काथ्याकूट: मोघम अमोघ (भाग तीन)

Submitted by चैतन्य रासकर on 2 November, 2017 - 17:00

काथ्याकूट: भाग एक
काथ्याकूट: नित्याचं ब्रेकअप (भाग दोन)
............................

"नित्या अमोघ जानला मेसेज करत होती "
"अमोघ जान? जान का जानकर?"
"जान...तू मेरी जान..त्यातलं जान..." नीरव म्हणाला.

काल संध्याकाळी, आम्ही जेव्हा एकत्र भेटलो, तेव्हा नित्या कोणाला तरी सारखे मेसेजेस करत होती, ती कोणाला मेसेज करत आहे हे नीरवने लांबून, तिच्या नकळत बघितलं, त्याला "अमोघ जान" असं नाव दिसलं, आपल्या नीरवची नजर एवढी जबर होती!

जान म्हणजे जानू! ही जाण नीरवला होती, हा माणूसच जाणकार होता, 'जान' खरं आडनाव नव्हतं, नित्याने मोबाइल मध्ये तसं सेव्ह केलं होतं, मुळात नित्याला नावं ठेवायला आवडतं असे, कॉलेजमध्ये असताना, नाव ठेवण्यात तिनं नाव कमावलं, तिचं नाव नावारूपाला आलं, पूर्वीच्या काळी, लग्न झाल्यावर आडनाव बदलत असे, आता प्रेमात आणि कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये पडल्यावर आडनाव बदलतं!

"मी अमोघला फेसबुकवर सर्च केलं.." नीरव म्हणाला.
एखादा आधारकार्डवर नसला, तरी फेसबुकवर असतो, फेसबुकवर असला की कामावर नसतो.
"एक अमोघ, नित्याचा फ्रेंड निघाला.." नीरव म्हणाला.
"मग?"
"मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली..." नीरव म्हणाला.
"मग?"
"पण..त्यानं मला ब्लॉक केलं.." नीरव हळूच म्हणाला.
पोरानेच पोराला ब्लॉक केलं? रिक्वेस्ट पाठवल्यावरच ब्लॉक? रिक्वेस्ट मधूनच ट्विस्ट आला राव!!

आम्ही त्याच फ्रेंच कॅफेत भेटणार होतो, पण काल वाटलं की, तिकडचे वेटर आम्हाला वैतागले आहेत, काल वेटरने आमच्या ऑर्डरची कदर केली नाही, आमच्याकडे लक्ष न देता अनादर केला!!
वेटर हा ना त्या नातेवाइकासारखा असतो, जो नको असताना येतो, पाहिजे असताना येत नाही.
जेव्हा मी चौथ्यांदा चिकन सँडविच मागवलं, तेव्हा तो फ्रेंच वेटर, सरळ मराठीत "ब्रेड संपला" असं म्हणाला. असा कसा ब्रेड संपू शकतो? "चिकन संपलं" असं म्हणावं, तरी खरं वाटलं असतं, त्याने असा नाद केल्यावर वाद घालणार होतो, पण कशाला उगीच भांडण करायची, म्हणून आम्ही सोडून दिलं, मग आम्ही वेटर नसलेली बेटर जागा शोधली, नीरवच्या जिमचा कॅफे!! मी जिमचा कॅफे कधी बघितला नव्हता, कारण मी कधी जिमच बघितली नव्हती, लहानपणी वडिलांबरोबर एकदा मी जिम बघितली होती, पण त्यानंतर कधी 'योग' आला नाही.

