोण आलय बघ"
बाप रे... असं कोण झोपेतून उठवतं? काय तो मधाळ आवाज!! किती ते प्रेम!! यांचं प्रेम तर फार सुप्रीम निघालं.

मी जर उशिरापर्यंत झोपलो असेल तर आपली इरा, किचन मधलं झुरळ पकडायची, मग ते झुरळ हळूच माझ्या शर्ट आतून अंगावर सोडायची, मग मी ओरडत झोपेतून उठायचो, "तुला सरळ, करतं झुरळ" इरा असा डायलॉग मारायची. एकदा मी माझा खाक्या दाखवला, झोपेत असताना, झुरळाला माझ्या काखेतच दाबून मारलं, काखेतच खून झाला!! आता माझ्या काखेत केस येत नाहीत, कदाचित मला 'काखेरीया' वगैरे झाला असेल.

अजून ही सात्विक, श्रेया घोषाल आवाजात नित्याला हाका मारत होता. हा नित्याला झोपेतून उठवतोय? का अंगाई गीत गद्यात सांगतोय?
मी नित्याचं घर बघू लागलो. हॉलच्या भिंतींचे रंग मागच्याच वर्षी उडाले असावेत. एकच फॅन होता, तो पण फिरायचा कंटाळा करत असावा. टीव्ही लहान मुलासारखा एका कोपऱ्यात रुसून बसला होता. फरशीवर बुरशी येऊन गेली असावी, खिडक्यांच्या काचा लीप इयरला पुसत असावेत.
पण अचानक... मला सर्वात महत्त्वाची गोष्ट दिसली, मोबाईलपेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट!! ज्या गोष्टीकडे मी नेहमीच प्रेमाने बघतो.
चार्जर....

लगेच, मी मोबाइल चार्जिंगला लावला. फोन स्विच ऑफ असेल तर मला इन्स्टंट डिप्रेशन येतं, मग मी स्वतःच्या एक्झीस्टन्स बद्दल विचार करू लागतो. जगासमोरची महत्त्वाची समस्या? दहशतवाद? ग्लोबल वॉर्मिंग? उपासमार? अरे ह्याट...
लगेच संपणारी मोबाईलची बॅटरी, याहून मोठा प्रॉब्लेम तो काय?
तो नाही...ती चार्जर. चार्जर इतकी आवडते की तिच्यावर कविता सुचतात. एक सादर करतो.

"घ्रिख़्यांश नित्याचा अंश आहे का?" इराच्या प्रश्नाने मी भानावर आलो.
"अ... म्हणजे..." सात्विक गडबडला. अरे हो की नाही? हा सांगत का नाहीये? ऐ सात्विक माणसाने खोटं बोलू नये.
"दत्तक आहे का?" नीरवने विचारले.
"दत्तक नाही.. आम्हीच केलाय" सात्विक अडखळला.
तो काय केक आहे का? घरीच केलाय म्हणे.
...पण तुम्ही हे सगळं नि..ला विचारा" सात्विक म्हणाला.
"नीला कोण?"
"नीला नाही नि.. ला" सात्विक म्हणाला.
ये नीला, नीला क्या है?
"नि...ला? फ्रेंच आहे का?"
"नि... ला म्हणजे" सात्विक समजावू लागला "नित्याला मी नि म्हणतो"
"मिनी म्हणतोस?"
"नाही नाही.. फक्त नि" असं म्हणत सात्विक किचन मध्ये गेला.
फक्त नि? अरे इंग्रजीत नि म्हणजे गुडघा. बायकोला गुडघा म्हणतोस? अरे बायको म्हणजे हृद्य, तू तिचा गुडघा केलास? तुझा गुडघा तुला गुडघ्याने मारेल. तुला गुडघे दुखी होईल आणि हो... तुझा गुडघा कधी उठणार आहे?
सात्विक किचन मध्ये खुडबुड करत होता, आम्ही हॉल मध्ये होतो, तेव्हा नीरव हळूच आम्हाला म्हणाला "माझी पुश अप्सची वेळ झालीय.."
सामान्य लोकांची चहा, जेवण, झोपेची वेळ असते.
"कर ना मग"
"कसं वाटेल ना... असं दुसऱ्याच्या घरात पुश अप्स करणं?"
बाप रे नीरव? लॉजिकल बोलतोय? मी स्वतःला चिमटा काढून बघितला.
"तू कर रे.. मी मोजते" इरा नीरवला म्हणाली, "व्यायाम म्हणजे नियम अन संयम" असलं काय तरी बोलून इराने नीरवला कन्व्हिन्स केलं, तसं नीरवने अंग मोडले. स्ट्रेचिंग केले, मग पालथा पडून तो पुश अप्स काढू लागला, अन तेवढ्यात सात्विक किचन मधून बाहेर आला, नीरवला असं पुश अप्स करताना बघून सात्विक बाळ संपलाच.

