काथ्याकूट: च्याव म्याव (भाग साडे सात)

Submitted by चैतन्य रासकर on 22 April, 2018 - 15:24

काथ्याकूट: भाग एक
नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
मोघम अमोघ (भाग तीन)
इराची तऱ्हा (भाग चार)
उरातला केर (भाग पाच)
नकळत चघळत (भाग सहा)
हौशी चौकशी (भाग सात)

बोनस:
ईशाचा इशू
........................

"नित्याचं लग्न झालंय?" ज्ञिमित्रीने विचारले.
"कधी?"
"केव्हा?"
"कसं?"
"कुठे?"
"कोणाबरोबर?"

आम्हाला काय माहित? हे तुला माहित पाहिजे ना. तू तिचा बॉयफ्रेंड ना, बॉयफ्रेंडला अशा महत्त्वाच्या गोष्टी माहित पाहिजेत, कारण माहित असलेल्या गोष्टी महत्त्वाच्या असतीलच असं नाही.

"नित्याने असं का केलं? लग्न लपवून का ठेवलं? मला का नाही सांगितलं??" ज्ञिमित्रीने आधारकार्डच्या फोटो सारखा चेहरा करत आम्हाला विचारले. ज्ञिमित्रीला स्वतःच आधारकार्ड नित्याच्या आधारकार्डशी लिंक करायचं होतं, म्हणजे नित्याशी लग्न करायचं होतं, पण नित्याने आधी कसलीच लिंक लागू दिली नाही, मग आधार ही दिला नाही. नित्याने ज्ञिमित्रीला का फसवलं? लग्न झालं हे शेअर का नाही केलं? लग्न करून अफेअर केलं? का अफेअर करून लग्न केलं? एवढं अनफेअर का वागली?

ज्ञिमित्री डोकं हातात पकडून खाली बसला. ज्ञिमित्री ऊर्फ ज्ञि, वेदनेतून गाणं, गाण्यातून वेदना मांडणारा मोर्चा गायक, द प्रोटेस्ट सिंगर, सिंगर आता सिंगल झाला होता.

बरीच रात्र झाली होती, आता निर्मोही अंधार चहुबाजूने अबोल थयथयाट करत होता, वाऱ्याची झुळूक कानोड्यात दडून बसली होती, रात्रीच ते स्निग्ध चांदण....... कुठं गेलं काय माहित? श्या..जाऊ दे.. अलंकारिक नाही पण फारच चमत्कारिक झालं. सोप्या शब्दात सांगायचं तर मी, नीरव, इरा आणि नवा भिडू ज्ञिमित्री, नित्याच्या सोसायटी बाहेर डास मारत, वेळ मारून नेत होतो, काही वेळाने डास संपले, मग गप्पा मारू लागलो, मग गप्पा संपल्या, मग चकरा मारू लागलो, चकरा मारून मला भूक लागली, आता ताव मारायचा होता, माझं पोट तर खपाटीला अन सपाटीला गेलं होतं, पोट इतकं रिकामं होतं की, मी काहीही गिळलं असतं, तर पोटात आवाज झाला असता.

ज्ञिमित्रीने सावकाश पाठीवरची गिटार आणि वेदनांची ओझी बाजूला ठेवली, नव्वदच्या दशकात जसं रडायचे, तसं स्फुन्दून फुसफुसू लागला, तसा नीरव सरसावला, ज्ञिमित्रीच्या शेजारी बसून त्याचं सांत्वन करू लागला. "अरे जाऊ दे, असलीच आहे नित्या, दे सोडून" नीरव म्हणाला.

अरे ऐ समजवायचं, एकमेकांचं वाजवायचं नाहीये. हे कुठलं सांत्वन? सांत्वन करतोय का तणतण वाढवतोय? नीरवला सांत्वन मधला "सा" सुद्धा येत नव्हता. बरं याला समजवायला कोणी सांगितलं? 'समजवायचं कसं?' हे आधी याला समजवायला हवं.

ज्ञिमित्री शर्टच्या बाहीने डोळे पुसायचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या शर्टला काहीच बाही नव्हती, कारण त्याने स्लिव्हलेस शर्ट घातला होता, स्लिव्हलेस शर्ट घालून कधी रडायला जाऊ नये, पण जर बाका प्रसंग आलाच तर, दंड बाह्य भाग वापरावा. ज्ञिमित्रीला रुमालाची गरज होती, मी माझ्या जीन्सच्या खिश्यात हात घातला, खिशात रुमाल नाही पण वितळलेलं चॉकलेट मिळालं, चॉकलेट? कधी ठेवलं होतं? एवढं महाग चॉकलेट वितळलं? मला कसं नाही कळलं?