नीरव पुढे सांगू लागला..
"अमोघचं फेसबुक वरून खरं आडनाव कळालं, मग त्याला सगळ्या जॉब पोर्टलवर शोधलं"
नीरव एका खाजगी कंपनीत एचआर कम रिक्रुटर होता, त्याच्या कंपनीने त्याला बऱ्याच जॉब पोर्टलवर रिक्रुटर अकाउंट काढून दिले होते, लोकं त्याला एचआर म्हणजे कामचुकार म्हणायचे, पण तो कामचुकार लोकांना रोजगार द्यायचा, कंपनीतल्या व्हेकन्सीला फॅन्सी लोकं शोधायचा, जी लोकं नोकरी शोधत आहेत, त्यांना हा शोधायचा, फावल्या वेळात लोकांचे रिझुमे, सीव्ही वाचायचा, मग इंटरव्हयू घेऊन लोकं वाचायचा, त्यामुळे अमोघचा सीव्ही नीरवने लगेच शोधून काढला. अमोघच्या सीव्ही मध्ये वैयक्तिक माहिती मध्ये, 'मॅरीड' असं नमूद केलं होतं!!
"चुकून झालं असेल" मी म्हणालो.
"ह्या..चुकून कसं? ती काय जन्म तारीख आहे का चुकायला? तो मॅरीडच आहे.." नीरव म्हणाला.
बॉयफ्रेंड निष्ठुर, नाटकी, नालायक निघू शकतो, पण नित्याचा बॉयफ्रेंड नवरा निघाला!!

"तुला काय वाटतं... " नीरव खुर्चीत मागे रेलून बसत म्हणाला, पॉज अन पोज घेत पुढे म्हणाला...
"सिक्स पॅक्स बघून जमलं? का जमलं म्हणून सिक्स पॅक्स बघितले?"
हा प्रश्न गहन होता!! मी विचार करू लागलो, म्हणजे नित्या नेमकं कधी प्रेमात पडली? प्रेमात पडल्यावर तिने सिक्स पॅक्स बघितले? का सिक्स पॅक्स बघून ती प्रेमात पडली? नेमकं काय झालं? सिक्स पॅक्स बघून फिक्स केलं? का फिक्स झाल्यावर सिक्स पॅक्स बघितले? हे आम्हाला कधी कळणार नव्हतं, पण काही म्हणा...नीरवने अमोघच्या पोटावरचे सिक्स पॅक्स फारच मनावर घेतले होते.
माझ्या मते, हा विषय वेगळ्या अंगाला जातो, कारण माणूस प्रेमात कोणत्या क्षणी पडतो? तो क्षण कुठला? मुळात एका क्षणात तुम्ही प्रेमात पडता का? "प्रेमात पडणे" असे म्हणतात, "पडणे" हे एका क्षणात घडते, म्हणजे प्रेमात पडायला एक क्षण पुरेसा आहे, हेच अभिप्रेत आहे, जर प्रेमात पडणे एका क्षणापुरतं मर्यादित नसतं, तर मग लोकं काहीतरी वेगळं म्हणाले असते, कदाचित लोकं "प्रेमात गंजतोय" असं म्हणाले असते, कारण "गंजणे" हे खूप वर्ष चालू असतं.

"काय माहित..नित्याने नीट सांगितलं नाही.." मी नीरवला म्हणालो, नीरव अजून विचारच करत होता, मी मेनू कार्ड बघू लागलो.
"प्रोटीनचे पॉपकॉर्न?" मी ओरडलोच.
"पण खूप महाग आहेत...प्रोटीनचे पराठे घे..मस्त आहेत..." नीरव म्हणाला.
प्रोटीनचा चहा होता, बिस्किटेपण होती, सगळ्या मेनूकार्डवर प्रोटीन होतं, बहुतेक ते मेनूकार्ड सुद्धा प्रोटीनचं असावं, एवढं प्रोटीन? का? मी आजूबाजूला बघितलं.. "चूज प्रोटिन्स..लूज जीन्स..." असं लिहिलं होतं, बारीक होण्यावर फार मार्मिक वाक्य होतं!!
"मला अमोघचा नंबर मिळाला.." नीरव म्हणाला
"कसा काय?" मी विचारले
"सीव्हीवर सगळेच, सगळे नंबर देतात" नीरव त्याचा फोन दाखवत म्हणाला.
मी नीरवकडे रोखून बघितलं, नीरव म्हणाला.. "त्याला कॉल करू"
"कशाला?"
"जाब विचारू.."
"नको यार..."
"नको कसं..नित्या इज गुड फ्रेंड, तिला यातून बाहेर काढलंच पाहिजे.." नीरव फुल्ल जोश मध्ये म्हणाला, एकदम आमरेन्द्र बाहुबली! पण मी कट्टप्पा नव्हतो, त्यामुळे तो माझं ऐकणार नव्हता, मला पण भूक लागली होती, मी आपले प्रोटीनचे लाडू मागवले.

