काथ्याकूट: सारा पसारा (भाग आठ)

Submitted by चैतन्य रासकर on 17 September, 2018 - 14:27

काथ्याकूट: भाग एक
नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
मोघम अमोघ (भाग तीन)
इराची तऱ्हा (भाग चार)
उरातला केर (भाग पाच)
नकळत चघळत (भाग सहा)
हौशी चौकशी (भाग सात)
च्याव म्याव (भाग साडे सात)
जरी तर्री (भाग पावणे आठ)

बोनस बिनस:
ईशाचा इशू
................................................................................................................................

"मी चैतन्य, नित्याचा बॉयफ्रेंड" तो पोहेवाला म्हणाला.
चैतन्य?
नित्याच्या नवीन बॉयफ्रेंड?
पोहेवाला?
साधासुधा नाही तर तर्री पोहेवाला?
हे ऐकून, मी दोन्ही कानावर हात ठेवून किंचाळणार होतो, पण पोहे खाताना कसं किंचाळणार? किंवा किंचाळून झाल्यावर मग पोहे कसे खाणार?

चैतन्य धक्कादायक होता, त्याला बघून नीरवला मोठा धक्का बसला, त्याच्या हातातली नोट स्लो मोशन मध्ये खाली पडली, इराने खाली पडलेली नोट उचलून नीरवच्या जीन्सच्या खिश्यात कोंबली, मग इरा अगदी बारीक डोळे करून चैतन्यला बघू लागली. इराला बहुतेक चष्मा लागलाय.

मला काय वाटतं, नित्याचे दोन प्रकारचे बॉयफ्रेंड्स आहेत, न दिसणारे आणि दिसणारे!! न दिसणारे बॉयफ्रेंड्स कुठेच दिसत नाही, दिसणारे बॉयफ्रेंड कुठे ही दिसू शकतात. कसे ही असू शकतात. पहिला दिसला तो ज्ञिमित्री, एकदम गोड पोरगा हो आणि आता हा तिखटया, चैतन्य.
कारण हे तर्री पोहे इतके तिखट होते की, माझा जठराग्नी कायमचा विझला. प्रेम आंधळं असतं, नित्याचं प्रेम तिखट निघालं.

माझ्या भरल्या डोळ्यांकडे बघत चैतन्य म्हणाला "पोहे तिखट एSS"
अरे तू ओरडत आहेस? का सांगत आहेस? का आवाहन करत आहेस? का तू विचारत आहेस? का तू असाच आहेस?
"तिखट नाही खारट" मी म्हणालो.
"खारट?"
"अरे पोहे इतके आवडले की डोळ्यात पाणीच आलं" मी शर्टच्या बाहीने डोळे पुसत म्हणालो.
"मग?"
"हेच पाणी पडून पोहे खारट झाले" मी म्हणालो
"तुला दोन दिवस व्हाट्सअॅपवर ब्लॉक करते" इरा तिचा फोन बाहेर काढत म्हणाली.
"का?"
"या जोकसाठी" इरा मला म्हणाली.
"अगं जोक नाही खरंच...."
"हो खरंच पोहे खूप टेस्टी आहेत" नीरव म्हणाला,
टेस्टी नाहीत चिकट आहेत, हे पोहे आहेत का भात? पोहे चिकट, तर्री तिखट, तर्रीत मीठ चवीप्रमाणे, तिखट मनाप्रमाणे, पाणी मिळेल त्याप्रमाणे, स्वच्छता सवयीप्रमाणे, तरी आपण म्हणायचं छान ए!!

"बस्स का भावा, तू पन्ना" असं म्हणत चैतन्यने मला अजून पोहे दिले, आधीच हे पोहे खाऊन पोट वाढले होते, आता हे परत वाढलेले पोहे कसे खाऊ? कारण समोर वाढलेलं अन आधी खाल्लेलं, पचवावं तर लागत.

चैतन्य तर्री मध्ये ढवळा ढवळ करत म्हणाला "माझी तर्री नित्याला जाम आवडते"
तुझी तर्री खाऊन माझं पोट जॅम झालं, त्याचं काय? पोह्यांबरोबर फ्रुट जॅम सुद्धा देत जा, एवढं तिखट कोण करतं? तिखट बनवताना निदान गोडं तेल वापरात जा. तुझी तर्री जरी बरी असली, तरी ही तर्री उरी जात नव्हती.

सूर्योदय नुकताच झाला होता, कोवळ उन अँड ऑल, आकाशात लाल रंगाची उधळण, तर अशावेळी मी, नीरव आणि इरा चैतन्यच्या स्टायलिश तर्री पोहे स्टॉलवर उभे होतो. हा स्टॉल म्हणजे पूर्वीच्या काळी क्रीम कलर असलेलं, तीन फूट उंच, प्लास्टिकचं टेबल, त्यावर दोन मोठे स्टेनलेस स्टीलचे डबे, एका डब्यात भात, त्याला चैतन्य पोहे म्हणत होता, दुसऱ्या डब्यात लाल रंगाचे पाणी, त्या पाण्याला तो तर्री म्हणत होता. त्या टेबलवर अजून एक अदृश्य डबा असावा, त्यात तिखट ठेवले असावे. एका छोट्या डब्यात पावशेर शेव ठेवली होती, ही शेव सुद्धा तिखट असावी, दुसऱ्या बाजूला ताटल्या, चमचे ठेवले होते, या ताटल्या चमचे धुतले असावेत किंवा धुवायचे आहेत म्हणून तिथे ठेवले असावेत.

