ईशाचा इशू

Submitted by चैतन्य रासकर on 19 March, 2018 - 15:00

दवंडी:
ही कथा काथ्याकूट सिरीजचा भाग होती, पण काही वाचकांनी सुचवल्याप्रमाणे संबंधित कथा, स्वतंत्र कथा म्हणून पुनः प्रकाशित करत आहे. त्यामुळे कथेचे नाव बदलले आहे. नवीन वाचकांनी या कथेचा जरूर आस्वाद घ्यावा, कथा कशा वाटली ते प्रतिक्रियांद्वारे कळवावे Happy
..............................
"ती माझ्याकडे बघतेय" नीरव मला म्हणाला.
ही तुझी भीती आहे का सहानभुती?
"मी जाऊन बोलू का?" नीरवने मला विचारले
हा तुझा आग्रह आहे का निग्रह? हे मी म्हणणार होतो, पण मी विचारले "काय बोलणार?"

अनोळखी मुलीशी बोलायला सुरुवात कशी करावी? म्हणजे पहिलं वाक्य काय असावं? त्या वाक्यात प्रश्न असावा का? म्हणजे "पीक अप" लाईन काय असावी? तिचा किती पीक अप असावा? "पीक अप" लाईन टिपिकल नसावी, पण ठीक असावी, पण नेमकी या वेळी काय असावी? याबद्दल मी आणि नीरवने विचारांची बैठक उभं राहून मांडली होती.

नोटाबंदीपूर्व काळ होता, कॉलेज नुकतचं संपलं होतं. मी आणि नीरव एकत्र राहायचो, नीरवला नुकताच जॉब लागला होता, मला कोणी इंटरव्हयूला पण बोलवत नव्हतं. अफाट गरिबी होती, जुना शर्ट अंघोळी नंतर टॉवेल म्हणून वापरायचो, मग अनिकेत आणि इराचं लग्न ठरलं, त्यामुळे तो शर्ट धुवावा लागला. लग्नाच्या दिवशी अंघोळ केल्यावर बेडशीटने अंग पुसलं.

अनिकेत आणि इराची आधी धांदल सुरु झाली, मग लग्न सुरु झालं. लग्नाचा मुहूर्त कधीच टळला होता, पण अनिराचा जोडा इतका जमून आला होता की, ते ज्या वेळी लग्न करतील, त्या वेळी मुहूर्त घडेल, हा जावईशोध काही जाणकारांनी लावला, इरा छान दिसत होती, तिने मोठी नथ घातली होती, पण तिची नथ आणि तिचा नाथ, दोघे ही डोईजड वाटत होते. अनिकेत इतका थकला होता की, तो स्टेजवरूनच जांभया देत होता. हा लग्नातच लग्नाला कंटाळला? पण खरंच स्वतःच्या लग्नाच्या वेळी जांभया कशा द्याव्यात? एखाद्या नवरदेवाला किंवा नवरीला झोप आली असेल तर? जांभया येणारच ना? त्या कशा रोखणार? काय करावं? कॉफी घ्यावी? पण कॉफी पीत लग्न करणं कसं दिसेल?

या लग्नात, नीरव स्वतःचच लग्न ठरवत होता. आधी तो लग्नाळू झाला, मग आगाऊ झाला. नीरवच्या मते एक तरुण मुलगी त्याच्याकडे बघत होती, ते पण सारखी!! हे फारच दुर्मिळ होतं, पण हा योगायोग होता का? ते माहित नाही.
"ती माझ्याकडे बघून लाजली" असं म्हणून नीरव लाजला, मग मी काय करावं? मी त्याची पाठ थोपटली. मला अजिबातच खरं वाटलं नाही कारण, एखादी अनोळखी मुलगी लाजली हे कसं सांगायचं? लाजणं म्हणजे नेमकं काय? ते ओळखायचं कसं? चेहऱ्याचे भाव कसे बदलता? लाजण्याचे शिष्टाचार काय आहेत? बरं शिष्टाचारात लाजणं येतं का? शिष्ट लोकं लाजतात का?

