काथ्याकूट: हौशी चौकशी (भाग सात)

Submitted by चैतन्य रासकर on 28 February, 2018 - 14:57

काथ्याकूट: भाग एक
नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
मोघम अमोघ (भाग तीन)
इराची तऱ्हा (भाग चार)
उरातला केर (भाग पाच)
नकळत चघळत (भाग सहा)
........................

इरा माझ्याकडे बघत म्हणाली "शरद??"
"आता हा कुठला शरद?" नीरवने विचारले.
"हे सगळं शरदलाच विचारू" मी म्हणालो.
परत आला शरद? एका शरदचे दोन झाले? एकाचे दोन कधी झाले कळलंच नाही!!

नित्याला पहिला शरद नोटाबंदीत तर दुसरा शरद इराच्या लग्नात भेटला असावा असा अंदाज होता, दोन शरद मनात धरले होते, आता दोन प्रश्न सोडवायचे होते .
प्रश्न पहिला, जोड्या जुळवा. नित्याचा नवरा कोण? अमोघ? लग्नातला शरद? का नोटाबंदीतला शरद?
प्रश्न दुसरा, स्पष्टीकरण द्या. नित्याने लग्न लपवून का ठेवले? हा गुंता अगदी त्या इअरफोन कॉर्डच्या गुंत्यासारखा आहे, सोडवल्या शिवाय चैन पडणार नाही. हाच गुंता सोडवण्यासाठी मी, नीरव आणि इरा अॅपच्या टॅक्सीतून नित्याच्या घरी निघालो होतो.

मी टॅक्सीतून बाहेर बघू लागलो, रात्र सावरलेली होती, कोणीतरी आकाशात चांदण्याची झालर विणत आहे, मंद, अवखळ वारा, अल्लडपणे येरझाऱ्या घालत आहे, असे अजिबातच वाटत नव्हते. बाहेर धुराचे लोट दिसत होते, रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती, तेवढ्यात इराने "ऐ ती बघा बिल्डिंग" असं म्हणत एक उंच इमारत आम्हाला दाखवली, आम्ही दोघांनी मान वर करून बघितले, पण काही दिसले नाही, पण तरीही उगाच मान राखायचा म्हणून "अरे वा उंच बिल्डिंग! नवीन दिसतेय, खाली पार्किंग सुद्धा आहे" असं म्हणालो.

"त्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर मला ऑफिस सुरु करायचंय" इरा म्हणाली.
अनिकेत बरोबर घटस्फोट झाल्यावर, इराने नोकरी सोडली. त्यानंतर तिने दहावीच्या मुलांना गणित शिकवायला सुरुवात केली, ती मुलं अजून ही दहावीत आहेत. दहावीतल्या मुलांचा वीट आल्यावर, इराने नवीन नोकरी शोधायला सुरुवात केली, इराला हिमाचल प्रदेशला नोकरी मिळाली, तेव्हा ही मला "हिमाचलला चल" म्हणाली, माझी फार चलबिचल झाली, मुळात मला चाललेलं चालत नाही. इराने आधी हिमाचल मग हिमालयात नेले असते, या वयात झेपलं नसतं. पाठदुखीचं कारण पुढे करून मी हे सगळं टाळलं, मग इराला नवीन करियर काय करायचं ते क्लिअर होईना.

एकदा मी घरातले बल्ब पुसत होतो, तेव्हा इराने मला पुसले "मी सगळ्यांना नीट समजावून घेते"
हे वाक्य आहे का प्रश्न? का शंका? का धमकी? का भीती? का अपेक्षा? का इच्छा? का मागणी? का गर्जना? हे न कळल्यामुळे मी हसून "हो" म्हणत मान डोलावली. मग इराने तिचा मुद्दा मांडला. हौशी चित्रकार असतो, गायक असतो, डान्सर असतो, नट असतो तर हौशी सायक्र्याट्रिस्ट किंवा हौशी कॉन्सलर का असू नये? हे ऐकून मला शॉक बसला!! मी स्टूलावरून खाली पडलो, माझ्या डोक्याला मार लागला, बल्ब फुटला. इराने बाकीचे दिवे लावत "मी हौशी कॉन्सलर होते" असे जाहीर केले. "ही हौस नाही हैदोस आहे' असे मी म्हणणार होतो, पण इरा हौशी नेमबाज सुद्धा होती, तिने मला बल्ब फेकून मारला असता, अजून एक बल्ब फुटला असता, म्हणून मी काही म्हणालो नाही.