"तू प्रॉपर कुठला आहेस?" इराने चैतन्यला विचारले.
"मी फक्त इमप्रॉपर ए" चैतन्य हसत म्हणाला, तसे नीरव, इरा हसले, अरे वा, हे बरंय, माझ्या जोक्समुळे मला व्हाट्सअॅपवर ब्लॉक करणार, या जोकला हसणार? ते पण खळखळून? दोन आठवड्यापूर्वी टीव्हीवर "माहेरची साडी" बघताना, इरा खळखळून हसली होती, त्यानंतर आत्ताच!! चैतन्यचा ऍक्सेंट फारच वेगळा होता, हा कुठला आहे? कोकण, विदर्भ. मराठवाडा, खान्देश, का अंदमान निकोबार?

मी चैतन्यला निरखून बघू लागलो, चैतन्याच्या त्वचेचा रंग पिवळसर होता, पोह्यांमुळे का कावीळ? त्याचा शर्ट त्याच्या केसांसारखा होता, रंगीत!! त्याने फुला फुलांचा फुल बाह्याचा रंगीत शर्ट घातला होता, त्याच्या शर्टला पोहे चिकटलेले होते, त्या पोह्यांना बरंच काही चिकटलं होतं, त्याच्या मनगटावर घड्याळासारखं काहीतरी होतं, दुसऱ्या मनगटावर तीन रंगाचे तीन गंडे, दोन रंगांचा एक कडा होता.

चैतन्यने फाटलेली जीन्स घातली होती, ही जीन्स फाटली म्हणजे आटली होती, म्हणजे विरळ झाली होती, पूर्वीच्याकाळी वेळी नदी, विहीर आटलेली असायची.आता जीन्स सुद्धा आटते. कदाचित आटलेल्या पाण्यात धुतल्यामुळे जीन्स आटत असावी. "स्टॉलवर नाही चूल, तरी मी कुल" असा सगळा याचा प्रकार होता.
नीरवने त्याच्या मोबाईलने या तर्री पोह्यांचा फोटो काढला, चैतन्यने त्याला विचारले "शेअर करतोय?"
"हो"
"माझं पोह्यांचं पेज टॅग कर ना"
पोह्यांचं पेज? आमच्या वेळी भाताची पेज होती, एवढा काळ बदलेल असं वाटलं नव्हतं.
"काय नाव आहे?"
"तरतरात तर्री पोहे" चैतन्य म्हणाला.
"काय?"
"तरतरात तर्री..."
अरे ए... तुला तर्री चढली की काय?
"तरतरात म्हणजे?"
"तरतरात म्हणजे बेस्ट, आमच्या गावाकडं म्हणतात" चैतन्यने सांगितले.
आमच्या गावाकडे तर म्हणत नाहीत, बहुतेक आमच्या गावाला काहीच बेस्ट नाही.
"तुला तर्राट म्हणायचं का?" इराने चैतन्यला विचारले आणि मराठीचा तास सुरु झाला.
"तेच ना.. तरतरात"
"तर्राट ना?"
"हा.. तरतरात"
"तरतरात नाही तर्राट..." इरा थयथयाट करत म्हणाली, इरा मधला मराठी माणूस जागा झाला, इराच्या लक्षात येत नव्हतं की, त्याच्या पोह्यांना त्याने नाव दिलं आहे, त्या नावाचा उच्चार, अर्थ, वापर संदर्भ, फोड ही त्यालाच ठरवू दे ना. आपण कशाला स्वतःचा तळतळाट करून घ्यायचा?

"नित्या भेटली?" चैतन्यने आम्हाला विचारले.
"नाही ना, आम्हाला तिचा फ्लॅट नंबर माहित नाही"
"बी विंग, फ्लॅट नंबर चौदा" चैतन्य एका दुसऱ्या गिऱ्हाईकला पोहे देत म्हणाला.
"नित्याचा फोन पण बंद आहे" नीरव म्हणाला.
"का?" असं विचारात लगेच चैतन्यने जीन्सच्या खिश्यातुन फोन काढून, नित्याला फोन लावला, पण फोन लागला नाही "फोन का बंद ए?" चैतन्यने परत फोन लावत विचारले.
अरे हे तुला माहित हवं ना? बॉयफ्रेंड कोण ए?