नीरव त्या मुलीकडे बघत म्हणाला "तिचे डोळे कसले भारी आहेत ना, एकदम हरीणासारखे, ते काय म्हणतात मग्रूर...."
"मृगनयनी"
"अरे हो..मृग..नयनी"
"पण तू हरीणाचे डोळे कधी बघितले होते?" मी विचारले
"ताडोबाच्या जंगलात, आपण गेलो होतो ना"
"ते हरीण तर पळत होतं, तुला त्याचे डोळे कसे दिसले?" माझी रास्त शंका.
"ओह, मग आपण जवळून काय बघितलं होतं?" नीरवने विचारले
"काळवीट"
"काळवीटासारखे डोळे?" नीरवने स्वतःलाच विचारलं.
"नाही रे"
"तुला त्या काळवीटाचे डोळे आठवतात?"
"डोळे नाही पण शेपटी आठवतेय" मी म्हणालो
"काळवीटाला शेपटी असते? मग शिंग कोणाला असतात?" नीरवने विचारले.
"शिंगपण असतात ना"
"नाही रे काहीतरी एकच असतं, शिंग नाहीतर शेपटी" नीरवने मला समजावून सांगितले.
आम्ही लगेच गुगलवर आधी काळवीट मग हरीणाचे फोटोज सर्च केले, गूगलवर काहीही मिळतं, खूप शोधलं तर मोक्षसुद्धा मिळेल. त्या मुलीचे डोळे हरीणासारखे किंवा काळवीटासारखे अजिबातच नव्हते, नॉर्मल होते. पण नीरवच्या दृष्टीने तिच्या सौन्दर्याला परिसीमा नव्हती, ती परी होती का सीमा? काय माहीत? कारण तिचं नाव अजून कळलं नव्हतं.

नीरवने ही कथा लिहीली असती, तर साडे तीन पानं तिच्या सौन्दर्याचं वर्णन लिहिलं असतं. त्या मुलीच्या चेहऱ्याचा ग्लो बघून, नीरव डोक्यात स्लो झाला होता, इतका की त्याला ती मुलगी स्लो मोशन मध्येच दिसू लागली, ती स्लो मोशन मध्ये हसत होती, बोलत होती, सेल्फी काढत होती, आळस सुद्धा स्लो मोशन मध्येच देत होती. मग कुठून तरी वारा बिरा आला, तिचे केस बीस उडाले, ते बघून नीरव वर उडाला, या हॉट मुलीला पाहून नीरव पार गार झाला होता.

"पण ती साखर का वाटत आहे?" नीरवने मला विचारले.
नीरवकडे सारखी बघणारी मुलगी, चमचा वाटीने साखर वाटत होती, आता का? शुगर फ्री संपलं होतं म्हणून का? तर नाही. यासाठी फ्लॅश बॅकच्या फ्लॅश बॅक मध्ये जावं लागेल. लग्न सुरु झालं मग आम्ही सुरु झालो, या लग्नात आजूबाजूचा जनसमुदाय सेल्फी काढण्यात मग्न होता. माझं असं निरीक्षण आहे की, बऱ्याच लोकांना सेल्फी काढता येत नाही. "सेल्फी सायन्स" हा खरं तर अभ्यासाचा विषय. या विषयातले बेसिक्स क्लिअर हवेत. उदारणार्थ, तुम्ही जर बारीक असाल, तर मोबाईल चेहऱ्यासमोर पकडून किंवा जाड असाल तर वर आकाशाकडे बघत सेल्फी काढावी, तुम्ही जर शहाणे असाल तर सेल्फी काढूच नये, कशाला ना उगीच डोक्याला ताप. इथे तर माझी सेल्फी काढून मान दुखत होती, म्हणून मी सेल्फी स्टिक शोधू लागलो. मी लग्नातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीकडे बघितले, फोटोग्राफर!! तो कुठून तरी कोपऱ्यात उभं राहून, मोठी लेन्स घेऊन फोटो काढत होता, एवढी मोठी लेन्स? कशाला? हा काय वाइल्ड लाईफ फोटोग्राफर आहे? मी त्याच्याकडे गेलो, त्याला सेल्फी स्टिक मागितली, त्याच्याकडे पण नव्हती.