आता ज्ञिमित्री सुरात रडू लागला, त्यात हा हाडाचा गायक, त्यात परत हडकुळा, त्यामुळे त्याच्या हुंदक्यात लय होती, ती पण लSSय होती. ज्ञिमित्री डोळे पुसत म्हणाला "माय लाईफ इज पेनफुल"
काकाच्या गावात, एवढं दुःख!! इंग्लिश मध्ये!!
दुःख कधी मोठं वाटतं? इंग्लिश मध्ये असल्यावर!! मराठी दुःखाला कोण काय विचारत नाही.
"माय लाईफ इज पेनफुल" याला गांभीर्याने घेतील, "माझं आयुष्य वेदनामय आहे" असं म्हटलं तर? त्या वेदनेबद्दल कोणी विचारेल का? पण इथे ज्ञिमित्रीची इंग्लिश वेदना 'असली' वाटेना, त्या वेदनाला कोणी 'सिरिअसली' घेईना. इराच्या चेहऱ्यावर "तुझी वेदना तुलाच ठेव ना" तर नीरवच्या चेहऱ्यावर "तुझी वेदना वाटून घेऊ ना" असे भाव उमटले होते.

"आय नीड अ ड्रिंक, लेट्स हॅव ड्रिंक" ज्ञिमित्री आमच्याकडे बघत म्हणाला, तसे नीरव, इराने माझ्याकडे बघितले, माझ्याकडे का बघताय? मी काय तुमचा म्होरक्या आहे का?
"मी आलो असतो पण, माझा उपवास आहे" मी काहीतरी बोलून गेलो.
"उपवासाला चालते की" इरा उपहासाने म्हणाली.
"माझा कडक उपवास आहे"
"कडक उपवास? मऊ उपवास पण असतो?" नीरवने विचारले.
"मऊ उपवासाला मऊ पदार्थ खातात, वरण भात वगैरे" इरा नीरवला म्हणाली, इराने "नरम उपवास" सुद्धा शोधून काढला असता, नरम उपवासाला नरम भजी खातात असं ही तिने नीरवला पटवून दिलं असतं.
"तुम्ही चला ना" ज्ञिमित्री म्हणाला.
"अरे मी रात्री आठ नंतर काहीच खात नाही" दुसऱ्याच डोकं सोडून, मी नीरवचं वाक्य मनात पूर्ण केलं.
"मी पण आले असते, पण मी सोळा सोमवार पाळलेत" इरा म्हणाली.
"काय???"
"सोळा सोमवारचं व्रत घेतलंय"
"का??"
"चांगला नवरा मिळावा.... आय मीन दुसरा चांगला नवरा मिळावा म्हणून"
इरा सोमवारचं व्रत काय, पण सोमवारच पाळत नव्हती. तिने पाऊण सोमवार सुद्धा कधी पाळून पाहिला नव्हता. इराने कुठलही व्रत न घेण्याचं व्रत घेतलं होतं. "करायचं व्रत, मग बसायचं चरत" असं म्हणत इरा, व्रत करणाऱ्या तमाम जनतेचा तिटकारा करायची, पण इराला ज्ञिमित्रीच्या वेदनेला भाव अन वाव द्यायचा नव्हता, म्हणून इराने जे मनात अन मणक्यात येईल ते दणक्यात सांगितलं.

तेवढ्यात आमच्या मागून "म्या SSSSSव" असा जाहीर आवाज आला, आम्ही दचकलो, सगळ्यांनी आवाजाच्या दिशेला बघितलं, एक छोटी, काळ्या रंगाची मांजर, आमच्याकडे रोखून बघत होती, बाप रे... तू कुठून आली? कोणाची ग तू? इथे कशी आली? तू आडवी जाणार आहेस का आम्ही जाऊ?
मी त्या मांजरीला बघून शहारलो, इरा "ऐ..ऐ...किती गोड ते" असं म्हणत त्या मांजरीजवळ जाऊ लागली, पण त्या मांजरीला इरा गोड नाही वाटली. ते मांजर पळू लागलं, इरा त्या मांजरा मागे पळाली, दोघे ही पकडा पकडी खेळू लागले, पण ते मांजर वळून न बघता पळून गेलं, इराचा उत्साह पार गळून गेला, ती परत आमच्याकडे आली.
"कसलं क्युट होतं ना..." इरा म्हणाली. मला ते मांजर क्युट नाही पण भूत वाटलं.
"मांजरीन होतं ना?" नीरवने विचारले
"मांजरीन??"
"पुरुष मांजरला, मांजरीन म्हणातात ना?" नीरव म्हणाला.
"पुरुष मांजर? असतं??" मी विचारले.
"पुरुष मांजरला बोका म्हणतात" इराने उत्तर दिले
"मग मांजरीन कशाला...?" मी विचारले.
"मांजरीन कशालाच म्हणत नाहीत"
"असं कस? उंदीर उंदरीन, पोपट पोपटीन... तसं मांजर मांजरीन" नीरव म्हणाला.

