काथ्याकूट: जरी तर्री (भाग पावणे आठ)

Submitted by चैतन्य रासकर on 19 June, 2018 - 15:40

काथ्याकूट: भाग एक
नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
मोघम अमोघ (भाग तीन)
इराची तऱ्हा (भाग चार)
उरातला केर (भाग पाच)
नकळत चघळत (भाग सहा)
हौशी चौकशी (भाग सात)
च्याव म्याव (भाग साडे सात)

बोनस बिनस:
ईशाचा इशू
................................................................................................................................

"नित्याच्या हजबंडचं नाव काय आहे?"
"ऑ"
"काय?"
"मिस्टर ऑ"
"काय?"
"त्याला सगळे मिस्टर ऑ म्हणतात" मंजिरीने सांगितले.
"ऑ? ऑड नावं वाटतंय" इरा म्हणाली.
"ऑड नाव नाही, आडनाव असेल"
"वेगळं नाव आहे" ज्ञिमित्रीला सुद्धा हे नाव वेगळं वाटलं.
"ऑ चायनीज नाव आहे" नीरव म्हणाला.
"चायनीज?"
"चायनीज नावं अशीच असतात, ऑ...लॉ....कॉ" नीरव म्हणाला
नित्याचा नवरा चायनीज? आमचे जीजू चिनी? नित्याचं सासर बीजिंग?

"ऑ निकनेम असेल ना?"
एका अक्षराचं निकनेम? हे तर निकनेमचं निकनेम झालं. असल्या निकनेमचा काय नेम? एवढा क्युट आहे की त्याचं नावचं ऑ आहे? नित्या त्याला कशी बोलावते? अहो का ऑ? घरी आल्यावर काय म्हणते? ऑलास का? आणि हो...कुठला ऑ? ऑ क्युट? ऑ काहीही? ऑ दुखतंय?

नित्याच्या नवऱ्याचा सुगावा, तिचा फोन आणि माझा डोळा लागत नव्हता. मी, नीरव, इरा, ज्ञिमित्री असे आम्ही चार जण, पहाटे चार वाजता, "च्यामारी" नावाच्या चहाच्या टपरीवर, चहा पीत, खारी खात, चांभार चौकशा करत, नित्याच्या पाहुणचाराची वाट बघत उभे होतो, आमच्या चारही मुंड्या, विचार, अविचार, शिष्टाचार करून चीत झाल्या होत्या, माझ्या हाता पायांच्या गोळ्यांना गोळे आले होते, या वयात अशी जागरणं, सोसत नाही हो.

मग आम्हाला, मांजरींच्या नखाच्या प्रचारक, मांजर गोंजर केंद्र चालवणाऱ्या, नखांपासून कानातले बनवणाऱ्या, मनीमाऊच्या हक्कांसाठी लढणारं, बहुतेक युवा असावं असं मनमिळाऊ नेतृत्व, अमोघ यांच्या सौ. मंजिरी भेटल्या, या मंजिरी मॅडम, आमच्या बेस्टेस्ट फ्रेंड नित्या यांना ओळखत होत्या.
"तुम्ही तिचे फ्रेंड्स ना? तुम्हाला तिच्या नवऱ्याचं नावं कसं माहित नाही?" मंजिरीने आम्हाला विचारले, चार तासापूर्वी नित्याला नवरा होता हेच माहित नव्हतं. नवऱ्याचं नाव का तो नावापुरता नवरा आहे? हे सुद्धा माहित नव्हतं

"आम्हाला वाटलं नित्याचा नवरा शरद आहे" इरा म्हणाली
"शरद? आय डोन्ट नो ऐनी शरद, बरं तुमची नाव सांग ना" मंजिरी मॅडम म्हणाल्या, मग आम्ही आमची नावं सांगितलं, मंजिराला ज्ञिमित्रीचं फक्त नाव जरा वेगळं वाटलं, त्याचं नाव काय गावं पण वेगळं होतं, त्याचा मॉस्कोचा जन्म होता, ज्ञिमित्रीने त्याच्या नावाची कहाणी सांगितली.

