काथ्याकूट: उरातला केर (भाग पाच)

Submitted by चैतन्य रासकर on 16 December, 2017 - 06:59

काथ्याकूट: भाग एक
काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
काथ्याकूट: मोघम अमोघ (भाग तीन)
काथ्याकूट: इराची तऱ्हा (भाग चार)
........................

"कोणाचा हजबंड?"
"नित्याचा हजबंड" अमोघची बायको म्हणाली.
"काय??" मी ओरडलोच, मी इराकडे बघितलं, तिचे डोळे मोठे झाले, हात नकळत तोंडावर गेला, नीरवसुद्धा पुरता गोंधळला, त्याला पुढे काय बोलावे ते कळेना, नित्याचा नवरा? लग्न कधी झालं? नवरा कधी झाला? पण महत्वाचं म्हणजे, लग्नाला का नाही बोलावलं?

"ताई..मॅम अहो..नित्याचं अजून लग्न झालेलं नाही" नीरव म्हणाला.
"असं कसं..मी स्वतः नित्याच्या मिस्टरांना बघितले आहे"
नित्याचे मिस्टर? मिस्टर आहेत का मिस्टर इंडिया? यांना दिसले, पण आम्हाला कधीच नाही दिसले!!

नित्या म्हणायची की तिचं सगळं लग्न वेगळं झालं पाहिजे. आमचे सुद्धा नित्याच्या लग्नासाठी भारी प्लॅन्स होते., नित्याच्या लग्नाला, लग्न कार्यालय नाही, तर असा तंबू टाकायचा होता, तंबूत लग्न घडवायचं होतं, तबूंतलं लग्न!! त्या तंबूच्या बाबूंना गुलाबी झिरमिळ्या लावणार होतो, एका बाजूला 'सेल्फी पॉईंट' ठेवणार होतो, तिथे अतिरिक्त फ्लॅश, सेल्फी स्टिकची सोय करून देणार होतो. पाहुण्यांना आधी रेड कार्पेट मग रेड वाईन देणार होतो. लग्नाला बँड नाही, साजेसा डीजे बोलावणार होतो, मोठी वरात काढून, रस्ता अडवून, डीजेच्या बिट्सवर, खाली पडून, मस्त उन्हात, डोळे मिटून नाचणार होतो. दहा हजार फटाक्यांची माळ लावणार होतो, फटाके वाजत असताना, ठेका धरणार होतो, चार लोकांना हाताशी घेऊन, 'रेलगाडी' डान्स करणार होतो, मी लग्नात रॅप सॉन्ग गाणार होतो, पण नित्याने सगळं लग्न इतकं वेगळं केलं की, ते कधी झालं ते आम्हाला कळलंच नाही

शाळेत असताना मला फॅशन म्हणून नाही तर पॅशन म्हणून, रॅपर व्हायचं होतं. बाबा सैगलची गाणी मी कोळून प्यायलो होतो. रॅपिंगसाठी लागणारे मोठे बाह्यांचे टीशर्ट्स, चेन्स, टोप्या हे सगळं मी मनापासून जमवलं होतं. मी खोली बंद करून आरशात स्वतःला बघत रॅप करायचो, त्यासाठी मोठा आरसा सुद्धा घेतला होता. मी तासनतास गॅप न घेता रॅप करत असे, तरी मला धाप लागत नसे, कारण हा माझा ध्यासच होता.
शाळेत मी मधल्या सुट्टीत मित्रांना रॅप करून दाखवायचो, पण एकदा इतिहासाच्या बाईंनी मला रॅप करताना बघितले, बहुतेक माझा रॅप त्यांना कळाला नाही, "तुमचा मुलगा शाळेत रॅपिंग करतो" अशी तक्रार माझ्या आईकडे केली, आईने "म्हणजे नक्की काय करतो?" असे विचारले, मला चांगलं आठवतं, इतिहासाच्या बाईंनी थोडे हात, मान हलवत रॅपिंग करून दाखवले, पण घरी आल्यावर आई ओरडली, "शाळेत जे करत होतास ते इथे करून दाखव" असं म्हणाली, ही धमकी आहे का विनंती हा विचार करत, मी घाबरत रॅपिंग करून दाखवलं, आईच्या डोळ्यात पाणी आलं, का ते माहित नाही. आई मला म्हणाली की "तू कविता का नाही करत?" पण मुक्तछंदात मला अडकायचं नव्हतं. "विरोध घरातून, उपयोग नाही पायापडून" अशी परिस्थिती असताना, मी रॅपिंग सुरु ठेवलं. शेवटी बाबा वैतागले, एकदा त्यांनी मला चोरून रॅप करताना बघितलं, रपकन मारलं, मी रॅप करतच रडलो, पण त्यानंतर माझं रॅपिंग सुटलं ते कायमचं!!