तेवढ्यात सोसायटीच्या गेटचा कर्रर्रर्र, खर्रर्रर्र, र्गर्रर्रर्र असा कसातरी आवाज झाला, मला गेटचा आवाज शब्दात मांडता येत नाही. आम्ही तात्काळ माना मागे फिरवून बघितले, सोसायटीच्या वॉचमनने गेट उघडलं, तशी एक महिला, एवढ्या लांबून वय बिय काय कळलं नाही, पण भूकंप झाल्यासारखी धावत बाहेर आली, तिच्या मागे वॉचमन सुद्धा बाहेर आला, आम्ही त्या दोघांना बघू लागलो, ती महिला काहीतरी शोधत होती, वॉचमन पण शोधू लागला, हे काय शोधत आहेत? त्या बाईची नजर आमच्याकडे गेली, तशी ती धावत आमच्याकडे आली, धापा टाकत तिने आम्हाला विचारले
"डिड यु...बघितलं..लहान..."
"काय??"
त्या महिलेच्या वयाचा अंदाज आला नाही, आमच्या पेक्षा वयाने थोडी मोठी असेल. पाऊस पडतोय, त्यात जोरात वारा आला आणि छत्री उडून पार कुठे तरी गेली, मग आपण आता पावसात भिजू लागलो, की कशी अवस्था होते तशीच अवस्था त्या महिलेची झाली होती.

त्या बाईने दीर्घ होता की नाही माहित नाही, पण श्वास घेत विचारलं "डिड यु सी टू इयर्स ओल्ड कॅट?"
मांजरीला बघून तिचं वय कसं सांगायचं? पुरुष मांजर असतं हे आता कळलं होतं.
"ओह येस्स..शी वेन्ट दॅट वे" इरा त्या बाईला म्हणाली.
"कूड यु गाईज प्लिज हेल्प मी" त्या बाईने आम्हाला विनंती अधिक विनवणी केली.
एवढ्या रात्री? मांजरीला शोधायचं? एवढ्या रात्री मी कधी आयुष्याचा अर्थ शोधला नव्हता, मांजर का शोधू? पण मांजराबद्दल असलेलं कनवाळू व्यक्तीमत्त्व पुढे आलं.
"येस शुअर..लेट्स सी दॅट वे" इरा त्या बाईला म्हणाली.
या बाईचं खरं नाव कळलं नव्हतं, म्हणून मी मनातल्या मनात त्या महिलेचं नाव मंजिरी ठेवलं, इरा मंजिरीबरोबर मांजर शोधू लागली, इराने मला, नीरवला आणि ज्ञिला इशारा केला.
एवढ्या रात्री, मला स्वतःला शोधण्यात काही रस नव्हता, पण आता मांजर शोधावं लागत होतं.
"थँक्स गायीज.. पोपो इज नॉट वेल" मंजिरी आम्हाला म्हणाली.
"पोपो?"
"पोपो...माय कॅट नेम"
पोपो? मांजरीचं नाव? पौराणिक मांजर आहे काय?
"पोपो" या नावावर खो खो हसायचं होतं पण हसता येईना, पळून गेलेल्या मांजरीवर कसं हसणार? आम्ही "पोपो" ला शोधू लागलो, मंजिरी मॅडम "पो पो" करत ओरडू लागल्या, आता का? तर मंजिरी मॅडम म्हटल्या की "शी रीस्पॉन्डस टू हर नेम" पण माझा प्रश्न असा आहे की, जर "पोपो" ला तिचं नाव आवडलं नसेल आणि म्हणून पळून गेली असेल तर? मग ती का रीस्पॉन्ड करेल ना? असं नाव ठेवल्यावर कोणीही पळून जाईल की नाही?