"मग तुझी मदरटंग काय?" मंजिरीने ज्ञिमित्रीला विचारले.
"मराठी"
"कसं काय?"
"माझी मदर मराठीतच बोलायची" ज्ञिमित्री म्हणाला, फादर घालून पाडून बोलायचे.
"ओह, माझे मॉम डॅड पण मराठी होते, पण डॅड गुजराती बोलायचे" मंजिरीने सांगितले.
"त्यांचा गुजरातचा जन्म का?" नीरवने विचारले.
"नाही, त्यांची आया गुजराती होती "
"आई?"
"आई नाही, आया"
"कोण आया?" नीरवने मागे बघत विचारले.
"आया मीन्स बेबी सीटर" मंजिरीने सांगितले, मला आपली थ्री सीटर माहित होती.
"ओह ती आया"
"डॅडची आया गुजराती होती, त्यामुळे डॅड अडीच वर्षाचे असतानाच 'केम छो' म्हणायचे"
"सरस.. मजा मा"
"कसं असतं, तुम्ही लहान मुलाला जर वेगळ्या भाषेतला बेबीसीटर ठेवला, तर ते मुल लहानपणीच ती भाषा शिकून घेतं" मंजिरीने सांगितले.
"चांगली आया...डिया आहे" इरा मख्ख चेहऱ्याने म्हणाली.
"माझा भाचा आहे ना रु...." मंजिरी मॅडम सांगू लागल्या.
"रु?"
"रुतंभू"
हो, मी जसं ऐकलं तसंच लिहीत आहे, पण रूतंभू, ऋतंभू, उतंभू किंवा हृतंभू सुद्धा नावं असू शकतं. खरं नाव काय हे रुतंभू सुद्धा माहित नसावं, बरं रुतंभूचा अर्थ काय? तो आपापला शोधावा.
"रुतंभूला जर्मन बेबी सीटर आहे"
"जर्मन बेबी सीटर?"
आमच्यावेळी जर्मन भांडी असायची, त्यातल्या त्यात जर्मन प्रेशर कुकर प्रसिद्ध होता, कुकरचा सीटर कधी झाला?
"बेबी सीटर इंडियनच आहे, पण छान जर्मन बोलते, ती जर्मन बोलायला लागली ना की, ऐकत राहावंस वाटतं" मंजिरी मॅडम म्हणाल्या.
ते पण आहे म्हणा, बेबीचं रडणं ऐकून कंटाळा आला असेल तर बेबी सीटरला ऐकावं.
"पण जर्मनच का?" मी विचारले
"इंग्लिश कॉमन झालंय" मंजिरी म्हणाली.
"जर्मनला डिमांड आहे" नीरव म्हणाला.
"ज्याची डिमांड, त्यावर हवी कमांड" इराने तिथल्या तिथे नवीन म्हण बनवली.
पण जर्मनचं का? एखादी कॉम्पुटर लँग्वेज का नाही? डॉट नेट, जावा, पायथॉन का नाही? एखादा कॉम्पुटर इंजिनियर छान बेबी सीटर होऊ शकतो, त्याला आपण "बेबी सिनियर" म्हणू शकतो. मुलांचा सर्वांगीन विकास, विज्ञानाची कास धरूनचं होऊ शकतो, पालकांनी हा प्रयास, त्रास सहन करून करायला हवा.

"बेबी सीटर रुतंभूला रोज जर्मन माईन काम्फ वाचून दाखवते" मंजिरी मॅडम म्हणाल्या.
"माईन काम्फ?"
"माईन काम्फ म्हणजे माझा लढा, हिटलरची बायोग्राफी"
अरे पण रुतंभूच्या लढ्याचं काय? त्याच्या नावातच एवढा लढा आहे, रु स्वतःच्या नावावर ऊऊ करत रडत असेल.
"हिटलर चुकीचा वागला" इरा म्हणाली.
"आपल्या इथे सगळ्या महापुरुषांना नावं ठेवतात, कुठलाच माणूस शेवटी परफेक्ट नसतो" मंजिरी हिटलरची बाजू घेत म्हणाली, हिटलरला बाजू होती हेच मला माहित नव्हतं. पण खरंच असं आहे का? आपल्या इथे महापुरुषांना नावं ठेवतात का? का नाव ठेवतात म्हणून ते महापुरुष होतात? अशी वैचारिक कसकस डिस्कस करत आम्ही, चहावाल्याचा हिशोब केला, तो पर्यंत चहावाल्याच्या शेजारच्या टपऱ्या सुरु झाल्या होता, वडापाववाला, त्याच्या पुढे कोल्ड कॉफी, त्याच्या पुढे पाणीपुरीवाला? पहाटे? पण टपरीचं नावच "सकालची पाणीपुरी" असं होतं, त्याच्याकडे कदाचित कालची पाणीपुरी असावी.

आम्हाला मंजिरी मॅडम, सोसायटी आत घेऊन गेल्या, तिथे हार्डकोर मराठी वॉचमन, ज्याने आम्हाला सडेतोड बोलून हाडतूड केलं होतं, हळू आवाजात मोबाइलवर गाणी ऐकत होता. "दे ना उत्तर कॉल्ला, जाऊ आपण मॉल्ला, किती दिवस झाले, पिझ्झा नाही खाल्ला" हे सुपरहिट गाणं सुरु होतं. "दे ना, दे ना" हे सहा वेळा रिपीट होतं. आम्ही जवळ गेल्यावर वॉचमनने गाणं बंद केलं.
"इथे आली होती?" मंजिरीने वॉचमनला विचारले. मराठी वॉचमनने "नाही" म्हणून मान डोलावली, मंजिरीची मांजर "पोपो" आयुष्याचा मतितार्थ समजावा, म्हणून चरितार्थ सोडून, परमार्थाच्या मार्गाला गेली होती, आम्ही इतका वेळ तिलाच शोधत होतो, पोपोने अशी फारकत घेतल्यामुळे, मंजिरीला फारच हर्ट झालं होतं, कोणी आपल्या जवळचं दूर गेल्यावर, उर भरून येतोच.