मी फोटोग्राफर जवळ उभं असताना, आमच्याकडे एक गृहस्थ आले, बरं त्यांना सद्गृहस्थ म्हणू, एकंदरीत ते लग्नाबद्दल नाखुश दिसत होते, आयुष्यात फार सोसलं असेल म्हणून ते आता रुसले होते. मला वाटलं ते माझं वजन विचारतील, पण त्यांनी मला विचारलं "इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना?"
"हो"
"मग वेगळं व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी कशाला?"
मी ब्लॅंक झालो, काय बोलणार? माझं वजन किती? हे विचारलं असतं तरी चाललं असतं, मी फोटोग्राफरकडे बघितलं, अरे एवढा मोठा फोटोग्राफर, काहीतरी स्टॅन्ड घे!! पण तो निघूनच गेला, मीच अडकलो, मी काहीतरी बोलायचं म्हणून त्या गृहस्थांना म्हणालो "सीसीटीव्ही कॅमऱ्यामध्ये क्लोज अप्स येत नाहीत"
"क्लोज अप्स?"
"चेहऱ्याचे क्लोज अप्स येत नाहीत"
"मग असले सीसीटीव्ही कॅमरे लावलेच कशाला?"
असं म्हणून त्यांनी माझी वाटच लावली, मी पुढं काही म्हटलंच नाही. त्यांना नाव ठेवायला वाव मिळाला, मग आत्मिक समाधान मिळालं, पण मला काही सेल्फी स्टिक मिळाली नाही.

ते गृहस्थ निघून गेल्यानंतर मी परत सेल्फी स्टिक शोधू लागलो, अचानक, एक माणूस माझ्या समोरून "चाय चाय" म्हणत गेला, मनकवडा चहावाला!! माझ्या चहाची चाह त्याला लगेच कळाली. सगळेच चहावाले मनकवडे असतात का? अशा मनकवड्या चहावाल्यांचा "डे" का साजरा होतं नाही? चहावाले इतके छान असतात की त्यांची युनिअन सुद्धा नसते. त्यांनी जर संप केला तर, सगळ्यांना कंप फुटेल, पण ते कधी संपावर जात नाहीत, ते फक्त मनात जातात. हे समाधानी लोक, समाधानातून चहा, चहातून समाधान देतात. विचार करून चहा पिण्यापेक्षा, चहा पिऊन विचार करावा, असा विचार करत मी त्या चहावाल्याला चहा मागितला.
त्या चहावाल्याने प्लास्टिकच्या पिशवीतून थर्मास बाहेर काढत मला विचारले "किती देऊ?"
"तीन कप" मी म्हणालो, कारण त्याच्याकडे ते आपले प्लास्टिकचे छोटे कप्स होते. त्याने मला तीन कप दिले, मी चहा पिऊ लागलो, तसा तो चहावाला मला म्हणाला "तीस रुपये"
थंड चहा भाजला!! चहा सांडला, मी स्वतःला सावरत त्याला विचारले "कसले?"
"चहाचे"
"अहो पण.." मला काय बोलावे ते कळेना, मला वाटलं आहेर म्हणून चहा वाटतोय, पण कहर म्हणजे हा तर पैसे मागतोय. इज्जतीचा विचार करत, हुज्जत न घालता मी त्या चहावाल्याला तीस रुपये दिले. त्याने लग्नात चहा विकणं सुरु ठेवलं, पुढे जाऊन त्या चहावाल्याने खूप चहा विकला, पण मुलाकडच्यांना ही गोष्ट खटकली, त्यांनी त्या चहावाल्याला अडवले, त्याला चहाबरोबर कॉफी सुद्धा आणायला सांगितले, त्या चहावाल्याने ग्रीन टी सुद्धा आणला, पण या चहात साखर कमी होती, साखरेचा प्रश्न आला, "खूप होता चहा, साखरेची सोय पहा" अशी परिस्थिती उद्भवली. साखरेसाठी कुरकुर सुरु झाली, मग कुठून तरी साखर विकत आणली, पण ती साखर कोण वाटणार? मी तर खाऊन संपवली असती, म्हणून त्या नीरवच्या मृगनयनीला साखर वाटायचे काम दिले होते.

"ह्या..कसला भंगार चहा आहे" नित्या चहा पीत म्हणाली.
आपल्या नित्या मॅडम आमच्या बरोबर होत्या ना. नित्याला ग्रँड दिसायचं होतं म्हणून तिची एंट्री उशिरा झाली. शो स्टॉपर असतात, नित्या वेडिंग स्टॉपर झाली होती. नित्याला बघताच काहीजण बोलायचे, जेवायचे, हसायचे थांबलेच. नित्याने जेवढं सोनं घातलं होतं, तेवढं माझ्या घरी लोखंड नसावं. तिचा लेहंगा जड नाही अवजड होता, त्या लेहंग्याची घडी करून, दोन्ही हाताने पकडून, खाली वर केलं असतं तरी व्यायाम झाला असता. नित्याने तिचे फोटो काढायला सोबत स्वतंत्र फोटोग्राफर आणला होता, तिचा तो मानलेला मित्र असावा. पूर्वीच्या काळी मानलेले भाऊ असायचे, काळ बदलला, ती नाती बदलली.

