काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप

Submitted by चैतन्य रासकर on 27 September, 2017 - 13:47

काथ्याकूट: भाग एक
........................

"मेन आर डॉग्ज"
नित्या मेन मुद्द्यावर बोलू लागली, हे ऐकून माझ्या सारखा मॅन, मान खाली घालून कॉफी पिऊ लागला..आता काय बोलणार?
"नितू काय झालं.... " नीरवने विचारलं.
नीरवसाठी 'नितू'.. माझ्यासाठी ती 'निघ-तू...' झाली होती, थोडा राग आला होता, एकदम डॉग्ज? डॉग्जला का नावं ठेवायची? पण मी काही म्हणालो नाही, कोल्ड कॉफी घेत, माझा राग गार करू लागलो.
"आय एम ओके...काही झालेलं नाहीये.." नित्या म्हणाली, मैत्रिणीच्या ओके मध्ये फार धोके असतात, हे चांगलंच माहित होतं, नीरवने माझ्याकडे बघितले, मी खांदे उडवले, नित्याचे नक्कीच काहीतरी वांधे झाले होते.

आम्ही परत भेटलो, परत एकदा, मी..नित्या, नीरव, त्याच फ्रेंच कॅफेमध्ये, तीच कॉफी, तेच सँडविच, त्याच गप्पा, तेच टोचून बोलणं, पण तोच..तोचपणा असला तरी विषय मात्र तोच नव्हता, वेगळा होता!! विषय काय होता, हे नेमकं कळलं नव्हतं, कारण नित्याने प्रस्तावना मांडली पण मूळ कथा नाही सांगितली, मग अभिप्राय कसा देणार?

मी मागच्या काही दिवसात घडलेल्या गोष्टी आठवू लागलो....
"समटाइम्स मूडी...ऑलवेज फूडी..." अशा आनंदी पोस्ट शेअर करणारी नित्या "प्लीज डोन्ट गो...माय लाईफ विल ब्लो..." अशा पोस्ट मधून दुःख व्यक्त करू लागली, अशा पोस्टला तमाम सिंगल अन मंगळ असलेल्या पोरांचे लाईक्स, कंमेंट्स येत असतं..."काय झालं...आर यु ओके?" पासून, काही कवी "नको लपवू मनाच्या कोपऱ्यात...सांगून टाक तोऱ्यात.." अशा कंमेंट्स देऊ लागले, नित्या पोस्टवर आलेल्या कमेंट्सला उत्तर देत नसे, एवढीशी ही पोरं, एकाहत्तर कमेंट्सला कशी, किती उत्तरं देणार?
मी ऐकलं होतं की, पूर्वीच्या काळी, म्हणजे ऑरकुटच्या ही अगोदर, लोकं "काय कसा आहेस?..घरचे कसे आहेत?" असं विचारून ख्याली खुशाली विचारत, आता फेसबुक पोस्ट मधून सगळी गोष्ट कळून जाते, विचारायची गरजच नाही!!

मला ही नित्याबद्दल तसंच कळालं, तिच्या या दुःखी कष्टी पोस्टी वाढत गेल्या, फूडी नित्याची कोणीतरी खोडी काढली होती, तिने दुःखाच्या दरीत उडी मारली, तिने चक्क मराठीत नवीन पोस्ट शेअर केली.....
"कधीतरी वाटतं खूप...खूप...लांब जावं....स्वतःजवळ येण्यासाठी..."
हाहाकार माजला!! पोरं येडी झाली, इतकी येडी की या पोस्टवर कविता, गज़ल, पोवाडे सगळं घडलं, माझ्या चुलत भावाने..."टेक केअर डिअर" अशी कमेंट केली, तीन लाईक्स मिळाले, याने मला कधी एक लाईक सुद्धा केले नव्हते, पण या फेसबुक पोस्ट बघून, मी नित्याच्या त्या नात्याला, तडा गेल्याचं ताडलं.