"ए तुम्ही दोघ पहिल्यांदा कुठे भेटला होतात?" इराने चैतन्यला विचारले.
"मंडईत"
"मंडईत?"
"हा.. भाजी मंडईत"
आता माझ्या डोक्याची मंडई झाली, अरे मंडईत कसं प्रेम होतं? काय प्रोसेस असते? कुठल्या भाज्या बघून रोमान्स सुचला? फरसबी? का कोबी? का माठ घेताना प्रेमात माठ झालात? मंडईत साधं पडायला जागा नसते, तुम्ही प्रेमात कसे पडलात?
"कसं काय?" नीरवने विचारले,
चैतन्य लव्ह स्टोरी सांगू लागला "त्या दिवशी बटाटे लय महाग होते, चार किलो कांदे पकडून हाताला रग लागली होती...."
वाह.. काय ते वर्णन, तू लेखक का नाही होतं?
"त्यात कोथींबीर, लिंबू बी मिळेना" चैतन्य पुढे सांगत होता, पण मला पुढचं सगळं माहित होतं.
चैतन्य कोथींबीर, लिंबू शोधत असताना, मंडईत पाऊस आला, कारण पावसाशिवाय प्रेम होतं नाही, कडक उन्हात "आय लव्ह यु" कोण म्हणतं का? तर पाऊस आला, चैतन्यच्या डोक्यातले बटाटे, पिशवीतले कांदे भिजू लागले, म्हणून त्याने आडोसा घेतला, तेवढ्यात, अचानक वीज चमकली धुडूम.. गुडगुडुम!!! ह्याट, ही तर लहान मुलांची वीज झाली, जाऊ दे, तर त्या भर पावसात एक मुलगी, म्हणजे आपली नित्या भर मंडईत, हातातल्या पिशव्या अन डोईवरचे केस बाजूला करून उड्या मारत, नाचू लागली, कुठूनतरी गरीब लहान मुलं आली, नित्याबरोबर नाचू लागली, असं नित्याला नाचताना बघत असताना, चैतन्य स्वतःशीच म्हणाला "अशीच घेताना भाजी, होशील का माझी?"

पण चैतन्यची "मंडई द लव्ह स्टोरी" काहीतरी वेगळीच होती.

चैतन्य फुल्ल ऑन ऍक्टिंग करत सगळं सांगत होता, "मला एका गाळ्यावर कोथिंबीर दिसली, मी त्या गाळ्यावर गेलो, कोथिंबीर अशी हातात उचलली अन विचारलं, कशी दिली?"
"मग?"
"त्या गाळ्यावर एक मुलगी मटार सोलत बसली होती" चैतन्य पुढे सांगू लागला "ती मुलगी म्हणाली तुम्हाला किती पाहिजे? मग मी विचारलं तुम्ही किती देणार?"
हे असं फ्लर्टींग? भाजी घेताना? मंडईत? तुला ना त्या मंडईतून तडीपार करायला पाहिजे.
"पण नित्या कुठे भेटली??" इराने न राहवून विचारले.
"तिच तर होती ना"
"कोण?"
"नित्या, त्या दिवशी गाळ्यावर मटार सोलत..." चैतन्य म्हणाला.
'काय??"
"हा.. नित्याचा मंडईत गाळा ए" चैतन्य म्हणाला.
नित्याचा मंडईत गाळा? हे नित्याने आम्हाला सांगायचं का गाळलं? तिला काय वाटलं आम्ही भाज्यांवर डिस्काउंट मागू?
"नित्याचा मंडईत गाळा?" इराने विचारले.
"नित्याचा म्हणजे तिच्या मामाचा गाळा ए, ती तिथं असायची" चैतन्यने स्पष्ट केले.
"हे काहीच माहित नव्हतं" मी म्हणालो.
"तुम्हाला माईत नाय?" चैतन्यने विचारले.
"नाही ना.. नित्या काहीच सांगत नाही" नीरव म्हणाला.
"नित्याचं कसं ए, तिला अनावर झालं की आपल्या कानावर येणार" चैतन्य पैसे मोजत म्हणाला.
"हो बरोबर..." नीरव भानावर येत म्हणाला.

माझा श्वास आता जलद चालला होता, त्यात विश्वास बसत नव्हता, नित्या भाज्या विकायची? ते पण मटार सोलत? कसं शक्य आहे?
"नित्या भाज्या कधीपासून खाऊ लागली?" मी लगेच विचारलं.
"हो ना.. कॉलेजमध्ये सॉस बरोबर पोळ्या खायची" नीरव म्हणाला.
"तेच सॉसचे पाऊच मॅक-डी मधून आणायची"
"अजून पन ती भाजीला राजी होतं नाही" चैतन्य म्हणाला.
"तिला चिकन फार आवडायचं" नीरव म्हणाला.
आवडायचं? अरे ए...ही शोक सभा नाहीये.
"हा..तिचं कसं असतं, घरात नाय किचन, तरी पाहिजे चिकन" तर्री वरचा तवंग अलगद बाजूला काढतं, चैतन्यने विचारले "अनिकेत नाय आला?"
"तुला अनिकेत माहितेय?"
अनिकेत म्हणजे इराचा एक्स दादला, दादला काय दाद देत नव्हता, कुठंतरी दडून बसला होता, अनिकेत आणि इराचा डिव्होर्स झाल्यावर अनिकेत आम्हा कोणालाच भेटला नव्हता.