"तुम्हाला पॉसिबल नाही वाटतं?" इराने मला आणि नीरवला विचारले.
"अजिबातच नाही "
"एखादा कॉन्सलर काय करतो?" इराने विचारले.
"काय करतो?"
"आपला प्रॉब्लेम ऐकतो, मग सल्ले देतो, तेच करायचं, सोप्पं आहे" इरा म्हणाली.
"पण पैसे कसे कमवणार?"
"एका तासाच्या सेशनचे पाचशे साठ रुपये" इरा म्हणाली.
"पाचशे साठ? वरचे साठ कशाला?"
"बारा परसेन्ट जीएसटी" इरा म्हणाली.
"पण मग खरे सायक्र्याट्रिस्ट आहेत ना, लोकं तुझ्याकडे का येतील?" नीरवने विचारले.
"तू जो आदिदासचा शर्ट घातला आहेस, तो शर्ट ओरिजिनल आहे का?"
"नाही" नीरव स्वतःच्या शर्टकडे बघत म्हणाला.
"ओरिजनल शर्ट का नाही घेतला?" इराने विचारले.
"स्वस्तात मिळाला, क्वालिटी पण चांगली आहे"
"एकझ्याकटली, लोकं हाच विचार करून माझ्याकडे येतील" इरा म्हणाली.
"असं कसं? म्हणजे तू लोकांना फसवणार?" नीरवने विचारले.
"फसवणार कसं? मी लोकांना आधीच सांगणार, मी हौशी कॉन्सलर आहे, प्रोफेशनल नाही" इराने उत्तर दिले.
"पण लोकं तुला काय सांगणार?"
"त्यांनी पाहिजे ते सांगावं, विचारावं, मला जो योग्य वाटेल तो सल्ला मी देणार"

"सल्ला देणं" हा बिझनेस कसा होऊ शकतो? सल्ले विकता येतात? पण माझा तर कोणी फुकटचा ही सल्ला घेत नसतं. इराला सल्ले देणे आवडायचं, कॉलेजमध्ये ती खूप छान सल्ले देत असे, त्यामुळे काहीजण तिला "मिस सल्ले" सुद्धा म्हणायचे. इरा म्हणायची की "सल्ला देणं" ही कला आहे, कोणी सल्ला मागितला तर लगेच देऊ नये. "अरे मी काय सांगणार" असं बोलून आधी थोडा माज करावा, मग सल्ला देण्याआधी सेंटी करावं, "खायला पैसे नसायचे, पाण्यात पारले-जी कुस्करून खायचो" असं काहीसं म्हणावं, विषयांतर झालं तरी चालेलं पण डोळे पाणावले पाहिजेत. मग "फक्त तुला म्हणून सांगतो" असं म्हणावं, मग सल्ला द्यावा, बस्स!! असं केल्यावर, सल्ला कसाही असला तरी त्याचं महत्त्व कैक पटीने वाढतं. शेवटी काय, हसत काहीही देऊ नये, सल्ला सुद्धा!! पण मला वाटतं, सल्ला पेनड्राईव्हसारखा असतो, लगेच कोणाला देऊ नये, कधी कोण स्वतःचा म्हणून वापरेल सांगता येत नाही.
"तू पहिले दोन सेशन फ्री ठेव" मी इराला म्हणालो.
"का?"
"प्रमोशन, लोकं ऍट्रॅक्ट होतील"
"येस्स, गुड आयडिया, लोकं येतील, फक्त चांगलं प्रोमोट करायला हवं" इरा विचार करत म्हणाली.