आम्हालाही सात्विकला बघून धक्काच बसला!! जे दिसलं ते भयंकर होतं, असं पोटात एकदम धस्स झालं, गलबलून गेलो, कसं काय? कसं शक्य आहे? सात्विकच्या हातात एक ट्रे होता, त्यावर पाण्याचे तीन ग्लास होते. सात्विकने आमच्यासाठी पाणी आणलं होतं!!! आम्ही पाहुणे झालो होतो. त्याला ते काय म्हणतात? संस्कार ना? हेच का ते? काय माहित? बरेच दिवस दिसलेच नव्हते, किती मौलिक होता हा अलौकिक सात्विक...

"तुम्ही एवढ्या सकाळी?" सात्विक पाणी देत औपचारिक बोलू लागला.
"नित्याने जॉगिंगला बोलावलं होतं" आता काय सांगणार? काय काम नाही, असंच उनाडक्या करत फिरतोय. असं नाही सांगता येत. यू नो...इट्स अबाऊट इमेज, नाहीतर इमेज कोमेजेल.
"पण तुम्ही लग्नाला का नाही बोलावलं?" नीरवने विचारले.
सात्विक अडखळत म्हणाला "कसं झालो ओ.. आम्ही.... घाईतच लग्न केलं.."
आपल्याकडे घाईत लग्न, अन संसार आरामात होतो. 'अहो लग्न फार आरामात झालं, वेळच वेळ होता' असं कधी ऐकलंय का?
"घाईत का?"
"घाईत म्हणजे आम्ही पळून जाऊन लग्न केलं" सात्विक म्हणाला.
नीरव सुद्धा पळून जाऊन लग्न करणार ए.. तेवढाच व्यायाम.
"पळून जाऊन? का? मागे कोण लागलं होतं?"
"नित्याचे मामा, ते बंदूक घेऊन मागे लागले होते"
"बाप रे.. का??"
"त्यांचा आमच्या लग्नाला विरोध होता" सात्विक चेहरा लपवत म्हणाला.
प्रेमविवाह हा बुलेट ट्रेन सारखा असतो, विरोध होतोच.
"मग काय केलंत?"
"आम्ही माझ्या काकांकडे गेलो" सात्विक म्हणाला.
"काका मला वाचवा.. असं केलंस का?"
"हो.. तसंच करावं लागलं, काकांनीच तर चिलखत दिलं" सात्विक म्हणाला.
"काय दिलं?"
"चिलखत"
"चिलखत कशाला?"
"बंदुकीची गोळी काकांच्या चिलखतातून आरपार जात नाही" सात्विक म्हणाला.
ह्या? चिलखत घालून लग्न? आमच्यावेळी शेरवानी घालायचे.
"तुम्ही चिलखत घालून फेरे घेतलेत?"
"हो ना.. करावं लागलं, नित्याच्या मामांनी आमच्या मागे स्नायपर्स लावले होते" सात्विक म्हणाला.
स्नायपर्स? रॉकेट लाँचर वगैरे नव्हतं का? हा तर पार अब्बास मस्तानचा सैराट झाला.
पण मला पडलेला मोठा प्रश्न, मी लगेच विचारला "तुझे काका चिलखत का घालतात?"
"काकांचं चिलखताचं दुकान आहे"
हे वाक्य माझ्या मेंदूला प्रोसेस करताच आलं नाही.
चिलखताचं दुकान? अरे पण का? चिलखत ही गरज कशी असू शकते? 'चला एक चिलखत घेऊ' असं का कोण म्हणेल? चिलखताची घडी कशी घालतात? त्याला घड्या तरी पडतात का? बरं.. चिलखताचं मार्केटिंग कसं करतात? वॉटरप्रूफ आहे, थंडी वाजत नाही, नॉइजलेस आहे? नेमकं कसं? आणि हो... दुकानाचं नावं काय? चपखल चिलखत?
"ऐ दुकान कुठंय? मला पण घ्यायचं, डिस्काउंट मिळेल ना?" नीरवने विचारले.
चिलखत घ्यावं एवढी मिळकत आहे का?
"हो मिळेल ना.. काका साईझ नुसार चिलखत बनवतात" सात्विक म्हणाला. दुकानाचं नाव "चिल चिलखत" असं होतं, तिथून सात्विक आणि नित्याने चिलखत घेतलं, मग चिलखत घालून किचकट लग्न करून ते एकमेकांना चिकटले.
म्हणून सात्वित्या आता इथे लपून राहत होते? ओह!! म्हणून नित्याने लग्न लपवलं का? पण आम्हाला सांगायला काय झालं? आम्ही थोडीच खलबतं करून सगळ्यांना सांगणार होतो.