आम्ही पण "पो पो" करत ओरडू लागलो. "पो पो" काय 'ओ' देईना. असं ओरडून मांजर काय मी कधी देव शोधला नव्हता. त्यात मुळात मी एखाद्याला शोधल्यावर, तो भेटल्यावर मग त्याच्यावर ओरडायचो, पण असं आधी ओरडून कोणाला शोधलं नव्हतं.
"पोपो" ने केव्हाच पोबारा केला होता, "पोपो" चा अर्थ मी विचारणार होतो, पण मंजिरीने सांगितला असता, त्यामुळे विचारला नाही. "पोपो" चा काय पत्ता लागला नाही, "पोपो" मुळे आमचा पोपट झाला होता, पण मंजिरी कावरी बावरी झाली होती.

मग आम्ही मेन रोडवर आलो, या मेन रोडला मेन रोड सारखं काहीच नव्हतं, एकतर रोड फारच रोडावलेला होता. रस्त्याच्या एका बाजूला फूटपाथ तर दुसऱ्या बाजूला कार पार्किंग होतं. कार पार्किंगच्या दुसऱ्या बाजूला बंद टपऱ्या होत्या. थोडा वेळ शोधल्यावर रस्त्याचा डिव्हायडर पण दिसला. स्ट्रीट लाईट्स होते पण चालू नव्हते. खड्डे होते पण मोठे नव्हते. या मेन रोडच्या फूटपाथवर बरेच 'मेन' मन लावून, गोधडी घेऊन झोपले होते, त्यांच्या झोपेकडे दुर्लक्ष करून मंजिरीने "पो पो" चा गजर सुरु ठेवला.

आमचा आवाज ऐकून फूटपाथवर पांघरून घेऊन झोपलेला, एक जीव उठला, आम्ही घाबरलो, एकतर तो फूटपाथवर झोपला आहे, आम्ही त्याची झोपमोड केली, तो चिडणारच ना? त्याने आमच्याकडे रोखून बघायला सुरुवात केली, मी त्याला "सॉरी" म्हणालो, तो दहा सेकंड काही म्हणाला नाही, आम्ही काही म्हणालो नाही, पण डोळे चोळत त्याने विचारले. "च्या पाहिजे का?"
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले, उजव्या डोळ्यातून अश्रू ओघळला, झोपेतून उठून कोणी कसं काय चहा पाहिजे का विचारू शकतं? आणि म्हणे माणुसकी शिल्लक नाही.

मी भरल्या डोळ्याने त्या चहावाल्याकडे बघत असताना, "चहा ना..हो पाहिजे" असं म्हणत ज्ञिमित्री पुढे सरसावला, पण तेवढयात इराने जो प्रश्न विचारला तो आम्हाला कधीच सुचला नसता. इराने त्या चहावाल्याला विचारले "दूध कुठून आणणार?"
"दूध पावडर चाललं?" चहावाल्याने विचारले. 'चालेल काय? तुम्ही तर लाजवताय' असं काहीसं म्हणणार होतो. मी या वेळी डोळे मिटून कोमट पाणी सुद्धा पिलं असतं. तो चहावाला उठला, त्याने त्याच्या गोधडीची घडी केली, खाली ठेवली, रस्ता क्रॉस करून तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आला, तिथली एक टपरी त्याने उघडायला सुरुवात केली.