हौशी समुपदेशनाचं प्रमोशन कसं करावं? ते सुद्धा हौशी असावं का? यावर बरंच विचार मंथन झालं, मग या स्टार्टअपचं नाव हौशी कॉन्सलर किंवा हवीशी कॉन्सलर ठेवावं यावर चर्चा सुरु असताना, आम्ही नित्याच्या सोसायटीपर्यंत पोहचलो. सोसायटी अगदी कुठेतरी कोपऱ्यात होती. एरिया सुनसान ना आदमी ना मकान, अशी अवस्था होती. ड्रायव्हरला पैसे देऊन, आम्ही खाली उतरलो. आसपास कोणीच नव्हते.थंडी वाजत होती. रात्रीचे साडे अकरा वाजले होते. अचानक एक कुत्रा आला, आमच्याकडे बघून भुंकू लागला, त्याला मारायला दगड ही दिसेना, पण त्याचा निषेध तसा लगेच संपला, मग तो पळून गेला, मी आजूबाजूला बघितले, रस्ताच्या दुसऱ्या बाजूला, एका बेंचवर, एक तरुण मुलगा गिटार हातात घेऊन बसला होता, तो मुलगा डोळे मिटून मान वर करून, आकाशाकडे बघत होता, त्याची बहुतेक समाधी लागली असावी.

आम्ही त्या मुलाकडे दुर्लक्ष केले, सोसायटीच्या गेटकडे जाऊ लागलो, सोसायटीचं नाव बहुतेक इंग्लिश असावं, ते काही वाचता आलं नाही, त्या नावाचा उच्चार "बस्स्सहह" असं काहीतरी असावा. सोसायटीला मोठं गेट होतं, पण ते बंद होतं, आम्ही गेट जवळ आलो, तसा एक वॉचमन उठून उभा राहिला, दोन्ही हात कमरेवर ठेवून, मान वाकडी करून, अजय देवगणसारखा आमच्याकडे बघू लागला, पण तो वॉचमन काहीच म्हणाला नाही. अरे बोल, सांग, मन मोकळं कर, असं मनात नको ठेवू, सांग ना..
"प्लिज जाऊ द्या ना" नीरव त्या वॉचमन म्हणाला.
तो अजय देवगण सारखी मान वाकडी करून "नाही" म्हणाला
"पण का?" इराने विचारले.
"रात्री अकरा नंतर बाहेरच्या लोकांना आतमध्ये यायला मनाई आहे" वॉचमन म्हणाला.
मराठी वॉचमन? कसं शक्य आहे? असं हेल काढून, दात कोरत "रात के टाईम को बाहर का लोग अलाऊडइच नही है" असं काहीतरी म्हणेल, पण तो मराठीत बोलला!! हे किती दुर्मिळ होतं, किती वेगळं, छान होतं, खरंच याच्याबरोअबर एक सेल्फी काढायला हवा. सोसायटीत कोरडा स्विमिन्ग पूल नसला ना तरी चालेल, एक मराठी बोलणारा वॉचमन असावा. "शाम को पाणी नही आयेगा" हे ऐकून कंटाळा आला होता "कपडे धुवून घ्या, रात्री काय पाणी यायचं नाय" या वाक्यात जो ओलावा आहे तो कशातच नाही.

"असं का?" इराने परत विचारले.
"सोसायटीचा रुल आहे"
सोसायटी आहे का नॉर्थ कोरिया? कायच्या काय रुल आहेत.
"इमर्जन्सी आहे प्लिज" नीरव म्हणाला.
"कोणाला भेटायचं?"
"नित्या निर्मिती"
"काय??"
"नित्या निर्मिती, आमची मैत्रीण आहे, ती आडनाव लावत नाही, शेवटी तिच्या आईचं नाव लावते" नीरव म्हणाला.
"नित्या निर्मिती?"
"हो"
"मला माहित नाही" वॉचमन म्हणाला.
असला कसला वॉचमन? वॉचमन हा गूगल सारखा असावा, सगळं माहित असणारा.

