गझल रचना.... तरही गझल.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 4 December, 2010 - 04:49

गालिब्,मीर आदि शायर मैफिल संपल्यावर एक ओळ देत्,की ज्या ओळीचा उपयोग मतल्यात सानी मिसरा म्हणून करुन पुढच्या वेळेस त्यावर आधारीत एक गझल तयार करून आणायची असे.

असाच प्रयोग्,गझल सागर प्रतिष्ठान च्या वतीने मुंबई इथे काही काळ चालला. .... माझ्याशी नियमित संपर्क असलेल्या काही शायरांनी त्यात उत्तमोत्तम गझल रचून गझल हा काव्यप्रकार लोकप्रिय व्हावा,सर्वमान्य व्हावा म्हणून बराच हातभार लावला आहे.

गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर्,प्रसादपंत्,भुंगा यांचेशी गप्पा मारताना गेली काही दिवस एक मैफिल्,एक गझल अश्या तून काही सामूहिक गझलांची निर्मिती झाली. हीच कल्पना पुढे नेवून नियमित पणे तरही गझल रचाव्यात ह्या कल्पनेतून हा धागा सुरु करतोय.

ह्यात दर आठवड्याला एक ओळ देण्यात येईल व ती ओळ मतल्यातील सानी मिसर्‍यात चपखल बसवून गझल रचावयाची आहे. आपणा सगळ्यांचे यात स्वागत आहे.

आजची ओळ आहे.

ओळ क्र.१ = जाळुन उगी जिवाला,जगण्यात अर्थ नाही

वृत्त : आनंदकंद
काफिया : जगण्यात किंवा अर्थ
रदीफ : अर्थ नाही किंवा नाही
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२= सावली तुला दिली नि राहिलो उन्हात मी
वृत्त : चामर
काफिया : उन्हात
रदीफ : मी
लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.३= कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते
वृत्त : वियदगंगा
काफिया : वाटले
रदीफ : होते
लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ४ = तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र.६ = थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - चालायला, वाकायला, जायला, यायला, व्हायला वगैरे स्वरुपी ('आ'यला समान)

ओळ क्र.७ = वादात या कुणीही सहसा पडू नये
वृत्त - विद्युल्लता
रदीफ - नये
काफिया - पडू
लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा

ओळ क्र.८ = ठरेन या जगात मी,महान एकदा तरी ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : एकदा तरी
काफिया : महान
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र.९ = थेट माझ्या सारखा तो कोण होता ? डॉ.अनंत ढवळे यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : कोण होता
काफिया :सारखा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. १० = अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही
वृत्त : आनंदकंद
रदीफ = माणसे ही
काफिया = छळतात
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ११ = कोठे मनाला वाटतो आराम पहिल्यासारखा ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मंदाकिनी
काफिया - आराम, दाम, ठाम, उद्दाम वगैरे
अलामत - आ
रदीफ - पहिल्यासारखा
गागालगा गागालगा गागालगा गागालगा

ओळ क्र.१२ = षंढ म्हणती लोक सारे,ऊठ तू आता तरी
वृत्त - कालगंगा
काफिया = सारे,तारे,वारे,न्यारे,उतारे,दारे,यारे, वगैरे
अलामत -आ
रदीफ - ऊठ तू आता तरी
लगावली - गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र.१३ = माणसे व्यर्थ मी जतन केली ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त = लज्जिता
काफिया = जतन, गहन, सहन इ.इ.
अलामत - अ
रदीफ - केली
लगावली - गालगा गालगा लगागागा

ओळ क्र.१४ = विसरणेही तुझ्या लक्षात नाही ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - मृगाक्षी
मात्रा - १९
लगावली - लगागागा लगागागा लगागा
काफिया - लक्षात, गावात, रस्त्यात, कोणात, जात, आत इत्यादी
अलामत - आ
रदीफ - 'नाही'
किमान शेर - मतला धरून पाच