आम्ही पण मांजर शोध कार्यातून ब्रेक घेतला, त्या टपरीकडे गेलो, मंजिरीला असं मांजर शोधताना चहा पिणं योग्य वाटलं नाही. मंजिरीच्या जीवाला घोर, झालं होतं बोर, झोपेला केलं इग्नोर, चला घरी जाऊया, बस्स झालं हे आऊटडोअर...
बायको, नवरा, काम वालीबाई, तरुण मुलं, मुली घरातून पळून गेल्यावर, "अहो येईल परत, काळजी करू नका" असं म्हणून समजावता येतं, मांजर पळून गेल्यावर कसं समजवायचं? पण ही जोखीम इराने पत्करली.
"जेवणाच्या वेळी परत येईल" इरा मंजिरीला म्हणाली.
"ती आजारी होती, आज काहीच खाल्लं पण नाही" मंजिरी म्हणाली.
"येईल परत..डोन्ट वरी" ज्ञिमित्री म्हणाला.
"आता ती झोपली असेल, सकाळी उठल्यावर परत येईल" नीरव म्हणाला.
हे नेमकं मांजरीबद्दलच बोलत आहे ना?
"घुर्रदगुम घरी एकटाच आहे"
"घुर्र...??"
"घुर्रदगुम.. ही इज माय टॉम"
टॉम? आता हा कोण टॉम? अरे काय चालू आहे? का अशी नाव आहेत? घुर्रदगुम हे घुर्रदगुमच आहे का? का मला वेगळं ऐकू आलं? घुर्रदगुम उच्चार आहे का खरंच असं नाव आहे? "घुर्र" काय पक्षी आहे का?
"टॉम म्हणजे बोका" इराने आम्हाला सांगितलं.
ओके आता कळालं, घुर्रदगुम पोपोचा यार होता. घुर्रदगुम नेहमी रात्री उशिरा यायचा, पोपो वैतागली, ती म्हटली "बाप्या हे नखरे चालायचे न्हायीत, किती होतो त्रास, तुला काय माहित?" घुर्रदगुम वॉज हाय ऑन मिल्क. घुर्रदगुम पण चिडला, दोघंही फार च्याव म्याव करत भांडले, पोपोसाठी ही रोजची भांडण होती, तिने लागलीच घर सोडलं. ब्रेकअप झालं.

"तुमच्याकडे किती कॅट्स आहेत?" नीरवने विचारले.
"आधी चार होत्या, आता दोन आहेत" मंजिरी म्हणाली. बाकीच्या दोन पळून गेल्या ना? नाव काय होतं? सोसो का लोलो का दोदो?
"यु नो मेनी थिंग्स अबाऊट कॅट्स" इरा म्हणाली.
"हो..माझा बिजनेस पण तसाच आहे" मंजिरी म्हणाली.
"बिजनेस? तुम्ही मांजरी विकता?" ज्ञिमित्रीने विचारले. का? तुला घ्यायची आहे?
"नाही नाही, असं विकायच्या नसतात, मी इयररिंग्स बनवते" मंजिरी म्हणाली.
"मांजरींसाठी इयररिंग्स??"
"मांजरींसाठी नाही, मी मुलींसाठीचं कानातले बनवते, माझा ऍमेझॉनवर बिझनेस आहे"
"ओह वॉव.. कसल्या इयररिंग्स?"
"मांजरीच्या नखासारख्या इयररिंग्स" मंजिरीने सांगितले
हे ऐकून तो चहावाला थांबलाच!! त्याने चहा सांडवला!! त्याला एक छोटा हार्ट अटॅक येऊन गेला. इरा फुल हँग!! नीरवने नकळत उजव्या कानाच्या पाळीला हात लावला, मी नकळत माझ्या हाताच्या नखांकडे बघू लागलो, मांजरीची नख कानात घालायची? खरं? का? कशाला? असे इयररिंग्स घालायला फारच डेरिंग लागेल.
"तुम्ही नखं काढून.....?"
"अरे नाही नाही..मी कॅट्सचे क्लॉज स्टडी करून, त्या आकाराचे इयररिंग्स बनवते"
"कॅट्सचे क्लॉज??"
"मांजरीची नख"
मंजिरी ऍमेझॉनवर ऑनलाईन इयररिंग्स विकत असे, या इयररिंग्स मांजरीच्या नखासारख्या असतं, मला मांजरींना नखं असतात हेच माहित नव्हतं. या इयररिंग्सच्या ब्रँडचं नावं "म्यावरिंग्स" असं होतं, बरं या म्यावरिंग्सला बाजारात खूप मागणी होती, म्यावरिंग्स ब्रँडची टॅगलाईन होती "नखशिखांत सौन्दर्यासाठी"

"पण तुम्ही सगळे इथे काय करताय?" मंजिरीने विचारले.
कारण आयुष्यात काहीच काम नाही.
"मैत्रिणीला भेटायला आलो होतो पण वॉचमनने आत जाऊन दिलं नाही" इराने उत्तर दिले.
"हो..सोसायटीचा तसा रुल आहे, कोणाला भेटायला आला होतात?" मंजिरीने विचारले
"नित्या निर्मिती"
"नित्या? तुम्ही नित्याचे फ्रेंड्स आहात?"
"तुम्ही नित्याला ओळखता?"
"हो, ती आमच्या विंगमध्येच राहते, पण तुम्ही एवढ्या रात्री?" मंजिरी म्हणाली.
"नित्याच्या वाढदिवस आहे ना"
"नित्याच्या वाढदिवस आहे?"
नित्याच्या वाढदिवस आज नव्हता, पण कसं सांगणार की एवढ्या रात्री नित्याचा बॉयफ्रेंड का नवरा किंवा जो काही प्रकार आहे ते बघायला आलो होतो.
"पण मग केक कुठं आहे?" मंजिरीने विचारले
एवढे प्रश्न? हा जास्त क्राईम पेट्रोल बघण्याचा परिणाम आहे.
"नित्या डाएट वर आहे ना" इरा म्हणाली.
"शुगर फ्री केक असतो ना"
"हो का? इथे कुठे मिळेल?" मी पटकन विचारले.
"एक मिनिट.." इराने मला थांबवले, मंजिरीला विचारले "तुम्ही नित्याच्या नवऱ्याला ओळखता?"
"हो, तो अमोघचा चांगला मित्र..." मंजिरी म्हणाली.
"अमोघ??"
"अमोघ, माझा नवरा"