"अहो ती इथेच राहते" नीरव वॉचमनला म्हणाला, त्यावर वॉचमनने "नाही" म्हणून मान डोलावली, त्याचा अभिनय संपला, तो परत त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला
"नित्या इथेच राहते ना??" इराने डोळे मोठे करून नीरवला विचारले
"मला चांगलं आठवतंय, एकदा मी नित्याला इथेच सोडलं होतं" नीरव उजवा पाय जमिनीवर आपटत म्हणाला. नीरवने तिथे डोकं सुद्धा आपटलं असतं तरी आम्हाला पटलं नसतं.
"तिने आता घर बदलेलं असेल तर?" मी विचारले.
"तिचं लग्न झालं असेल, तर ती नवऱ्याचं आडनाव लावत असेल ना?" इराने विचारले
"अरे हो, शरदचं आडनाव काय आहे?"
"कुठल्या शरदचं आडनाव? आपल्याकडे दोन शरद आहेत" मी म्हणालो, हे सगळं संभाषण गेट पलीकडचा मराठी सिंघम ऐकत होता, ते ऐकून, तो म्हणाला "फोन करून बोलवून घ्या"
फोन करून बोलावून घ्या? नित्याचा फोन लागला असता तर एवढं महाभारत झालंच नसतं ना!! पूर्वीच्या काळी एखाद्याच 'बोलणं' लागतं असे, पण हल्ली त्या आधी मोबाइल लागावा लागतो. नित्याला कसा ही करून फोन करायला हवा, पण कसा? हा विचार करत आम्ही गेटपासून बाजूला झालो.

मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बघितले, मघाशी गिटार घेऊन समाधीला पोहचलेला मुलगा, हातात मोबाईल घेऊन 'कँडी क्रश' खेळत होता. आता कँडी क्रशच का? कारण माझी नजर अशी खत्राड होती की, मोबाइलवरची बोटं बघून, ती व्यक्ती मोबाइलवर काय करत असेल हे मला लगेच कळत असे, मला आमच्या कॉलेज बाहेरच्या चहावाल्याची एकदम आठवण आली, तो नेहमी म्हणायचा "बोटं जास्त हलू लागली की, पोट कमी हलतं" डीप थॉट!! त्याने आमच्या कॉलेज मधूनच ग्रॅजुएशन केलं होतं.

त्या तरुणाला बघून आमच्या तिघांच्या डोक्यात कल्पना चमकली.
आम्ही तिघे ही त्या तरुणाजवळ गेलो, इराने त्या तरुणाला विचारले "फोन करायचा आहे, तुमचा मोबाइल मिळेल का?"
त्या तरुणाला इरा काय म्हणाली ते कळाले नाही, तो तरुण तसाच मोबाईल हातात पकडून आमच्याकडे बघू लागला. हॉटेलमध्ये ऑर्डर यायला उशीर झाला की आपण कसे वेटरवर ओरडतो त्याच आवाजात इराने त्या तरुणाला परत विचारले "फोन मिळेल का? एक कॉल करायचा होता"
लगेच त्या मुलाने स्वतःचा मोबाइल इराला दिला, मी इराला नित्याचा नंबर सांगितला, इराने नंबर डायल केला, तसे मोबाइल स्क्रीनवर एक नाव उमटले "बेबी डॉल"

आम्ही तिघांनी ते नाव बघितले, आम्ही उडालोच, बेबी डॉल??!! नित्या आणि डॉल? ती पण बेबी डॉल? कुठल्या अँगलने? नित्याची बेबी डॉल कधी झाली? याने नित्याचा नंबर "बेबी डॉल" म्हणून का सेव्ह केला? हा कोण आहे?
"बेबी डॉल?" इराने त्या मुलाला विचारले.
"काय?" तो मुलगा म्हणाला.
"तू नित्याला ओळखतॊस?" नीरवने विचारले.
"हो"
"कसं काय?"
"मी नित्याचा बॉयफ्रेंड आहे"
चला लोक हो, हीच ती वेळ, बोलवू एका डीजेला, बादशाहची गाणी लावूया, थोडं नाचूया. कारण काय विचारता? नित्याचा बॉयफ्रेंड अखेर मिळाला, सापडला, गवसला, गावला. इतकी भागाम भाग झाल्यावर, हा महाभाग इथे भेटला.