नीरवने नंबर डायल केला, मोबाईल टेबलवर, स्पीकरवर ठेवला, मी नीरवकडे, नीरव माझ्याकडे रोखून बघत होता.
रिंग वाजू लागली..
पहिल्यांदा रिंग वाजली..
दुसऱ्यांदा रिंग..
एक मिनिट...
या कॅफेत कुठल्यातरी फोनची रिंगटोन वाजत आहे!!
माझ्या मागून आवाज येत होता, मी हळूच मागे बघितले, माझ्या मागे, एक मुलगा बसला होता, त्याचा फोन वाजत होता!!
मी ताडकन उठलो, नीरवच्या सुद्धा लक्षात आले, तो ही उठून उभा राहिला, आम्ही दोघे त्या मुलाकडे रोखून बघू लागलो, त्या मुलाचं आमच्याकडे लक्ष गेले, तसा तो दचकला, रिंग वाजत होती, त्या मुलाने घाबरत, आमच्याकडे बघत त्याचा फोन घेतला, मी त्या मुलाकडे बघत, हसत फोन कट करणार तेवढ्यात...
तो मुलगा त्याच्या फोनवर बोलू लागला!! पण आमच्या फोनची रिंग तर अजून सुरूच होती...
आम्ही गोंधळलो, झटकन खाली बसलो, नीरवने पटकन कॉल बंद केला, नीरव म्हणाला...
"मला वाटलं.."
"मला पण.." मी एवढंच बोलू शकलो.
आम्हाला वाटलं, अमोघ इथेच आहे, पण हे असले, पिक्चरवाले ट्विस्ट आमच्या नशिबात नव्हते! काय करावे ते कळेना, मी प्रोटीनचे लाडू खाऊ लागलो, ह्या...हे लाडू कडू आहेत.

तेवढ्यात..नीरवचा फोन वाजला!!
आम्ही नंबर बघितला, हा कॉल अमोघकडून आला होता!!
नीरवचे डोळे मोठे झाले, मी त्याला हातानेच कॉल स्पीकरवर ठेवायला सांगितले, नीरवने फोन उचलला, स्पीकर सुरु केला..
"हॅलो.." फोन मधून आवाज आला.
नीरव काही बोलेना, मीच हातानेच नीरवला 'बोल' असे म्हणालो, पण तो कसेतरी हळू आवाजात "हॅलो" म्हणाला.
"हॅलो..कोण बोलतंय?" अमोघने विचारले.
"अ..मी नीरव आणि.."
नीरव माझे सुद्धा नाव सांगणार होता, पण मी त्याला हातानेच "माझे नाव सांगू नको" असे म्हणालो.
"नीरव आणि?" अमोघने विचारले.
"अ..मी..मी... नीरव आणि..कर..." नीरव गडबडला.
"नीरव आणिकर?" अमोघने विचारलं
"हो..मीच.." नीरव म्हणाला..
अर्रर्र..नीरवने स्वतःसाठी नवीन आडनाव शोधून काढले.
"आपलं काय काम होतं?" अमोघने सौम्य स्वरात विचारले.
"मी नित्याचा फ्रेंड आहे..मला माहितेय..तू मॅरीड आहेस.." नीरव एकदम बोलून गेला, पण मग लगेच काही उत्तर आले नाही, अमोघने थोडा वेळ घेतला आणि म्हणाला..
"ओके..मग..मी काय करू?" अमोघ म्हणाला.
"तू नित्याला कधी सांगणार आहेस की तू मॅरीड आहेस?" नीरवने पटकन विचारले.
"मी मॅरीड आहे.. हे नित्याला माहितेय.." अमोघ शांतपणे म्हणाला.
माझा आपसूकच 'आ' वासला, नीरव स्तब्ध झाला, आम्हाला पुढे काय बोलावे ते कळेना..नित्याला माहित होतं की अमोघ मॅरीड आहे? तरी अफेअर केलं? का? मॅरीड होता म्हणून अफेअर लपवलं? आमचा गोंधळ उडाला, इकडे फोनवर अमोघ "हॅलो...हॅलो" करत होता, आम्ही उत्तर देत नव्हतो, कारण आमचे प्रश्न वाढले होते, बातमी पचवायला वेळ हवा होता, आयला...अमोघ बाता मारतोय का बातमी देतोय? मी पटकन कॉल कट केला..
"कॉल का कट केला?" नीरव ओरडला.
"मग आपण काय बोलणार होतो?" मी प्रश्नाला प्रश्नानेच उत्तर दिले.
तसा नीरव शांत झाला, पुढे काही बोलला नाही, इतका वेळ आम्हाला वाटलं की, नित्याला माहित नाही की अमोघ मॅरीड आहे, पण नित्याला माहित होतं! नित्या का तू आम्हाला सांगत नाहीस?? विकेट काढताना आमचा कडेलोट झाला!