"हा.... अनिकेत आम्हाला भेटला होता" चैतन्यने सांगितले.
"आम्हाला म्हणजे?"
"मला अन नित्याला" चैतन्य म्हणाला.
"कुठे?" इराने विचारले.
"छबिन्याला" चैतन्य पोह्याचा डबा हलवत म्हणाला.
"छबिन्याला?"
बागेत, कॉलेजमध्ये, मॉलमध्ये, किंवा फेसबुकवर अशा नॉर्मल जागी तुला कधी कोण भेटलं आहे का?
"मी नित्याला म्हटलं आलाय छबिना, आपण जाऊ ना, तिकडं गेलो, तिथंच अनिकेत पन भेटला" चैतन्य म्हणाला.
"छबिना म्हणजे?" नीरवने विचारले.
"फेअर"
"कुठला फेअर? खूप फेअर आहेत" नीरवने फेअर मुद्दा मांडला.
"खूप कसे काय?"
"फेअर क्रीम, दॅट्स नॉट फेअर, एअर फेअर, फेअर वेल" नीरवने फेअर मुद्दा मांडला.
"छबिना म्हणजे फनफेअर" इराने फेअरली सांगितले.
"अनिकेत छबिन्यात काय करत होता?"
"त्याचा आकाश पाळणा आहे ना" चैतन्य म्हणाला.
"काय?"
"हा.. छबिन्यात त्याचा आकाश पाळणा फेमस होता, आम्हीपन पाळण्यात बसलो ना" चैतन्य म्हणाला.
अनिकेतचा छबिन्यात आकाश पाळणा? अनिकेत एवढा वर जाईल असं वाटलं नव्हतं, एकीकडे गाळा, दुसरीकडे पाळणा, मला आता काय बी कळ ना...
मी आणि नीरवने इराकडे बघितले, तिने सुद्धा ही बातमी पचवायला वेळ घेतला.
"त्याला आकाश पाळणा आवडायचा, विकत घेईल असं वाटलं नव्हतं" इरा म्हणाली.
"आकाश पाळणा घेतला आणि बघायला बोलावलं पण नाही" नीरव हताश होऊन म्हणाला.
कसं बोलावणार? पाळणा घेतलाय, या बसायला...

"तुमचा मग.... समेट केला का चेकमेट झाला?" चैतन्यने इराला विचारले.
"म्हणजे?"
"म्हणजे मिलन केलं का सहन केलं?" चैतन्य परत विचारले.
"म्हणजे?"
"बेटर केला का सेकंड केला?"
"म्हणजे?"
अरे ए, तुला नेमकं काय होतंय? तुला काय म्हणायचं?
"एक मिनिट...तुला डिव्होर्स झाला का? असं विचारायचं का?" इराने थेट विचारले
"हां तेच.."
त्यावर इराने 'हो' असं उत्तर दिलं, तसा चैतन्य म्हणाला "पण अनिकेतने काडीमोड लय मनावर घेतला"
"का? काय म्हणाला?" इराने पटकन विचारले.
"भेटला तेव्हा मोक्कार रडला" चैतन्य म्हणाला.
मोक्कार? आमच्याकडे धाय मोकलून, भोकाड पसरून, गदागदा, जोरात, धो धो, कोरडे, सदैव, हळूच, घळघळ, भेसूर, नाटकी रडतात, अजून तरी कोणी असं मोक्कार रडलेलं नाही.
"मोक्कार म्हणजे?" आमच्या प्रगत मित्राने विचारलेच.
"मोक्कार म्हणजे कारमध्ये जेव्हा रडतात...." मी नीरवला म्हणालो.
"अनिकेत का रडला?" इराने विचारले
"जाऊ दे ना.. आता कशाला?" चैतन्य विषय टाळत म्हणाला
"सांग रे"
"अनिकेत म्हणाला...." तर्रीच्या डब्यात बघत चैतन्य म्हणाला, अरे ए.. तर्रीत काय पडलं होतं?
"काय?"
"अनिकेत म्हणाला.... बायको लय दारू प्यायची" चैतन्य सावकाश म्हणाला.
"काय?"
"हा.. तो म्हणाला बायको दारू प्यायची मग मारायची"
"व्हॉट द हेक... असं म्हणाला?" इराने चिडून विचारले.
"ही कधीच दारू पिऊन मारणार नाही" नीरव इराची बाजू घेत म्हणाला.
आधी मारून मग ती दारू पिऊ शकते.

इरा भडकली, हा तिखट तर्रीचा परिणाम आहे, शांत माणूस पण लगेच चिडतो, तिचा चेहरा लाल झाला, इरा हल्क झाली होती, तिने नकळत स्टेनलेस स्टीलच्या चमचा वाकवून त्याची पार बांगडी केली, नीरवने इराच्या हातातून बांगडी घेतली, त्याच्या परत चमचा केला, चैतन्यला परत दिला.