नीरवने हताश होऊन फोन माझ्याकडे सरकवला, पण मी काय बोलणार? मला काही सुचत नव्हते, मी इराकडे बघितले, तिला आमची अडचण कळली, तिने नीरवचा फोन घेतला, स्पीकर बंद केला, ती फोनवर अमोघच्या बायकोशी बोलू लागली. मी नीरवकडे बघितले, नीरव निर्विकार दिसत होता, माझा पण मूड गेला होता, नित्याने आम्हाला लग्नाला का नाही बोलवले? असं लपवून का ठेवलं? आम्ही एवढे परके कसे झालो? का नित्या का?

इरा फोनवर बोलत होती, "मी नित्याशी बोलते, काळजी करू नका" असं म्हणून तिने कॉल कट केला, इराने फोन नीरवकडे दिला, नीरव नित्याला कॉल करू लागला, ते बघून इरा त्याला "ते सुद्धा नित्याला फोन करत आहेत, पण लागत नाहीये" असं म्हणाली.
"व्हाट्सअॅ पवर लाव" मी सुचवले. नीरवने व्हाट्सअॅयप , फेसबुक, स्नॅपचॅट, स्काईप, हँगआऊट, इमो दिसेल त्या अॅेपवर, दिसेल तसा कॉल लावला, पण नित्याला कॉल लागला नाही.
"त्यांना सुद्धा नित्याच्या नवऱ्याचं नाव माहित नाही" इरा म्हणाली.
"शरदच नवरा असणार" नीरव म्हणाला.
नोटाबंदीत, बँकेसमोर पार्किंगला जागा मिळत नव्हती, नित्याला नवरा मिळाला!!

"पण तुम्हाला अमोघ बॉयफ्रेंड आहे असं का वाटलं?" इराने विचारले, मी इराला अमोघ नित्याच्या प्रकरणाबद्दल, नीरवने फोन नंबर कसा शोधून काढला, याबद्दल थोडक्यात सांगितले.
"ती अमोघला सारखे मेसेजेस करत होती, म्हणून तुम्ही दोघांचं अफेअर लावून लावलतं??" इराने विचारले. आम्ही दोघांनी 'हो' म्हणून मान डोलावली, इराच्या चेहऱ्यावर आमच्या विषयी 'अशक्य आहात' असे भाव होते.
आकर्षण हा जो काही मुद्दा आहे, त्याची सुरुवात कशी होते? सारखे मेसेजेस केल्यावर आकर्षण वाढतं? का आकर्षण वाढल्यावर सारखे मेसेज केले जातात? पण मुळात, आपल्या मनात त्या व्यक्तीजवळ जाण्याची ओढ असून काय उपयोग? आधी त्या व्यक्तीने "जवळ ओढ" असं म्हटलं पाहिजे ना!!