सात्विकने परत एकदा त्याच्या हाकांना सूर लावला, पण नित्या अजूनही अहोंना 'ओ' देत नव्हती. सात्विक तिच्या खोलीत का जात नाहीये? नित्याने खोली आतून बंद का केली होती? माझा फोन चार्ज का होतं नाहीये?
बायको अन मोबाईल कधी रुसेल काय सांगता येत नाही, हे मी नाही, आमचे शेजारी म्हणायचे. त्यांच्याकडे दोन मोबाईल होते.

"काय रे.. काल भांडलात की काय?" इराने विचारले.
"नाही ओ तसं नाही..." असं म्हणत सात्विकने आम्हाला बसायला खुर्च्या दिल्या, पांघरून अन उशी देतोस का? प्लिज... टेकावं म्हणतो.
सात्विक आमच्यासमोर एका खुर्चीवर बसला, त्याने मार्मिकला मांडीवर बसवत नीरवला विचारले "दादा, तुम्ही काय करता?"
"मी जिम करतो"
"अरे ते पोटासाठी, पोटापाण्यासाठी काय करतोस?" इरा वैतागली.
"अरे हां... मी एका कंपनीत एचआर डिपार्टमेंटमध्ये आहे" नीरव म्हणाला.
"ओके..." असं म्हणत सात्विकने इराकडे बघितले, तशी इरा म्हणाली "मी संसार करत होते, आता पुस्तक लिहितेय"
अगं तू इतिहास लिही ना.
"भारीच.. कशावर आहे पुस्तक?" सात्विकने विचारले
"झोप येण्यावर"
"काय?"
"हो.. सगळीच पुस्तकं अशी झोप उडवणारी असतात"
"येस्स.. जनरली अशीच असतात"
"पण असं एक पुस्तक हवं ना जे वाचताना शांत झोप येईल" इरा अशी मधूनच प्रायोगिक व्हायची, तिची ही नाटकं डोक्यावरून जायची. आता हीच बोलणं मला घंटा काही कळेना, इरा सुरूच झाली, थांबेनाच, तिला श्रोते मिळाले, पण मला स्वतःले झोप येऊ लागली. "समाजाच्या जाणिवांना ज्वर झालाय" या तिच्या वाक्याला मला डुलकी लागली.

एकदा मी इराला, माझ्या स्वप्नात म्हणालो की, "तू कधी कधी लय बोर करते" तेव्हा इराने मला झोपेतून उठवून मारलं होतं. त्या दिवशी कळालं की, आम्ही दोघे स्वप्नातून संवाद साधतो. हॅशटॅग इन्सेप्शन वाला लव्ह.
एखादा माणूस, लय बोअर करत असेल, तर त्याचं सगळंच ऐकायचं नाही. फक्त की वर्ड्स लक्षात ठेवायचे. उदारणार्थ, 'आमच्याकडे गावाकडे नदीत पोहताना माझ्या भाच्याला साप चावला' याबद्दल कोणी भरभरून बोलत असेल, तेव्हा भाचा अन साप, फक्त दोनच की वर्ड्स लक्षात ठेवा, बाकीचं विसरून जावं. परत विषय निघालाच तर "तुम्ही भाचा अन सापाबद्दल बोलत होतात" एवढंच म्हणावं, म्हणजे सांगणाऱ्याला वाटतं की आपण ऐकत होतो.