या सगळ्या पोस्ट एका पोरासाठी होत्या, हा मुलगा कोण होता? तो नित्याला कसा भेटला? नित्याचं अन त्याचं प्रेम कधी, कुठे, केव्हा, किती वेळा झालं? हे आम्हाला काहीच माहित नव्हतं.

"नाही सांगणार का? हीच का दोस्ती?" नीरवचे पौराणिक डायलॉग्ज आले.
"इट्स व्हेरी कॉम्प्लिकेटेड...." नित्या म्हणाली.
अरे पण काय? काय कॉम्प्लिकेटेड? ही काहीतरी आउटडेटेड बोलत होती, पण मी काही बोललो नाही, ब्रेकअप हे नेहमी कॉम्प्लिकेटेड असतं, साधं सरळ ब्रेकअप नसतं, साधं घर, साधं जेवण, साधा कार्यक्रम, साधी राहणी, साधे विचार, साधं लग्नपण असतं, पण साधं ब्रेकअप? कधी ऐकलं का साधंचं ब्रेकअप झालं म्हणून?

तेवढयात...दुसरी ऑर्डर घेण्यासाठी वेटर आला, नित्याचा जीव दुःखात अन माझा जीव खाण्यात अडकला होता, मी माझी ऑर्डर दिली, माझी ऑर्डर ऐकून, मला खाण्याचा डिसऑर्डर झाला आहे, अशा अर्थाने दोघांनी बघितले...
"अरे इथे प्रोटीन शेक पण मिळतो..." मी नीरवला म्हणालो.
"माझा प्रोटीनचा ब्रँड ठरलाय...मी तोच घेतो..." नीरव म्हणाला.
आयला ह्याला टोमणा पण कळला नाही.
"तू घेत जा प्रोटीन...बघ किती केसं गेलेत" नीरव माझ्या केसांकडे बघत म्हणाला, साहजिकच माझा हात केसांवर गेला...
"हात नको लावू...सँडविच मध्ये पडतील.." नीरव म्हणाला, त्याला माझा अन मला त्याचा टोमणा चांगलाच लागला, मी सँडविच, नीरव माझे डोके खाऊ लागला. कुठलं प्रोटीन किती वेळा, कसं, कशाने, कशात, कशासाठी घ्यायचं हे त्याने समजून सांगितलं, मी शांतपणे ऐकून घेतलं नाही, सँडविच मधल्या चिकनचे कण कण वेचून खाताना, कोण ऐकणार?
मी नित्याकडे बघितले, ती फोनवर सारखा तिच्या सख्याला मेसेज करत होती, पण हा सखा कोण होता? या सख्याचं सच काय होतं? यांच्या सौख्याला सुरुंग कसे लागले? अजून काहीच कळालं नव्हतं.

"तो सालसा क्लास मधला ना...?" नीरवने बॉम्ब टाकला. नित्याने डोळे मोठे करत नीरवकडे बघितले, नजर अगदी सहज दुसरीकडे वळवली, नकळत अंग चोरून घेतले, ती काही बोलली नाही, यावरून बॉम्ब योग्य ठिकाणी पडला हे कळलं, हीच वेळ आहे गनिमी कावा करायची.
"तुमच्या लग्नाला आमचा फुल्ल सपोर्ट.." मी बोलणार तेवढ्यात...
"तुम्हाला कोण म्हटलं...?" नित्या म्हणाली.
"तू नीट सांग ना काय झालायं...." नीरवने विचारलं.
दोन्ही बाजूने कोंडी होत आहे, हे कळल्यावर, नित्या पुढे बोलली नाही, शांत बसली, थोडावेळ कोणीच काही बोललं नाही, आता जास्त काही विचारू नये, असा विचार करत असतानाच...