पण इराच्या मते नित्याचा बॉयफ्रेंड अमोघ नव्हता, पण तरी मुद्दा हाच राहतो की त्या दिवशी नित्या अमोघला सारखे मेसेजेस का करत होती? अमोघच्या बायकोला, नित्या आणि अमोघबद्दल संशय का होता? जर शरद बॉयफ्रेंड आहे, तर नित्याने असं लपवून लग्न का केले?
"तिने लग्न केलं ते सांगितलं का नाही?" नीरव शेवटी काय तो फुटला.
"सैराट सारखं काहीतरी झालं असेल" मी म्हणालो.
"सैराट मध्ये ते दोघ लग्न असं लपवून ठेवत नाहीत" नीरवने माझा मुद्दा खोडून काढला.
"मग 'साथिया' सारखं केलं असेल" मी नवीन मुद्दा खोदून काढला.
"साथिया मूव्ही नाही बघितला, त्यात ते लग्न लपवून ठेवतात?" इराने विचारले.
"हो, पण त्यांचे मित्रच त्यांना लग्न करायला मदत करतात" नीरव हताशपणे म्हणाला.
"इथं मित्रांनाच लग्न झालेलं माहित नाही" मी त्याच्या सुरात सूर मिसळला.
"हा तर मग साथिया पार्ट टू झाला" इरा हसत म्हणाली, पण आम्ही हसलो नाही
"गायीज..चिल..तुम्ही हा विषय तळपायाच्या फोडासारखा का जपताय?" इराने विचारले.
"तळहाताच्या"
"तळपायाचा फोड पण जपावा लागतो ना" इरा म्हणाली
"तळपायाला फोड येतो का?" मी विचारले
"नवीन शूज घातले की येतो ना" इराने उत्तर दिले., मी पुढे काही म्हणालो नाही, मी नीरवकडे बघितले, तो शांत बसला होता, हताश झाला होता, एकुलत्या एक सख्ख्या मैत्रिणीने असं केल्यावर काय करणार? जेव्हा नेहमीचा पासवर्ड सहा वेळा टाकून सुद्धा, लॉग इन होतं नाही, तेव्हा कसं वाटतं, अगदी तसंच आम्हाला वाटतं होतं.

"फर्स्ट इयरला एवढी होत गं" नीरव उजवा हात वर करून, नित्याची उंची दाखवत म्हणाला, मी 'पाच फूट तीन इंच' असं म्हणणार होतो, पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून बोलण्याचं टाळलं.
"कॉलेज समोरचा रस्ता क्रॉस करताना, नेहमी माझी सॅक पकडायची" नीरव म्हणाला, पुढे बोलत गेला, आम्ही त्याला थांबवलं नाही.
"ती खूप साधी होती, नेहमी साधा डोसा मागवायची, ती त्याबरोबर असते ना, नारळाची पांढरी चटणी, तिला आवडायची नाही, मग मी संपवायचो" नीरव म्हणाला. मी सांबर संपवायचो, मला एकदम आठवलं.
"नेहमी सामोस्याचा काठ खायची" मी मेनूकार्ड बघत म्हणालो.
"तिच्या वाढदिवसाला, तिला आवडतो म्हणून, गुलकंद घातलेला केक आणायचो" नीरव म्हणाला.
"अरे पण, त्या आधी केकवाल्याला वीस गुलाब आणून द्यायचो" मी म्हणालो.

आम्ही नित्यासाठी, तिने आमच्यासाठी बरचं काही केलं होतं. कॉलेजला असताना, परीक्षा जवळ आल्यावर, नित्या नोट्स द्यायची, नोट्स मधलं काय वाचायचं हे हायलाईट करून द्यायची, नोट्स वाचायला कंटाळा यायचा, तेव्हा वाचून दाखवायची, कॉपी करायला मदत करायची, आम्ही मग तिच्या फोटोला चांगले फिल्टर लावून द्यायचो, तिची ऍक्टिव्हा मेन स्टॅन्डवर लावून द्यायचो, तिच्या पोस्टला लाईक्स, शेअर, कॉमेंट, टॅग करायचो, त्यामुळे तिच्या लग्नाच्या फोटोजमध्ये तिने आम्हाला टॅग करावं अशी माफक अपेक्षा होती, पण अपेक्षाभंग झाला होता.
सामान्यपणे, सामान्य मुलं मुली एकमेकांना भाऊ बहीण मानतात, इथे नित्या नीरवला 'काका' मानायची!! "नीरव मिशा ठेवल्यावर माझ्या काकांसारखा दिसतो" असं नित्या म्हणायची, "आवाज सुद्धा काकांसारखा आहे" असं सुद्धा म्हणायची, पण तरीही नित्याने मानलेल्या काकापासून लग्न लपवले होते.