'ऐकणं' ही कला आहे पण 'न ऐकणं' हा व्यासंग असायला हवा.

"मी लिहिलेलं पुस्तकं वाचताना लोकांना शांत झोप लागेल" असं म्हणत इराने प्रवचन संपवलं. तसा मी इराकडे बघत म्हणालो "हिला छान सल्ले देता येतात.. एखादा दे बघू"
इरा मला खत्राड लुक देत म्हणाली "याला गाता येतं.. दाखवं बरं गाउन"
"सिंगर नाही... ही इज अ गुड रॅपर" आता नीरव म्हणाला, तसा मी लाजलो. आमचे मित्र पण ना..
मी स्मितहास्य करत म्हणालो "मी जॉब करत होतो, पण आता फुल टाईम रॅपिंग करतो"
"याचं रॅपिंग फार अपलिंग आहे"
"दादूस.. रॅपिंग कधी पासून करताय?" सात्विक विचारले.
"मी चार वर्षांचा असल्यापासून रॅपिंग शिकतोय, माझ्यावर बांद्रा घराण्याचा प्रभाव आहे"
"बांद्रा घराणा?"
"रॅपिंग मध्ये घराणा आहेत"
"ओके.. हे माहित नव्हतं"
"पंजाब आणि गुडगाव हे मेन घराणा, पहिले रॅपर तिकडूनच आले" मी सांगू लागलो.
"ओके..."
"मग बांद्रा घराणा आला"
"ए पिंपरी घराणा पण आहे ना?" इराने मला विचारले.
"नाहीये.. तू मनाचं काहीतरी सांगतेस"
"मग दादा हे पॅशन कसं फोल्लो करतोस?" सात्विकने विचारले.
"अरे मी माझी पॅशन घेऊन इंडियन आयडॉलला गेलो होतो" मी उत्तर दिले.
"भारीच.."
"अनु मलिक सरांसमोर गायचं होतं" मी कानाच्या पाळ्यांना हात लावत म्हणालो.
"टीव्हीवर आला होतात?"
"नाही ना.. ऑडिशनला खूप मोठी लाईन होती, ते पण उन्हात" हे सांगताना माझे डोळे पाणावले. का या आठवणी त्रास देतात??
"ऑSSS.." करत इराने मला थोपटलं.
"काय झालं?"
"हा लाईन मध्ये असताना चक्कर येऊन पडला, ऑडिशन हुकली"
मी डोळ्यातलं पाणी लपवतं म्हणालो "आता सारेगमपला जाईन"
"या वेळेस टोपी घालून जा.." इरा म्हणाली.