आम्ही सोसायटीच्या गेटच्या आत आलो, मी सोसायटी बघून हबकलोच, सो मोठी सोसायटी? हा तर अख्खा मतदारसंघ वाटतोय, या सोसायटीला एक स्वतंत्र नगरसेवकसुद्धा पुरला किंवा उरला नसता.

आम्ही लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर आलो, "चला जाते, कपडे धुवायचे आहेत" असे म्हणत मंजिरी मॅडम लिफ्ट बाहेर पडल्या "वॉशिंग मशीनला काय झालं?" असं विचारणार तेवढ्यात, लिफ्टने आम्हाला चौथ्या मजल्यावर सोडले. प्रत्येक मजल्यावर चार घरं होती, दोन डाव्या बाजूला, तर दोन उजव्या बाजूला, मंजिरीने सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूचे पहिले घर नित्याचे होते, त्या फ्लॅटच्या दारावर "मिस्टर ऑ" एवढंच लिहलं होतं, "ऑ" चे स्पेल्लिंग, 'ऐ डब्लू डब्लू' असे नव्हते, तर "ऐ ऐ ओ" असे होते.

मी दारावरची बेल वाजवणार, तेवढ्यात ज्ञिमित्रीने गॉगल घातला, "गॉगल कशाला?" त्यावर "आय डोन्ट वॉन्ट टू शो हर माय इमोशन्स" असं ज्ञिमित्री पुटपुटला, नित्याने न सांगता लग्न केलं होतं, ज्ञिमित्रीला गंडवल होतं, म्हणून बर्गंडी रंगाचा गॉगल, घालून ज्ञिमित्री नित्याशी भांडणार होता.
मी दारावरची बेल वाजवली, बेलचा आवाज झाला नाही, म्हणून दार वाजवले, "मिस्टर ऑच्या" घराची दहा वेळा बेल, अकरा वेळा दार वाजवले, मग मी मोजायचं सोडून दिलं, पण दार कोणी उघडेनाच!! मी चिडलो असतो तर दार तोडलं असतं, पण हे दार फार मजबूत होतं, म्हणून चिडलो नाही.

परत दार वाजवले, तेवढ्यात, शेजारच्या घराचा दरवाजा उघडला!! अरे बाप रे!! कसं काय? ही कसली सिस्टिम? डाव वाजवलं उजवं उघडलं!! त्या दरवाज्यामागून पांढरा पोलो टी शर्ट घातलेला, साधारण एकशे पन्नास सेमी उंची असलेला, गुटगुटीत बांध्याचा, सडसडीत हातांचा, खडबडीत चेहऱ्याचा, बटबटीत डोळ्यांचा मनुष्य बाहेर आला, तो झोपेत आणि हिरव्या हाल्फ पॅण्ट मध्ये होता. त्याच्या उजव्या हातातली क्रिकेटची बॅट बघून मी त्याला "सॉरी" म्हणालो. त्याला वाटलं आम्ही दरोडेखोर आहोत, म्हणून त्याने प्रतिकारासाठी क्रिकेटची बॅट आणली होती. अरे बॅट्समन पण दरोडेखोर बेल, दार वाजवून का दरोडे घालतील? ते पण पहाटे पाच वाजता?

त्याने उजव्या खांद्यावर बॅट ठेवत आम्हाला विचारले "का करत हव?"
"हम काही नाही करत"
"व्हाय हिएर?" बॅट्समनने परत विचारले.
"वी आर हिअर टू सी वाईफ ऑफ ऑ" मी म्हणालो.
"अंग्रेजी" तो मान हलवत म्हणाला "नइखे समझ में आवत"
मग इंग्लिशला सुरुवात कशाला केली?
"भोजपुरी बोलेनी?" त्याने आम्हाला विचारले.
अरे मी का बोलू भोजपुरी? ते पण सकाळी पाच वाजता?
"थोडा थोडा हिंदी आता हैं" नीरवने उत्तर दिले.
"क्या चाहिये?" त्याने परत विचारले.
"मिसेस ऑ को मिलना है"
"क्यूँ?"
असंच टाईम पास, वेळ जात नाही म्हणून.
"उसके माहेर के यहा से आये हैं" नीरव म्हणाला.
"माहेर?"
"मिसेस ऑ के माहेरवा से आये हैं" मी म्हणालो.
माहेरला भोजपुरीत काय म्हणतात? भोजपुरीत माहेर असतं का? आम्हाला भोजपुरी आजमावून, त्याला समजावून सांगता येत नव्हते, पण इराने सावकाश सांगायला सुरुवात केली "मिसेस नित्याजी को मिलना है, हम दूर से आये हैं"
"ऑ की औरतीया?"
औरतीया? अरे ती तुझ्या शेजाऱ्याची बायको आहे, किमान रिस्पेक्ट अपेक्षित होता.
"हां ऑची औरत"
"मिसेस ऑ जेल मे हवं" भोजपुरी बॅट्समन म्हणाला.
"काय? जेल मे??"
"हा वो जेल मे हैं"
"क्यूँ?"
"हमके नइखे मालूम" भोजपुरी बॅट्समन सोज्वळपणे म्हणाला.
मला चक्कर आली, मी खाली पडणारच होतो, पण पडलो असतो तर लागलं असतं, म्हणून पडलो नाही, नित्या जेलमध्ये? कसं काय? जेलमध्ये जाताना सांगितलं का नाही?