"जाऊ दे.. ती पाहिजे तेव्हा सांगेल, तुम्ही एवढं उराला लावून, केर काढू नका" इरा आम्हाला लागली.
"उराला लावून, केर काढणे" याचा अर्थ मी इराला कधी विचारला नाही, कारण तिने अर्थ सांगितला असता, माझ्या काही लक्षात राहिला नसता. ही इराची नवीन म्हण होती. इराने काही महिन्यांपूर्वी "म्हणी म्हण" नावाची ब्लॉग पोस्ट लिहिली होती, त्यामध्ये "आपण मराठी म्हणी का वापरत नाही?" असा तिच्यासाठी ज्वलंत असणाऱ्या, प्रश्नाचा पसारा मांडला होता. आपण म्हणी वापरत नाही, त्यामुळे म्हणींचा ऱ्हास होतो, याचा त्रास मराठी वाङ्मयला होतो, अशी इरा यांची भूमिका होती. तंत्रज्ञान जर बदलत असेल तर, म्हणी का नाही बदलल्या? हा प्रश्न इराने ब्लॉग पोस्ट मधून उपस्थित केला होता. पण फक्त प्रश्नाचे आयाम न मोजता, उत्तर शोधण्याचे काम केले पाहिजे, असा पुरोगामी विचार करून, इराने काही नवीन म्हणी आणि त्यांचे अर्थ स्वतःच लिहून काढले. "काम नाही सुरु, लॉग आऊट करू" किंवा "फोर जी सांगणार, ब्रॉडबँड करणार" अशा स्वलिखित म्हणींचा ती सर्रास वापर करत असे, पण तिची सर्वात आवडती म्हण "लाईक्स चार, माज फार"

"काहीतरी प्रॉब्लेम असेल, कदाचित देवळात लग्न केलं असेल" इरा समजावू लागली.
"निदान रिसेप्शनला तरी बोलवायला हवं होतं" मी म्हणालो, तेवढ्यात नीरव त्याच्या फोनवर काहीतरी करू लागला.
"काय झालं?" मी विचारले.
"जे माणूस आपलं नाही, ते व्हाट्सअॅपवर का ठेवायचं?" असं म्हणून नीरवने नित्याला, आमच्या व्हाट्सअॅप ग्रुप मधून काढून टाकलं, ग्रुपचा ऍडमिन मीन झाला, बरीच रात्र झाली होती, आम्ही जड अंत: करणाने आणि पोटाने त्या कॅफे मधून बाहेर निघालो, कोणीच कोणाशी बोलत नव्हते, आम्ही जिमच्या पार्किंग एरियामध्ये आलो. त्या पार्किंग एरियात साधा बल्ब नव्हता पण भारी सीसीटीव्ही लावले होते, भयाण शांतता होती, वॉचमन वगैरे पण नव्हता, बहुतेक वॉचमन 'वर्कआऊट' करायला गेला असावा. नीरवकडे बाईक, इराकडे ऍक्टिव्हा होती, पण माझ्याकडे काहीच नव्हतं, कारण गरिबी!

"एका फ्रेंडने तर सोडलंच आहे, तुला कुठे सोडू?" नीरवने त्याची बाईक शोधत विचारले.
साधारण नऊ मिनिटे विचार करून नीरवने हा डायलॉग मारला असावा, असा माझा प्राथमिक अंदाज होता.
"अरे मी जाईल"
"कसा जाणारेस, नाहीतर मी सोडते" इरा मला म्हणाली.
"तू आता कुठे राहतेस?" नीरवने इराला विचारले, तशी इराने मोठी जांभई दिली, त्या दोन सेकंदात, बरोबर उत्तर काय द्यायचं हा तिने विचार करून घेतला, कारण नीरवला माहित नव्हते की, मी आणि इरा एकाच घरातलं वाय फाय वापरतो.
एखाद्याच्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, उत्तर द्यायचं नसेल किंवा खोटं बोलायचं असेल तर काय करावं? तेव्हा आवाज करत, मोठी जांभई द्यावी, म्हणजे मनातल्या मनात उत्तर तयार करायला वेळ मिळतो. जांभई बघून समोरचा माणूस म्हणू शकतो "का रे झोप नाही झाली का?" मग आपण लगेच "हो रे काल रात्री काम करत होतो, उशिरा झोपलो" असं म्हणून सोयीस्कर रित्या विषयांतर करता येतं.