"हा चहा कसातरीच वाटतोय" नित्या म्हणाली.
"म्हणजे कसा?"
"ग्लायकोडीन उकळून पिल्यासारखं वाटतंय" नित्या म्हणाली.
"पण तू ग्लायकोडीन का उकळून पिलं होतंस?" मी विचारले.
"अरे चुकून..."
"चुकून? कसं काय?"
"अरे मला मेपल सिरप उकळायचं होतं"
"तू चुकून ग्लायकोडीन गरम केलंस?"
"हो..ते दोन्ही सारखंच दिसतं ना"
"मग तुला कळलं कधी?"
"जेव्हा मला खोकला झाला, तेव्हा बघितलं तर ग्लायकोडीनची बाटली रिकामी होती"
"मग काय मेपल सिरप बाटलीत तसंच होतं??"
"हो ना.."
बाप रे!! पण हिने मेपल सिरप आणि ग्लायकोडीन एकत्र का ठेवलं होतं? ग्लायकोडीन उकळून पिल्यावर खोकला लवकर जातो का?

"मेपल सिरप उकळतात? कशाला?" नीरवने विचारले
"हॉट चॉकलेटला"
"समोरची पण हॉटच आहे ना....चॉकलेट सारखी" नीरव म्हणाला.
"निऱ्या तुला ती भाव नाही द्यायची" नित्या त्या मृगनयनीकडे बघत म्हणाली, नित्याने एका सेकंदात निकाल लावला, तू काय थर्ड अंपायर आहेस का?
"ह्याला तर खूप आवडली"
"फक्त आवडली असं नाही, बट आय थिंक शी इज द वन" नीरव म्हणाला.
"तुझी वणवण सुरु ठेव, पण ही पटायची नाही" नित्या सरळ म्हणाली.
"ती माझ्याकडेच बघत होती" नीरवने तळमळ बोलून दाखवली
"ते पण सारखी"
"तुझ्या मागे कोणी उभं होतं का?" नित्याने नीरवला विचारले
"नाही यार, तिचं नाव शोध ना"
"ईशा"
"तुला कसं कळलं?"
"मघाशी, कोणीतरी तिला ईशा म्हणून हाक मारली"
"इशिता, ईशाली, ईश्वरी, ईशान्या पण नाव असू शकतं" मी म्हणालो.
"नाव इशाचं आहे" नित्या ईशाचं इन्स्टाग्रामवरचं प्रोफाइल दाखवत म्हणाली "इराची नणंद आहे"
"अनिकेतची चुलत बहीण?"
"आता तर अनिकेतसाठी सगळ्याच बहिणी आहेत"

नीरव स्वतःच्या फोनवर ईशाचं प्रोफाईल ओपन करत "ईशा.. ईशा.. ईशा.." असं तीन वेळा म्हणाला, नीरव ईशामय झाला होता, त्याची ईशकली होती, ईशाने त्याच्या आयुष्याला नवीन दिशा दिली होती. इशाचे फोटोज बघून त्याने 'इश्श' सुद्धा केलं असतं.

आम्ही तिघेही, ईशाचं इंस्टाग्राम प्रोफाइल बघू लागलो. प्रोफाइल कल्पक होतं. ईशा होती की नाही ते माहित नाही. सर्जनशील ईशाने इंस्टाग्रामवर एक क्रिएटिव्ह फोटो शेअर केला होता, त्यात फोटोत तिने, तिच्या कापलेल्या केसांची बट एका टेबलवर, काही पुस्तकांवर ठेवली होती, त्या फोटोत एवढचं होतं, बाकी काही नव्हतं, त्या फोटोला तिने "केस स्टडी" असं नाव दिले होते.
"हे केस तिचे आहेत?" नीरवने विचारले.
"मग काय, ती दुसऱ्यांचे केस का शेअर करेल?"
"तिच्या कापलेल्या केसांच्या फोटोला साडे पाचशे लाईक्स!! निऱ्या दे सोडून" नित्या फोटो बघत म्हणाली.
"लाईक्स वरून माणूस ठरत नाही"
"हो का? तुझ्या कापलेल्या केसांना पन्नास तरी लाईक्स येतील का?" नित्याने नीरवला विचारले.
"बघू..आज रात्री कापून बघतो"
"पण ती कापलेल्या केसांचे फोटो का काढते?" नित्याचा प्रश्न.
"वाईट वाटलं असेल, केस कापले म्हणून" नीरवने ईशाच्या केशांची बाजू घेतली.
"कधी कापले होते ते लक्षात राहावं म्हणून.." मी म्हणालो.
"किती कापले होते..."
"बास..कळलं" नित्याने हात जोडले.