"कोनसे जेल मे?"
"हमके नइखे मालूम"
"इस स्टॉप" असं म्हणून इराने तिचा फोन काढून त्यावर काहीतरी केले, इराने तिचा फोन त्या बॅट्समनच्या चेहऱ्यासमोर धरला आणि म्हणाली "इस नित्या को मिलना हैं"
बॅट्समन इराचा फोन डाव्या हातात धरून, त्यावरचा नित्याचा फोटो नीट बघू लागला.
"ये औरतीया को तनीक कई देखा हवं" भोजपुरी बॅट्समन फोटो बघत म्हणाला.
"ये ऑ की औरत, आय मीन वाईफ हैं ना?" इराने विचारले.
"पता नी, शायद है"
कसला तू शेजारी? जा माघारी, शेजारच्याची बायकोसुद्धा माहित नाही? शेजारच्याची बायको आणि आणि बायकोच्या शेजारी कोण आहे हे माहित असावं, भोजपुरी बॅट्समनने इराचा फोन परत तिच्याकडे दिला.

"अभी आवाज मत करना, लल्ला सो रहा हैं" असं म्हणून भोजपुरी बॅट्समनने आवाज करत स्वतःच्या घराचा दरवाजा लावला, हा लल्ला कोण? ते मल्ला कल्ला नाय. आम्ही परत मिस्टर ऑच्या घराची बेल वाजवली, पण मिस्टर ऑ बाहेर ऑलाच नाही, त्या घरात त्यावेळी कोणीच नव्हते. आता काय करायचं? नित्याला कसं भेटायचं? नित्या खरचं जेलमध्ये आहे का?

"ह्या, नित्या जेलमध्ये जाऊच शकत नाही" नीरव म्हणाला.
"बहुतेक बेलवर बाहेर आली असेल" ज्ञिमित्री म्हणाला.
"शक्यच नाही, तिने सांगितलं असतं"
"असं कसं सांगणार, की मी जेलमध्ये आहे" मी म्हणालो.
"म्हणजे?"
"समजा तू जेलमध्ये गेला तर तू हे लपवूनच ठेवणार ना?" मी नीरवला म्हणालो.
'प्लीज डोन्ट आस्क रीझन, आय एम इन प्रिझन' अशी कधी फेसबुकवर पोस्ट बघितली आहे का?
"तिने लग्न केलं, ते पण लपवून ठेवलं" ज्ञिमित्री म्हणाला.
"पण असं काय केलं की ती जेलमध्ये गेली?" इराने विचारले.
आमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते, नित्याने काय केलं असेल? चोरी? मारामारी? का मर्डर? कॉलेजमध्ये असताना, नित्या चिडली की कोपर मारायची, आता थेट माणूस मारेल?

असं किती वेळ दार वाजवणार? म्हणून आम्ही लिफ्टने परत ग्राउंड फ्लोअरला आलो, पार्किंगमधून काही न बोलता चालत होतो, काय करावे ते कळत होते पण कळकळत नव्हते.
"मिस्टर ऑची बायको नित्या नसेल तर मग मंजिरी खोटं का बोलली?" इराने विचारले.
"आपण मंजिरीला ते देऊ" नीरव म्हणाला.
"काय देऊ?"
"ते रे आपलं, ते देऊ" नीरव आठवू लागला.
"त्रास देऊ?"
"नाही रे"
"सजा देऊ?"
"नाही ना"
"पैसे देऊ?"
"नाही यार, ते नाही का म्हणत, इंग्लिशमध्ये"
"इंग्लिशमध्ये काय देणार?"
"इंग्लिशमध्ये शंकेला काय म्हणतात"
"डाउट?"
"बेनेफिट ऑफ डाउट देऊ?"
"येस्स, मांजर हरवली म्हणून ती टेन्स होती ना, त्यामुळे नित्याचा नवरा.." नीरव वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात मी म्हणालो "असं कसं? एखाद्याचा नवरा चुकून सांगायचा?"
"आपण मंजिरीला परत विचारू" नीरव म्हणाला.
"कशाला? काही गरज नाही, चला घरी जाऊ" इरा ओरडली.
यावर कोणीच काहीच म्हणालं नाही, आम्ही वेडेपणा करून दमलो होतो आता दमल्यावर परत वेडेपणा करायचा नव्हता, आम्ही स्वतःला कुढत, पाय ओढत त्या पार्किंगमधून चालत होतो, या सोसायटीचं पार्किंग मोठं प्रशस्त होतं, लहान मुलांना लपाछपी खेळायला मोठी जागा होती.