"नित्याचा बॉयफ्रेंड? तू अमोघ ना?" नीरवने विचारले.
"नाही"
"शरद ना?" इराने विचारले.
"नाही"
"मग?"
"निमित्री"
"काय?"
"निमित्री..कॉल मी नि"
निमित्री?? असलं कसलं नाव? चिनी आहेस का? आणि कुठला "नि"? पहिला का दुसरा?
"नि..पण तू..." इराला काय बोलावे ते कळेना, ती "नि" बघूनच निशब्द झाली.
"तुम्ही नित्याला कसे ओळखता?" निने विचारले.
"अरे आम्ही नित्याचे बेस्ट फ्रेंडस आहोत, हाय मी नीरव"
"बेस्ट फ्रेंडस? सॉरी मला माहित नाही" निमित्री म्हणाला.
"नित्याने कधी तुला आमच्याबद्दल सांगितले नाही?" मी विचारले. निमित्रीने "नाही" म्हणून मान डोलावली.

मी "नि"ला नीट बघू लागलो, तो एवढा काही नीट दिसत नव्हता, ठणठणीत वाटत नव्हता, बरेच दिवस "नि" नीट निजलेला नसावा. "नि" ला की नाही, बरेच काळे केस होते, तो केसाळ होता. डोक्यावरचे केस डोळ्यापर्यंत आले होते. हातात पकडता येईल एवढी मोठी दाढी होती. "नि" च्या नेत्रात तेज नाही पण रांजणवडी होती. त्याच्या बोलण्यात नजाकत, हरकत होती. त्याने काळा कुडता खांद्यावर अडकवला होता. त्याच्या हातावर सुद्धा खूप केस होते, ही पार हाताबाहेरची केस होती. त्याच्या डाव्या हातावर मला काही चट्टे दिसले, ते कदाचित टॅटू असावेत, पण त्याच्या हातावर एवढे केस होते की, त्याच्या हातावरचे केस आपल्या हाताने पकडून, बाजूला करून, मग त्याच्या हातावरचे टॅटू बघता आले असते. त्याने दोन हजार चौदाला निळ्या रंगाची असावी, अशी जीन्स घातली होती. पायात जोडे होते, पाठीवर गिटार अडकवलेली होती, बहुतेक ही गिटार तो वाजवत सुद्धा असावा. हा एकदम रॉकस्टार दिसत होता.

"नि" ला तो दारावरचा सिंघम "चल निघ" म्हणाला होता, त्यामुळे निमित्री सुद्धा असाच बाहेर नित्याची वाट बघत होता. एखादा असता तर घरी जाऊन झोपला असता, पण नाही, निमित्री असा अंधारात, रस्ताच्या कडेला, गिटार घेऊन, प्रेयसीची वाट बघत होता, खरंच...हेच का ते खरं प्रेम?
आम्ही परत निमित्रीच्या बेबी डॉलला कॉल लावला, डॉलला काय कॉल लागेना, नित्याचा फोन स्विच ऑफ होता. आता काय करायचं?

मग आम्ही ज्ञिमित्रीची हौस म्हणून चौकशी सुरु केली. "निमित्री तुझं नाव खूप...वेगळं आहे" इराने विचारले.
"येस, माय डॅड इज हाफ रशियन अँड मॉम इज महाराष्ट्रीयन"
"बाप रे रशियन?"
"हो, माझ्या आईला 'ज्ञानेश' नाव ठेवायचं होतं, बाबांना 'दिमित्री' नाव ठेवायचं होतं, ते एकत्र करून ज्ञिमित्री"
"दिनेश नाव सुद्धा ठेवता आलं असतं" इरा म्हणाली.
"तेव्हा त्यांना सुचलंच नाही" ज्ञिमित्री म्हणाला.
"ओह ज्ञानेशचा 'ज्ञ' मला नळातला 'न' वाटत होता" मी म्हणालो.
"बाणातला ण नाही ना वाटला?" इराने मला विचारले
"असे एकूण किती न आहेत?" नीरवने विचारले, आता हा कुठल्या 'न' बद्दल बोलत आहे? पण नीरवकडे दुर्लक्ष करून इराने ज्ञिमित्रीला विचारले "ज्ञिमित्री तुझी नित्याशी मैत्री कशी झाली?"
"मी नित्याला ट्रेकवर भेटलो" ज्ञिमित्री म्हणाला.