ईशा समोरच उभी होती, पण नीरव मन लावून, मान वाकडी करून ईशाचे फोटोज बघत होता.
"स्स्स..."
मोबाइल हातातून खाली पडणार तेवढ्यात, नीरवने दुसऱ्या हाताने कसातरी झेलला.
"काय झालं?" मी विचारले.
"मोबाइल हॉट झाला"
"ईशाच्या फोटोजमुळे?"
"बहुतेक"
"तू सेल्फी काढ, मग थंड होईल" नित्या म्हणाली.
"मी असा थंड नाही राहू शकत, मी तिच्याशी जाऊन बोलतो" नीरव म्हणाला
पण बोलणार काय? नीरवने ईशाशी बोलायला सुरुवात कशी करावी? यावर आम्ही गांभीर्याने चर्चा केली. पहिलं वाक्य काय असावं? ते किती मोठं असावं? कसं असावं?
आम्ही नीरवला खालील पीक लाईन्सवर सुचवल्या.
फोटो काढू का? किती वाजले? आज फारच उकाडा आहे ना? कितवं लग्न? तुम्ही बसून का नाही साखर वाटत? तुम्हाला खुर्ची आणून देऊ का? लव्हशीप देती का? तुम्ही साखर सोडून अजून काय वाटता?
पण नीरवला एकही लाईन नाही आवडली.

"अशी काहीतरी फनी लाईन पाहिजे" नीरवने आम्हाला सुचवले.
"तशी ती फनकन मारेल" नित्या म्हणाली.
"माझ्याकडे फुल प्रूफ प्लॅन आहे" मी खूपच भारी डोकं लावलं.
"काय?"
"मी तिकडे जातो, ईशाचं लक्ष नसताना, तुझ्या बाईकची चावी हळूच तिच्या पायाजवळ ठेवून येतो"
"मग मी ती चावी शोधायला जातो" नीरव म्हणाला
"गाईज, प्लिज ग्रो अप" नित्या वैतागली.
"बरोबर, तू चावी शोधत आहेस असं दाखवं, ईशा ते बघेल, मग तुला मदत करेल"
"येस्स..मग आम्ही बोलायला सुरुवात करू"
"खरी चावी कशाला पाहिजे? तू चावी शोधायची ऍक्टिंग कर ना" नित्या नीरवला म्हणाली.
"पण मग चावी सापडली नाही तर ईशाला डाउट येईल" मी म्हणालो.

"हो हो.. असंच करू" असं म्हणत नीरवने त्याच्या बाईकची चावी माझ्या हातात दिली, माझ्या उजव्या हातात चहाचा कप तर डाव्या हाताच्या मुठीत चावी, चेहऱ्यावर अस्सल अभिनय घेऊन मी ईशाच्या दिशेने कूच केले. मी ईशाकडे बघायचे टाळले, "कोणाला तरी शोधत आहे" असे हावभाव चेहृऱ्यावर आणले, कपाळावर आठ्या वगैरे आणून फुल्ल ऑन अभिनय सुरु ठेवला. हळूच, मोठ्या शिताफीने ती चावी ईशाच्या पायाजवळ ठेवली, तिला काही कळणार नाही, याची खबरदारी घेतली, चावी ठेवल्यावर मी नीरवला इशारा केला.