ओळ क्र.१५=अजूनही मी तुझ्याचसाठी जिवंत आहे ( श्री.भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ )
वृत्त - सती जलौघवेगा
लगावली - लगालगागा लगालगागा लगालगागा
मात्रा - २४
काफिया - जिवंत, महंत, संत, वसंत, आसमंत इत्यादी
अलामत - अं
रदीफ - 'आहे'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र.१६=आला पाउस गेला पाउस ( श्री .प्रसाद गोडबोले,''पंत'' यांची ओळ )
वृत्त - पादाकुलक
लगावली - गागागागा गागागागा

ओळ क्र.१७ = श्वासांचा या ब्रेक दाबता मृत्यूचे ये गांव मनोहर (उमेश कोठीकर यांची ओळ.)
वृत्त - गागागागा * ४ - किंवा ३२ मात्रांचे मात्रावृत्त
काफिया - मनोहर, घर, उत्तर, जर, तर, अंबर इत्यादी स्वरुपाचे
रदीफ - रदीफ नाही
अलामत - 'अ'
शेर - मतला धरून किमान पाच

ओळ क्र. १७ = खोल खोल आतवर तुझी नजर
वृत्त = श्येनिका
काफिया = नजर्,उदर्,अधर्,शहर इ.
अलामत = अ
रदीफ = नाही.गैरमुरद्दफ
लगावली =गालगाल गालगाल गालगा

ओळ क्र.१८ = काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
वृत्त = कालगंगा /देवप्रिया
काफिया = आनंदण्याची, ......... पेरण्याची,तारण्याची,वाकण्याची,अंधारण्याची इ.इ.
अलामत्=अ
रदीफ= कारणे
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.१९ = ही जगाची रीत नाही
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रददीफः नाही
लगावली : गालगागा गालगागा

ओळ क्र. २० = चांदणे आहे खरे की भास नुसता ?.......नचिकेत जोशी,आनंदयात्री यांची ओळ
वृत्त : मंजुघोषा
रदीफ :नुसता
काफिया :भास्,खास्,आभास्,त्रास्,इ..इ..
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.२१ = जगावेगळे मागणे मागतो मी......... नचिकेत जोशी ( आनंदयात्री ) यांची ओळ.
वृत्त : भुजंगप्रयात
काफिया : मागतो,ठेवतो,पाहतो ,बोलतो
रददीफः मी
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र.२२ =************************************************
वृत्त : सुमंदारमाला
काफिया : जावे,खावे,विसावे,जडावे इ.इ.
रददीफः कुठे
लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

ओळ क्र.२३ *********************************************************************************************************
वृत्त :तोटक
काफिया :खरा,जरा,बरा,धरा,करा
रदीफ : गैरमुरद्दफ
लगावली :ललगा ललगा ललगा ललगा

ओळ क्र.२४ :शेवटी संपायला आलीच ही एकांकिका......भूषण कटककर,''बेफिकिर'' यांची ओळ.
वृत्त - कालगंगा
रदीफ - गैरमुरद्दफ
काफिया - एकांकिका, मालिका, विका, शिका, टिका, राधिका, इत्यादी
अलामत - र्‍हस्व इ
शेर - मतला धरून पाच
लगावली = गालगागा गालगागा गालगागा गालगा.

ओळ क्र.२५ : या इथे कधी काळी देखणे शहर होते.......... बेफिकिर यांची ओळ
वृत्त : रंगराग
रदीफ : होते
काफिया : शहर्,गजर्,अधर्,पदर्,इ.इ.
अलामत : अ
लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा

ओळ क्र.२६ :कशास त्याची वाट पहावी,जे घडणे आहेच असंभव....... अमितदेसाई, बागुलबुवा यांची ओळ
वृत्त : वनहरिणी ( मात्रा वृत्त्, अष्ट मात्रिक ४ आवर्तने )
रदीफ : नाही..गैरमुरद्दफ
काफिया : असंभव्,अनुभव्,वैभव्,संभव्, उद्भव,