"आम्ही सालसा क्लास मध्ये भेटलो....." नित्या सांगू लागली.
झालं सुरु!! त्याच आपल्या नेहमीच्या गोष्टी, क्लासमध्ये भेटले, पार्किंगमध्ये गप्पा झाल्या, पार्किंगच्या गप्पा मग पार्कला होऊ लागल्या, पार्क नंतर ते डार्क मध्ये भेटू लागले, नकळत प्रेमात, डोक्यात पडले, मग रोज भेटू लागले, प्रेमात हौस मौज राजरोस करू लागले, नित्याच्या शब्दात "तो खूप वेगळा होता..." तो समजंस, समजूतदार, सुस्वभावी, सालस, मनकवडा.. सगळंच होता, त्यात तो खूप हसवायचा, लाड करायचा, सगळी कामं करायचा, खूप वेळ द्यायचा, कमी वेळ घ्यायचा, सगळं शांतपणे ऐकून घ्यायचा...आयला बॉयफ्रेंड होता का पत्रकार?

हे सगळं बोलून झाल्यावर, नित्याने हळूच नजर खाली फिरवली, खांदे जवळ करत, स्वतःशीच हसली, परत आम्हा दोघांकडे बघितले, परत हसली!! आम्हा दोघांना कळेना, पोरीला होतंय काय? मी नीट नित्याकडे बघू लागलो, अंदाज घेऊ लागलो, आयला हेच का ते? नित्याबरोबर!! मी ओरडलोच...
"तू लाजतेस?"
यावर नित्या अजून लाजली, बाप रे, नित्या लाजते? कधीपासून? कसं शक्य आहे?
"ऐ गप रे.. काही काय..." नित्या लाजत पुढे सांगू लागली....
"ही हॅज सिक्स पॅक्स...."
"सिक्स पॅक्स....व्वा.." नीरव म्हणाला, आता याला पण तो आवडला.
मनाचं सौन्दर्य..हृदयाची श्रीमंती..अशा गोष्टींवर आमचा विश्वास होता, आहे, राहील पण, सिक्स पॅक्स असल्यावर हृदयाकडे नजर शक्यतो जाणार नाही, एकप्रकारे ती सुद्धा पोटाची श्रीमंती आहे, अशा श्रीमंत विचारांचे आम्ही होतो, पण सिक्स पॅक्सवाला दुर्मिळ पोरगा...याने केलं तरी काय? ज्यामुळे नित्या चिडली..सगळ्या मेनला डॉग्ज म्हणू लागली.

"मग आता..."
"आता काय.." नित्या म्हणाली, तिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलले, एकदम शांत, निर्विकार झाली.
"तुम्ही लग्न.." मी परत विचारले.
"तो युएसला जातोय... कायमचा.."" नित्या खाली बघत म्हणाली.
ते ऐकून नीरवने 'काय चिंधी प्रॉब्लेम' या अर्थाने माझ्याकडे बघितले.
आपल्या काही गोष्टी मित्रांना काहीही वाटतात!!
"त्याने लग्नाचं..." नीरवने विचारले.
"नाही विचारलं.." नित्या एकदम म्हणाली.
"मग तू विचार..." मी म्हणालो
"तो म्हणतोय, आत्ता नको करायला..का नको? तर म्हणे सेटल होऊ दे, सेटल कधी होणार? तर म्हणे अजून तीन वर्ष लागतील, एवढी वर्ष का? तर म्हणे...."
नित्या बोलत राहिली, स्वतःला प्रश्न विचारून स्वतःच उत्तर देत होती, चिडली कम वैतागली होती, तिचा मुद्दा बरोबर होता, पोरगा प्रेमाला 'हो' अन लग्नाला 'नाही' म्हणत होता, मग करणार काय? लहानपणी वाटायचं की आपण खूप छान सल्ले देऊ शकतो, पण मी आता लहान नव्हतो, एखाद्याने सल सांगितली की पटकन सल्ला देऊ नये, हे शिकलो होतो.
"तू एवढी सिरीयस..." नीरवने विचारले.
"झाले सिरीयस...मला पण नाही कळालं" नित्या म्हणाली.
कॉलेजमध्ये असताना, नित्यावर लाईन मारणाऱ्या पोरांची लाईन मोठी होती, नित्याला सुद्धा माहित होते, नित्याने कोणाला भाव दिला नाही, ज्याला भाव दिला, त्याने मग भाव खाल्ला, आधी नित्याला रस नसणार, पण नकळत ती पुढे सिरीयस झाली असणार.
प्रेम होतं...हे ब्रेकअप झाल्यावर कळतं कारण, प्रेम झाल्यावर काहीच कळतं नाही.