आपण सगळेच लपाछपी खेळत असतो, कोणी लपत असतं, कोणी लपवतं असतं, तर कोणी शोधतं असतं. पण लपावं किंवा शोधावं तर लागतं, अलिप्त राहता येत नाही, हा खेळ खेळावा लागतो. लपाछपी या खेळाची गरज आपल्यामध्ये कुठेतरी लपून बसलेली असते.
नित्या कशाला, काय लपवत होती? का आम्ही शोधून काढू म्हणूनच ती लपवत होती?

वाऱ्याची झुळूक अंगावर आली, तसा मी शहारलो, तेवढयात, त्याच क्षणी, कोणाचा तरी फोन वाजला, 'कानरुकलगगू' असा काहीतरी आवाज ऐकू आला, ज्ञिमित्रीला फोन आला होता, बहुतेक रशियन रिंगटोन असावी, आंम्ही सगळ्यांनी त्याला "नित्या का?" असे विचारले पण त्याने नाही म्हणत मान हलवली, तो फोनवर बोलू लागला.

तो पर्यंत आम्ही वॉचमनजवळ आलो होतो, वॉचमन शांत झोपला होता, मी त्याच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसलो, कारण माझे पाय दुखत होते, मी शांतपणे वॉचमनच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपणार तेवढ्यात..
"गायीज..." ज्ञिमित्री ओरडला, तसा मी आणि वॉचमन खडबडून जागे झालो, वॉचमन मला शेजारी बघून दचकला, मी त्याला सॉरी म्हणालो. ज्ञिमित्री आमच्याजवळ येत म्हणाला "आय हॅव टू गो"
"नवीन मोर्चा?"
"नाही, वृक्षारोपण आहे"
"तू झाडं लावताना गाणार?" इराने निरागसपणे विचारले.
मोर्चा, आंदोलन, उपोषण, निषेध, मेळावा, मेळा, चर्चासत्र, शक्तीप्रदर्शन, जत्रा, छबिना इथे सगळीकडे ज्ञिमित्री गायचा, ऑल इन वन सिंगर होता.
"झाडं लावताना बोरं होतं ना, म्हणून मला तिकडे गायला बोलावलं आहे" ज्ञिमित्री म्हणाला.
"कुठे?"
"स्टेशनच्या रोडवर"
"स्टेशनच्या रोडवर वृक्षारोपण??"
"हो, स्टेशनच्या रोडवर बरेच खड्डे होते, ते मोठे सुद्धा झाले आहेत"
रस्त्यातले खड्डे, हे लहान मुलांसारखे असतात, पटपट वाढतात.
"मग?"
"नगरपालिकेचा प्रस्ताव आहे की या खड्यांमध्ये झाडं लावली की छान पायवाट होईल"
"स्टेशनला जायला पायवाट?"
"हो... पण स्थानिक जनतेचा विरोध आहे" ज्ञिमित्री म्हणाला
"विरोध करायलाच पाहिजे, काहीही करतात" इरा म्हणाली.
"पण..."
"पण काय?"
"पण लोकांना पायवाट नाही जॉगिंग ट्रॅक हवा आहे" ज्ञिमित्रीने सांगितले.
"काय??"
"पायवाट केली तर, स्टेशनला पोहचायला उशीर होईल" नीरवने शक्यता दर्शवली
"जॉगिंग ट्रक केला तर लोकं धावत जातील, वेळेवर पोहचतील?" इराने विचारले.
"बरोबर"
"पण तू लोकांच्या बाजूने आहेस का नगरपालिकेच्या?" मी विचारले.
"मी झाडांच्या बाजूने आहे, झाडं लागली पाहिजेत" 'लागली' या शब्दावर जोर देत ज्ञिमित्री म्हणाला, ज्ञिमित्री बाय करून, आळस झाडून, झाडांबरोबर सूर लावायला निघाला, तसं मला आठवलं!!! अरे ते विचारायचं राहिलंच!!