"बाकी तू काय करतोस?"
"माझं स्वतःच स्टार्टअप आहे हो..." सात्विक म्हणाला.
"व्वा.. कसलं?"
"आम्ही रेंट बेसिसवर पाठलाग करतो" सात्विक म्हणाला अन मार्मिक रडायला लागला. हे ऐकून मला ही थोडं रडून घ्यायचं होतं.
"रेंट बेसिसवर पाठलाग?"
"कसं असतं...." सात्विक सांगू लागला "एखाद्याला कोणाचा तरी पाठलाग करायचा असतो..."
"बरोबर..."
"पण आता कसं झालंय, पब्लिकला पाठलाग करायला वेळ नसतो हो...."
"म्हणून तू पाठलाग करायला रेन्टवर माणसं पुरवतोस?" इराने विचारले.
"येस्स, आता ही काळाची गरज आहे"
काळाची गरज? मला तर याची काळजी वाटू लागली. रेंटवर पाठलाग? अरे पण "नेमकं काय करतोस?"
"समजा... फॉर एक्झाम्पल एखाद्याने सिक लीव्ह्ज घेतल्या, पण त्याच्या बॉसला डाउट आला"
"मग तो बॉस तुला हायर करणार?" नीरव म्हणाला.
"येस्स.. तो बॉस मला पाठलाग करायला हायर करणार"
"एक मिनिट.. म्हणजे तू तर डिटेक्टिव्ह झालास" इरा म्हणाली.
"नाही ओ.. डिटेक्टिव्ह माहिती शोधून काढतो, आम्ही तसलं काही करत नाही"
"कसं काय?"
"सिक लिव्ह घेणारा डॉक्टरकडे गेला का पार्टी करायला, तेच बॉसला सांगतो"
"पण मग तुम्ही लोकांच्या पर्सनल स्पेस मध्ये येता"
इरा अगं ही टीव्ही डिबेट नाहीये.
"पर्सनल स्पेस मध्ये जात नाही हो, आम्ही लांबूनच फक्त बघतो, बाकी काही करत नाही" सात्विक म्हणाला, एव्हाना मार्मिक रडायचा थांबला होता, त्यालासुद्धा त्याच्या बाबांचा बिझनेस पटला असावा.
आमचे हे तर लॅपटॉप समोर बसून दिवस घालवतात, तुमचे मिस्टर काय करतात?
पाठलाग.. रेंट बेसिसवर...
नित्या अशा गप्पा मारत असेल?
"नित्याला हे पटतं?"
"आधी तिला आवडत नव्हतं.. पण आता काही म्हणत नाही" सात्विक नित्याच्या खोलीकडे बघत म्हणाला.

"तुला यातून बिझनेस मिळतो?"
"मिळतो ना हो, बऱ्याच वेळा हाऊस वाईफ नवऱ्याचा पाठलाग करायला हायर करतात" सात्विक मार्मिकच्या तोंडातून बाहेर येणारी लाळ पुसत म्हणाला.
"नवरे सुद्धा हायर करत असतील?"
"येस्स... त्यानेच तर जास्त बिझनेस मिळतो" सात्विक म्हणाला.
आई वडील त्यांच्या मुला मुलींचा पाठलाग करायला सुद्धा सात्विकला हायर करायचे. घराबाहेर मुलं मुली काय करता? हे पालकांना कळायला नको? पालकांचं लक्ष असं दूरवर पोहचवण्याचं काम हा करत असे.

रेंट बेसिस फॉलोव्हर. "रेबेफॉ" असं सात्विकच्या स्टार्टअपचं नावं होतं, अॅप पण भारी होतं. अॅप अँड्रॉइड स्टोअरवर उपलब्ध, "रेबेफो अॅप" आत्ताच डाउनलोड करा. पहिल्या पाठलागाला वीस टक्के डिस्काउंट!!

"याला भूक लागलीय" असं म्हणत मार्मिकला कडेवर घेऊन सात्विक उठला.
तेवढयात आम्ही बघितलं, नित्याच्या घराच्या दारात एक महिला उभी होती.
ये क्या है नया? ही कोण बया? ये क्या ट्विस्ट आया? ही का मुलाची आया? का सात्विक हिचा राया?

ही फिमेल वयाने तिशीच्या आसपास असावी, मनाने चिरतरुण असेल ही, आपल्याला काय माहित? त्या महिलेने केस मोकळे सोडले होते, केस मोकळे असले की वारा येतोच, मग ते केस वाऱ्याबरोबर उडू लागतात. मला इथे उकडतंय, हिला कसा काय वारा लागतोय?
ती महिला सात्विककडे एकटक, थंड नजरेने बघत होती. एवढी थंड नजर? बाई तुम्ही झोंबी का? पण झोंबी असे हळू हळू, पुढे चालत तरी येतात, ही बाई एकाच जागी उभी होती, काहीच करत नव्हती, तुम्ही स्टेशनरी झोंबी का? या महिलेने 'ही कोण अडगळ?' असा एक लुक आम्हाला दिला.
मार्मिक त्या महिलेला बघून रडू लागला. मार्मिकचे बाबा सुद्धा त्या महिलेकडे बघत होते. हा बघण्याचा कार्यक्रम झाला असेल तर ओळख करून देता का?