"खोटं बोलतोय?" नीरवने विचारलं.
"तो तर कुल होता यार..आरामात बोलत होता.." मी म्हणालो.
"मला वाटतं, हा खोटं बोलतोय..याने मॅरीड आहे हे लपवून ठेवलं, अफेअर केलं, आता अफेअर संपवायचं ..."
"म्हणून तो सांगतोय की तो आता यूएसला जाणार? " मी नीरवच वाक्य पूर्ण केलं.
"येस...बरोबर..म्हणून तो लग्नाला ही नाही म्हणतोय.."
"आपण आधी नित्याशी बोलू.." मी म्हणालो
कारण अमोघशी बोलण्याचं धाडस नव्हतं, अमोघ तर कूल निघाला, हा कूल पोरगा फूल तर करत नव्हता ना? आम्ही थोडे शांत झालो, प्रोटीन जास्त झालं बहुतेक. नीरवचा फोन वाजला, अमोघचा कॉल? माझा घास घश्यातच अडकला..

नीरवने कॉल घेतला.
"हॅलो.." एवढं बोलून तो थांबला..
माझा घास अजून तसाच अडकला होता.
"ओके..मी खाली येतो " नीरव उठून उभा राहत म्हणाला, मी हातानेच त्याला "काय?" म्हणून विचारले.
"इरा..." असं म्हणून नीरवला निघून गेला.
इरा? कशी काय? आत्ता इथे? नक्कीच नीरवने बोलावले असणार, घरी असताना ती काही बोलली नाही, मला कोणी काही सांगतच नाही, काय चालू आहे यार? या लाडूंमध्ये साधं तूप सुद्धा नाही, असले कडू लाडू कोण करतं?
मी साधं पाणी पिऊ लागलो, कारण इथे "पी वॉटर" पण होतं, पी फॉर प्रोटीन! मी इकडे तिकडे बघितले, कॅफेच्या एका दुसऱ्या भिंतीवर, मोठ्या अक्षरात, "से नो टू शुगर..येस्स टू किलर फिगर" असं थिल्लर वाक्य लिहलं होतं!