नीरव चार फुट लांबूनच, खाली गुडघ्यांवर बसून, उजव्या हातात चहाचा कप पडकून चावी शोधायची ऍक्टिंग करू लागला, आता तो चहाचा कप कशाला? चहा पीत का चावी शोधायची? पण नीरव पार फिल्मफेअर लेव्हलचा अभिनय करत चावी शोधू लागला, हनुवटीला हात लावत, कार्पेट खाली, वर करून चावी शोधू लागला. मी आणि नित्या, ईशाकडे बघू लागलो, ईशा काय पण बाकीचे सगळेच नीरवकडे विचित्र नजरेने बघू लागले, एवढा अभिनय केल्यावर, लोकांच्या नजरेत येणारच ना. एवढं पार दिलीप कुमार व्हायला कोणी सांगितलं होतं? नीरवचा अभिनय बघून, एक मध्यवयीन गृहस्थ, नीरव जवळ आले, त्यांनी नीरवला विचारले "काय शोधतोयस?"
"चावी"
"कसली?"
"बाईकची"
"लग्नात अशी चावी शोधायची नसते, अशुभ असतं" असं म्हणत त्यांनी नीरवच्या दंडाला पकडून त्याला वर उठवले, नीरव चेहरा पाडून उठला, ते पार्ट टाईम ज्योतिषी निघून गेले. तुम्ही एखादा छान व्हिडीओ बघत असता, पण मध्येच इंटरनेट डाटा संपतो, की कसं वाटतं, अगदी तसंच नीरवला वाटलं.

नीरवने आमच्याकडे बघितले, नित्याने हातानेच त्याला "जा बोल" असे सांगितले, त्याने परत चावी दिल्यासारखा अभिनय सुरु केला. हा अभिनय करतोय का याला खरंच चावी दिसतं नाहीये? मलाच आता चावी दिसत नव्हती, कुठे गेली? नीरवला चष्मा लागलाय का मला?
नीरव आता ईशाच्या बराच जवळ पोहचला होता, पण ईशाने नीरवकडे दुर्लक्ष केले, ती नीरवपासून दूर झाली, ह्या? पोरगी काय बोलतच नाही? कुठे गेली हिची माणुसकी? एक मुलगा जर काहीतरी शोधतोय तर त्याला मदत करायला नको? निदान काय हरवलं वगैरे एवढं विचारला नको? हेच का ते कलयुग?

नीरव ईशाच्या पुढे जाऊन उभा राहिला, तशी ईशा दचकलीच, तिचा स्टॅचू झाला, नीरवला काय बोलावे ते कळेना, तेव्हा नीरवने कसेतरी "हाय.." म्हणाला.
"हाय.."
नीरवने परत अभिनय सुरु केला, याने अभिनयाचं बाळकडू कुठून घेतलं? याला एकतर अभिनयाचं बाळकडू दिलंच कशाला? याला बाळकडूच दिलं कशाला? केस वगैरे आवरत त्याने त्याच्या चहाचा कप ईशा समोर केला, ईशाने त्याच्या चहाच्या कपकडे बघितले, मग नीरवकडे बघितले, काही न बोलता, नीरवच्या चहाच्या कपात ती साखर देणार एवढ्यात नीरव म्हणाला.. "नको"
ईशा तो साखरेचा चमचा घेऊन तशीच थांबली, तिला काय बोलावे ते कळेना
"माझ्या चहात बोट बुडवशील?"
"एक्सक्यूजमी?"
"कूड यु प्लिज डीप युअर फिंगर इंटू माय टी"
"हं.. काय? कशाला??"
"चहा गोड होईल.."
आ?? काय? ही कुठली लाईन? असली कसली पीक अप लाईन? ही तर "पीक अप अँड थ्रो लाईन" झाली. असं कोण बोलतं? ही तर नापीक लाईन झाली. अरे ती का तुझ्या गरम चहात बोट बुडवेल? मी नित्याकडे बघितले तो पर्यंत नित्या ईशा आणि नीरव पर्यंत पोहचली होती.

"ऐ तू ईशा ना?" नित्याने विचारले
"हो.."
"थोडी साखर दे ना.." असं म्हणून नित्याने तिच्या चहाच्या कपात साखर दिली.
"ऐ तू काय करतो इथे? तुला बाईकची चावी मिळाली का?" असं नीरवला विचारत नित्याने परिस्थिती संभाळली.