मला ज्ञिमित्रीला सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता, असा प्रश्न की ज्याचं उत्तर माझं आयुष्य बदलून टाकेल, पण त्याला असं विचारलेलं रुचेल का? ज्ञिमित्री जात होता, मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक बघत होतो, विचारू का? आवडलं नाही तर? मला झोप येत होती पण माझं अंतर्मन जाग झालं, मी खुर्चीतून उठलो, ओरडलो "ज्ञिSSSS" एको आला नाही, ज्ञिमित्रीला माझी हाक ऐकू आली नाही, ज्ञिमित्री थांबला नाही, इरा आणि नीरव माझ्याकडे येड्यासारखे बघत होते, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, कारण.. कारण मला तो प्रश्न विचारायचा होता. मी ओरडत ज्ञिमित्रीकडे धावू लागलो, ज्ञिमित्रीला माझा आवाज ऐकू गेला, तसा तो थांबला, त्याने मागे वळून बघितले, मी कसातरी धावत त्याच्यापर्यंत पोहचलो, मी धापा टाकत बोलू लागलो... "तू...."
"काय?"
"तू...केसांना...काय..."
"काय?"
"तू केस कसे वाढवतोस?"

ज्ञिमित्री दहा सेकंड माझ्याकडे बघतच बसला, त्याने नकळत स्वतःचे केस सेट केले, ज्ञिमित्रीला खूप केस होते, केसाळ होता, हातापायांवर, चेहऱ्यावर आयाळ होती, त्याच्या डोईवरचे केस, तुकतुकीत, चकचकीत होते, त्याच्या भुवयांचे केस सुद्धा हातात पकडता आले असते, एखाद्या मुलाला एवढे केस? दुर्मिळच नाही का? किती ही बी ग्रेड असलं तरी या केसांचं सीक्रेट जाणून घ्यायचं होतं.
मी परत विचारले "एवढे चांगले केस कसे?"
"अरे मी एलोवेराचं तेल लावतो" ज्ञिमित्रीने सांगितले.
"कुठे आलं हे एलोवेरा?"
"ते गाव नाहीये, एलोवेरा म्हणजे कोरफड, त्याचं तेल लाव, नक्की गुण येईल" ज्ञिमित्री मला म्हणाला, मी थँक्स म्हणालो, तो निघून गेला, मी माझ्या केसांवरून हात फिरवला, माझे पाच केस पटकन वाऱ्याबरोवर उडत गेले, मी मागे वळून बघितले, इरा आणि नीरव वॉचमनशी काहीतरी बोलत होते, मी कसंतरी चालत त्यांच्याकडे गेलो.

"मिसेस ऑ जेलमध्ये का गेली?" इरा वॉचमनला विचारत होती.
"हाल्फ मर्डर केला" वॉचमन म्हणाला.
"कोणाचा?"
"मिस्टर ऑचा"
"ऑSSSS.....कसं काय?"
"ते काय मला विचारू नका" वॉचमन म्हणाला.
"ही त्यांची बायको नाहीये ना?" इराने स्वतःच्या मोबाइलवर नित्याचा फोटो दाखवत विचारले.
वॉचमनने फोटो बघितला, "पहिली बायको तर नाहीये"
"म्हणजे त्यांनी दुसरं लग्न केलं?"
"मग आता असं बिना बायकोचं किती दिवस राहायचं?" वॉचमन म्हणाला, अरे तू स्वतः बद्दल तर बोलत नाहीयेस ना?
"पोलिसांचा मॅटर ऐ" असं म्हणून वॉचमनने जास्त काही बोलायचं टाळलं, मग आम्हाला टाळलं, मग आम्ही कंटाळलो, आम्ही सोसायटी बाहेर आलो, कोणी काहीच बोलत नव्हतो, काय बोलणार? काय करणार? सगळं तर करून झालं होतं, सहनशक्ती अन फोनची बॅटरी संपत आली होती, आता घरी जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

आम्ही चालत परत त्या मेनरोडवर आलो, आता रहदारी बऱ्यापैकी सुरु झाली होती, पेपरवाले, दूधवाले, सायकलवाले, असंच धावणारे, लोकं दिसू लागले, आम्ही परत त्या "च्यामारी" चहाच्या टपरीवर जवळ आलो, चहावाला आता सेलिब्रिटी झाला होता, पन्नास तरी लोकं त्याच्या टपरी भवती उभी होती, काही लोकं बसले होते, पण ती लोकं मी मोजत बसलो नाही. इरा आणि नीरवने मला तिथे चहा पिऊन दिला नाही, म्हणून मी थोडं चालत पुढे आलो, तिथे एका टेबलवर एकजण 'तर्री पोहा' विकत होता, माझे डोळे एकदम भरून आले, मी डोळे पुसत त्याच्याकडे गेलो, त्या पोहेवाल्याने एक प्लेट तर्री पोहा मला दिला, मी पोहे खाऊ लागलो, नीरव, इराचा नाईलाज झाला, त्या दोघांना सुद्धा भूक लागली होती, शेवटी त्यांनी सुद्धा पोहे घेतले, आम्ही तिथंच उभे राहून, पोहे खाऊ लागलो.