पाच मिनिटे झाले असतील, नीरव आणि इरा एकत्र येताना दिसले, मी लांबून इराला 'हाय' केलं, इराने उत्तर म्हणून डावी भुवई उडवली, मी आणि इरा एकत्र राहतो, हे नीरवला अजून माहित नव्हते, आम्हाला एवढ्यात सांगायचे नव्हते, बाकीच्यांना कळाले असते तर, लोकांनी परत आम्हाला नाव व आडनाव ठेवली असती, इराच आडनाव 'इरा अफेअरवाली' असं झालं असतं, त्यामुळे आम्ही सरळ या गोष्टी लपवल्या.
"ए हाय किती दिवसांनी.." इरा मला म्हणाली.
"हो ना खूप दिवसांनी..कशी आहेस?" मी म्हणालो
"मी मस्त.." इरा माझ्या शेजारी बसत म्हणाली, नीरव आमच्या समोर बसला.
"मी कितीवेळा तुला मेसेज केले..." नीरव इराला म्हणाला.
"अरे हो..पण समहावू मला बाहेर पडायचं नव्हतं..." इरा म्हणाली
"तू व्हाट्सअँप ग्रुप पण सोडलास..." मी इराला म्हणालो.
"तुम्ही ग्रुपवर फक्त गॉसिप करता..मला बोअर झालं.."
'मग काय करायचं असतं?' असं मी म्हणणार होतो, पण टाळलं.
"आता कशी आहेस?" नीरवने विचारले.
"माहित नाही. आय गेस आय एम ओके.." इरा म्हणाली.

आम्ही पुढे काही म्हणालो नाही, इरा डिप्रेस होती की नाही माहित नाही, पण आज खूप महिन्यानंतर ती घराबाहेर पडली, जेव्हा अनिकेत बरोबर घटस्फोट झाला, तेव्हा ती पार कोलमडली होती, तिला अनिकेत बरोबर राहायचं नव्हतं, घटस्फोट झाला हे घरी सांगायचं नव्हतं, कारण घरच्यांशी भांडून लग्न केलं होतं, तिला राहायला घर नव्हतं, तेव्हा ती माझ्याकडे आली, माझ्याबरोबर राहू लागली, आम्ही प्रेमात होतो की नाही माहित नाही, कदाचित होतो, कदाचित नव्हतो, पण एकमेकांना सोबत होती.
आधी माझ्या घरी राहत असताना, इरा एकटीच बसायची, बाहेर यायची नाही, जास्त बोलायची नाही, की कोणाला भेटायची नाही, मग मी तिच्या खोलीत एसी बसवला, पंखा काढून टाकला, सोसायटीच्या वॉचमनला सांगून टेरेस बंद करून ठेवले, किचन मधली सूरी, कात्री वगैरे लपवून ठेवली, ती झोपल्यावर तिच्या फोनची ब्राउजिंग हिस्टरी बघू लागलो, कारण ब्राउजिंग हिस्टरी बघून माणसाचा प्रेझेन्ट कळतो.

सगळेच शांत झाले होते, मी नीरवला म्हणालो.. "ए चल तुझी जिम बघू.."
"तुला जिम बघायची?" इराने हसत मला विचारले.
"हो.. आता मी रोज पहाटे पळायला जाणार आहे.." मी म्हणालो, तर हे दोघे हसायला लागले!! काहीतरी प्रोत्साहन वगैरे द्या? आमचे हे महान मित्र प्रोत्साहन देत ही नाहीत आणि घेत ही नाहीत.
आम्ही कॅफेतून बाहेर आलो, जिमकडे जाऊ लागलो.
"ए तो कॉन्ट्रीब्यूशन बॉक्स कशाला आहे?" इराने विचारले.
जिमच्या काउंटरवर एक कॉन्ट्रीब्यूशन बॉक्स ठेवला होता, मला वाटलं गरीब मुलांना मदतीसाठी ठेवला असेल, पण नीरव म्हणाला... "जिम मध्ये डीजे आणायचाय..."
"जिम मध्ये डीजे?"
"अरे हो...जिम मध्ये खूप भंगार गाणी लावतात, बोअर होतं, मग आम्हीच वर्गणी काढून, डीजे बोलवणार" नीरव म्हणाला, हे ऐकून, इराने 'काय लॉजिक आहे?' या अर्थाने माझ्याकडे बघितले, मी खांदे उडवले, सणासुदीला उत्साही मंडळ वर्गणी घेतं असतं, त्याला मोठी परंपरा होती, हीच परंपरा जिम मध्ये सुरु झाली असावी, डीजेवाले बाबू आता, जिमवाले डीजे होणार होते.
आम्ही जिमच्या आत आलो, बहुतेक इंग्लिश भाषेतील गाणी सुरु होती, जिम मध्ये खूप आरसे होते, म्हणजे आरश्यांच्या भिंती होत्या, दोन मुलं आरशात बघून सेल्फी काढत होती, एक जण तिथेच पालथा झोपला होता, बहुतेक त्याला जिम जास्त झाली असावी, एकजण ट्रेनरच्या हातापाया पडून 'आता जास्त नको' असं म्हणत होता, दुसरीकडे एका मुलीला, तीन मुले कदाचित व्यायाम शिकवत होती. दुसऱ्या बाजूला एकजण ओरडत, दुसरा रडत तर तिसरा शर्ट काढून व्यायाम करत होता, बहुतेक त्याला उकडत असावे, एका कोपऱ्यात "इट्स सिम्पल..जिम इज टेम्पल" असं लिहलं होतं.