ट्रेकवर निसर्ग नव्याने भेटतो असं म्हणतात, मुली कधीपासून भेटायला लागल्या? हा कुठला ट्रेक? असले ट्रेक आमच्यावेळी नव्हते बुवा! ज्ञिमित्री नित्याला ट्रेकवर भेटला. हे दोघे ट्रेक करत असताना थकले, मग ट्रेक मध्ये ब्रेक घेत आडोशाला टेकले, तिथे गप्पा झाल्या, एकमेकांचे नंबर एक्सचेंज झाले. ट्रेकवरून थेट ते डेटवर गेले, डेटवर ब्रेड पॅटिस खात, हे दोघे सेट झाले, मग दोघेच नाईट ट्रेकला जाऊ लागले. अशाच एका ट्रेकवर गुडघे टेकून "टेक माय लव्ह" असं म्हणत ज्ञिमित्रीने नित्याला प्रपोज केलं, नित्याला पटकन उत्तर देता आले नाही, म्हणून ज्ञिमित्री तिला "टेक युअर टाईम" असं म्हणाला, मग जेव्हा नित्याच्या भावनांनी ओव्हरटेक केलं, तेव्हा नित्या "हो" म्हणाली.

"ऐ नित्या म्हणाली तुला सिक्स पॅक्स आहेत" नीरव ज्ञिमित्रीला म्हणाला.
"सिक्स तर नाहीयेत, दोन आहेत" असं म्हणतं ज्ञिमित्रीने त्याचा कुडता वर केला, त्याच्या पोटावरचे अॅब्ज दाखवू लागला, तशी इरा एक पाऊल मागे सरकली, पण नीरवने खाली वाकून त्याचे अॅब्ज मोजले.
"अरे हो दोनच आहेत" नीरव म्हणाला.
"येस्स अॅब्ज वाढवायचे आहेत, नित्याच्या बर्थडेला मी तिला सिक्स पॅक्स अॅब्ज गिफ्ट म्हणून देणार आहे" ज्ञिमित्री म्हणाला.
बर्थडे गिफ्ट म्हणून सिक्स पॅक्स अॅब्ज? चॉकलेट्स, केक, घड्याळ अशा गोष्टी गिफ्ट देतात ना? त्याला काय झालं? मला असं इराला गिफ्ट देता येईल का? पण मला आधीच खूप कब्ज होते असे अॅब्ज कधी येणार ना..

"तू ना, मिठा आणि मीठ खाऊ नकोस" नीरवचा सल्ला.
"हो यार, मला डायट करायचंय पण मोर्च्यांमुळे खाण्याचे हाल सुरु आहेत" ज्ञिमित्री पोटावरून हात फिरवत म्हणाला.
"मोर्च्यांमुळे?? तू मोर्च्यांमध्ये का जेवतोस?" इराने विचारले.
"मोर्च्यांमध्ये जेवत नाही, पण मोर्च्या संपल्यावर जेवतो" ज्ञिमित्री म्हणाला.
ज्ञिमित्रीच अगदी बरोबर होतं, मुळात मोर्चा चालू असताना भूक लागली तर? मग काय करायचं? ऐन मोर्चा सुरु असताना कसं जेवणार? बाकीचे निषेध म्हणून घोषणा देत आहेत, तुम्ही डबा काढून नाही जेवू शकत, कसं वाटेल ते? त्या मोर्चाला चवच राहणार नाही.