"यात सगळ्यात, मला दुसरं स्थळ पण आलंय..." नित्याने जाहीर केलं, पुढे बोलू लागली...
"फॅमिली फ्रेंड आहे.. मुलगा जर्मनीला असतो..."
फॅमिली फ्रेंडशी लग्न, हा प्रकार नव्वदच्या दशकात आला असावा, असा माझा कयास आहे, तो अजून ही पाहायला मिळतो, काळ थोडा बदलला, आता आधी बॉयफ्रेंड, मग त्याचा फॅमिली फ्रेंड होतो.
"तू जर्मनीला जाणार?" नीरवने पटकन विचारलं..
"अजून काही ठरलं नाहीये..." नित्या म्हणाली, एकतर पहिलं स्थळ हे नेहमी युरोप, अमेरिका या खंडातून आलेलं असतं, जपान, साऊथ कोरियातून का येत नाही? आशियाई, आखाती देश का मागे पडतात? असा विचार करत असताना, नित्याचा विचार मागे पडला,नित्याचा प्रश्न, मॅटर मोठा होता, ते म्हणतात ना बॉयफ्रेंडला नव्हती सवड, घरचे म्हणतात लग्नात पड!! असं काहीतरी झालं होतं.

पण मग आम्ही शांतच बसलो, माझे डोळे मिटत होते, नीरव उगीच हात, पाठ, मान मोडत होता, हा नीरव आहे, त्याला जिमची आठवण आली की तो असं स्ट्रेचिंग करायचा.
"ए मला काहीतरी दाखवायचं..." आमच्याकडे न बघत नित्या म्हणाली.
नित्याने तिचा मोबाइल मला दिला, मी तिच्या मोबाइलमध्ये एक फोटो बघू लागलो, एका कागदावर, निळ्या अक्षरात, चार ओळी मराठीत, खरडल्या होत्या, त्याचा फोटो काढला होता, मी ते सुंदर अक्षर वाचू लागलो...
"तुझ्यासाठी झुरताना.. मला कुढताना..
दिसेल तुला....मागे वळून बघताना.."
आई ग!! हे वाचून माझ्यातला कवी वीक झाला!!
आयला पोरीनं लईच मनावर घेतलंय, कूल नित्या व्याकुळ काव्य कधीपासून करू लागली?
"कसं आहे?" नित्याने विचारले, तो पर्यंत नीरवने माझ्याकडून मोबाइल घेतला, तो वाचू वागला.
"भारीये...फेसबुकवर टाक ना.." मी म्हणालो.
"हो टाकायचं...पण हॅशटॅग सुचतं नाहीये.." नित्याने उत्तर दिले.
"हॅशटॅग व्याकुळ..किंवा..हॅशटॅग विरक्त.." मी म्हणालो.
"कुढताना का कुढत बसताना..?" नीरवने विचारले.
"दे इकडे..." असे म्हणत नित्याने तिचा फोन परत घेतला.