आई शपथ!! अमोघ इज बॅक!! अमोघ आठवला का? तिसरा भाग मोघम अमोघवाला?
त्या दिवशी ब्रेकअप स्टोरी सांगत असताना, नित्या कोणाला तरी सारखे मेसेज करत होती, नीरवने अमोघ हे नाव नित्याच्या मोबाइलवर बघितले, अमोघच नित्याच्या बॉयफ्रेंड आहे हा निष्कर्ष काढला, मग नीरवने अमोघचा रिझुमे शोधून काढला, त्यावरून अमोघच लग्न झालं आहे हे आम्हाला कळलं, पण आम्हाला वाटलं अमोघने लग्न लपवून ठेवलं आहे आणि तो नित्याला फसवत आहे, म्हणून मग आम्ही अमोघला जाब विचारण्यासाठी फोन केला तर अमोघ म्हणाला की, नित्याला त्याच्या लग्नाबद्दल माहित आहे, पण मग अमोघच्या बायकोला वाटलं की नित्या आणि अमोघचं अफेअर सुरु आहे, म्हणून अमोघच्या बायकोने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की नित्याचं पण लग्न झालं आहे, तर अमोघची बायको म्हणजे मंजिरी, नित्याच्या लग्नाची बातमी देणारी मंजिरी, ती आमच्या समोर उभी होती.

बरं मंजिरीने तिचं खरं नाव सांगितलं होतं, पण आता माझ्या लक्षात नाही, तिला मंजिरीचं म्हणूया, एखाद्याला कशाला उगीच जास्त नाव ठेवायची?

"आपण तर आताच फोन वर बोललो" नीरव मंजिरीला म्हणाला.
"आपण फोनवर बोललो? कधी?" मंजिरीने विचारलं.
"आता संध्याकाळी, मी अमोघला फोन केला होता, मग तुम्ही मला फोन केला" नीरवने सांगितले.
"मी तुम्हाला फोन केला होता?" मंजिरीने विचारले.
"हो..तुम्ही रडत..आय मिन इमोशनल झाला होतात"
"हो मी पण तुमच्याशी बोलले" इरा चक्रावून म्हणाली.
"सॉरी पण आपण आज फोनवर बोललो नाही, तुम्ही कुठल्या अमोघबद्दल बोलताय?" मंजिरीने विचारले.
असं कसं? शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय काय?
नीरवने त्याच्या फोन काढला, अमोघचा नंबर मंजिरीला दाखवला.
"हा नंबर तर अमोघचा आहे, पण आपण फोनवर कधीच बोललो नाही" मंजिरीने सांगितले.
नीरवने माझ्याकडे बघितले, मी दोन्ही हाताने डोके पकडले, विचार करू लागलो ही जर अमोघची बायको आहे तर ती फोनवर कोण होती? नीरव आणि इरा कोणाशी बोलले?

"अमोघ घरी आहे का?" मी विचारले.
"नाही, तो आता बंगलोरला आहे" मंजिरी म्हणाली.
येस्स!! आता आलं लक्षात!! नीरव मंजिरीशी फोनवर नव्हता बोलला, त्याचं बोलणं अमोघच्या गर्लफ्रेंड बरोबर झालं होतं!! अमोघ बंगलोरला त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर आहे!! नीरवच्या फोनमुळे तिला वाटलं की अमोघ आणि नित्याचं अफेअर सुरु आहे, त्यामुळे ती फोनवर रडली. पण आता मंजिरीला माहित नसावं की तिच्या नवऱ्याची म्हणजे अमोघची गर्लफ्रेंड पण आहे, आता काय करायचं? मंजिरीला तिच्या अमोघच्या अफेअर बद्दल सांगायचं का? अमोघची तर वाट लागेल राव!!