"मावशीकडे" इरा म्हणाली.
"तू घरी सांगितलंस का?" डिव्होर्स शब्द न वापरता नीरवने विचारले.
"सांगायला कशाला पाहिजे, कळणारच ना" इरा म्हणाली.
आम्ही मोबाईलच्या प्रकाशात नीरवची बाईक शोधू लागलो, नीरवची बाईक काही सापडेना.
"बाईक आणली होतीस का?" मी नीरवला विचारले.
"अरे मग कसा येणार?" इराने विचारले.
"हा कधी कधी, जिमला धावत येतो ना"
"का??"
"कार्डिओ होतो ना, ट्रेडमिलचा कंटाळा आलाय" नीरव एका बाईकच्या सीटवर बसत म्हणाला "बाईक आणली होती का?" हे आठवू लागला. नीरवला एवढी जिम आवडते, की तो धावतच जिमकडे जायचा!!

"अनिकेत काहीच रिप्लाय देत नाही" नीरव म्हणाला, विषयांतर या विषयात नीरवने पदवी घ्यायला हवी असं तेव्हा मला वाटलं. अनिकेतच नाव ऐकून इराने खांदे उडवले, तिला अनिकेतबद्दल काही बोलायचं नव्हतं, मला सुद्धा काही माहित नव्हतं.
इरा आणि अनिकेतच्या घटस्फोटानंतर, अनिकेत गायब झाला होता, इरा अनिकेतबद्दल काही बोलत नसे, मी सुद्धा काही विचारत नसे. मी त्याच्या वाढदिवसाला, सणासुदीला मेसेज करायचो, तो त्याला ही रिप्लाय देत नसे. नक्की काय करत होता ते कोणालाच माहित नव्हतं, त्यात अनिकेत फेसबुकवर पण नव्हता, फेसबुकवर जर एखादा नसला तर तो माणूस, आयुष्यात काहीच करत नाही, असं वाटतं.

अनिकेत कॉलेजचा मित्र होता. कॉलेज मधले जुने मित्र हे सेकंडरी ई-मेल अकाउंट सारखे असतात, आपण ते ई-मेल अकाउंट जास्त वापरात नाही, पण कधीतरी सहज, आठवण आली की, त्या अकाउंट मध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो, पासवर्ड आठवत नसतो, पण तरीही पासवर्ड मिळवून लॉग इन करतो, त्या अकाउंट मधले इमेल्स आठवणीं सारख्या असतात. ते अकाउंट अनरीड इमेल्सने खच्चून भरलेलं असतं, आपण मग काही महत्त्वाचं मिळतंय का ते बघतो, पण एवढे सगळे इमेल्स वाचायला वेळ पण नसतो, काही इमेल्स वाचतो, काही इमेल्सला रिप्लाय द्यावासा वाटतो, काही इमेल्स लगेच डिलीट करतो, मग वाटतं कशाला हवंय सेकंडरी अकाउंट? पण मग हे अकॉउंट कुरवाळु का डिलीट करू? या प्रश्नात आपण अडकतो.