"मला पटतच नाही की, नित्या असं काही करेल" नीरव पोह्यातली तर्री चमच्याने बाजूला करत म्हणाला. आता काय करणार? काही गोष्टी कितीही डोकं आपटलं तरी पटतं नाहीत, मी बोलण्याच्या मूडमध्ये नव्हतो, कारण माझा मूड आता फूडमध्ये होता,
"आपण वाट बघू, तिचा फोन येऊ दे, तिचं काय ते खरं सांगेल" इरा पोह्यावर लिंबू पिळत म्हणाली.

नीरवला तर्री काय आवडली नाही, म्हणून सगळी तर्री त्याने माझ्याकडे दिली, थोडं खाल्यावर त्याला पोहे ही आवडले नाही, म्हणून पोहे ही मला दिले, नीरव पाकीट काढून पोहेवाल्याला पैसे देऊ लागला. पोहेवाला हसून म्हणाला "अरे नीरव पैसे नकोत"
आम्ही दचकलोच!! आम्ही तिघे ही त्या पोहेवाल्याकडे बघू लागलो, तो पोहेवाला हसत आमच्याकडे बघत होता, याला नीरवचं नाव कसं माहित? आम्हाला काय बोलावं ते कळेना, पण नीरवने विचारले "माझं नाव...?"
"बेस्ट.. गेस बरोबर लागलाय" तो पोहेवाला म्हणाला.
"तू इराना ना?" त्याने इराला विचारले. हे ऐकताच इराच्या हातातलं लिंबू खाली पडलं, मला तर 'तू किराणा ना?' असं ऐकू आलं.
"तुझं नाव..." तो पोहेवाला माझ्याकडे बघत माझं नाव आठवू लागला.
"तुम्हाला नाव कसं माहित?"
"मी तुमचे चिक्कार फोटो बघितलेत, असं लगेच ओळखले" 'असं' या शब्दावर चुटकी वाजवत पोहेवाला म्हणाला
"पण तुम्ही..?"
"मी चैतन्य, नित्याचा बॉयफ्रेंड" तो पोहेवाला म्हणाला.

क्रमशः

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगागा! Rofl!
टोटल टाईम पास. शब्दांचा काय खेळ आहे, hats off

भारी लिहिलंय...
अशी पात्रांची नावं कुठून शोधून काढतोस

आणि
पोहेवाला चैतन्य
दोन सेकंदासाठी तूच समोर आला
Rofl

. "दे ना उत्तर कॉल्ला, जाऊ आपण मॉल्ला, किती दिवस झाले, पिझ्झा नाही खाल्ला" हे सुपरहिट गाणं सुरु होतं. "दे ना, दे ना" हे सहा वेळा रिपीट होतं. >>> Rofl हे जास्त आवडलं.
नेहमीप्रमाणे जबरदस्त पंचेस. पण फार म्हणजे फारच उशीर केलात हा भाग आणायला. पुढला जरा लवकर येउदे Happy
माझा साऊथ इंडियन मित्र आहे. त्याला मी लिंक पाठवलेली ह्या सिरीजच्या मागच्या भागांची तो पण माझ्यासारखा ह्या सिरीजचा फॅन झालाय. तो रोज विचारतो आला का पुढला भाग आता आधी त्याला लिंक पाठवली मग मी वाचला Happy

नेहमीप्रमाणेच मस्त एकदम.. येऊ दे अजून.
फार म्हणजे फारच उशीर केलात हा भाग आणायला. पुढला जरा लवकर येउदे >>> +१

फार म्हणजे फारच उशीर केलात हा भाग आणायला. पुढला जरा लवकर येउदे >>>
नाहीतर काय ??? पोहे बनवायला ईतका वेळ लागातो का ?

दे ना उत्तर कॉल्ला, जाऊ आपण मॉल्ला, किती दिवस झाले, पिझ्झा नाही खाल्ला>> हे नविन गाणं आहे का?

रस्त्यातले खड्डे, हे लहान मुलांसारखे असतात, पटपट वाढतात. >> अनदर जेम Biggrin .
पहिल्या भागापासून परत वाचून तो सुभाषित संग्रह करायचा राहिला आहे माझा अजून Happy

हा भाग खुप उशिरा आला.. पण जबरद्स्त..! Lol Lol Lol
सगळे पंचेस मस्त.!
रस्त्यातले खड्डे, हे लहान मुलांसारखे असतात, पटपट वाढतात. Lol Lol Lol

शेवटी नित्या चा बॉयफ्रेंड .. चैतन्य आहे तर..! Happy

शेवटी नित्या चा बॉयफ्रेंड .. चैतन्य आहे तर..! >>> नाही ओ !
या भागाच्या "शेवटी नित्या चा बॉयफ्रेंड .. चैतन्य आहे "
पूढच्या भागात काहितरी वेगळे होईल .
इतके twist and turns तर "रेस ट्रायलोजी" मध्ये पण नव्हते . Wink