जिम बघून झाली, आम्ही जिमच्या बाहेर आलो, परत कॅफेकडे जाऊ लागलो.
"बाकी सगळे कसे आहेत..?" इरा तिच्या फोनकडे बघत म्हणत म्हणाली.
नीरवने माझ्याकडे बघितले, तो मला नजरेतूनच "नित्या बद्दल सांगायचं का?" विचारत होता, मी "नाही" म्हणून मान डोलावली.
"नित्याची पोस्ट वाचली?" इरा अजून फोन मध्येच गुंतली होती.
मी आणि नीरव फोन काढून नित्याची पोस्ट बघणार, तेवढ्यात इराने पोस्ट वाचून दाखवली...
"आपलं नाही पटलं..
तरी प्रेम नाही आटलं...
हॅशटॅग कुठेतरी खटकलं"
"आटलं...का आतलं?" नीरवने फोनकडे बघत मला विचारलं..
"फाटलं... असं पाहिजे" इरा हसत म्हणाली, ती पुढे म्हणाली..
"ही अजून ब्रेकअप मधून बाहेर नाही आली वाटतं..."
एका सेकंदात, इराने जो काय बॉम्ब टाकला होता, त्याने आम्ही उडालोच, आता खाली येणे नाही.
"तुला माहित होतं?" नीरवने मोठ्याने विचारलं.
"काय?" इराने विचारलं..
"नित्याचं अफेअर?" मग मी विचारलं.
"हो.." इरा म्हणाली.
घशाला कोरड पडली, कोरड!! आम्ही कॅफेत येऊन परत त्याच जागी बसलो, मी प्रोटीनच पाणी मिळतं का ते बघू लागलो.

आमचे असे भांबावलेले चेहरे बघून इरा म्हणाली "गाइज..तुम्हाला माहित नव्हतं?"
"तिने काल सांगितलं.."
इरा हसत बोलू लागली..."काल?..लोल..तीन चार महिने झाले ब्रेकअप होऊन.."
"पण तुला कसं कळलं?" मी विचारलं.
"मी भारीये.." इरा म्हणाली.
"आम्हाला का कोणी सांगत नाही?" मी विचारले, इरा हसायला लागली, माझ्याप्रमाणे नीरवचा सुद्धा चेहरा पडला.
"तुम्हा दोघांना कोणी, कधीच काही सांगत नाही" इरा हसत म्हणाली.
"आम्ही तिच्या बॉयफ्रेंडला फोन केला होता" नीरव म्हणाला.
"फोन का?" इराने हसत विचारले.
"तो मॅरीड आहे, आम्हाला वाटलं तो नित्याला फसवतोय.." मी म्हणालो.
"तो मॅरीड आहे?" इरासाठी सुद्धा हा शॉक होता.
"हो..फोनवर तसा तो म्हणाला.." मी म्हणालो.
"वाटत नाही..शरद मॅरीड असेल म्हणून.." इरा म्हणाली.
"कोण शरद?"
"नित्याचा बॉयफ्रेंड.. " इरा मेनूकार्ड बघत म्हणाली.