ओळ क्र.२७ : हा कोणत्या दिशेचा,आहे प्रवास अजुनी............नयना मोरे, मी_ आर्या यांची ओळ
वृत्त : आनंदकंद
रदीफ : अजुनी
काफिया : प्रवास्,भास्,तास्,निवास्,श्वास
लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र.२८ : तुझ्या पत्रातला मजकूर का ओलावला होता
वृत्त : वियदगंगा
रदीफ : होता
काफिया : ओलावला, पाणावला,भंडावला,पावला,धावला,इ.इ...
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र.२९ : सोड चिंता मीच माझे पाहतो आता '' कणखर'' यांचि ओळ
वृत्त : राधा
रदीफ : आता
काफिया : पाहतो,वाहपाहतो,वाहतो,साहतो,राहतो,नाहतो
लगावलि : गालगागा गालगागा गालगागा गा

ओळ क्र. ३०: जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे.
वृत्त : वियदगंगा
रदीफ : आहे
काफिया : रेंगाळतो,जाळतो,टाळतो,हेटाळतो
लगावली :लगागागा लगागागा लगागागा लगागागा

ओळ क्र. ३१: हृदय एवढे धडधडत का असावे?
वृत्त :भुजंगप्रयात
रदीफ : असावे
काफिया : सौतीकाफिया " आ'' कारान्त स्वरकाफिया
लगावली :लगागा लगागा लगागा लगागा

ओळ क्र. ३२: कितीक प्रश्न का असे अनुत्तरीत राहिले ? डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : कलिंदनंदिनी
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : राहिले,पाहिले,साहिले,वाहिले,दाहिले,
लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा

ओळ क्र. ३३: जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे डॉ.राम पंडित यांची ओळ.
वृत्त : देवप्रिया
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : माझ्यासवे, चालवे,आसवे, कालवे, काजवे,आठवे, जाणवे,पारवे,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३४: पिंजर्‍याला मानती आकाश रावे गझलसम्राट सुरेश भट यांची ओळ.
वृत्त : मंजुघोषा
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : रावे, व्हावे, असावे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३५ : येत जा देवून थोडी कल्पना
वृत्त : मेनका
रदीफ : गैरमुरद्दफ
काफिया : कल्पना,प्रार्थना,वंचना,वासना,साधना,कामना,वेदना
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३६ : दाटते आहे निराशा फार हल्ली
वृत्त :मंजुघोषा
रदीफ : हल्ली
काफिया : फार्,चार्,आजार्,बाजार्,व्यापार.....
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र. ३७ : आज आहे नेमका शुद्धीत मी
वृत्त : मेनका
रदीफ : मी
काफिया : शुद्धीत्,रीत्,प्रीत्,विपरीत्,गीत्,भीत्,आश्रीत,
लगावली : गालगागा गालगागा गालगा

khal.jpg

ओळ क्र. ३८ : चालला आहे कशाचा खल इथे
वृत्त : मेनका
रदीफ : इथे
काफिया :खल्,चल्,निश्चल्,बल्,कल्,दल्,कोलाहल
लगावली : गालगागा गालगागा गालगा

ओळ क्र. ३९ : सारे जुनेच आहे काही नवीन नाही....... शाम यांची ओळ.
वृत्त : आनंदकंद
रदीफ :नाही
काफिया : नवीन्,लीन्,दीन.विहीन्,हीन्,लगीन्,तीन्,अधीन्,मशीन,
लगावली :गागाल गालगागा गागाल गालगागा

ओळ क्र. ४० :कवेत माझ्या अखेरचे, भिजून तू विरघळून जा.... रसप यांची ओळ.

लगावली - लगालगागा लगालगा - यती - लगालगागा लगालगा

वृत्ताचे नांव - ज्ञात नाही, कोणाला ठाऊक असल्यास कृपया नोंदवावेत.