पण नाही.. कडेवरच्या मार्मिकने निषेध वाढवला, त्याला भुईवर यायचं होतं, तसं सात्विकने हळूच त्याला खाली सोडले, मार्मिक दुडूदुडू का ते माहित नाही पण धावत त्या महिलेकडे गेला, तिने खाली बसत मार्मिकला कडेवर घेतले, एवढ्या थंड नजरेने सात्विकला बघू नका, बिचाऱ्याला थंडी वाजत असेल.
मार्मिकला कडेवर घेऊन ती महिला निघून गेली.
सात्विक तिला "थांब थांब" म्हणत तिच्या मागे गेला.

आली अन गेली पण? काय मॅडम, अशी एन्ट्री घेतलीत, एखादा डायलॉग तरी घ्यायचा, असं असतं का? आम्हा तिघांना काही कळेना. मार्मिक हा नित्याचा मुलगा असावा? का ही बाई मार्मिकची आई असावी? म्हणजे सात्विक हिचा 'हे' असावा? पण मग सात्विक असं का म्हणाला की तो नित्याचा धनी आहे? माझ्या मनी फारच गोंधळ झाला होता.

आम्ही सात्विकची साडे आठ मिनिटे वाट बघितली. हो मी टायमर लावला होता. पण तो आलाच नाही. हिरोच निघून गेला, हिरॉइन झोपेतून उठत नव्हती, आता करायचं तरी काय? मग साईडहिरो नीरवने नित्याच्या नावाने हाका मारत, तिच्या खोलीचे दार वाजवले. पण नित्या काही उठत नव्हती.

"तोडायचं का?" नीरवने दाराकडे बघत विचारले.
"तू काय दया आहेस का? हे सीआयडी नाहीये"
"पण करणार तरी काय?" इरा म्हणाली.
नीरवने इराकडे बघितलं, इराने मूकपणे समंती दिली, तसा नीरव खांद्याने धक्का देत दार उघडू लागला. हे माझ्या नशिबाचे दार तर नाही ना? उघडत का नाहीये? मग आम्ही तिघांनी जोर लावला, दार उघडण्याचा प्रयत्न केला, तसं ते दार सरकलं.
ह्यात तिच्या मारी!! दाराला कडीच नव्हती. ते दार फुगलं होतं, फरशीला चिटकून बसलं होतं, आम्ही कसं तरी रेटलं, दार सरकत, आवाज करत, उघडलं गेलं, आम्ही खोलीच्या आत आलो.
खोलीत कोणीच नव्हतं!!

नित्या कुठे आहे? पण मग सात्विक कोणाला हाका मारत होता?

आतमध्ये एक बेड होता, त्याशेजारी लाकडाचं टेबल होतं, त्यावर एक वही होती, बाजूला लाकडाचं छोटं कपाट होतं. कधीही जाऊन बघा, लव्ह मॅरेज झालेल्या घरात जास्त फर्निचर नसतं.
आम्ही तिघांनी एकमेकांकडे बघितलं, तशी इरा खोलीच्या बाहेर गेली, तिने हॉल मधून एक खुर्ची आणली
"काय झालं?"
"या सगळ्याचा, मला बसून विचार करायचा पण.."
"पण काय?"
"पण विचार करत बसायचं नाहीये" असं म्हणून इरा खुर्चीत बसली.
"नित्या कुठंय?" नीरवने विचारले, पण या अपेक्षित प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. मला समोर छान बिछाना दिसत होता, त्या बिछान्याला माझं बोट जरी लागलं असतं, तरी मला गाढ झोप लागली असती.

नीरवने नित्याच्या खोलीतली एकुलती एक खिडकी उघडली. नित्याच्या शेजाऱ्यांनी मोठ्या आवाजात गाणी लावली होती, स्पष्ट ऐकू आली.
"दिसतेस वाव, म्हणून राहिला गाव, पन देईना तू भाव, ही झालीया अगाव"
"अगाव, अगाव" बॅकग्राऊंडला सुरु राहतं. "सकाळी सकाळी, अशी गाणी का लावतात?" इरा वैतागली तिला हे आगाऊ गाणं पकाव वाटलं पण, या वाव गाण्याला लय वाव होता.