काथ्याकूट: इराची तऱ्हा (भाग चार)

................
- चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अदिति
हो क्रमश: आहे. या भागाला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर मग चौथा भाग लिहितो Happy

जिम चे वर्णन अफाट आहे Happy

जिम जास्त झाली असावी
हे वाक्य म्हणजे कहर आहे, कॉपीराईट घ्या याचा Happy

मस्त...
नेहमीसारखा शेवटच्या 2 वाक्यात बॉम्ब Happy

@चैतन्य लवकर भाग टाकत जा राव. इथे नात्यांची इतकी गुंतागुंत आहे की मला लिंक लागत नाही. सगळे भाग परत सलग वाचावे लागतात. Lol

मस्त जमलाय भाग. मला प्रोटीनवाला पॅरा आवडला. इतका की जेवणात तोफू खावं लागलं. Wink

अरे मस्त जमलंय हे. नेहमीप्रमाणेच. भारी आवडलं.
'जिम जास्त झाली असावी' आणि 'प्रेमात गंजतोय' अशक्य आहेत.
पी-वॉटर, प्रोटीन वाला पॅरा आणि जिममधे लिहिलेली वाक्यं मस्तच.
शेवटच्या दोन ओळीत तर स्फोट.
पुढचा भाग जरुर लिहा चैतन्य.

जिम जास्त झाली असावी
हे वाक्य म्हणजे कहर आहे, कॉपीराईट घ्या याचा Happy >>>>>>>> अगदी अगदी Happy

अरे मस्त जमलंय हे. नेहमीप्रमाणेच. भारी आवडलं.
'जिम जास्त झाली असावी' आणि 'प्रेमात गंजतोय' अशक्य आहेत.
पी-वॉटर, प्रोटीन वाला पॅरा आणि जिममधे लिहिलेली वाक्यं मस्तच.
शेवटच्या दोन ओळीत तर स्फोट.
पुढचा भाग जरुर लिहा चैतन्य. >>> +११११

खुसखुशीत!
जिममधली वाक्य भारी आहेत! Lol

मस्तच ! आवडला हा भाग. पुढचा भाग जरुर लिहा +१

आमचे असे भांबावलेले चेहरे बघून नित्या म्हणाली, "गाइज..तुम्हाला माहित नव्हतं?"
"तिने काल सांगितलं.."
नित्या हसत बोलू लागली..."काल?..लोल..तीन चार महिने झाले ब्रेकअप होऊन..">>>येथे इरा हवे ना?

आमचे असे भांबावलेले चेहरे बघून नित्या म्हणाली, "गाइज..तुम्हाला माहित नव्हतं?"
"तिने काल सांगितलं.."
नित्या हसत बोलू लागली..."काल?..लोल..तीन चार महिने झाले ब्रेकअप होऊन..">>>येथे इरा हवे ना?>>>> चैत्राली +१
माझ्याही आलेलं लक्षात पण लिहायचं राहुन गेलेलं.
चैतन्य, तेव्हढ दुरुस्त करा.

आशुचँप, भान
धन्यवाद कॉपीराईट घेऊन ठेवतो Happy

शमा, सिंडरेला, सिम्बा, कऊ, सायुरी, वावे, चैत्रगंधा, स्वस्ति, अंकु, _Gargi_ पूनम, आदू, समाधानी, पूनम
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांची नेहमीच वाट बघत असतो, तुम्हा सगळ्यांना कथा आवडली हे बघून, खूप छान वाटलं, सगळ्यांना मनापासून धन्यवाद Happy

पाथफाईंडर
गुंतागुंत होणार नाही याची काळजी पुढच्या भागाच्या वेळी घेतो Happy

सायो
हो ना..तोफू, पनीर!! या प्रोटीनसाठी बरंच काही करावं लागतं Happy

सस्मित, र।हुल, अॅना, स्नेहनिल, निर्झरा, अॅना
तुम्हा सगळ्यांना हा भाग आवडत आहे हे बघून खूप आनंद झाला, पुढचा भाग लगेच लिहायला सुरुवात करतो Happy

रुपालि देशपान्डे,
सगळी देवी सरस्वतीची कृपा Happy

चैत्राली उदेग, सस्मित
योग्य तो बदल केला आहे धन्यवाद Happy

Pages