माझ्या जांभया वाढू लागल्या, मोठ्या झाल्या, तसं आम्ही सगळे उठलो, बिल देऊन पार्किंगला आलो, नित्याने आभार प्रदर्शन मांडलं, याचा अर्थ पुढचे दहा दिवस ती आम्हाला मेसेज करणार नव्हती, आंम्ही सुद्धा, "वेळ घे, शांतपणे विचार कर, काही झालं तर सांग आम्ही आहोतच" असे ते नेहमीचे डायलॉग मारले.
"तुला पाहिजे तर नवस कर ना.." मी म्हणालो.
"काय...?" दोघेही ओरडले.
"देवीला नवस..मनासारखं होऊ दे म्हणून.." मी घाबरत म्हणालो.
नित्याने 'नाही' म्हणत मान हलवली, मला झापायला सुरुवात केली, तू सुशिक्षित ना? एकविसावं शतकं, माणूस मंगळावर गेला, तू मंगळ मानतोस? कुठं गेली कर्तबगारी? सगळी अंधश्रद्धा आहे, रिडिक्युलस वगैरे असं सगळं बोलली, मी ऐकून घेतलं, ती आधीच खच्ची होती, त्यात तिला खूप उशीर झाला होता, म्हणून मी बोललो नाही, नित्या आम्हाला बाय करून निघून गेली.
"नवस कसा करायचा?" नीरवने मला विचारले.
"का..?"
"मला पण करायचय रे.. माझं प्रमोशन होत नाहीये..." नीरव म्हणाला, नीरवचे इमोशन माझ्यापर्यंत पोहचले.
मग मी त्याला सविस्तर सांगितलं, नवस खूप अवघड, कठीण असतो, हे समजावून सांगितलं, त्याने मोबाइल मध्ये या गोष्टी नमूद करून घेतल्या.
नीरव सुद्धा निघून गेला, मी बाहेर आलो, चालू लागलो, झोप तर येतं होती, थोडा चाललो, मग पटकन रिक्षा मिळाली, घरी आलो, कसाबसा पायऱ्या चढत फ्लॅटपर्यंत पोहचलो.

मी लॅच की ने दरवाजा उघडला, आत आलो, टीव्ही चालू होता, बाकी हॉलमध्ये सगळा अंधार होता, सोफ्यावर मांडी घालून एक व्यक्ती बसली, ती व्यक्ती पाठ वाकवून, रिमोट हातात धरून, टक लावून टीव्ही बघत होती, मी घरात आल्यावर शूज काढले, तसा त्या व्यक्तीने माझ्याकडे न बघत, काही न बोलता, उजवा हात वर केला, मला "हाय" केले.
इरा...

इरा आणि अनिकेत वेगळं झाले, मग आम्हाला वेळ मिळाला, आम्ही एकेमकांच्या प्रेमात कधी पडलो आम्हाला कळलंच नाही!! प्रेम की नाही...नकळत होतं, असं सांगून, ठरवून नाही होतं...ते की नाही असं होऊन जातं, इरा माझ्याबरोबर राहत होती, कोणाला तसं माहित नव्हतं, लपवायचं नव्हतं, पण इराला एवढ्या लवकर कोणाला सांगायचं नव्हतं.
मी बघितले, इरा 'स्प्लिट्सविल्हा' बघत होती, न्यूज, डिस्कवरी हे बघायचं आपलं वय नाही, असं तिला वाटायचं, तिला बिग बॉस पण आवडायचं नाही!!

मी तिच्या शेजारी जाऊन बसलो, जाहिराती लागल्यावर तिने मला विचारलं.. "जेवलास?"
"थोडं खाल्लंय.." मी म्हणालो.
माझ्याकडे बघून इरा थोड हसली, मी थोडं खातो, असा थोडाही विश्वास तिला नव्हता.
आम्ही असेच बसलो असताना, नीरवचा मेसेज आला, मी मेसेज वाचला...
"नित्याचा बीएफ मॅरीड आहे..."
आयला काय चालू आहे? ग्रुप मधल्या लोकांना कामं नाहीत का? नुसतं उठसुठ अफेअर का करत आहेत? झालय काय? नीरवने कसं शोधून काढलं? असा विचार करत, मी स्प्लिट्सविल्हा वरच ब्रेकअप बघू लागलो....