"अनिकेत इराचा डिव्होर्स" हा खरं तर अभ्यासाचा विषय. पण या डिव्होर्सचा सोर्स काय होता? कारण काय होतं? हे कोणालाच माहित नव्हतं. डिव्होर्सचं खरं कारण विकिलिक्सला सुद्धा माहित नसावं. डिव्होर्स झाल्यानंतर इराने घर सोडले आणि माझ्याबरोबर राहू लागली, डिव्होर्स का झाला? हे विचारल्यावर इरा म्हणाली अँड आय कोट "संसाराचा कंटाळा आला, कंटाळ्याचा संसार झाला" हे ऐकल्यावर मला परत काही विचारायचा कंटाळा आला. मग आम्ही एकत्र राहू लागलो, त्यानंतर आमच्या दोघांबरोबर हे डिव्होर्सचं सीक्रेट पण राहू लागलं.
इरा अनिकेतला मारायची? हे खरं होतं? का अनिकेत इराला व्हिलन ठरवत होता? तिच्याबद्दल खोटं बोलत होता? पण याचा इराला प्रचंड राग आला होता. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं होतं.

नीरवच्या पण लक्षात आले, तो चैतन्यला म्हणाला "चला नित्याकडे जाऊ"
"नाय ना राव... मी हे सोडून कसं येऊ?" चैतन्य तर्रीच्या डब्याकडे हात दाखवून म्हणाला.
"आपण जायचं?" मी विचारले, तसं नीरवने 'हो' म्हणून मान डोलावली.
"सॉरी बरं का पन..." चैतन्य पुढे काही म्हणणार तेवढ्यात इराने "इट्स ओके..." म्हणून विषय संपवला. इमोशनल विषयाला ऑप्शनला ठेवून, चैतन्यला बाय करून, आम्ही नित्याच्या घरी निघालो, मला तर्री पोह्याची गाडी काढायला किती खर्च येतो? नफा किती मिळतो? हे जाणून घ्यायचं होतं, पण इराचा मूड ऑफ झाला होता, म्हणून आम्ही तिथून हळूच सटकलो.

आम्ही नित्याच्या सोसायटीकडे निघालो, नित्याच्या खरा फ्लॅट नंबर कळालाच होता. मी इराकडे बघितले, इरा काही बोलत नव्हती.
"मग खरा बॉयफ्रेंड कोण? ज्ञिमित्री का हा?" नीरवने विचारले.
"हाच असेल, याने आपल्याला ओळखले ना" मी म्हणालो .
"हम्म.. ज्ञिमित्रीला आपल्याबद्दल काहीच माहित नव्हते" नीरव म्हणाला.
ज्ञिमित्री बॉयफ्रेंड नसावा असा निष्कर्ष निघाला, कारण चैतन्यला आमच्याबद्दल बरीच माहिती होती, पण मग काल रात्री ज्ञिमित्री इथे का बसला होता? याचं उत्तर आता नित्याचं देऊ शकली असती.

मी इराकडे बघितले, ती शांतपणे चालत होती, काही बोलत नव्हती, आम्ही परत त्याच बेंचकडे आलो, जिथे आम्हाला ज्ञिमित्री भेटला होता, इरा पटकन त्या बेंचवर जाऊन बसली, नीरवने माझ्याकडे बघितले, मला सुद्धा काय बोलावे ते कळेना.
"स्ट्रेसला करू ऍड्रेस" हा विचार करत, नीरव हळूच इराच्या शेजारी जाऊन बसला, "काय झालं?" नीरवने विचारले, पण इरा काही म्हणाली नाही, ती खाली बघत होती, तिच्या डोळ्यात पाणी साचले होते, मी थोडं लांबूनच या दोघांना बघत होतो.
"तू कशाला मनावर घेते.." नीरव जसा म्हणाला, तशी इरा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली, मला इराला रडताना बघायचं नव्हतं, म्हणून मी नजर फिरवली, अनिकेतने असं म्हणायला नको होतं.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने, फॉर्मल शर्ट पॅन्ट घातलेले एक काका, दोन्ही हातात पिशव्या घेऊन, रडणाऱ्या इराकडे बघत येत होते, त्यांच्या हातातल्या पिशव्या फारच मोठ्या होत्या, एका पिशवीत आस्था आणि दुसऱ्या पिशवीत आपुलकी असावी, कारण त्यांनी इराकडे बघत मला विचारलं "काय झालं?"
"डिव्होर्स झाला" मी उत्तर दिले.
"या दोघांचा?"
"नाही नाही.. या दोघांचं काहीच होणार नाही"
"मग?"
"हे आपलं सांत्वनाला बसलेत"
"डिव्होर्स कसा झाला?"
"काय सांगू... आज कालची तरुण पिढी, नात्यांची किंमत नाही हो, आपल्यावेळी असं नव्हतं.." मी काकांचा डायलॉग काकांनाच मारला.
"तुम्ही पण यंग दिसताय" काका मला म्हणाले.
"नाही हो.. कसला यंग? गुडघे दुखतात, पाठीचं तर विचारू नका, आयुष्य फार कष्टात गेलं...." मी असं म्हणत असताना काकांनी माझ्या ढेरीकडे बघितले, तोपर्यंत इरा आणि नीरव माझ्या शेजारी येऊन उभे राहिले, सीआयडी काकांनी लगेच इराला विचारले "काय गं? कसा झाला डिव्होर्स?"
इरा अनपेक्षित प्रश्नाने क्षणभर गोंधळली, पण पटकन, डोळे पुसत म्हणाली "आमच्याकडे पोळ्या लाटायला मुलगी यायची"
"मग?"
"पोळ्या लाटता, लाटता.... तिने नवरा कधी लाटला कळलंच नाही" इरा शांतपणे म्हणाली.
यावर नीरव अन मी खोकत खोकत हसलो, मी काकांकडे बघितले, त्यांना हे सगळं खरं वाटतं होतं, त्यांनी इराला विचारले "अरेरे...असं कसं झालं? आता काय करतेस?"
"आता ब्रेड बरोबर सगळं खाते, पोळी सुटली ती कायमची" इरा म्हणाली. काकांना काय म्हणावे ते कळेना, त्यांनी जाता जाता "पोळ्या करायला शिक" असा सल्ला दिला, या सल्याचं आत्मिक समाधान घेऊन, ते काका निघून गेले गेले.