नीरव भांबावला, नीरवने मूकपणे 'नाही' म्हणून मान डोलावली, तो खाली बघत आत्मविश्वास शोधू लागला. नित्याने त्याला डोळ्यानेच जाण्यासाठी सांगितले. नीरव खांदे, चेहरा पाडून तिथून निसटला, माझ्याकडे आला. त्यानंतर नित्या साधारण बावीस मिनिटे, ईशाशी बोलत होती, नित्या तिच्याशी काय बोलली ते आजतागायत आम्हाला कळालेलं नाही. आम्हाला शेवटपर्यंत ईशासाठी पिकअप लाईन आणि नीरवच्या बाईकची चावी सापडली नाही, नंतर चावीवाला सुद्धा सापडला नाही, तो पण कुठल्यातरी लग्नाला गेला होता, तो परत येईपर्यंत आम्ही चावीवाल्याच्या दुकानाबाहेर बसून होतो, तो आला, त्याला नीरवच्या बाईकपर्यंत घेऊन आलो, त्याने पंधरा मिनिटात नवीन चावी तयार करून दिली. या चावीमुळे नीरवच्या जिभेची चव गेली, तो नीट जेवला पण नाही.

त्यानंतर दोन महिने, नीरवने ईशाला इंस्टाग्रामवर फॉलो केले, पण ईशाला ट्रम्पच्या ऑफिस मधून स्थळ आलं, मुलगा ट्रम्प ऑफिस मध्ये कामाला होता, ईशाचं लग्न ठरलं, नीरवने लगेच "काँग्रट्स" असा मेसेज केला, ईशा थँक्स म्हणाली, मग नीरवने "एच वन बी व्हिजा देशील का?" असं विचारलं, मग ईशाने त्याला ब्लॉक केलं, या ईशाचा एवढा इशू झाला की निऱ्याला आसवे पुसण्यासाठी टिशू वापरायला लागले होते.

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त....

आवडला हाही भाग...पुढचा भाग येऊ द्या लवकर..

Haha!!
हा भागही चांगला झालाय पण किंचित पाणी ओतल्यासारखा वाटला मधून मधुन.
हा भाग शेवटचा भाग असेल असं वाटत होतं.

खुप मस्त....

आवडला... पुढचा भाग येऊ द्या लवकर..
आरे पन त्या नित्या च काय झाल ?

काय भारी लिहीतोस यार

पंचेस तर तर खुप फनी होतो

नेहमीच्या आयुष्याच्या रनगाड्यात वेगवेगळे विचार करून डोक्याचा भूगा होतो मग असल काहीतरी वाचलं की त्या भुग्यावर थंड पाणि पडल्यासारख वाटत
पुलेश

नेहमीप्रमाणे पंचेस छान.!
पण हा भाग विशेष नाही आवडला.. नित्याच्या बॉय्फ्रेंडला शोधत होते..म्ध्येच ह्या भागाने विस्कळीत वाटतयं..

अनिराच्या लग्नात सेल्फी स्टिक असते असा कुठेतरी उल्लेख आहे ना? मग ते सेल्फी स्टीक का शोधत फिरतात?
सकाळी वाचला हा भाग तेव्हा काही प्रमाणात पंचेस वाचून मजा आली होती पण एकुणात भरकटल्यासारखा वाटला हा भाग. उगाचच वाढवू नका सिरेलीसारखा!

नेहमीसारख अप्रतिम लिखाण, मजा आली, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
एवढं निखळ विनोदी वाचायला मिळत आहे, त्यामुळे एवढ्यात तर थांबू नका
लोकांचा काय प्रॉब्लेम आहे ते कळेना, एकदा म्हणतात भाग चांगला आहे एकदा म्हणतात नका लिहू

आधीच्या भागाइतका जमलं नाही
नित्याच्या बॉयफ्रेंड चे काय आहे त्याची उत्सुकता असताना हा भाग उगाच लांबवला असे वाटले

लॉजिक वगैरेचा विचार न करता भाग वाचला तर रटाळ वाटत नाही, पण ह्या भागात कथा पुढे सरकली असेल अशी अपेक्षा ठेवून हा भाग वाचला तर थोडं " उगीचच " च फिलिंग येतंय... नित्याचं प्रकरण शोधताना हे भलतंच प्रकरण अतिक्रमण केल्यासारखं वाटतंय... अपेक्षा ठेऊन भाग वाचल्याने मला इतका नाही आवडला पण पंचेस नेहमीप्रमाणे जमलेत, ते आवडले.

अरे !! हा तो लग्नातला आम्ही वाचकांनी मागणी घातलेला भाग ना ?? मस्त जमलाय.. पंचेस भारीच आहेत..