काफिया - विरघळून / जळून / पळून / वळून इत्यादी

अलामत - 'ऊ' (दीर्घ ऊकार)

रदीफ - जा

ओळ क्र. ४१: आजही जखमेत माझ्या वेदना तितकीच आहे
वृत्त : व्योमगंन्गा
रदीफ : तितकीच आहे
काफिया : वेदना , साधना, वन्चना,
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

ओळ क्र.42 : सुरू होतील आता वादळे माझ्या विचारांची ( वैभव वसंत कुलकर्णी यांची ओळ )
वृत्त : वियद्गंगा
लगावली: लगागागा लगागागा लगागागा लगागागा
काफिये: ताज्या, माझ्या, साध्या , गेल्या
अलामत : तंत्रानुसार आ ह्या स्वरांतयमकाची अलामत..बाकी त्याच्या आधीच्या अक्षरावर आलेली जोडाक्षरातील उछारात येणारे वजन हेही अलामतीसारखे वारंवार येणारे ठरावे अश्या काफियांची अपेक्षा !!
रदीफ : विचारांची

ओळ क्र.४३ : आतला माणूस माझ्या जळत आहे.
वृत्त : मंजुघोषा
काफिया : जळत्,कळत्, वळत्,पळत्,हळहळत
रदीफ : आहे
लगावली : गालगागा गालगागा गालगागा

गुलमोहर: 

माझाही खारीचा वाटा....

हसावे तू .., तुझ्यासाठी रडावे वाटले होते
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

पुन्हा हा आठवांचा घोळ मी घालायचा नाही
मलाही तू जरासे आठवावे वाटले होते

कशाला तीच खोटी कारणे (?) भांबावलो आहे
तुझ्या रागावण्यासाठी रुसावे वाटले होते

जगाला काय सांगावे नवे आभास दु:खांचे
तुझ्या हास्यात मी गुंतून जावे, वाटले होते

जगाचे बोलणे आता मला ऐकायचे नाही
तुझ्या ओठावरी तेव्हा ठसावे वाटले होते

अताशा वेड हे माझे मलाही पेलणे नाही
विशाला, का तुला तेव्हा हसावे वाटले होते?

हि गझल इथेही वाचता येइल.

तुझ्या उष्ट्यात उष्टाऊन जगणे बाटले होते
कधी काळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते

नभाचे हासणे जेव्हा छताच्या आत ओघळले
'बिलोरी स्वप्न जिरवावे' मनाने घाटले होते!

जरी ताजेच होते रक्त सार्‍या पुर्वजांचे त्या
तरीही तेच तळवे सज्जनांनी चाटले होते

तिच्या सार्‍याच अश्रुंना दिली मी ऊब ओंजळभर
तिला कळलेच नाही नभ इथेही दाटले होते

खर्‍या त्या घोषणा होत्या रुपेरी अर्धपुतळ्याच्या
हबाला प्रश्न हा की 'हात का ते छाटले होते?'

वाहवा हबा.... फार छान गझल.. Happy

वरील तरहीवर अजून केलेल्या रचना खालील लिंक्स द्वारे देत आहे.

http://www.maayboli.com/node/22418 विजय पाटील यांची गझल.

http://www.maayboli.com/node/22428 बेफिकिर यांची गझल

http://www.maayboli.com/node/22452 शरद यांची गझल

तुझ्या डोळ्यात माझे जग असावे वाटले होते;
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते.

जरी भात्यात होती राख ओली साचली माझ्या;
निखार्‍याला पुन्हा या का फुलावे वाटले होते.

तुझ्या माझ्या क्षणांच्या आठवांनी मोडले जेव्हा;
मला तू अन् तुला मी पांघरावे वाटले होते.

कशाला भावनांचे खेळ सारे मांडले वेडे;
जरा अर्थ तुला माझे कळावे वाटले होते.