आम्ही नित्याच्या सोसायटीच्या गेटवर आलो, गेटवर आता एक नवीन वॉचमन होता, "किती दिवस मारतोय लाईन, हो ना माझी व्हॅलेन्टाईन, कशाला टेन्शन घेते, तुझ्या भावाला बघून घेईन" हे श्रवणीय गाणं ऐकण्यात दंग होता, 'ईन' हा शब्द गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये रिपीट होत राहतो. वॉचमनने आम्हाला त्याच्या वहीत नावं लिहायला लावली, आम्ही स्वतःची नावं लिहून सोसायटीच्या बी विंगकडे जाऊ लागलो.
"हा कसला होता ना...." मी चैतन्याचा विषय काढला.
"नित्याशी याचं कसं काय जमलं असेल?"
"ए तुम्ही त्याच्या छातीवरचा टॅटू बघितला?" इराने विचारले
"कसला टॅटू?"
"त्याच्या छातीवर फुलपाखराचा टॅटू होता"
छातीवर फुलपाखरू? मग पोटावर फुलं आहेत का? ते फुलपाखरु काय रिप्रेझेन्ट करतं? काय विचार असावा?.
"पण तू त्याची छाती का बघत होती?" नीरवने इराला विचारले.
"ए गप रे, मी बघत नव्हते, मला दिसलं" इरा म्हणाली.
"असं कसं दिसलं?"
"अरे त्याने शर्टची पहिली दोन बटणं लावलीच नव्हती, तुम्हाला नाही दिसलं?" इराने विचारले
"अजिबातच नाही"

अशा फारच धीर गंभीर, मौलिक, तात्विक गप्पा मारत, आम्ही बी विंगच्या फ्लॅट नंबर चौदा समोर पोहचलो. चैतन्यने सांगितल्याप्रमाणे हा नित्याच्या फ्लॅट होता, या फ्लॅटच्या दारावर एक नावं होतं, पण ते खोडलं होतं, नीरवने बेल वाजवली, तसा मी हळूच दारावर डावा कान लावला, आतलं ऐकू लागलो, तसं दार उघडलं गेलं!!
दार उघडच होतं, आतून कोणी लॉक केलं नव्हतं.
आम्हाला आश्चर्य वाटलं, मी दार ढकललं, पण आतमध्ये कोणीच नव्हतं, अंधार होता, काहीच लगबग दिसत नव्हती. मग नीरवने नित्याच्या नावाने तीन चार वेळा हाका मारल्या, पण हाकेला उत्तर आलं नाही.
"आत जायचं का?" नीरवने विचारले.
"आत जाऊन काय करणार?"
"चहा करू..." मी म्हणालो.

तेवढ्यात, आमचा आवाज ऐकून, दोन तीन वर्षाचं, दोन तीन फूट उंच असलेलं, लहान मुलं दुडूदुडू धावत हॉलमध्ये आलं, त्या मुलाच्या हातात एक खेळण्यातील गाडी होती, तो धावत आला, थांबला, त्याने क्षणभर आमच्याकडे बघितलं, परत धावत आमच्याकडे आला, तसं इराने त्याला खाली वाकून अडवलं, त्याला उचलून कडेवर घेतलं.
"काय रे? तुझं नावं काय?" मी त्या मुलाला विचारले, पण त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. इरा त्याच्या बरोबर खेळू लागली, नीरव त्या लहान मुलाकडे निरखून बघत होता.
"घरात कसं कोणी नाही?"
आम्ही परत नित्याला हाका मारल्या, तेवढ्यात आतल्या खोलीतून, पटकन कोणीतरी बाहेर आलं, परत आत गेलं!! अरे तुम्ही काय लपाछपी खेळताय का? बाहेर या...