"त्याने जॉब सोडला ते माहित होतं, आता तो काय करतो??" नीरवने अनिकेतबद्दल विचारले, पण मला खरंच काही माहित नव्हते, माझ्या आणि इराबद्दल जेव्हा अनिकेतला कळेल, तेव्हा तो काय करेल, याची मला प्रचंड भीती वाटतं होती. मी इराकडे बघितले, ती अनिकेतच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार याची मला खात्री होती, मला त्याचं काही वाटतं नव्हतं, शेवटी ते तिचं पहिलं प्रेम होतं. पहिलं प्रेम विसरता येतं का नाही, ते माहित नाही, पण पहिलं लग्न? ते कसं विसरणार?
"मला एवढंच माहितेय की, मागे तो काठमांडूला गेला होता" इरा अनिकेतबद्दल म्हणाली.
"का??"
"तेव्हा तिथे भूकंप झाला होता ना"
"मदत करायला?"
"नाही, भूकंपामुळे तेव्हा प्लेनचं तिकीट स्वस्त मिळत होतं" इरा म्हणाली.
हे वाक्य कुत्सित होतं का सत्य? हा खरं तर संशोधनाचा विषय होता, हे नीरवला सुद्धा जाणवलं असेल, त्याने पुढे काय विचारलं नाही.
"बाईक आणली असशील तर चावी असेल ना" इरा नीरवला म्हणाली, नीरव पॅन्टच्या खिश्यात, बॅग मध्ये चावी शोधू लागल.
"नीरव"
नीरवला कोणीतरी हाक मारली, आम्ही सगळे आवाजाच्या दिशेने डोळे ताणून बघू लागलो, एवढ्या अंधारात काही दिसेना, आठवण काढली आणि अनिकेत आला काय?
"नित्या?" इरा म्हणाली.

क्रमशः
................
उजळणी:

कथानक एकदम सोपं आहे.
नित्या, नीरव, इरा, अनिकेत, कथानायक हे कॉलेजचे जुने मित्र आहेत, यांचा ग्रुप आहे, ते बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटतात आणि कथा सुरु होते.

१) भाग पहिला
इरा आणि अनिकेतचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाचं कारण अजून कळालेलं नाही, पण इरा व कथानायक एकमेकांच्या प्रेमात आहे, हे उघड होते.

२) भाग दुसरा
नित्याचं ब्रेक अप झालं आहे हे कळतं, पण नित्याचा बॉयफ्रेंड हा विवाहित आहे, हे नीरव शोधून काढतो.

३) भाग तिसरा
नित्याच्या बॉयफ्रेंड अमोघ आहे का शरद हा वाद सुरु होतो.

४) भाग चौथा
नित्या सुद्धा विवाहित आहे ही बातमी अमोघच्या बायकोकडून सगळ्यांना कळते.

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तंबूत लग्न घडवायचं होतं, तबूंतलं लग्न!! Lol
सेल्फी पॉईंट, रेड कार्पेट मग रेड वाईन, रॅप गाणं सगळं मस्तंच. Biggrin Proud

मस्त!
. कॉलेज मधले जुने मित्र हे सेकंडरी ई-मेल अकाउंट सारखे असतात, आपण ते ई-मेल अकाउंट जास्त वापरात नाही, पण कधीतरी सहज, आठवण आली की, त्या अकाउंट मध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो, पासवर्ड आठवत नसतो, पण तरीही पासवर्ड मिळवून लॉग इन करतो, त्या अकाउंट मधले इमेल्स आठवणीं सारख्या असतात. ते अकाउंट अनरीड इमेल्सने खच्चून भरलेलं असतं, आपण मग काही महत्त्वाचं मिळतंय का ते बघतो, पण एवढे सगळे इमेल्स वाचायला वेळ पण नसतो, काही इमेल्स वाचतो, काही इमेल्सला रिप्लाय द्यावासा वाटतो, काही इमेल्स लगेच डिलीट करतो, मग वाटतं कशाला हवंय सेकंडरी अकाउंट? पण मग हे अकॉउंट कुरवाळु का डिलीट करू? या प्रश्नात आपण अडकतो.>>
जबरदस्त! Lol

नोटाबंदीत, बँकेसमोर पार्किंगला जागा मिळत नव्हती, नित्याला नवरा मिळाला!!
☺️

"लाईक्स चार, माज फार"

कसली भारी म्हण आहे ही..

आवडला हा भाग सुद्धा . .खुप छान.. .माझ्या एका फ्रेन्डला पण वाचून दाखवलं मी ...ती तर तुमची खुप मोठी फॅन झालीय...

आता ती तुमची फॅन झालीय म्हटल्यावर मला सांभाळून राहावं लागेल...

जरा भाव खाल्ला की ,वरची म्हण मलाच ऐकवायला कमी नाही करणार ती...