कुणाला दोष द्यावा आज येथे ना कळे आता;
तुझ्या माझ्यातले अंतर मिटावे वाटले होते.

चांगली गझल कमलेशजी..

कशाला भावनांचे खेळ सारे मांडले वेडे;
जरा अर्थ तुला माझे कळावे वाटले होते

या शेरात दुसर्‍या मिसर्‍यात व्रूत्तभंग झाला आहे. ...

नवीन तरही....

तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
वृत्त : हिरण्यकेशी
काफिया : नकार
रदीफ : आहे
लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा

*या आठवड्याची तरही*

हजार होड्या मिळून येवो, तरावयाला नकार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

तिनेच तेव्हा सुरेल गाणी तिच्या मनातुन पिटाळलेली
तिच्याच दारी पुन्हा विरहणी म्हणावयाला नकार आहे

मरण नको मज इथे नको या धरेस वंदन विभक्ततेच्या
अश्या दळ्यांच्या रणांगणी तर हरावयाला नकार आहे

फळावयाचे असेल तर हे कुरण तुझ्या सोयिचेच नाही
इथे दुधाच्या जनावरांना चरावयाला नकार आहे

पितील ते झिंगतील ते अन पुन्हा गझल अवतरेल त्यांची
हबा तुझ्या मैफिलीस प्याला भरावयाला नकार आहे

-हबा

घ्या डॉक्टर साहेब, तरही .... हजलचा मतला. Happy
जगावयाला होकार मिळाल्यावर बाकी शेर सादर करेन यथावकाश.

मिळकत नाही मुळीच माझी तुला पुरेसा पगार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

कधी काळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते,ही ओळ वापरुन केलेली आनंदयात्री यांची गझल.

http://www.maayboli.com/node/22800

नव्या तरहीवरील क्रांती यांची गझल.

http://www.maayboli.com/node/22806

मरुन अस्तित्वहीन होण्या,तुझ्याचसाठी तयार आहे
तुझ्याविना या जगात माझा,जगावयाला नकार आहे

धरून सूर्यास आणले अन ,हजार तेजाळले दिवेही
असा कसा दूर व्हावयाचा,मनातला अंधकार आहे

अचूक आले तुझे नयन बाण्,येथ घायाळ जाहलो मी
शिकार गेलो करावयाला,स्वतःच झालो शिकार आहे

नको धरु आज हात माझा,कठोर ही बाब आठवावी
जगावयाचा प्रवास माझा उद्या तसा संपणार आहे

कधीच कर्जात राहिलो ना ,म्हणून ”कैलास” अंत आला
जगू कसे हे जिणे तसे तर तुझ्याकडूनच उधार आहे

ही माझी रचना. आपल्याला इथे सुद्धा वाचता येईल.

http://www.maayboli.com/node/23051

या आठवड्याची तरही

ओळ क्र.५ = दु:ख आता फार झाले
वृत्त : मनोरमा
काफिया : फार
रदीफ : झाले
लगावली : गालगागा गालगागा

दु:ख आता फार झाले

स्वप्नही लाचार झाले
दु:ख आता फार झाले

झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले

झुंजण्याची वेळ येता
मर्द तेही नार झाले

झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले

खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले

पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले

बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले

उत्तरांना पेलताना
प्रश्नही बेजार झाले

“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद आता बार झाले

...............गंगाधर मुटे.............

झुंजण्याची वेळ येता
मर्द होते नार झाले

उत्तरांना पेलताना
प्रश्नही बेजार झाले

क्या बात है !!! छान शेर.आवडले.

झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले..........इथे ''तसबिरींचे हार झाले'' हे कसे वाटेल? फोटोंचे हार झाले हाच अर्थ आपणास अपेक्षित आहे ना?

सोसण्याच्या पार झाले,
दु:ख आता फार झाले!