"पण कसले मोर्चे? आय मीन तू मोर्चाला का जातोस?" मी विचारले.
"मी मोर्च्यांमध्ये गाणी गातो" ज्ञिमित्रीने उत्तर दिले.
"काय?"
"मी मोर्च्यांमध्ये..."
"ते कळलं पण का?" इराने विचारले.
"दिवसभर मोर्चा सुरु असेल तर लोकं कंटाळतात, म्हणून ऑर्गनायझर मला गाणी गायला बोलवतात" ज्ञिमित्री मागे पुढे मान हलवत म्हणाला.
ज्ञिमित्री "प्रोटेस्ट सिंगर" होता, तो मोर्च्यांमध्ये गायचा, त्याचा हा फुल टाईम जॉब होता, मला हा जॉब असतो हेच माहित नव्हतं, नाहीतर मी सुद्धा या जॉबसाठी प्रयत्न केला असता, संगीत क्षेत्रात योगदान देण्याची माझी कमालीची इच्छा होती. ज्ञिमित्रीचे महाराष्ट्रभर दौरे सुरु असतं. तासाच्या हिशोबाने त्याला मोर्च्याचे ऑर्गनायझर्स पैसे देत असतं. कुठे असतात हे ऑर्गनायझर्स? मला का नाही कधी दिसले?

"मोर्चाला ऑर्गनायझर? मोर्चा आहे का पार्टी?" इरा पटकन म्हणून गेली.
"पार्टीचा मोर्चा असतो" नीरव तिला म्हणाला.
"तू मोर्च्यावरून डायरेक्ट इथे आलास का?" मी विचारले
"हो, आज ओपन युनिव्हर्सिटीत मोर्चा होता, मी तिकडेच होतो"
"कशासाठी मोर्चा होता?"
"ओपन युनिव्हर्सिटीत फ्री वाय फाय द्या अशी मागणी आहे"
"कोणाची?"
"विद्यार्थी संघटनेची"
फ्री वाय फाय? ते पण ओपन युनिव्हर्सिटीत? मी ओपन युनिव्हर्सिटी बघितली होती, ती फारच ओपन होती, काही सिक्युरिटीच नव्हती, युनिव्हर्सिटीच्या आत कोणीही कधी ही येऊ शकत असे. त्याच युनिव्हर्सिटीत "प्यायला पाणी द्या, नाहीतर युनिव्हर्सिटीची कारंजी बंद करतो" या मुद्दयावर एक उपोषण झालं होतं, काही दिवसांनी कारंजी सुद्धा बंद झाली पण प्यायचं पाणी आलं नाही.

"अरे तुम्ही लग्न केल्याचं सांगितलं का नाहीत?" नीरवने विचारलं
"कोणाचं लग्न?" ज्ञिमित्रीने विचारलं
"तुझं आणि नित्याचं?"
"नित्याचं लग्न झालंय?"
"तुला पण लग्नाला नव्हतं बोलवलं?" इराने हसत विचारले.
ज्ञिमित्री चेहरा पाडून "नाही" म्हणाला.
असं कसलं नित्याचं लग्न? लग्नाला बॉयफ्रेंडच नाही? मग लग्न केलंच कसं?

क्रमश:

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग शेवटचा भाग होता, पण हा भाग लिहिताना वाटले की, अजून एक भाग होऊ शकतो.
हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा Happy

अरे काय रे हे....काहीही धुमाकुळ सुरुये....
नको रे शेवटचा भाग करू....बरेच दिवसांनी माबोवर असे काहीतरी निखळ वाचायला मिळते आहे.