एकच नंबर, उत्सुकता ताणत चाललीय
पण फार ताणू नकोस भावा

रॅप वाला पॅरा महान होता

ही धमकी होती का विनंती
कहर होतं हे

जमलाय हा पण भाग

येऊ दे अजून

मी तुमच्या विनोदाच्या timing ची फॅन झाले आहे.
पण फार ताणू नका.. नाहीतर पंचेस चा भुलभुलैया व्हायचा Happy

मिस्टर आहेत का मिस्टर इंडिया?<<<
नोटाबंदीत, बँकेसमोर पार्किंगला जागा मिळत नव्हती, नित्याला नवरा मिळाला!!<<<<
त्या पार्किंग एरियात साधा बल्ब नव्हता पण भारी सीसीटीव्ही लावले होते, भयाण शांतता होती, वॉचमन वगैरे पण नव्हता, बहुतेक वॉचमन 'वर्कआऊट' करायला गेला असावा. <<<<<<<

भारीये! Lol
'लाईक्स चार, माज फार' पण आवडली. वापरायला हवी. Proud

पंचेस भारी..
शेवटी काय झालं? काही कळलं नाही. नित्या, अनिकेत ह्यांच लग्न झालं होत का?

मस्त ..
मागच्याच भागाचा फॉर्म कंटिन्यू.... Happy

पवनपरी11 वावे , mr.पंडित, आबासाहेब, च्रप्स, श्रद्धा, सायुरी,ऋन्मेऽऽष, जिज्ञासा,
मनापासून धन्यवाद Happy

@अजय चव्हाण

धन्यवाद Happy
या कथेमुळे, तुमच्या दोघांमधली मैत्री वृद्धिंगत होतं आहे हे बघून छान वाटले Happy

@आशुचँप @दुहेरी
नक्कीच, पुढचा भाग लिहिताना या गोष्टींची काळजी घेईन Happy

@अदिति
नित्या आणि अनिकेतचं लग्न झालेलं नाही, पुढे होणार ही नाही Happy

मस्तच हापण!
साथीया पार्ट 2, मीन ऍडमिन Lol

पण फार ताणू नका.>>>+1
आता शेवट करा Proud

भारी जमलाय हाही भाग Lol
निखळ मज्जा

लिहता की मस्करी करता तुम्ही....
तबूंतलं लग्न... रॅपिंग... साथीया पार्ट 2..... मीन ऍडमिन... तळपायाचा फोड.... इराच्या म्हणी.... नीरवच जिम प्रेम.... सगळच भारी.
काम करता करता वाचत असताना हसण खुप कन्ट्रोल कराव लागत.
जरा लवकर टाका पुढचा भाग

वा.भारीच हा भाग पण..!
एक से बढकर एक पंचेस..!
रॅपिंग चा पॉरा..कहर आहे..!
मीन ऍडमिन, इराच्या म्हणी..मस्त्च.!
लाईक्स चार, माज फार. Lol Lol Lol

पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघते..लवकर येउ द्या.

नेहमीप्रमाणे मस्त... सगळेच पंचेस भारी.
आता नित्याच्या लग्नाच नेमक काय ह्याची उत्सुकता लागली आहे.
लवकर येऊ देत पुढचा भाग.

सिरियलसी वेब सिरिज बनवा रे कोणीतरी Happy .
ईतर भागांपेक्शा थो...डा डावा वाटला .
तुम्हीच आमच्या अपेक्शा वाढवून ठेवल्यात ना राव !

पण पंचेस आणि म्हणी नेहमीप्रमाणे मस्त Happy . वेचून वेचून कुठल्या काढायच्या उदाहर्णार्थ Happy .
पुभाप्र .

फेसबुकवर जर एखादा नसला तर तो माणूस, आयुष्यात काहीच करत नाही, असं वाटतं ,

मस्त झालाय हा भागसुद्धा. इराच्या म्हणी एक नंबर आहेत.

फेसबुकवर जर एखादा नसला तर तो माणूस, आयुष्यात काहीच करत नाही, असं वाटतं. >>> Lol

भारी चालू आहे. नविन म्हणी आवडल्या.

उजळणी दिल्याबद्दल धन्यवाद नाही तर सगळी साखळी कुठल्या कुठे चालली होती Lol

Pages