................................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीचा भाग आणि हा भाग दोन्ही मस्त..
क्रमशः आहे??

स्प्लिट्सविल्हा वरच ब्रेकअप बघू लागलो....................................>>>>
अवांतर होईल, खरच बघता का??तर
कोणाचे ब्रेकअप झालं यावेळी ते सांगा..गेल्या रविवारी बघितलं नाही

Biggrin Biggrin Biggrin
Biggrin Biggrin Biggrin

@कऊ
जर सगळ्यांना हा भाग आवडला तर पुढचा भाग नक्की लिहायला आवडेल Happy

स्प्लिट्सविल्हा नाही, मी फक्त रोडीज बघतो Lol Lol Lol

हायला, मस्त,
तुम्ही डेली सोपं चे भाग लिहिता का हो?
शेवटच्या 2 वाक्यात एकदम उत्सुकता वाढवली Happy

मस्त !
कोट्या बाकी ईंटरेस्टींग आहेत, वाचायला मजा येते Happy

आणि भाषा मॉडर्न मिंग्लिश मिश्रित असली तरी मी आली , तू कुठे गेला, मी तिला बोल्लो असली भयाण नाही ते आवडले हेही एक नोंदवते आता Happy

जर सगळ्यांना हा भाग आवडला तर पुढचा भाग नक्की लिहायला आवडेल-->
कोणाला आवडो ना आवडो, माझ्यासाठी नक्कीच टाका..
अप्रतिम आहे..

हा ही भाग भारी झाला आहे! याची मालिका कराच!

एकतर पहिलं स्थळ हे नेहमी युरोप, अमेरिका या खंडातून आलेलं असतं, जपान, साऊथ कोरियातून का येत नाही? आशियाई, आखाती देश का मागे पडतात? >> हाहाहा

जर सगळ्यांना हा भाग आवडला तर पुढचा भाग नक्की लिहायला आवडेल-->
अहो नक्की टाका, वाट बघतेय पुढच्या भागाची.
हा भाग पण मस्तच. अधले मधले पंचेस भारी, कॉलेज च्या दिवसांची आठवण देतात.

<<जर सगळ्यांना हा भाग आवडला तर पुढचा भाग नक्की लिहायला आवडेल-->
अहो नक्की टाका, वाट बघतेय पुढच्या भागाची.>>
नक्की टाका. नित्याचा B.F. अनिकेत आहे का?

र।हुल, कऊ, सिम्बा, मैत्रेयी, ऋन्मेऽऽष, प्राजक्ता, च्रप्स, अदिति, जिज्ञासा, आदू, सस्मित, ऋतु_निक, बी.एस., Meghana sahasrabudhe अंकु

धन्यवाद Happy तुम्हा सगळ्यांना कथा आवडली आहे, हे बघून छान वाटलं Happy

@सिम्बा
तुम्ही डेली सोपं चे भाग लिहिता का हो?
नाही हो.. अजून तरी नाही Happy

@च्रप्स @ कऊ @जिज्ञासा @ बी.एस.
तिसरा भाग लिहायला आजच सुरुवात करतो Happy

@सस्मित
हो नीरव ची स्टोरी डोक्यात आहेच, मला वाटतं की नीरव, "मी" आणि इरा पुढच्या भागात एकत्र येऊ.

@Meghana sahasrabudhe
नित्याचा B.F. अनिकेत आहे का?
नाही Happy
हा एक वेगळाच मुलगा आहे, याचं नाव अमोघ असेल Happy

Mast...

कथा वाचताना एकटाच हसत बसलो..... Lol Lol Lol एका मागोमाग एक विनोद येत जातात, नॉन स्टॉप .. तुम्ही पुढचे भाग लिहायला हवेत.....आता थांबू नका

Pages