नीरव अजून ही त्या लहान मुलाला निरखून बघत होता, मी नीरवला खुणेनेच "काय झालं?" असं विचारलं.
"याचं कपाळ, नाक..." नीरव एवढचं म्हणू शकला.
मी पण त्या मुलाला निरखून बघितलं आणि माझा 'आ वासला' गेला!!
"काय झालं?" इराने विचारलं.
"हा नित्याचा..?" नीरव एवढचं म्हणू शकला.

तेवढ्यात हॉल मध्ये एक मुलगा आला.
"सॉरी.. मी आत अंघोळ करत होतो..." तो मुलगा कसानुसा हसत आम्हाला म्हणाला.
घराचं दार उघडं ठेवून अंघोळ? वा... तू खतरों के खिलाडी मध्ये का जात नाही? आम्ही त्या मुलाला बघितलं, हा मुलगा वयाने आमच्यापेक्षा लहान दिसत होता, तशी सगळीच मुलं माझ्यापेक्षा वयाने लहान दिसतात, याने पांढऱ्या लुंगीवर काळं लेदर जॅकेट घातलं होतं, मी माझ्या आयुष्यात अंघोळीनंतर किंवा अंघोळीआधी असं काही घातलं नव्हतं. त्याने इराकडून त्या लहान मुलाला स्वतःच्या कडेवर घेतलं.

"दार उघडच होतं..." इरा लुंगीवाल्या मुलाला म्हणाली.
"ओह.. सॉरी.. कडी लूज झालीय" तो मुलगा म्हणाला.
"नित्या आहे का?" नीरवने विचारले.
"आहे ना.. आपण?" त्या मुलाने विचारले.
"आम्ही तिचे फ्रेंड्स..तिला भेटायला आलो होतो" नीरव म्हणाला.
"ओह.. या ना.."
"तुम्ही?"
"आय एम सात्विक.. हर हजबंड"

क्रमश:

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नित्या आहे की Matrix चे पात्र? सगळीकडे आणि सगळ्यांबरोबर असूनदेखील कुठेच नाही...
बाकी लिहीलय नेहमीप्रमाणेच भन्नाट.

नफा किती मिळतो? हे जाणून घ्यायचं होतं, पण नित्याचा मूड ऑफ झाला होता, म्हणून आम्ही तिथून हळूच सटकलो. >>> इथे इराचा मूड असं पाहिजे ना?

बादवे, हे नित्याचं गूढ वाढतच चाललंय Proud मस्त चाललीये कथा.

@धनवन्ती
नित्या आहे की Matrix चे पात्र?
मग नित्याचं नाव निओत्या ठेवावं लागेल Biggrin

@rmd
मनापासून धन्यवाद, योग्य तो बदल केला आहे Happy

मला आता हे वाचून ' ऑपरेशन यमू' या भन्नाट पुस्तकाची आठवण यायला लागली आहे Lol त्यात त्या सगळ्यांना यमू वेगवेगळी दिसते.
मधे एका ठिकाणी नीरव ऐवजी अनिकेत झालं आहे. काकांच्या प्रसंगात.

नित्या भारीये.
पंचेस जमलेत. नेहमीसारखंच छान वाटलं वाचुन.

छान आहे पण यावेळचे पंचेस नेहमीसारखे खळ खट्याक नाही बसले.. नेहमीसारखी मजा नाही आली.>>+१

मस्त्च.!
पंचेस नेहमीप्रमाणे .. Lol
फक्त पुढचा भाग लवकर येऊद्या.. नाहीतर लिंक लागत नाही. आणि जास्त न ताणता शेवट करा प्लीज...
सिरीज पूर्ण झाली की सगळे भाग एकत्र पोस्ट करा..वाचायला मजा येईल..!

मस्त झालाय हा भाग सुद्धा !!! नित्याचा सस्पेन्स कळण्याची काही घाई नाही. सस्पेन्सकडे जाण्यातच मजा वाटतेय.

अरे तुला आता पकडून मारला पाहिजे, किती ती डोक्याची मंडई करावी एकाने. किती ती पात्रे, कीती तो गोंधळ

चैतन्य पोहेवाला नक्कीच फायनल हिरो असणार कथेचा!!!
लेखकाने आवडते नाव वापरले आहे ना, म्हणून Proud Light 1
फक्त पुढचा भाग लवकर येऊद्या.. नाहीतर लिंक लागत नाही. आणि जास्त न ताणता शेवट करा प्लीज.. +११११११

अरे तुला आता पकडून मारला पाहिजे, किती ती डोक्याची मंडई करावी एकाने. किती ती पात्रे, कीती तो गोंधळ
Submitted by आशुचँप on 18 September, 2018 - 15:25
>>>>
मी तर दुसर्या भागापासून हेच म्हणतोय. Rofl Light 1

जागडगुत्ता Rofl Rofl
तो तर्री पोहे वला चैतन्य तूच ना Rofl Rofl

बस्स का भावा, तू पन्ना >>>>> देवाSSSS , किती वेळ लागला मला हे वाक्य समजायला Biggrin
शब्दच्छल जास्त झालाय यावेळी , पण मज्जा आली .
नित्याचं घर सापडलं , तिचा एक्स-बॉफ्रे सापडला , बॉफ्रे सापडला , नवरा-मुलगा सगळे सापडले .
फक्त नित्या काय सापडेना .
अनिकेत घेउन गेला की काय तिला ????