>>>अफाट गरिबी होती, जुना शर्ट अंघोळी नंतर टॉवेल म्हणून वापरायचो, मग अनिकेत आणि इराचं लग्न ठरलं, त्यामुळे तो शर्ट धुवावा लागला. लग्नाच्या दिवशी अंघोळ केल्यावर बेडशीटने अंग पुसलं.>>>> भन्नाट Rofl डोळ्यांत पाणी यावं !
पुभाप्र Happy

अरे बाप रे, दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आहेत, पण प्रतिक्रिया येत आहेत, आपण सगळे आपुलकीने वाचत आहात, ही माझ्यासाठी मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. बऱ्याच वाचकांनी सुचवले होते की त्यांना इराच्या लग्नाबद्दल वाचायला आवडेल, मला सुद्धा इराच्या लग्नाबद्दल लिहायचे होते, तसे मी मागच्या भागात नमूद केले होते, त्यामुळे हा भाग लिहिला, त्यामुळे या भागात नित्याच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याबद्दल काही घडत नाही.
पुढच्या भागात नित्याच्या बॉयफ्रेंड कम नवऱ्याबद्दलची सगळी माहिती कळेल, याची मी काळजी घेईन Happy

लॉजिक वगैरेचा विचार न करता भाग वाचला तर रटाळ वाटत नाही, पण ह्या भागात कथा पुढे सरकली असेल अशी अपेक्षा ठेवून हा भाग वाचला तर थोडं " उगीचच " च फिलिंग येतंय >>>> अनुमोदन. हिच ती सब्यसाची लेहंगा वाली का ??

@ स्वस्ति
हिच ती सब्यसाची लेहंगा वाली का ??
हो बरोबर तीच ही.

या कथेचे नाव बदलले आहे, त्यामुळे या कथेचा स्वतंत्र कथा म्हणून आस्वाद घ्यावा Happy

अरे उगाच बदलले. ही सिरीज वाचणार्या लोकांना मिस होणार ना हे सर्व. असो. मला तर हा भाग खूप आवडला. खूप हसले. नवर्याला ही वाचुन दाख्वला. Happy
Frankly speaking I have lost track of Nitya long back. Whenever it comes back, I'll catch up on it. But for now, just reading it as is, its fun!
Its your writing, your choice. Thats why lot of times when you are posting multiple parts story, it is important
to finish most of it so that you continue with your original thoughts and dont change the story as per readers' choice. Just thought to share. Happy

@विद्या भुतकर
तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे, पण कथेत काहीच बदल केलेला नाही, फक्त नाव बदललं आहे जेणेकरून नवीन वाचक, स्वतंत्र,नवीन कथा म्हणून वाचतील.
नित्याचा ट्रॅक खूप सोपा आहे, नित्याने न सांगता लग्न केलं आहे, ते का आणि कोणाशी केलं आहे हेच तिच्या मित्रांना शोधून काढायचे आहे.

स्वतंत्र कथा म्हणून पण छान आहे , अन या कथेत जेव्हा अनिकेत च्या लग्नाचा उल्लेख आला त्यानंतर ही हा भाग आला असता तर काही हरकत नव्हती. मस्त पंचेस आहेत. काही लोकांनी आवरा म्हटलेय त्यांना नित्याचे काय झाले याची जास्त उत्सुकता असावी Happy पण कुणाचे काय झाले ही सरळसोट कहाणी हा इथे पॉइन्ट् च नाहीये मुळी . काय घडले हा अगदी छोटासाच भाग आहे , बाकी शाब्दिक काथ्याकूट हीच तुमची स्टाइल आणि या सीरीज ची खासियत आहे त्यामुळे मला आवडलेत सगळे भाग.

तुमची सगळी सिरिज फॉलो केली नाहीये. हा स्वतंत्र भाग म्हणून वाचला आणि भन्नाट आवडला. एकटाच हसत होतो. Happy
पण शेवट जरा गंडलाय का? ट्रंप, एच वन, इशू टिशू जरा बोर वाटलं. त्याचा एकदम काय संबंध असं झालं. आधीचे काही रेफरन्सेस असतील तर माहित नाही.

कुणाचे काय झाले ही सरळसोट कहाणी हा इथे पॉइन्ट् च नाहीये मुळी . काय घडले हा अगदी छोटासाच भाग आहे , बाकी शाब्दिक काथ्याकूट हीच तुमची स्टाइल आणि या सीरीज ची खासियत आहे त्यामुळे मला आवडलेत सगळे भाग. >>> ++१११

मलाही आवडला हा भाग. येई देत अजून

Pages