रस्त्यातले खड्डे, हे लहान मुलांसारखे असतात, पटपट वाढतात

तुझ्या या अफाट वन लायनर्स चा संग्रह करून ठेवला पाहिजे

आणि अरे किती तो गोंधळ च्यायला, औ काय मिसेस ऑ काय, बॅट्समन तोही बिहारी
धुमाकूळ सुरुये नुसता

जबरदस्त Lol प्रत्येक भाग एकमेकांपेक्षा वेगळा पण नाविन्यपूर्ण. पंचेस तर सॉलिडच. सगळी धमालच. आम्हाला तर प्रत्येक वेळी नवीन काय प्रतिसाद द्यायचा हेही सुचत नाही. Lol

सगळेच भाग ऊत्तम. काय सुरेख लिहिलय! नुसती धमाल! Lol Lol मस्तच!
(कोट्यांचा अतिरेक होतो असं वाटतं कधी कधी पण हरकत नाही)

"अभी आवाज मत करना, लल्ला सो रहा हैं" असं म्हणून भोजपुरी बॅट्समनने आवाज करत स्वतःच्या घराचा दरवाजा लावला,<<<<
कायच्या काय! Rofl

टोटल कहर!

जबरदस्त Lol प्रत्येक भाग एकमेकांपेक्षा वेगळा पण नाविन्यपूर्ण. पंचेस तर सॉलिडच. सगळी धमालच. आम्हाला तर प्रत्येक वेळी नवीन काय प्रतिसाद द्यायचा हेही सुचत नाही. >> +!१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

जबरी हा पण भाग
पात्रांना नाव हि जबरी दिली आहेत
ऒ >>>> Lol Lol Lol Lol

छान चैतन्य.
२० तारखेची कमिटमेंट पाळलीसच. (एक महीन्याने का होईना.) Biggrin

जिज्ञासा, वंदना, मॅगी, चैत्रगंधा, सायुरी
मनापासून धन्यवाद Happy

@ 카버
कथेतला चैतन्य खूप वेगळा असेल, करामती असेल, माझ्यासारखा अजिबात नसेल Happy

@अक्षय दुधाळ
तुम्ही इतक्या आवडीने बाकीच्या लोकांपर्यंत कथा पोहचवत आहात, हे बघून खूप छान वाटलं, मनापासून धन्यवाद, मी आशा करतो की तुमच्या मित्राची प्रतिक्रिया, इथे लवकरच वाचायला मिळेल Happy

@स्वस्ति
मनापासून धन्यवाद Happy
पोहे पटकन होतात, पण तर्री पोहे बनवायला तसा वेळ लागतोच Biggrin
"दे ना उत्तर कॉल्ला.." हे नवीन गाणं आहे, पूर्ण गाणं अजून तेवढं सुचलं, जमलं नाही, जमलं तर नक्की पोस्ट करेन.

इतके twist and turns तर "रेस ट्रायलोजी" मध्ये पण नव्हते<<<<<<<< Lol

@ बी.एस.
धन्यवाद, पण हा चैतन्य वेगळा आहे, माझा अन त्याचा काय संबंध नसेल Happy

@ पद्म, समाधानी, यो यो अज्जूबाबा, @आशुचँप
मनापासून धन्यवाद Happy

@पवनपरी11 @किल्ली
मी नेहमीच तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियांची वाट बघत असतो, त्यामुळे पुढे सुद्धा प्रतिक्रिया नक्की द्या..

@शाली @श्रद्धा @Siddharth Pradhan @mr.पंडित @धनि @स्वाती२ @असामी
तुम्हा सगळ्यांना कथा आवडली हे बघून फार छान वाटलं, तुमच्या प्रतिक्रियांमुळे आनंद नेहमी द्विगुणित होतो Happy

@पाथफाईंडर
मी तुमचा विशेष आभारी आहे, नाहीतर मी अजून खूप वेळ लावला असता.
आधी हा भाग लिहिला होता, तो पूर्ण वेगळा होता, मी तो भाग परत वाचला, काय मजा येत नव्हती, म्हणून परत लिहायला बसलो, मध्यंतरी माझं व्हाट्सअपवरचं लेखन वाढलं होतं Biggrin या सगळ्यामुळे बराच वेळ लागला.
या भागात काही विनोद टाळले, मिसेस ऑ हाल्फ मर्डर कसा करते, हे लिहिण्याचं टाळलं, ते बहुतेक आता पुढच्या भागात येईल Happy

मस्त.
माहेरवा खूप आवडलं. बाकीपण पंचेस छान.

थँक्स द्वादशांगुला, मी तुमच्या सगळ्या कथा न चुकता नेहमी वाचतो Happy

धन्यवाद झेलम Happy

Pages