@ धनि
चैतन्य तर्रीमास्तर नगरचे की काय ?
नाही हो.. हा चैतन्य वेगळाच आहे Happy

धन्यवाद मैथेलि, चैत्रगंधा

@वावे
योग्य तो बदल केला आहे

@हिम्सकूल
गुंता असं काही नाही, सरळ साधी गोष्ट आहे, तीन मित्र त्यांच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड/हजबंड शोधत आहेत, एवढंच आहे.

@श्रद्धा
सात्त्विक हसबंड कसा शोभेल?
शोभेल पण सोसेल का? Biggrin

@मॅगी @कोमल १२३४५६
पुढच्या भागात अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो Happy

@सस्मित
मनापासून धन्यवाद, तुमच्या प्रतिसादाची तर नेहमी वाट बघत असतो Happy

@बी.एस.
तुम्ही मागच्या भागाला म्हणाला होतात की, याचे किती ही भाग झाले तरी चालतील
कथानक जर लवचिक असेल, ताणायला काहीच हरकत नाही Happy

@गोल्डफिश
मनापासून धन्यवाद, माझ्या मनातलं बोललात Happy

@आशुचँप
अरे तुला आता पकडून मारला पाहिजे Rofl Rofl Rofl

@किल्ली
या कथेत तसं हिरो कोणी नाही, कारण हिरो सारखं कोणीच वागत नाही
मला वाटतं, कथेचा शेवट शोधण्यापेक्षा, कथेचा आत्मा शोधायचा प्रयत्न झाला, तर त्याचा फायदा कथा लिहिताना होतो.

@पाथफाईंडर @ द्वादशांगुला
मनापासून धन्यवाद Happy

@ प्रिती विराज
नाही हो.. हा चैतन्य फार वेगळा आहे. दोघांचा एकमेकांशी तीळ मात्र संबंध नाही.
मी तर्री पोह्याची गाडी सुरु करणार होतो, पण नंतर कळालं की त्यासाठी पहाटे उठावं लागतं, म्हणून विचार सोडून दिला Biggrin

@स्वस्ति
मनापासून धन्यवाद, तुम्ही सोप्या शब्दात कथेचं सार सांगितलं आहे, मला नाही वाटतं, अनिकेत कधी कथेत येईल, मी एका गोष्टीवर ठाम आहे की, अनिकेत आणि नित्याचं काही नातं नाहीये, कारण मग ते फारच क्लिशे होईल, मग लिहायला मजा येणार नाही

@Namokar @जिज्ञासा
मनापासून धन्यवाद Happy

ह्यावेळी नेहमीएव्हधी मजा नाही आली. पंचेस कमी पडले असे वाटले पण हा महान होता रे "आता ब्रेड बरोबर सगळं खाते, पोळी सुटली ती कायमची""

@ चैतन्य.. हो मी म्हट्लं मागच्या भागात..की कितीही भाग झाले तरी चालेल.!
पण हा भाग वाचून का कुणास ठाऊक..असं वाटलं की.. जास्त न ताणता शेवट्चा भाग यायला हवा.. जे वाट्लं ते प्रांजळ पणे लिहीलं..
तुम्हाला दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. क्रुपया गेरसमज नसावा..
तुम्ही छानच लिहीताय..उत्सुकतेने पुढच्या भागाची वाट पहात असते..

या कथेत तसं हिरो कोणी नाही, कारण हिरो सारखं कोणीच वागत नाही
मला वाटतं, कथेचा शेवट शोधण्यापेक्षा, कथेचा आत्मा शोधायचा प्रयत्न झाला, तर त्याचा फायदा कथा लिहिताना होतो.>>>
अहो चैतन्य, दिवा दिलाय प्रतिसादात मी, एवढ मनावर घेउ नका ते हिरोच Proud
रच्याकने,
कथेचा आत्मा शोधायचा प्रयत्न झाला>>> हे वाचुन मला "उसने मेरी आत्मा को छुआ है मा" , हे हदिदेचुस मधल ऐशु च वाक्य आठवल, तालासुरात आणि साभिनय Proud
पुन्हा एकदा Light 1

@ असामी
पुढच्या भागात अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो Happy

@ अॅमी
मनापासून धन्यवाद Happy

@बी.एस. @किल्ली
पुढील भागाचं लेखन करताना, तुम्ही सुचवलेल्या गोष्टींचा नक्कीच विचार करीन Happy

Pages