नेहमीप्रमाणेच पंचेस अफाट आहेत....हौशी कॉन्सेलर, बोटं जास्त हलू लागली की, पोट कमी हलतं" डीप थॉट!!. दिनेश का नाही ठेवलं तर बेक्कार हसलोय

Rofl
हे सगळं भयंकर आहे !!!
प्रत्येक वाक्यागणिक हसलोय/हसतोय.
चैतन्य, कृपया ही सिरीज इतक्यात थांबवू नका.. Happy

अहो लेखक साहेब
ईतक्यात संपवलीत

काय राव हे बरोबर नाही बर का

ही सिरीज लवकर बंद करु नकोस.शेवटच्या भागामधे आधीच्या सगळ्या भागाच्या लिंका डकव.
हा पार्ट ही तुफान आहे. Lol

काही शेवटचा भाग वैगेरे नाहीये हा.
पुढचा भाग आलाच पाहिजे. अजुन नित्याचा जांगडगुत्ता कुठे सुटलाय. Happy
धम्माल झालाय हा ही भाग. बरेच पंचेस चपखल.

या कथेला तोडच नाही, सगळंच भन्नाट, मजेशीर आहे
जुने मित्र एकत्र येऊन गप्पा मारतात, असं साधं कथानक आहे, त्यामुळे कथा रेंगाळतेय वगैरे असं काही वाटत नाही
पुढचे भाग लवकर येऊ देत... Happy

जबर्दस्त चाललीये कथा.. धम्माल.. Lol Lol Lol
हा भाग पण खुप आवडला..
वॉचमन हा गूगल सारखा असावा, सगळं माहित असणारा.
मी ओपन युनिव्हर्सिटी बघितली होती, ती फारच ओपन होती, ..
बाकी चे पंचेस पण भारी..

कहर आहे... फक्त या कथेच्या प्रतीक्षेत मी इथे फिरकत होते काही दिवस... आणि प्रतीक्षा सफल झाली... भन्नाट

टोटल कल्ला.. काय मस्तं धुमाकूळ घातलाय पोरांनी.. पण आहे कुठे ही नित्या, तिचा लागतच नाही पत्त्या..

सगळ्यांना मनापासून धन्यवाद, प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले.

मागचा भाग जेव्हा लिहून झाला तेव्हा ठरवलं होतं की हा आता शेवटचा भाग असेल, मग ही कथा संपेल, पण हा भाग लिहिताना असं जाणवलं की अजून एक भाग होऊ शकतो. मागच्या भागाच्या वेळी फेसबुक, ई-मेलवर खूप छान मेसेजेस आले होते, त्या वाचकांनी ही सिरीज लगेच संपवू नका, असे सुचवले, मला सुद्धा काथ्याकूट लिहिताना खूप मजा येते, त्यामुळे आता पुढचा भाग शेवटचा असेल की नाही ते मला आत्ता खरंच सांगता येणार नाही Happy

क..ह..र... नुसता कल्ल्ला चालू आहे.
पण कथा पुढे सरकत नाहीये.
हौशी counselor concept आवडली आणि सिंघम watchman .
अभ्यासाच्या पुस्तकात , महत्त्वाची वाक्ये अधोरेखित करायचो , तसं सगळे भाग परत नीट वाचून , सुविचार गोळा करावे लागणार.
अरे.. ते वेबसिरीजचं घ्या कोणी तरी मनावर!!

धमाल पंचेस आहेत ह़या ही भागामध्ये
पुढचा भाग लवकर टाका

जास्त उशीर झाला की मागचे भाग विसरायला होतात.

धमाल पंचेस आहेत ह़या ही भागामध्ये
पुढचा भाग लवकर टाका
जास्त उशीर झाला की मागचे भाग विसरायला होतात.
नवीन Submitted by akki320 on 2 March, 2018 - 16:10
>>>>>
चैतन्य ही माझी पण तक्रार आहे. फार दिवस लावतोयस.
बायदवे भाग वाढवायचे मनावर घेतले आहेस तर इराच्या लग्नाचा स्पेशल एपिसोड पाहीजे. हक्काची मागणी. Happy

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद, आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया वाचून खरंच खूप छान वाटतं Happy

धन्यवाद पाथफाईंडर.
मी पुढचा भाग लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.
इराच्या लग्नाचा भाग लिहायला सुरुवात केली आहे, जर तो भाग छान जमून आला, तर नक्कीच पोस्ट करेन Happy

Pages