"तुम्ही अमोघला फोन का केला होतात?" मंजिरीने विचारले
अरे यार आता काय सांगायचं?
"नित्याचा बर्थडे होता म्हणून सगळ्यांना बोलवत होतो" इरा पटकन खोटं बोलली.
"ओके..पण मग तुम्हाला असं का वाटलं की मी पण तुमच्याशी बोलले? तेव्हा अमोघ बरोबर कोण होतं?" मंजिरीने विचारले.
आता काय बोलणार? कसं टाळायचं?
"पण मग फोनवर कोण का रडलं?" मंजिरीचे प्रश्न संपत नव्हते.
आम्हाला काय बोलावं ते कळेना, मी इराकडे बघितले, तिने उजव्या हाताची तर्जनी हळूच ओठावर ठेवली. नकारार्थी मान हलवली, आता काय बोलणार? जी रडली ती तुमची सवत होती, तुमच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड होती. असं सांगायचं? मी आणि नीरव काही म्हणालो नाही, पण ज्ञिमित्रीने म्हणजे आपल्या नित्याच्या बॉयफ्रेंडने मंजिरीला विचारले...
"नित्याच्या हजबंडचं नाव काय आहे?"

क्रमश:

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला..
नित्याच्या नवऱ्याचं बारसं करूया, त्याला छानसं नाव देऊया...
मी नित्याच्या नवऱ्यासाठी गोंडस नाव शोधत आहे, तुम्हाला जर सुचलं तर प्रतिक्रिया देऊन कळवा Happy

हुश्श्य ऽऽऽऽऽ
संपली वाटते "साडेसा(ती)त" या लेखन मालीकेची.

आता तरी लवकर नवीन भाग येऊ देत रेऽऽऽऽ म्हाराजा.

चैतन्य, झालेला उशीर या भागाच्या पथ्यावर पडला आहे. वेळ घेऊन लिहील्यामुळे पंचेस दमदार आहेत. एवढे भाग लिहून कोणते "रत्न" शोधणार आहेस? रत्नेश नाव ठेव.

Lol तो चहावाल्याचा अख्खा प्रसंग कहर आहे.

झोपेतून उठून कोणी कसं काय चहा पाहिजे का विचारू शकतं? आणि म्हणे माणुसकी शिल्लक नाही.<<<<<< Rofl

नित्याच्या नवऱ्याचं नाव नूतन / नवीन ठेवा. म्हणजे ते नित्यनूतन किंवा नित्यनवीन होतील. पण सगळ्यांत कहर ज्ञिमित्रीचं नाव आहे. Lol

पाणीच आलं डोळ्यात(अर्थात हसून )...बिचारी नित्या..अजून किती आणि कोण कोण नमुने आहेत तिच्या नशिबात..सुपर्ब..मनातले विचार आणि शब्दांचे केलेले संधी, विश्लेषण , अलंकार आणि जे काय काय आहे ते..मस्त एकदम

नित्याचा नवरा ..नितीन होऊ शकतो , म्हणजे नित्याचा नित्या असे म्हणता येईल..

जबरदस्त झालाय हा भाग..! खूपच आवडला..च्याव म्याव.. Happy
सगळेच पंचेस नेहमीप्रमाणे छानच..!
चहावाल्याचा पॉरा कहर आहे.! Lol Lol Lol

पुढील भाग लवकर टाका..

पुर्ण भागात जागोजागी फटाके पेरुन ठेवले आहेस तु.सुर्पब. Happy Rofl
तरीही नित्याच्या नवर्याचे कोडे सुटेना.. ह्म्म...
अरे मग इरा अनै कथानायक काय ठरवल आहेस?? ते कसे सांगणार बाकीच्यांना ?? की एका पॅराग्राफ मधे त्यांना गुंडाळायच ठरवल आहेस ??? प्लीज अस नको करु.

मला स्वतःला इरा आणि कथानायकाच्या स्टोरीत जास्त इंटरेस्ट आहे नित्याच्या हजबंडपेक्षा. म्हणजे हजबंडच्या स्टोरीत. Happy

जबरदस्त भाग Lol

नियम नाव असतं की नाही माहित नाही पण मला पटकन हेच सुचलं. नित्यनियम. Lol

हा भाग भन्नाट आहे Happy
नियम नाव असतं की नाही माहित नाही पण मला पटकन हेच सुचलं. नित्यनियम. Lol >>> ज्ञिमित्री असू शकत तर नियम का नसावं ?? होउ दे खर्च Biggrin

कहर! "मांजरीच्या नखासारख्या इयररिंग्स" मंजिरीने सांगितले हे ऐकून तो चहावाला थांबलाच!! “
भयंकर हसलेय मी ह्या वाक्याला!! एक नंबर जमलाय हा भाग!