नीरवने घरभर नित्याला शोधले, इरा खुर्चीवर डोळे मिटून बसली होती, पण या सगळ्यात, माझी नजर फक्त एकच गोष्ट शोधात होती..
पांघरून...

"सात्विकला बघून येतो" असं म्हणून नीरव घरा बाहेर निघून गेला, मी स्वतःला रोखू शकलो नाही, अन त्या बिछान्यावर पडलो. त्यावरची उशी दगडाएवढी मऊ होती, मी उशी बाजूला ठेवली, तेव्हा शेजारच्या टेबलावरची ए फोर साइझ वही दिसली. मी वही घेतली, चाळून बघितली, वहीत काही लिहिलं नव्हतं, वहीला नाव सुद्धा नव्हतं, पण त्यातून एका घडी केलेलं पान खाली पडलं, मी पान उघडलं, त्या पानावर मराठीत, काळ्या शाईने खालील मजकूर लिहिला होता..

तुझे जुने मेसेज वाचताना..
तुझ्यातलं माझंपण सरताना
तुला काय देऊन जाऊ?
शेवटचं आता मरताना...

#सुसाईडनोट

क्रमशः

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राव काय लिहिलंय!
तुम्हज रॅपर आहात माहितीये मला, सुरुवातीच्या दोन तीन ओळी रॅपमध्येच वाचल्या! Wink
एकसे एक जबरी पंच!!! मानलं!

धमाल!
सगळे पंचेस एकसे एक!
#काय काय कोट करू Happy

जबरदस्त..!!
विशेष धन्यवाद..!! खरोखर 2018 मध्येच हा भाग टाकल्याबद्दल! Happy

भन्नाट च..
मधेच त्या लहान मुलाचे नाव मार्मिक का झालेय???
( हे वाचून मलापण सतत प्रश्न विचारायची सवय लागली की काय?? )

बाब्वो! कायच्या काय भन्नाट लिवलंय. जिओ चै.

<<<<आणि काय रे सात्विक? तुझं आडनाव 'आहार' का?>>>>>. इथुन जी खुसखुशीला सुरुवात झालीये ती वाढतंच गेली.

स्नायपर्स? रॉकेट लाँचर वगैरे नव्हतं का? हा तर पार अब्बास मस्तानचा सैराट झाला. >>> एक नंबर

इन्सेपशनवाला लव... हे मी एसओटी च्या इश्कवाला लवच्या चालीवर वाचल. Lol
धमाल लिहित आहेस.आता ही सीरीज संपली एकदाच सगळ वाचुन काढणार.विसरायला होतय.
बाय द वे, सारा लांबुन तरी दिसली का ????

प्रतिक्रिया वाचून पुढचा भाग लिहायचा उत्साह वाढला, मनापासून धन्यवाद Happy

@धनवन्ती
मधेच त्या लहान मुलाचे नाव मार्मिक का झालेय???
कथा निवेदक म्हणतो ना... तुम्ही त्याला जब्री म्हणा, मी त्याला मार्मिक म्हणणार, सात्विकांचा मार्मिक

@अंकु
सारा लांबुन तरी दिसली का ????
नाही ना, पण तैमूर दिसला Proud

मस्त

छान आहेत पंचेस !!! आतापर्यंत सगळे भाग मजा घेत वाचलेयत पण आता शेवट सुसाईड असा दुःखद नका करू. तसा नसावा असेच वाटतेय.

प्रत्येक भागाप्रमाणे हाही भाग अप्रतिम! काथ्याकूटच्या भागांची खरंच फॅन झालेय. Happy दरवेळी जबरी ट्विस्ट असतात. Happy पुभाप्र Happy

अरे ये चीटीन्ग है , चीटीन्ग है .... ये चीटर है | (जयकान्त शिकरे च्या आवाजात वाचा Happy
आतातरी नित्या सापडेल वाटलेलं .
किती गोन्धळ रे बाबा , प्रत्येक भागात नविन माणूस . डोक्याचा भुगा झालायं .पण ईतक्या लवकर मालिका संपू नये .
धमाल चाललीय
लहान मुलांची नाव चं एक पुस्तक काढ आता . ज्ञिमित्री काय , घ्र्यिखांश काय (लिहितापण येत नाही आहे मला Angry )