काय शस्त्राची बढाई?
पाहण्याने वार झाले!

एकदा झाल्या चुकीचे
कैकदा उद्धार झाले!

एक पाकोळी जळाली,
कोण हाहा:कार झाले!

सांग चुकवावे कितीदा?
वार वारंवार झाले

ये, सुखाला साद घालू,
दु:ख आता फार झाले!

काय शस्त्राची बढाई?
पाहण्याने वार झाले!.........व्वा !!

ये, सुखाला साद घालू,
दु:ख आता फार झाले!

फार दमदार शेर.... Happy

क्रांती,आपण वेगळा धागा काढून ही गझल प्रकाशित करावी. Happy

******************
******************

ओळखीचे यार झाले
दु:ख आता फार झाले

बंद विठुचे दार झाले
दान देणे भार झाले

गुंतलो मी..संपलो मी
रेशमी आजार झाले

केस ओले स्तब्ध गात्रे
अन हवेसे वार झाले

का अशी नाराज झाली
डांव खेळुन चार झाले

गज़ल पुन्हा वाच राजा
नाटकी उच्चार झाले...

आण घालू मी कशाची
देवही नादार झाले !!!!

******************
******************

बेफिकिर यांची गझल..

http://www.maayboli.com/node/23127

हबा यांची गझल

http://www.maayboli.com/node/23119

मी मुक्ता यांची गझल

http://www.maayboli.com/node/23124

निशिकांत यांची गझल

http://www.maayboli.com/node/23124

मुटेजी,गिरिश कुलकर्णी व क्रांती यांच्या गझला वर प्रतिसादात आहेतच. Happy

हा धागा खूप महत्वाचा आहे.

कैलासराव,

मनातील काही विचार लिहीत आहे. आग्रह नाहीच!

१. हा धागा मुखपृष्ठावर दिसेल यासाठी प्रशासकांना विनंती करावीत. कारण या धाग्याबरहुकूम केवळ नवीन गझलाच आल्या असे नाही तर एक उपक्रम यशस्वीरीत्या राबवल जाण्यास सुरुवात झालेली आहे.

२. माझ्या अंदाजाने तरही मिसरा हा मतल्यातील दुसरा मिसरा म्हणून योजत असत. तसा कायदा असला तरीही तो मोडल्यास काही फरक पडणार नाहीच. पण शक्य असल्यास गझलकारांनी तो मिसरा मतल्यातच दुसरा मिसरा म्हणून घ्यावा असे एक मत आपण लिहावेत.

३. या गझला इतर संकेतस्थळांवर प्रकाशित करणे हा ज्याचा त्याचा हक्कच आहे. कारण दिलेली एक ओळ सोडली तर बाकी सर्व कारागिरी व आशयसौंदर्य हे त्या त्या गझलकारांचेच असते. पण मल असे वाटते की इतरत्र या गझला प्रकाशित करण्यात तितकीशी मजा कदाचित येणार नाही. हा उपक्रम मायबोलीपुरताच ठेवल्यास अधिक संदर्भयुक्त राहील असे मत आहे. अर्थात, याबाबत कोणताही आग्रह धरण्याचा अधिकार मला अजिबात नाही.

चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

भूषणजी,धन्यवाद.
अगदी मनातलं लिहीलं आहे आपण.

प्रशासकांना विनंती त्यांच्या विपुत जावून करतो आहे.

आपण सांगीत ल्या प्रमाणे ओळ कोणत्याही शेरात बसवावी... मतल्याच्या सानी मिसर्‍यातच असावी असा आग्रह काढून टाकत आह्वे.

आणि सर्व प्रतिसादकांस व गझलकारांस विनंती की आपण लिहीलेली तरही गझल इथेच लिहून चर्चिल्यास मायबोलीचा संदर्भ राहील. अर्थात इतरत्र प्रकाशनाचे स्वातंत्र्य आपले आहेच.

Pages