जसा पुढे पुढे वाचल तसा फिस्सकन हसायला येत गेले. जबरदस्त फार्सिकल वाटते. नित्याच्या नवर्‍याचे नाव नित्याच ठेव म्हणजे अजून धुमाकूळ घालता येईल. हवे असेल तर नित्याचा नवरा तो नसून ती आहे असे कर म्हणजे पोकळी भेदून अजून घोळ घालता येतील Happy

>>>> त्यामुळे त्याच्या हुंदक्यात लय होती, ती पण लSSय होती. <<<<
पंचेस तर सगळेच एकसे एक आहेत पण हा विशेष आवडला. Biggrin

नित्या च्या नव-याचं नाव "नवल" ठेवा.
नित्यनवल मधे पण लssssय लय आहे. Lol

हा भाग पण तुफान झालाय. पुभाप्र _/\_

सगळ्यांना मनापासून धन्यवाद, सगळ्या प्रतिक्रिया वाचून छान वाटलं, खूप आनंद झाला. अशा प्रतिक्रियांमुळे भरपूर ऊर्जा मिळते, त्यामुळे लगेच पुढचा भाग लिहायला सुरुवात केली आहे.

@अजय चव्हाण @पाथफाईंडर
हो या भागाला खूप वेळ लागला, मी पुढचा भाग लवकरच पोस्ट करेन,
मला या भागाच्या शेवटी एक ट्विस्ट द्यायचा होता, ट्विस्ट देऊ का नको असा विचार करत बसलो, म्हणून बराच वेळ गेला,पण नंतर वाटलं नको, अति होईल, म्हणून ट्विस्ट काढून टाकला, ट्विस्ट काय होता ते आत्ता सांगता येणार नाही. दुसरं कारण म्हणजे आयपीएल, मी संध्याकाळी मॅच बघत बसतो.

@अंकु @सस्मित
इरा आणि कथानायकाचं अजून तरी काही ठरवलं नाहीये, दोघे आनंदाने एकत्र राहत आहेत, नीरव, नित्याला त्यांच्या बद्दल काही माहित नाही, अशीच सद्य परिस्थिती आहे, पुढं त्यांच्या दोघांमध्ये काय होईल ते आत्ता तरी सांगता येणार नाही.

@असामी
नित्याच्या नवर्‍याचे नाव नित्याच ठेव, नित्याचा नवरा तो नसून ती आहे , असे कर<<<<<
हा खूपच भारी ट्विस्ट होईल, मी कधीच असा विचार केला नव्हता, यावर एक वेगळी कथा होऊ शकते

नितीन, नूतन, नवीन, रत्नेश, नित्यनूतन, नित्यनवीन, सत्या, नवल
नित्याच्या नवऱ्यासाठी ही बरीच कल्पक नावं मिळाली आहेत, अजून कोणाला नवीन नावं सुचलं तर नक्की कळवा Happy

पुन्हा एकदा, सर्वाना मनापासून धन्यवाद, मी नेहमीच आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघत असतो Happy

कहर आहे हा भाग देखिल
पंचेस तर भयानक
कोन आहे नित्याचा बाँफ्रे+नवरा
माझ्या मते नुतेंद्र नित्या चा नुतेंद्र

चैतन्य च्या या सिरीज चे भाग हल्ली ते हाय फाय रिसेप्शन मध्ये कस्टमाईझ व्हेज तवा असते ना, शिजलेल्या वेगवेगळ्या भाज्या तव्याच्या कडेला ठेवलेल्या असतात, आपण निवड सांगू त्या घेऊन ग्रेव्हीत परतून वाढल्या जातात, तसे असतात.☺️☺️ सगळे एकत्र किंवा वेगवेगळे कसेही वाचले तरी मजा येते.म्यावरिंग आवडली.
बाय द वे अमेझॉन वर खरंच कानात घालण्याचे मांजर, कुत्र्याचे पंजे, अख्खे मांजर, अख्खा पांडा असे बरेच प्राणी मिळतात ☺️☺️

Pages