एखादा माणूस, लय बोअर करत असेल, तर त्याचं सगळंच ऐकायचं नाही. फक्त की वर्ड्स लक्षात ठेवायचे. उदारणार्थ, 'आमच्याकडे गावाकडे नदीत पोहताना माझ्या भाच्याला साप चावला' याबद्दल कोणी भरभरून बोलत असेल, तेव्हा भाचा अन साप, फक्त दोनच की वर्ड्स लक्षात ठेवा, बाकीचं विसरून जावं. परत विषय निघालाच तर "तुम्ही भाचा अन सापाबद्दल बोलत होतात" एवढंच म्हणावं, म्हणजे सांगणाऱ्याला वाटतं की आपण ऐकत होतो. >>>> मौलिक सल्ल्याबद्दल धन्यवाद . मंडळ आभारी आहे . Happy

कहर लिहीतोयस, हा भाग खुपच उशीरा आला पण नेहमीसारखाच भन्नाट

काहीही धुमाकुळ सुरु आहे.

पांढऱ्या रंगाच्या लुंगीवर चॉकलेटी लेदर जॅकेट? एवढ्या सकाळी एवढी फॅशन? कसं रे जमतं? सोनम कपूर वूड बी प्राउड.

अशक्य होता हे

घ्रिख़्यांश नाव सुचण्याबद्दल तर नतमस्तकच

बरं झालं 'ळ' आलं नाही, आता तरी खाकरता येतंय, नाहीतर गुळण्या करायला लागल्या असत्या.

तो काय केक आहे का? घरीच केलाय म्हणे.

माझी पुश अप्सची वेळ झालीय.."
सामान्य लोकांची चहा, जेवण, झोपेची वेळ असते.

अफाट केवळ अफाट

संपवू नको रे इतक्यात

@समाधानी, द्वादशांगुला, वावे, स्वस्ति, Namokar
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून, खूप आनंद झाला

@गोल्डफिश
आता शेवट सुसाईड असा दुःखद नका करू<<<<
असा शेवट केला तर, काही वाचक मला धरून मारतील Proud

@आशुचँप
नक्कीच, तुमच्या प्रतिक्रियांमुळे पुढचा भाग लिहायचा उत्साह व्दिगुणीत झाला

@ mi_anu
कथा विनोदी व्हावी हाच नेहमी प्रयत्न असतो.

महान!

सगळे पंचेस एकसे एक! कुठला म्हणून कोट करू...
जबरी लिहिलय Rofl

धमाल आहे हे!
घ्रिख़्यांश चा सगळा पॅरा वाचून खूप हसायला आलं. माझ्या ओळखीत रेयांश, अयांश, सारांश आहेत!

सात्विकचा व्यवसाय काय असावा? यावर बराच विचार केला, डॉक्टर, इंजिनियर असं काही नको होतं, मग ते टिपिकल होतं.
नाव सात्विक पण हा चोरून पाठलाग करतो, हे मजेशीर वाटलं.
मला एक मेल आला आहे, त्यात "रेंट बेसिस पाठलाग" या संकल्पनेवर चांगला व्यवसाय होऊ शकतो का? असं एकाने विचारलं. मला वाटतं असा व्यवसाय यशस्वीपणे करता येऊ शकतो, त्यात असं गैरकानूनी काही नसावं.
जर कोणाला असा व्यवसाय सुरु करायचा असेल तर कळवावे, मी यात इन्व्हेस्टमेन्ट करायला तयार आहे Happy

भारीय... हा पण भाग.. देर से आते हो लेकीन दुनिया (माबो) हिलाते हो..

नीट विचार केला तर खरचं "रेंट बेसिसवर पाठलाग" हा व्यवसाय होऊ शकतो...
चैतन्य आय अॅम ईन Wink

त्यात "रेंट बेसिस पाठलाग" या संकल्पनेवर चांगला व्यवसाय होऊ शकतो का?
-----------मला याला भेतुन दन्द्वत घलयचय!

Pages